मी, इटुकली पिटुकली असले म्हणून काय झाले? मी फक्त ५ वर्षे ९६ दिवसाची असल्याचे म्हणून काय झाले? पराक्रम तर कुणालाही गाजवता येतोच की. तुम्ही विचाराल, ‘ये पिटुकले, छुटुकले, तू बरं कोणता असा पराक्रम गाजवलाय?’ ‘मला तरी कुठे माहिताय.’ ‘हा हा हा!’, तुम्ही हसलात ना. ‘हू हू हू!’ हे माझं त्यावरचं उत्तर. म्हणजे, तुमची गंमत करायची नाही की खिल्लीपण उडवायची नाही मला. मी काय सांगते हे तुमच्या लक्षात आल्यावर याची खात्री पटेल बघा.
तर काय झालं, परवा की नाही, ते ‘टेड टॉक’वाले माझ्या घरी आले होत. पुन्हा तुमच्या मनात प्रश्न आला असेल, कशाला आले ते? नि ही ‘टेड टॉक’, भानगड तरी काय?’
‘अहो, ही टेड टॉक, भानगड नाही बरं का? टेड मध्ये टी ई डी हे तीन इंग्रजी अक्षर आहेत. यापैकी टी म्हणजे टेक्नॉलॉजी, ई-एंटरटेनमेंट, डी म्हणजे डिझाइन आणि टॉक म्हणजे बोलणं, हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. तर, या ‘टेड टॉक’ची स्थापना अमेरिकेत रिचर्ड वुरमन आणि हॅरी मार्क्स यांनी केली. विविध विषयांवर सखोल आणि वेगळं भाषण देण्यासाठीचं जागतिक व्यासपीठच म्हणाना. यामध्ये भाषण करायला मिळणं, हेच मोठं कठीण कर्म असतं. जगातल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळींना अशी संधी मिळते मग, ते त्यांच्या भाषणातून नवेनवे विचार देतात. म्हणून या व्यासपीठाचं ब्रीद वाक्य आहे, “एक विचार जग बदलू शकतो.”
अशा या, ‘टेड टॉक’ व्यासपीठावर मला भाषण करण्याची संधी मिळाली. माझा विषय होता, ‘क्रियेटिव्ही इज सुपर पॉवर’ म्हणजेच, ‘सर्जनशिलता ही सर्वोच्च शक्ती. तेव्हा, मी होते ५ वर्षे ९६ दिवसांची! आणि मी ठरले जगातील सर्वात लहान महिला वक्ता. याची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी घेतली. हेच सांगायला, ‘टेड टॉक’वाले माझ्या घरी आले. म्हणाले, ‘इटुकले-पिटुकले, मोठ्ठाचं पराक्रम गाजवलास हो’. तेव्हा, मला कळलं की मी काहीतरी पराक्रम गाजवलाय. म्हणूनच म्हंटल की, पराक्रम गाजवायला वयाचं बंधन थोडच लागतं. पटलयना.
आता पुन्हा एकदा माझंच उदाहरण सांगते. मी अडीच वर्षाची असताना, लंडनमधील, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने माझी नोंद घेतली. कारण, तेव्हा मी ७२ पेटिंग्ज रंगवले होते. इतक्या लहान वयात असा पराक्रम म्हणे तोपर्यंत कुणीच केला नव्हता. माझ्या या पेंटिग्जची प्रदर्शने दुबई, मुंबई ,गुरुगाव इथे भरली आहेत. माझ्या चित्रे किंवा पेंटिग्ज एकसुरी नसतात. त्यात एकिकडे विज्ञान आणि रंगाचा सुरेख मेळ साधला जातो, तर दुसरीकडे निसर्ग चित्रेही हुबेहुब मी रंगवते. रशियन फ्ल्युइड आर्ट, रोमन शाई आणि बर्फ, रंगीत काचेवरील चित्रकला, विविध माध्यमांमधील अमूर्त चित्रकला (मल्टिमीडिया ॲबस्ट्रक्ट) या कलाप्रकारालाही मी हस्तगत केलं आहे. माझी मम्मा सांगते की, जेव्हा एक वर्षे ९ महिन्यांची होते, तेव्हा मला ४२ स्पॅनिश शब्द त्याच्या अर्थासह ठाऊक झाले होते. तज्ज्ञांच्या मते असं फक्त तीन वर्षे वयाच्या मुलामुंलीबाबतच घडू शकतं.
