(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

हरवलेलं बाळ 

तेजोमयीची बहीण कल्याणी नुकतीच परदेशी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. तिला पोहचवायला आई बाबांसमवेतच तेजोमयीही विमानतळावर गेली.

विमानतळाच्या आतमध्ये जाण्यासाठी काही कालावधी असल्याने चौघेही जण विमानतळाला  लागून असलेल्या एका बागेतील बाकावर गप्पा मारत बसले. त्यांच्या गप्पा सुरु असतानात तिथे एक गोंडस असा डॉगी आला. तो त्यांच्या भोवती घुटमळू लागला. हा डॉगी श्रीमंताच्या घरच्या दिसत होता. कारण त्याला छान सजवण्यात आलं होतं. त्याच्या पायात सुबक डॉगी बूट होते. मानेवरच्या केसाची सुंदर वेणी केली होती.

तो डॉगी बघून चौघांनाही आनंद झाला. कल्याणीने त्यास जवळ बोलावले. तो चटदिशी तिच्या कुशीत शिरला. तो भेदरलेला दिसत होता. सारखा इकडे तिकडे बघत होता. एखाद्या जत्रेतील गर्दीत लहान मूल आईबाबांपासून हरवल्यावर त्याची जशी स्थिती होत असावी, तशी त्या डॉगीची झाली होती. आईने पाणी प्यायला दिले तर त्याने त्यास तोंडही लावले नाही. त्याचा चेहरा मलूल झाला होता.

नक्कीच हा त्याच्या मालकीन आई किंवा बाबांपासून हरवला असला पाहिजे. बाबा म्हणाले.

लोकांची पण कमाल आहे. मी म्हणते, इतक्या गर्दीत आणायचं तरी कशाला अशा मुक्या जिवांना, आई काळजीच्या सुरात म्हणाली.

आता हो काय बाबा,कल्याणीने विचारलं.

थोडा वेळ वाट बघू, नाही तर विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकू यास. बाबा म्हणाले.

पण तशी काही वेळ आली नाही, कारण त्या डॉगीची मालकीन आई हाश हुश करत डॉगीला शोधत तिथे आली. तिला बघताच डॉगीने आनंदाने तिच्याकडे झेप घेतली.मात्र त्या मालकीन बाईने, यू फूल,यू रॉस्कल म्हणून डॉगीला ‍झिडकारले आणि त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली.

तुला काही कळत नाही.       मूर्खासारखा इकडे तिकडे भरकत राहतो. माझ्या जीवाला किती घोर लागून गेलाय वगैरे अशा आशयाचं बोलणं आणि त्याला शिव्या देणं सुरु होतं. फक्त मारायचं तेवढं त्यांनी शिल्लक ठेवलं. तिचं शिव्या प्रकरण जेव्हा फार वाढलं आणि डॉगीचा चेहरा आणखी मलूल होऊ लागला तेव्हा न राहवून आई ,त्या डॉगिच्या मालकीन आईस म्हणाली.

हे बघा ताई, मला काही बोलण्याचा अधिकार नाही. पण हे मुके जीव आपल्या लहान लेकरांसारखेच असतात. अशा गर्दीत आपल्या लेकरांनाच काही सुचणार नाही, तर याचा तर काहीच प्रश्न नाही. त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष झालं म्हणूनच तो भरकटला ना..त्याला बोलता येत नाही, त्यामुळे तो तुम्हाला शोधत इथे आला.इथे शहाण्यासारखा बसून राहिला. या गर्दीत नि वाहनांच्या चहलपहिलीत त्याचं काही झालं असतं तर…

आईच्या या बोलण्याचं त्या मालकीन आईंवर परिणाम झाला असावा. त्यांनी त्या डॉगीस पटकन उचलले नि त्याचं लाड करत त्याला सॉरी म्हंटलं…मात्र आईला थँक्यू न म्हणताच त्या निघून गेल्या. त्यांच्या कडेवरचा डॉगी आईकडे पुन्हा पुन्हा वळून बघत होता…त्याच्या डोळयात थँक्यूचे भाव आईला दिसले..ते बघून आईच्या डोळयात अश्रू आले…

सुरेश वांदिले