वर्गशिक्षक मनोहरराव देशपांडे यांनी विनयला विचारलं की, ‘तुझं स्वप्न काय किंवा तुला भविष्यात काय व्हायचय ?’ विनयने या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते ऐकून त्यांना महद्आश्चर्य वाटलं. जेव्हा विनयनं आणखी विस्तृतपणे आपल्या स्वप्नाचं वर्णन केलं, तेव्हा तर त्यांना धक्का बसता बसता राहिला.
विशेषत: आठवी-नववीमध्ये असलेल्या बहुतांश मुलांना एकतर डॉक्टर व्हावसं वाटतं किंवा मग इंजिनीअर. आणखी एकदोन क्षेत्रं सोडली तर त्यापलिकडे मुलं बघत नसल्याचं देशपांडे सरांना इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर चांगलंच ठाऊक झालं होतं.
गेली अनेक वर्षे ते आठवीचे वर्गशिक्षक होते. दरवर्षी शेवटच्या सत्रातील एके दिवशी विद्यार्थ्यांना तुमची स्वप्नं काय, भविष्यात तुम्हास काय व्हायला आवडेल, असं विचारुन मुलांच्या मनात काय चाललय याचा ते अदमास घेत. तसं मग प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनाही कळवत. मुलांचा ॲप्टिट्यूड म्हणजेच भविष्यातील करिअर वा शिक्षणाच्यादृष्टिने कल जाणून घेण्याची ही त्यांची पध्दत होती. त्यादिवशी ते विद्यार्थ्यांना बोलकं करुन त्यांच्या स्वप्नाविषयी जाणून घेत. त्यांना विविध करिअरची माहिती देत. विद्यार्थ्यांमधील एखादा विशिष्ट गुण बघून, तू हे करायला हवस, ते करायला हवस असही सांगत.
परवाच, त्यांनी यंदाच्या आठवीतील विद्यार्थ्यांना तुम्ही भविष्यात काय होणार, असा प्रश्न विचारला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचं त्याचं स्वप्न सांगितलं. नेहमीप्रमाणेच बहुतेक विद्यार्थ्यांना डॉक्टर ,इंजिनीअरच व्हायचं होतं. पण विनयनं सांगितलं की त्याला टूर गाइड व्हायचय. त्यातही तो जेव्हा पुढं म्हणाला की त्याला स्पेस टूर गाइड आणि विशेषत: चंद्रसफर गाइड व्हायचय तेव्हा मात्र देशपांडे सर त्याच्याकडे काहीक्षण बघतच राहिले.
मुळात असं एखादं करिअर असतं किंवा असू शकतं असा विचार त्यांनी स्वप्नातसुध्दा केला नव्हता. तसे तेही पारंपरिक करिअरचीच माहिती सांगायचे. त्यात मग शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अध्यापक ,वैमानिक, कलेक्टर, पोलीस अधिकारी, मागच्या एकदोन वर्षापासून पत्रकारितासुध्दा हा करिअरचा एक पर्याय असल्याचं विद्यार्थ्यांना सांगू लागले होते. पण स्पेस टूर गाइड ही संकल्पना त्यांच्यासाठी अक्षरश: नवी होती.
” विनय, तुझं स्वप्न छान आणि वेगळं आहे रे, पण स्वप्न अशी बघावीत की जी आपणास सत्यात उतरवता येतील.”
“सर, अशक्यप्राय स्वप्न बघा नि त्याचा पाठलाग करा म्हणजे ती नक्कीच साध्य होतील असं, आपले माजी राष्ट्रपती डॉ.एपिजे अब्दूल कलाम सांगायचेत ना.” विनय म्हणाला.
“ते अगदी बरोबरच आहे विनय, पण त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ असा होता की, साध्य होऊ शकतील अशीच अशक्यप्राय स्वप्न बघा. कल्पनेत स्वप्नांचे मोठमोठे इमले बांधता येतात, ते तेव्हढ्यापुरतेच मर्यादित ठेवा.”
