(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

वर्क्तृत्व स्पर्धा म्हंटली की तेजोमयीचा उत्साह ओसंडून वाहायचा. चौथ्या वर्गापासून ती अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. यामुळे सभाधिटपणा येतो. आत्मविश्वास वाढतो असं तिचे बाबा तिला नेहमी सांगत. चौथ्या वर्गात असताना तिला त्यांच्या या सांगण्याचा अर्थ विशेष कळायचा नाही. सुरुवातीला तिचे बाबाच तिला संपूर्ण भाषण लिहून देत. मग ती पोपटासारखी पाठ करायची. पाठांतर चांगलं असल्यानं ते भाषण लवकर पाठ व्हायचं.

स्वत:समोर बसवून प्रत्यक्ष स्पर्धेत ती भाषण कसं देईल याचही प्रात्यक्षिक आईबाबा करुन घेत. एवढं करुनही स्पर्धेच्या वेळेस मात्र काही ना काही गफलत होतच असे. काही वाक्य किंवा शब्दच तिला आठवत नसत. मग काही क्षण शून्यात पाहण्यात जात. परीक्षक काय ते समजून जात. त्यामुळे तेजोमयीला चौथ्या आणि पाचव्या वर्गात एकाही वर्क्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळालं नाही. त्यामुळे पुढे तिला अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा कंटाळा येऊ लागला. पण बाबांचा आग्रह कायम होता. पारितोषिक मिळालं नाही तरी चालेल पण आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायला हवं, असं त्यांचं सांगणं असे.

तेजोमयी सहावी गेल्यावर त्यांनी तिला भाषण लिहून देणं सोडलं. वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेल्या विषयाची तयारी स्वत:च करण्यासाठी ते प्रोत्साहन देऊ लागले. काही मुद्दे काढून देऊ लागले. संदर्भासाठी पुस्तकं देऊ लागले.

तिला वर्तमानपत्रं आणि मासिकं वाचण्याची सवय लावली होती. इंटरनेटवर गुगलमध्ये जावून एखाद्या विषयावरची माहिती कशी मिळवायची हे बाबांनी तिला शिकवलं. तिने भाषण स्वत:च लिहावं असा त्यांचा कटाक्ष असे. प्रारंभी तेजोमयीला याचा कंटाळा यायचा. आधीच शिक्षकांनी दिलेलं होमवर्क खूप. त्यात अशी स्पर्धा आली की मग सारा वेळ यातच जायचा. खेळणं बंद आणि टीव्हीला रामराम करुनच पूर्ण वेळ वर्क्तृत्वस्पर्धेच्या तयारीसाठी द्यावा लागे. तेजोमयीच्या आईलाही हा सर्व वेळेचा अपव्यय वाटे. पण बाबांनी आग्रह सोडला नाही.

स्वत: भाषण तयार करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे तेजोमयीच्या हळूहळू लक्षात आलं. असं भाषण विशेष पाठही करावं लागत नसे. प्रत्यक्ष व्यासपीठावर विशेष अडचण जात नसे. एका स्पर्धेत ती अशा पध्दतीने तयारी करुन सहभागी झाली. व्यासपीठावर गेल्यावर एकएक मुद्दा तिला आठवत गेला. त्यानुसार ती बोलत गेली. या स्पर्धेत तिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. त्यानंतर मग तेजोमयीनं मागं वळून बघितलं नाही. ती प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊ लागली. तिला पारितोषिकंही मिळू लागले.

यंदा तेजोमयी सातवी आहे. आंतरशालेय स्पर्धेसाठी मुख्याध्यापकांनी तिचं नावं शाळेतर्फे सुचवलं. या स्पर्धेचा विषय होता ,माझं स्वप्न.

मुख्याध्यापक श्री अनंतराव चोरघडे यांनी याविषयावरचं भाषण तिला तयार करुन आणायला सांगितलं. शाळेतील सर्व शिक्षक आणि त्यांच्यासमोर, या भाषणाचा सराव त्यांना करुन घ्यायचा होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वत:हून आपलं नाव आंतरशालेय स्पर्धेसाठी पाठवलं म्हणून तेजोमयी खुष होती.

तिने मन लावून भाषण तयार केलं. बाबांची थोडीफार मदत घेतली. मुद्दे काढले आणि चोरघडे सरांनी सांगितलेल्या दिवशी तिने सर्व शिक्षकांसमोर हे भाषण केलं. भाषण मस्त जमलं . त्यात सफाईदारपणा होता. मुख्य म्हणजे तेजोमयीनं निवडलेला, माझ्या स्वप्नाचा विषय एकदम वेगळा होता. तिनं विषय निवडला होता,’माझं स्वप्न, कलेक्टर होण्याचं!’ भाषण संपल्यावर सर्वांनी टाळया वाजवल्या. चोरघडे सरांनी कौतुक केलं.

पांडे सरांनी एक शंका  विचारली. “सातवी शिकणाऱ्या मुलगा किंवा मुलीला कलेक्टर कसं व्हायचं, हे इतकं विस्तृतपणे कसं ठाऊ असणार?”

तेजोमयीनं धीटपणे उत्तर दिलं,

“कां माहीत असू नये सर? माझ्या बाबांनी मला सांगितलच पण मीसुध्दा याबद्दल माहिती मिळवलीय.”

