“मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्या आईबाबांना धक्काचा बसला. कॉलेजसुध्दा साधेसुधे नाही तर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सीटीमधलं. ही जगातील सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटीपैकी एक. इथे प्रवेश मिळणं तसं कठीणच. तरीसुध्दा मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. सगळयांनी मला मूर्खात काढलं. पण मी एकदा ठरवलं तर ठरवलं. मग मागे हटायचं नाही असा माझा निर्धार!
पण मी, मुळात इतकं चांगलं कॉलेज सोडलचं कशाला? डोक्यावर पडलास की काय ?असं तुमच्यापैकी अनेकांना वाटू शकतं.
खरंच आहे म्हणा. मी डोक्यावरच पडलो म्हणायचं, त्यामुळे माझं डोकं आधीपेक्षा सुसाट धावू लागलं. कारण, माझा मित्र, आदित्य पालीचा, याला सोबत घेतलं नि “किराणाकार्ट” हा ॲप आधारीत उद्योग सुरु केला. हे एक ऑनलाइन दुकानच म्हणाना. आमच्या या “किराणाकार्ट” दुकानाचं वैशिष्ट असं होतं, की तुम्ही ऑर्डर करा. पुढच्या ४५ मिनिटात,किराणामाल तुमच्या घरी. असं काही होऊ शकतं का? इम्पॉसीबल वगैरे टोमणे ऐकावं लागले. पण या टोमण्यांनी आणखी उर्जाच मिळाली.
आम्ही निराश न होता हे दुकान चालवत राहिलो. आमच्याकडे काही पैसेही जमा झाले. मग आम्ही “झेप्टो” या स्टार्टअपची पायाभरणी केली. त्याचा आधार “किराणाकार्ट”च होतं. तिथे ४५ मिनिटात किराणा माल पोहचवण्यात येत असे तर आता “झेप्टो”नं ठरवलं १० मिनिटात किराणा माल पोहचवायचा.
तो करोना साथीचा काळ होता. त्याकाळात ऑनलाइन खरेदी विक्रीची संस्कृती चांगलीच रुजू लागली होती. त्यामुळे आमची “झेप्टो” चांगलीच धावू लागली. इतकी की, २०२३ च्या ऑगस्टमध्ये १००० कोटी रुपयांची उलाढाल करणारी भारतातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली नि मी ठरलो देशातला सर्वात तरुण श्रीमंत! माझं वय होतं तेव्हा अवघं २०! कॉलेज सोडलं १८ व्या वर्षी नि अवघ्या दोन वर्षात हे यश मिळवलं.
जगातील सर्वोत्कृष्ट कॉलेजपैकी एक असलेलं कॉलेज सोडण्याचा माझा निर्णय मूर्खपणाचाच असलेही कदाचित. पण, स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचं धेय्य आधीपासूनच ठरलं होतं. तंत्राधारीत उद्योग व्यवसायाकडे माझा ओढा लहानपणापासून होता. उबर, ओलासारख्या ॲप आधारीत उद्योगांनी तर माझ्या स्वप्नाची पतंग आणखीनच उंचउंच नेली. मला जे करायचयं ते नक्कीच साध्य होईल, हा आत्मविश्वास या स्वप्नानेच दिला. त्यामुळे कॉलेजातील शिक्षण पूर्ण करा, मग एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करुन अनुभव घ्या, मग काही वर्षांनी स्वत:चा स्टार्टअप सुरु करा, यात वेळ दवडणं मला काही पटेना. शिवाय करोना काळात कशाची नेमकी जास्त गरज आहे हे माझ्या लक्षात आलंच होतं. ही मोठी संधी असल्याची माझी खात्री पटली. माझ्या या खात्रीनं या संधीचं सोनं केलं.
पण, याचा अर्थ सगळं काही सरळ, सुलभ आणि सहज झालं असा नाही. अडचणी तर अनंत आल्याच. सप्टेंबर २०२० मध्ये “झेप्टो”ची स्थापना केली, तेव्हा सगळयांनी खिल्ल्ली उडवली. आम्ही खूप मोठी समस्या दूर करु इच्छितो, हीच अनेकांसाठी समस्या ठरली. याशिवाय आम्हाला, आधीपासूनच या क्षेत्रात असणाऱ्या काही कंपन्यांची तीव्रस्पर्धा होतीच. पण आम्ही आत्मविश्वास, प्रामाणीकपणा नि अथक परिश्रम याबळावर या सगळया समस्यांवर मात केली. या यशाने हुरळून न जाता वेगवेगळे निर्णय काळजीपूर्वक घेतले. उत्साहाच्या भरात घाई केली नाही. आमच्या लहान वयाकडे बघून अनेकांनी आमचं हसं केलं पण आम्ही ही आमची कमकूवत बाजू मानली नाही.
तर मी, कैवल्य व्होरा, झेप्टोचा संस्थापक!
हल्ली मुक्काम बेंगळुरु.”
सुरेश वांदिले