“पण सर, हा तुम्ही काढलेला अर्थ आहे.”
विनय असं सहज बोलून गेला. पण त्याचा देशपांडे सरांना राग आला. विनय जरा जास्तच आगावू झालाय असं त्यांना वाटलं. ते तसं काही बोलले नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी काही लपून राहिली नाही. विनयचं ते वाक्य त्यांना बऱ्यापैकी झोंबलच. पुढचं त्यांच्याकडून शिकवेना वा त्यांना इतरांना काही प्रश्न विचारावे वाटेना, म्हणून त्यांनी वर्गातलं हे करिअर मार्गदर्शन थांबवलं.
०००
विनयचं ते वाक्य त्यांच्या मनातून काही जाईना. विनयचं स्वप्न वेगळं होतं, पण ते त्यांच्यादृष्टिने विचित्र आणि अशक्यप्राय होतं. असल्या स्वप्नात गुंतून विनयसारखा हुषार मुलगा वाया जाऊ शकतो. त्याचं अभ्यासातून लक्ष कमी होऊ शकतं. त्यामुळे तो नापासही होऊ शकतो. त्यातून त्यास नैराश्य येऊ शकतं, असही देशपांडे सरांना वाटायला लागलं. हे गुणी पोर असं वाया जाण्याआधी त्याच्या घरी या स्वप्नाविषयी सांगायला हवं, असा विचार करुन ते एके दिवशी विनयच्या घरी गेले.
विनय आणि त्याच्या आईबाबांना देशपांडे सरांचं असं अचानक घरी येणं कोड्यात टाकणारं आणि अचंबीत करणारं ठरलं. देशपांडे सरांचं आगतस्वागत झाल्यावर विनयच्या बाबांनी त्यांना येण्याचं प्रयोजन विचारलं.
विनयने काही गंभीर चूक केली की काय, असं आईबाबांना वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून देशपांडे सर हसत हसत म्हणाले,
” तुम्ही समजता तसं काही वाईटसाईट विनयच्या हातून घडलेलं नाही.” आईच्या बाजूलाच बसलेल्या विनयला सरांची ही प्रतिक्रिया ऐकून खूप बरं वाटलं.
“मग काय झालं हो? असं तुम्ही आमच्याकडे अचानक आल्यानं माझं काळीज धडधडायलाच लागलं.” विनयची आई म्हणाली.
“अहो, तसं काहीही नाही. विनय हा अत्यंत गुणवान मुलगा. आमच्या शाळेसाठी तर तो हिराच आहे.”
” मग काय झालं?”आता बाबांनी अधिरतेनं विचारलं.
सरांनी, विस्तृतपणे परवाची वर्गातली करिअरचर्चा सांगितली. विनयच्या स्वप्नाचं सुतोवाच केलं.
“विनयला, स्पेस टूर गाइड किंवा चंद्रसफर गाइड व्हायचय. हे अशक्यप्राय स्वप्न असल्याचं मला वाटतं. विनयसारख्या अत्यंत तल्लख आणि बुध्दिवान मुलानं असं स्वप्न बघणं, मला स्वत:ला तरी योग्य वाटत नाही. तो याचाच सतत विचार करत राहिला तर त्याच्या पुढील शिक्षणावर परिणाम व्हायचा. तो इतका हुषार आहे की नक्कीच आयआयटीत जाऊ शकतो. पण हे टूर गाइड होण्याचं त्याचं स्वप्न त्याला आयआयटीपासून दूर नेऊ शकतं.” सर एका दमात बोलून गेले.
“सर, काय म्हणतात ते खरंय का?”, विनयचे बाबा किंचित चढ्या आवाजात त्याला विचारते झाले.
विनयने होकारार्थी मान हलवली.
