मिशन एक्स
खरं तर तेजोमयीचा पहाटेच्या स्वप्नांवर फारसा विश्वास नाही. ती विज्ञानाची विद्यार्थीनी. त्यातही गणितात विशेष आवड. त्यामुळे कोणत्याही आभासी गोष्टींमध्ये तिला रस वाटत नसे. विज्ञानाचा पाया गणित असल्यानं आणि ते सिध्द करावं लागत असल्यानं तिला स्वप्न बिप्न भाकड कथाच वाटायच्या. म्हणे, पहाटेची स्वप्नं साकार होतात. समजा पहाटे स्वप्न पडलं की मी, १० वीत पहिली मेरिट येईल? तर हे स्वप्न काय आपोआपच साकार व्हायचं? नाही ना. त्यासाठी मला अभ्यासच करावा लागेल. हॅागवर्ट येथील जादुच्या शाळेत शिकणाऱ्या हरमॉयनीला सुध्दा खूप अभ्यास केल्यामुळेच हॅरी (पॉटर) , त्याचे मित्र मंडळी आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा सर्वाधिक गुण मिळायचेत ना. असं तिने एकदा स्वप्ना विषयीच्या एका निबंधात आपलं मत नोंदवलं होतं.
त्यामुळे झोपेत पहाटे पडणाऱ्या स्वप्नांविषयी ती कधी बोलायची नाही किंवा घरच्या किंवा बाहेरच्या मंडळींमध्ये अशा स्वप्नांची चर्चा सुरु झाली तर त्यात सहभागी व्हायची नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करायची.
मात्र, परवा तिला झोपेत एक असं स्वप्न पडलं की, त्यामुळे तिची झोप खरोखरच उडाली.
आधी तिने या स्वप्नाबद्दल स्वत:चीच टर उडवली. आरशासमोर उभी राहून स्वत:ला वेडावून घेतलं. गणिताच्या भाषेत स्वप्न बसत नाही. असंही स्वत:ला बजावलं. पण तिला पडलेलं स्वप्न काही तिचा पिच्छा सोडेना….
०००
असं कधी झालं नव्हतं. मग आजच कां बरं हे विपरीत घडावं? हा प्रश्न तिने स्वत:ला केला. तेव्हा ते स्वप्न उघड्या डोळ्यांसमोरही दिसू लागलं. तेव्हा मात्र जरा ती दचकली.
हे असं कां घडतय, यावर तिचं मंथन सुरु झालं.. जी दृष्य दिसताहेत त्याची काही संगती लावण्याचा प्रयत्न करु लागली.
एक मोठी फौज गुप्तपणे कुठेतरी निघाल्याचं दिसत होतं. कुणाची बरं असेल ही फौज? तेजोमयी स्वत:शी बोलली. याचं उत्तर काही तिला देता आलं नाही. डोळे मिटून त्या फौजेचं दृष्य डोळयासमोर ती आणू लागली. करोना विषाणू सारख्या विषाणूंची ती फौज वाटत होती. पहिला करोना, त्यानंतर त्याचा रुपांतरीत भाऊ किंवा बहीण, त्यानंतर डेल्टा करोना त्यानंतर डेल्टा प्लस करोना आणि त्यानंतर अशा असंख्य रुपांतरीत करोनाची ती फौज होती. अत्यंत शिस्तबध्द रितीने पण प्रचंड रागाने मार्गक्रमण करत होती.. कुठे जात असावी बरं ही फौज? तेजोमयीला प्रश्न पडला..पण या प्रश्नाचंही उत्तर तिला देता आलं नाही.
०००
स्वप्नातल्या आभासी जगात घडणाऱ्या घडामोडींचं उत्तर कसं काय बरं देता येणार? असा प्रतिप्रश्न तेजोमयीनं स्वत:ला केला. या फौजेला नजरेपासून दूर करण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र त्या रात्री परत ही फौज तिच्या स्वप्नात आली. ती दचकून जागी झाली.
याचा खरच काही तरी अर्थ असू शकेल काय? तीचं विचारचक्र गतिनं फिरु लागलं. ही फौज कुठे जात असेल याच्या शक्यता आपण लिहून काढल्या तर.. तिला सुचलं.