“कलेक्टर होण्यासाठी ग्रॅज्युएट म्हणजेच पदवी मिळाल्यावर परीक्षा द्यावी लागते. सातवी-आठवीतल्या मुलांना ग्रॅज्युएट म्हणजे काय याची तेवढीशी कल्पना नसते.” सोनी सरांनी शंका विचारली.

“नसली म्हणून काय झालं सर. मी सातवीत असताना मला कलेक्टर व्हायचं हे कळलं. पण अंकूर गर्गला, तर तो चौथीत असतानाच त्याच्या आईबाबांनी याविषयीची माहिती दिली होती.” तेजोमयी म्हणाली

“कोण हा अंकूर गर्ग?” चोरघडे सरांनी विचारलं.

“सर, हा मुलगा  काही वर्षांपूर्वी नागरी सेवा परीक्षेत देशात पहिला आला. त्याची मुलाखत मी टीव्हीवर बघितलीय. त्यात त्याने हे सांगितलं होतं.तो असंही म्हणाला की तेव्हा पासूनच त्याच्या मनात कलेक्टर होण्याची प्रेरणा निर्माण झाली. ती ज्योत त्याने तेवत ठेवली.”

“दॅट इज द पॉईंट!” उपमुख्याध्यापक सोनवणे म्हणाले.

“सर,तेजोमयीचा मुद्दा अगदी बरोबर आहे. कलेक्टर होण्यासाठी लहानपणापासूनच जर आपण आपल्या मुलांना सांगितलं, तरच त्यांच्या मनाची मशागत होत राहील.”

“तरीसुध्दा हा विषय  सातवीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिने डोक्यावरुन जाणारा वाटतो.”तेजोमयीच्या वर्गशिक्षक श्रीमती बोरगावकर यांनी आपली शंका बोलून दाखवली.

“मला तर तसं काहीच वाटलं नाही मॅडम. या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, मातृभाषा, इंग्रजी, इंग्रजी निबंध आणि तुम्ही पदवीपर्यंत शिकलेल्या विषयावरील पेपर्स असतात. दरवर्षी ही परीक्षा होते. आधी आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाखीच असणारी ऑब्जेक्टिव्ह पध्दतीची पहिली प्राथमिक परीक्षा. या परीक्षेत विशिष्ट गुण मिळविलेल्या मुलांसाठी मुख्य परीक्षा. याचे पेपर्स वर्णनात्मक असतात. यात चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांची मुलाखत घेतली जाते. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये जे एकूण गुण मिळतात त्यावर आधारीत गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानुसार पहिल्या १००-१५० मुलांची कलेक्टरपदासाठी निवड केली जाते. यात न समजण्यासारखं काहीच नाही सर.” तेजोमयी धिटपणे उत्तरली.

“अगं, भाषणासाठी कुणीतरी दिलेले मुद्दे पाठ करणं, म्हणजे सगळी माहिती असणं आणि विषय समजणं नव्हे.” पीटी टिचर सरदेशपांडे म्हणाले.

“हा मुद्दा गैरलागू आहे सरदेशपांडे,” चोरघडे सरांनी भरकटत चाललेल्या या चर्चेची सूत्रं आपल्या हाती घेतली. “तेजोमयीनं आपल्या भाषणात कलेक्टर होण्यासाठी काय करावं लागेल, हे जे सांगितलय ना ते महत्वाचं! मुलांनी आतापासूनच तयारी केली तर ग्रॅज्युएशनला जाईपर्यंत त्यांची पूर्ण तयारी होईल नि त्याला यश मिळेल. सध्या  मुलांना पदवी मिळाल्यावर, आता पुढे काय? असा प्रश्न पडतो नि मग ते अशा परीक्षांच्या तयारीला लागतात. आतापर्यंत शिकलेलं सारं विसरलं असल्यानं त्यांना नव्याने तयारी करावी लागते .त्यात वेळ जातो. अतिरिक्त श्रम करावे लागतात. यश मिळेल याची शास्वती नसते. कलेक्टर होण्यासाठीची तयारी तेजोमयीने सांगितल्यानुसार अंकूर गर्गच्या मातापित्यांनी जशी लहानपणापासून केली तशीच जर केली तर आपलीही अधिकाधिक मुलं या परीक्षेत यश मिळवतील.”

मुख्याध्यापकांचं म्हणणं ब-याच शिक्षकांना पटलं. काहिंना ते पटलं नाही. मुख्याध्यापकांनी तेजोमयीचं कौतुक केलं. तिला शाबासकी दिली. तेजोमयीनं प्रत्यक्ष स्पर्धेत या विषयावर आणखी ठोसपणे मुद्दे मांडले. परीक्षकांनाही हा नवा विषय खूप आवडला.या स्पर्धेत तेजोमयी पहिली आली.तिच्या बाबांना खूप आनंद झाला.

“पण बाळ, हे तुझं स्वप्न केवळ भाषणापुरतं मर्यादित ठेऊ नकोस.जे भाषणात सांगितलंस ते प्रत्यक्ष करुन दाखव.” ते म्हणाले. त्यांनी तिच्या डोळयात बघितलं. कलेक्टर होण्याच्या महत्वाकांक्षेचं फुलपाखरु त्यात त्यांना दिसत होतं.

०००