“अरे, तुझ्याकडून किती अपेक्षा ठेवल्या आहेत आम्ही आणि तुला भिकेचे डोहाळे सुचताहेत”, असं काहीसं आईस बोलावसं वाटलं.” पण सर समोर असल्यानं त्या गप्प बसल्या. विनय स्वत:ला जरा जास्तच शहाणा समजायला लागलाय. अशी अव्यक्त भावना बाबांच्या मनात आली.
“ मी याचसाठी तुम्हा दोघांना सांगायला आलो होतो की तुम्ही जरा सावध व्हा. विनयच्या मनात, हे जे स्पेस टूर गाइड व्हायचंय भूत शिरलय ना ते वेळीच बाहेर काढा.” सर म्हणाले.
“अहो सर, तुम्ही काहीबाही सांगू नका . माझं स्वप्न असलेली अशी भ्रंमती आज कदाचित अशक्यप्राय वाटत असेलही पण भविष्यात ते शक्य होऊ शकतं.” विनय हिम्मत करुन म्हणाला.
“आताच काय पुढेही ते अशक्यप्रायच ठरणार. सध्या अवकाशात जाऊ शकतात ते फक्त अंतराळवीर आणि अंतराळ संशोधनात रस असणारे वैज्ञानिक. हे जाणं-येणं कमालीचं महागडंसुध्दा आहे.” नाराजीच्या सुरात सर म्हणाले. विनयचं उत्तर त्यांना आवडलं नव्हतं.
“ पण सर, परवाच मी एके ठिकाणी वाचलय की आता काही दूरदृष्टीच्या उद्योजकांना यात मोठी व्यावसायिक संधी दिसू लागलीय. पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडून अशी भ्रमंती पुढील काही वर्षात प्रत्यक्षात साध्य होऊ शकते.“
“यात कोणती आलीय व्यावसायिक संधी! आणि काय रे, तुला कधीपासून व्यवसाय ,दूरदृष्टी वगैरे कळू लागलय“, बाबा चढ्या आवाजात म्हणाले.
“अहो बाबा, मला कां कळू नये? शिवाजी महाराजांना १३ व्या वर्षी जर राज्य स्थापनेचा विचार समजत होता तर मीसुध्दा आता १३च वर्षाचा आहे ना. मग,मला कां नाही कळू शकणार, व्यवसाय म्हणजे काय नि व्यवहार म्हणजे काय?”
“अरे, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज होते त्यांची बरोबरी तू कशी काय करतोस.” सरांनी विचारलं.
“बरोबर आहे सर, तुमचं म्हणणं, पण ते तेराव्या वर्षी शिवाजी महाराज नव्हते. ते फक्त शिवबा होते. तसाच मी विनय किंवा विनयबा! शिवबांनी राज्यस्थापनेचं अशक्यप्राय स्वप्न पाहिलं. मी स्पेस टूर गाइड होण्याचं स्वप्न बघतोय, इतकाच काय तो
फरक. “
“अरे बाळा, स्वप्न बघायला आमचं काही म्हणणं नाही. पण तू चंद्रावर जाण्यासाठी अंतराळवीर होण्याचं स्वप्न बघ ना. टूर गाइड होण्याचं स्वप्न म्हणजे मला तर अंधारात उडी घेण्यासारखं.कपाळमोक्ष ठरलेलाच!” आई काळजीने म्हणाली.
“आई, असं कसं म्हणतेस तू? अगं, अंतराळवीर होणं कठीणचं असतं. पण ते आता काही फार अशक्यप्राय राहिलेलं नाही. जगात शेकड्यानं अंतराळवीर आहेत. पण स्पेस किंवा मून टूर गाइड कुणीही नाही. मला ते व्हायचय. यात कसला आलाय कपाळमोक्ष. तूसुध्दा जरा शांतपणे विचार कर, पुढच्या काळात ही भ्रमंती म्हण किंवा पर्यटन म्हण चंद्रापर्यंत जाऊ शकते. चंद्र हा केवळ धुळीने माखलेला प्रदेश नाही. तिथे मोठ्या पर्वतरांगा नि खोल दऱ्या आहेत. प्रत्येकाची वेगळी वैशिष्ट्ये आहेत.”