०००
२६ जुलै
मी ९ महिन्यांची असताना मला २६ पक्षी आणि ४२ प्राण्यांची नावं ठाऊक झाली होती. तेव्हाच माझा चित्र काढून रंगवण्याचाही प्रवेश सुरु झाला होता. मी आईबाबा आजी आजोबांसोबत घरानजिकच्या बागेत जायचे. तेथील फळं, फुलं, झाडं, पानं, वेली, पक्षी, मला घरी आल्यावर चित्र काढण्यासाठी प्रेरणा देत. मी २१ महिन्यांची होईपर्यंत मला सगळ्याप्रकारच्या रंगांचं चांगलचं ज्ञान प्राप्त झाल्याचं आई, बरेदचदा कुणाकुणाला सांगते. अर्थातच प्रत्येक आईला आपल्या मुलांच कौतुक असतच म्हणा. त्यात नवल ते काय?
पण, माझ्या आईला माझं दुसऱ्या एका कारणासाठी भलतच कौतुक वाटतं. मी जेव्हा बागेत जाई, तेव्हा बरेचदा तेथील माळीकाळा लिंबूच्या झाडांना पाणी घालताना दिसत. या झाडांना लिंबू लागत. म्हणजेच झाडाची अशी जोपासना केल्यावरच उत्तम लिंबू लागतात, हे माझ्या मनानं बरोबर टिपलं. त्यामुळे घरी कुणी जेवणात सलादमधील लिंबू तसाच ठेवला तर लगेच त्यांना, एक लिंबू झाडावर यायला माळीकाकांना किती कष्ट घ्यावे लागतात, हे सांगायची नि घरातील मंडळींना लिंबू वाया घालवू द्यायची नाही. ‘लिंबू वाया घालवायचा नाही’, या माझ्या आग्रहाचा आईला कोण कौतुक!
इतक्या लहान वयातच माझा शब्दसंग्रह खूप झालाय. सगळी बडबडं गितं मला पाठ आहेत . माझी स्वत:ची लायब्ररीसुध्दा आहे. त्यात किती पुस्तकं आहेत, हे सांगू का तुम्हाला. अहो २००! झालात ना थक्क! अर्थातच माझ्या वयाला साजेशी, मला समजणारी, खूप चित्रं असलेली ही पुस्तकं आहेत. मला खूप आनंद मिळतो पुस्तक वाचण्यात. दररोज मी तीन ते चार पुस्तकं वाचण्याचा निर्धार करते नि हा निर्धार पूर्ण केल्याशिवाय मी झोपायला जात नाही.
मला पियानो वाजवाला खूप आवडतं. बरं का, मी जेव्हा चार वर्षे २५४ दिवसांची होते तेव्हा, माझं पहिलं पुस्तक, ‘लिटिल गर्ल्स बिग इमोशन’, हे इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत प्रसिध्द झालं. असं दोन भाषेत, इतक्या लहान वयात, पुस्तक लिहिणारी मी सर्वात लहान लेखिका ठरले. याचीही नोंद गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली. माझ्या एव्हढीच चिमकुली मुलं, जी कलेच्या विविध प्रांतात रमतात, त्यांच्या मनातील भावस्पंदनं टिपण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलय.
मला असं रंग, शब्द आणि संगीतात रमायला खूप आवडतं. याचा अर्थ मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करते असा नाही. पण माझे आईबाबा मला जे आवडतं, ज्यात माझं मन रमतं, ज्याचा मला आनंद मिळतो, ते करु देतात. मला प्रोत्साहन देतात. उगाच अभ्यास एके अभ्यासबिभ्यासच्या पाठिमागे लागत नाहीत. त्यामुळेच तर मला असं यश मिळतयना. मी लहान असले म्हणून काय झाल? पटलय ना तुम्हाला माझं म्हणणं.
अरे हाँ,एक शेवटचं गुपित सांगायच राहूनच गेलं, हे गुपित माझ्या मम्माला आधीच कळलय, कोणतं बर ते ? तर ते आहे, माझ्या आवडत्या टेडिच्या तोंडातलं वाक्य, ‘आय ॲम नॉट टायर्ड लेट्स प्ले इंस्टेड! (मी कंटाळले नाही, त्याऐवेजी खेळू या.)’ हे वाक्य मी एखाद्या गाण्याची ओळ समजून दिवासातून कितीतरी वेळा पुटपुटते. त्यामध्ये कधीकधी, ‘आय ॲम नाट टायर्ड लेट्स पेन्ट इनस्टेड, (मी कंटाळले नाही, त्याऐवेजी चित्रकाढू या.)’, असाही बदल करते नि मग चित्र रंगवण्यात देहभान हरपून जाते. हे ते गुपित.
असो, तर मी, अवनी विशेष अग्रवाल.
हल्ली मुक्काम भुवनेश्वर
सुरेश वांदिले