त्याप्रमाणे ती लॅपटॉप उघडून मुद्दे लिहू लागली.. (१) ही फौज पुन्हा एकदा कोणत्या तरी राष्ट्रावर आक्रमणासाठी निघाली असावी.
(२) मानवाने करोनाच्या विरुध्द लस शोधल्याने आता पृथ्वीवरुन निघून जायला हवं म्हणून रागारागाने परतीच्या मार्गास लागली असावी. (३)
किंवा मग ज्या शास्त्रज्ञाने ही लस शोधून काढली त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी फौज निघाली असावी…
तिसरी शक्यता लिहून पूर्ण होताच क्षणी ती शहारली..
लस शोधणाऱ्या संशोधकांवर मारा करुन, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी या उक्तीनुसार कृती करण्यासाठी या करोना फौजेला आज्ञा तर मिळाली नसावी ना…असं जर असेल तर करोना विषाणू वरील लसीचं संशोधन धोक्यात येऊ शकतं. याचा अर्थ मानव जात संकटात येऊ शकते. अशा कल्पनेचा विस्तार तेजोमयीच्या मनानं केला..
छे छे, अशी स्वप्नं म्हणजे भाकड कथाच असतात. कशाला त्यात आपण गुंतायचं. असं स्वत:ला समजावून तेजोमयीनं लॅपटॉप बंद केला. ती झोपी गेली. काही काळाने तिला झोप लागली. मात्र तिला पहाटे पुन्हा स्वप्न पडलं..करोनाची फौज ज्या दिशेने गेली होती त्याच्या विरुध्द दिशेने परतत होती. त्यांचा राग मावळल्याचं जाणवत होतं.. आनंद आणि उत्साहात ही फौज होती.
हे काय भलतच, असं स्वत:लाच सांगत तेजोमयी जागी झाली. फौज जाऊन परततेय याचा अर्थ त्यांचं जे मिशन होतं, ते पूर्ण झालं की काय? तिच्या मनात प्रश्न आला. घाईघाईने उठून ती दिवाणखान्यात आली. तिने कमी आवाजात टीव्ही सुरु केला. बातम्यांसाठी सीएनएन वाहिनी लावली.
ब्रिटनमध्ये एकच हलकल्लोळ माजला होता. प्राध्यापक सारा गिलर्ब्ट या मध्य रात्रीपासूनच त्यांच्या राहत्या घरातून गायब झाल्या होत्या. या प्रा. सारा गिलर्ब्ट म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठात करोना विषाणूविरुध्दच्या लस शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केलेल्या विषाणूशास्त्राच्या संशोधक. त्यांच्या संशोधनातून ॲस्ट्रा झेन्का या लसीचा शोध लागला. आतापर्यंत निर्मिती झालेल्या लसींमध्ये ही लस सर्वात प्रभावी असल्याचं सिध्द झालं होतं. याचा तर धसका करोना विषाणूने घेतला नसावा.. आपल्या पुढच्या अवतारांचा प्रभाव कमी किंवा शून्य करुन टाकणाऱ्या लसीचा जर प्रा. सारा यांनी शोध लावला तर..तर…असं करोना विषाणूच्या म्होरक्यास किंवा सरदारास वाटू शकतं. त्यावरचा एकमेव उपाय म्हणून त्याने आपल्या फौजेला प्रा. सारा यांचं अपहरण करण्याचा आदेश दिला तर नाही ना..तेजोमयी स्वत:शीच जोरानं बोलली.. या कल्पनेनं तिच्या अंगावर काटे आले. ओह नो, करत ती जोरात ओरडली.
या ओरडण्याने आई-बाबा तिच्या खोलित धावत आले.
तिला त्यांनी उठवलं.
काय गं, असं कोणतं भीतीदायक स्वप्न तू बघत होतीस..आईनं विचारलं.
म्हणजे ते स्वप्न होतं..अरे देवा..
काय झालं.. आई- बाबांनी तिला एकाच वेळी विचारलं..तेव्हा तिने सारं काही कथन केलं.