“अरे, तू पाठ केल्यासारखं कां आम्हास सांगतोयस. तुझं पाठांतर चांगलं असल्याचं सगळ्यांनाच ठाऊक आहे. पोपटपंची म्हणजे हुषारी नव्हे .”बाबा असं काहीसं बोलून गेले.
“अहो बाबा, ही पोपटपंची नाही. मी खरंच चंद्राचा अभ्यास करतोय. इंटरनेटवर खूप माहिती मिळतेय. मी त्यावर माझं प्रेझेंटेशनही तयार केलय. दाखवू का तुम्हास?”
“दाखव बघू, काय दिवे लावलेस ते! लॅपटॉपचा असाही दुरुपयोग करशील हे ठाऊक असतं तर तुला तो हाताळायला दिलाच नसता.” बाबा नाराजी व्यक्त करत म्हणाले.
ही नाराजी विनयच्या लक्षात आली. पण बाबांनी प्रेझेंटेशन बघण्याची तयारी दाखल्यानं त्याला जरासं हायसही वाटलं. त्याने अभ्यासिकेतून लॅपटॉप आणला. तो टीव्हीला जोडला. टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर तो एकएक स्लाईड दाखवू लागला.
“हे बघा बाबा”, एका स्लाइडकडे त्या तिघांचं लक्ष वेधत विनय सांगू लागला…
“ही आहे, मॉन्टेस अपेनिअस पर्वत रांग. या ठिकाणी अपोलो १५ यान उतरलं होतं. या दुसऱ्या स्लाइडमध्ये मॉन्टेस ज्युरा- सी ऑफ शॉवर्स आणि बे ऑफ रेनबोच्या अवतीभवती असणारे भविष्यातील पिकनिक स्पॉट. तिसऱ्या स्लाइड मध्ये दिसतय ते ॲरिस्टारकस – चंद्रावरील सर्वाधिक चमचमते क्रॅटर.”
अशी बरीच स्थळं दाखवल्यावर तो तिघांना म्हणाला …
“भविष्यात या प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना घेऊन जाता येईल. त्यांचं दर्शन घडवता येईल. त्याबद्दल समजावून सांगता येईल. यासाठी टूर गाइडची गरज भासू शकते की नाही ,तुम्हीच सांगा सर.”
हा सवाल बिनतोड होता. त्याचं तसं उत्तर तिघांकडेही नव्हतं. पण त्यांना विनयचं सांगणं अशक्यप्रायच वाटत होतं. ते त्यांच्या जुन्या संकल्पनेतून बाहेर पडायला तयार नव्हते.
” अरे विनय, पुस्तकात वाचून किंवा इंटरनेटवरुन खूप माहिती मिळवली म्हणजे काही स्वप्न सत्यात येत नाहीत”. सरांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.
“बरोबर आहे सर तुमचं. म्हणूनच तर चंद्रावर १९६९ साली पहिला मानव निल आर्मस्ट्राँग चालल्यावर गेल्या ४७ वर्षात अवघी १२ माणसंच चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेऊ शकली आणि आमचा हिरो निघालाय टूर गाइड व्हायला. चमत्काराने माणसं नेणार की फक्त मांजरी-कुत्रे यांचीच सफर घडवून आणणार!” बाबा उपहासाने म्हणाले.