याचा अर्थ तू एका स्वप्नात दुसरं स्वप्न बघत होतीस तर..बाबा तिचा गालगुच्चा घेत म्हणाले. तेव्हा कुठे तिच्या ते लक्षात आलं.
याचा अर्थ करोना विषाणूसारखा स्वप्नाचाही गुणाकार व्हायला लागला म्हणायचा. पण बाबा, जे स्वप्नात दिसलं, त्याची काही संगती लागतेय का, तुम्हाला? तेजोमयीनं विचारताच बाबा काही क्षण स्तब्ध झाले..
अशा स्वप्नांना कितपत हवा द्यायची. हा प्रश्नच असतो.. ते सुध्दा तेजोमयीच्या विचाराचे होते..पण सध्याचा काळ अनिश्चतेचा असल्याने काहीतरी हालचाल करायला हवी असं बाबांना वाटलं.
म्हणजे काय करायचं बाबा. तेजोमीयनं विचारलं.
आपण प्रा. सारा यांना एक मेल लिहू. या स्वप्नातील घटनांचा आधार घेऊन..
पण त्या आपला अनोळखी मेल बघतील का बाबा.
अगं, त्या नक्कीच मेल बघतील. कारण ॲस्ट्रा झेन्काचा शोध घेण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अशाच एका मेलने झाला होता.
काय सांगता …तेजोमयी आणि आईने आश्चर्य व्यक्त केलं. दोघींची उत्सुकता खूप वाढली. त्या दोघेही सरसावून बसल्या.
बाबा सांगू लागले..
३१ डिसेंबर २०१९ च्या मध्यरात्री प्रा. सारा यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतील काम संपवलं. संगणक बंद करत असताना, त्यांच्याकडे एक मेल आला. त्यांना त्यावेळी तसा कंटाळाच आला होता. उद्या बघू असं म्हणत असताना त्यांनी कंटाळा बाजुला सारुन मेल वाचायला सुरुवात केली. चीन देशातील वुहान शहरात एका अनामिक आजारानं चार व्यक्ती प्राण गमावून बसल्याची, त्या मेल मध्ये माहिती होती…. संगणक बंद करुन त्या घरी परतल्या..दुसऱ्या दिवशी पासून वुहानमधील मृत्यूची संख्या वाढतच असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. हा एक नवा आजार असल्याचं लक्षात येऊ लागलं. जागतिक आरोग्य संघटनेनं वर्षभरापूर्वी असा एखादा, डिसिज (आजार) एक्स (अनोळखी) जगभर उच्छाद मांडू शकतो असं सर्व शास्त्रज्ञांना मेल करुन कळवलं होतं. प्रा. सारा यांना ते आठवलं. मग त्यांच्यातला विषाणूशास्त्रज्ञ जागा झाला..पुढचा इतिहास साऱ्यांनाच ठाउुक आहे. अथक परिश्रमानं त्यांनी ॲस्ट्रॉ झेन्काची निर्मिती केली..
याचा अर्थ बाबा, करोना विषाणूला हरवण्याचं जैव शास्त्रीय तंत्र त्यांनी अवगत केल असच नाही का?
अगदी बरोबर..
याचा दुसरा अर्थ असाही नाही का..की हा करोना विषाणू कितीही रुपांतर करु लागला तरी प्रा. सारा जैवशास्त्रीय तंत्राचा वापर करुन आणखी प्रभावी लस शोधू शकतात,
अगदी बरोबर..
याचाच तिसरा अर्थ असाही नाही का.. त्यांना आणखी प्रभावी लस शोधताच येऊ नये म्हणून कुणीतरी त्यांचच अपहरण करण्याचा कट रचला असेल तर? माझ्या स्वप्नातली करोना विषाणूची फौज तसंच तर सांगत नसावी….
तेजोमयीच्या या कथनाने बाबा खरोखरच दचकले. त्यांनी लॅपटॉप सुरु केला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विषाणूशास्त्र विभागाचा शोध घेऊन प्राध्यापक सारा यांचा मेल ॲड्रेस मिळवला त्यांनी सावधगिरी बाळगावी. काळ वाईट आहे, अशा आशयाचा मेल त्यांना पाठवला….
सुरेश वांदिले