खरंतर मोठ्यांच्या अशा चमत्कारिक प्रश्नांना काय उत्तर द्यावं, हे विनयला कळेना. आता आईबाबा रागावले तरी आपल्या मनातलं सांगून टाकायचच असं त्याने ठरवलं. तो सांगू लागला—
“बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण चंद्रावर माणूस जाऊ शकतो असं सुध्दा अवघड आणि अशक्यप्राय वाटत होतंच की नाही. चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर यान पोहचणं अशक्य वाटत होतं, पण आपल्याच देशानं २०२३ साली तेही साध्य केलं. १२ माणसं कां होईना जाऊन आली. विज्ञानाची प्रगती इतक्या गतिने होत आहे की ही संख्या भविष्यात १२ शे किंवा १२ हजार किंवा १२ लाख कधी होईल असं सांगता येणार नाही.तेव्हा टूर गाइडची नक्कीच गरज भासेल. अंतराळ पर्यटन म्हणजे कोणत्यातरी पर्यटन कंपनीने आयोजित केलेला दोन आठवड्यांचा युरोप टूर ठरणार नाही बाबा“.
“अरे शहाण्या, तुला आम्ही बोलू देतो याचा अर्थ तू काहीही सांगावस असं नाहीना“.बाबा रागावून म्हणाले.
“अहो, शांत व्हा पाहू. त्याला काय म्हणायच ते एकदा आपण ऐकून तर घेऊ,” देशपांडे सर म्हणाले. खरतर आता काही सांगावं असं विनयला वाटत नव्हतं. त्याने एक आवंढा गिळला नि तो पुन्हा सांगू लागला,
“ अंतराळ पर्यटकास पर्यटन उड्डाण भरण्याआधी प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्याची मानसिक, शारीरिक क्षमता जोखली जाईल. सध्या सगळ्या प्रकारचे प्रवास अधिकाधिक सुरक्षित होत असले, तरी अंतराळातील धोके आणि संकटं अनपेक्षित व कोणत्याही प्रकारची राहू शकतात. अंतराळ टूर गाइड या प्रवासातला मार्गदर्शक आणि मित्र राहील.”
“अरे बाळा, ही तुझी पोपटपंची थांबव बरं आता. मी चार दिवस इंटरनेटवर बसले तर यापेक्षा चांगलं सांगेन. तुझं वय तरी आहे का हे सगळं समजून घेण्याचं. अजून खूप शिकायचय आणि मग वाटल्यास विचार कर ना चंद्रावर टूर न्यायची की मंगळावर न्यायची.” आई समजुतीच्या सुरात म्हणाली.
“१३ व्यावर्षी आपणास जर लहान म्हणून हिणवत असतील तर संपल सारं. एकीकडे हेच आईबाबा, शिवबांचा आदर्श ठेवा, सचिन तेंडूलकरचा आदर्श ठेवा, सानिया मिर्झाचा आदर्श ठेवा, लता मंगेशकरांचा आदर्श ठेवा असं उठता बसता सांगतात. पण या श्रेष्ठ मंडळींनी १२ व्या, १३ व्या वर्षीच मोठमोठी स्वप्नं बघायला सुरुवात केली नि ती वास्तवात उतरवली. हे मात्र सोईस्कररीत्या विसरतात .” असं काहीसं विनयच्या मनात आलं. पण आता गप्प बसणं श्रेयस्कर वाटून तो चूप बसला.
आपलं म्हणणं विनयला पटलं असावं असं सर आणि आईबाबांना वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं.
०००
” विनयच्या डोक्यावर खरोखरच परिणाम झाला नसले ना हो?” आई रात्री झोपताना बाबांना म्हणाली.
“आपण त्याला चांगल्या डॉक्टरकडे दाखवू या का?”
” हो हो नक्कीच, माझ्या ओळखीचे एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे आपण घेऊन जाऊ विनयला.” बाबांनी आईला आश्वस्त केलं.
०००
विनयला यातलं सध्या काहीच ठाऊक नाही. कुणी काहीही म्हंटलं तरी आपण स्पेस टूर गाइड व्हायचच याचा त्याचा निर्धार पक्काच आहे. त्याने आता स्पेस सायंटिस्ट होण्यासाठी काय करावं लागतं याची इंटरनेटवरुन माहिती घेणं सुरु केलीय…
००००००