परवा, तेजोमयी अभ्यास करत असताना अलेक्झांडर आणि अलेक्सा गोर्जी तिच्या अवतीभवती होते. सरांनी दिलेल्या विषयावर इंग्रजीतून निबंध लिहिण्याचा तिला जाम कंटाळा आला होता. गोर्जीने आधीच सांगून ठेवलं होतं, गृहपाठासाठी मदत करेन, पण सगळा गृहपाठ काही करुन देणार नाही. तेजोमयीने आशाळभूत नजरेनं अलेक्झांडरकडे बघितलं. “तुला निबंध लिहिता आला असतं तर, किती बरं झालं असतं रे, अलेक्झू?” तेजोमयी मनात म्हणत, पुन्हा त्याच्याकडे बघितलं.
“तरीसुध्दा मी नसता लिहून दिला.”असे भाव अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटल्याचं तेजोमयीला वाटलं. तिला हसू आलं.
गोर्जीने काय झालं? म्हणून विचारलं.
“कुठे काय?” म्हणून तेजोमयीने दुसरीकडे मान वळवली. तेजोमयीच्या मेंदूत काय चाललय, हे गोर्जीने, डीप लर्निंगच्या मदतीनं समजून घेतलं. तिलाही मग हसू आलं.
“तू कां हसलीस?”तेजोमयीनं विचारलं.
“कुठे काय?”असं म्हणत गोर्जीनेही दुसरीकडे मान वळवली. दोघींच्या या रुसव्याफुगव्याचा आनंद, कधी हिच्याकडे तर कधी तिच्याकडे बघत, अलेक्झांडर घेऊ लागला.
“गरज असताना, जर उपयोगात येत नसेत तर, काय कामाचा तुझा स्मार्टफार्टपणा, गोर्जे.” तेजोमयीने मनात वैताग व्यक्त केला. गोर्जीला हा वैतागही कळला. पण तिने आपलं हसू दाबून धरलं.
उद्या सकाळी शाळा असल्याने निबंध आताच लिहिणं आवश्यक होतं. नसता, उद्या सरांकडून शिक्षा ठरलेलीच. काय करावं बरं? विचार करता-करता तेजोमयीला, ‘को-पायलट’ची आठवण झाली. तो कशासाठी मदत करतो, हे तिला ठाऊक होतं. पण तिने, आतापर्यंत त्याची मदत घेतली नव्हती.
गोर्जीच्या स्मार्टपणाची मिजास जिरवण्याच्या हेतूने, तेजोमयीने आज त्याची मदत घेण्याचं ठरवलं. तिने लॅपटॉपमधील ‘कोपायलट’ला, सरांनी दिलेल्या विषयांवर, दोन परिच्छेदात निबंध लिहिण्याची सूचना केली. अवघ्या अर्ध्या मिनिटात ‘को-पायलट’ने निबंध सादर केला. तेजोमयी थक्क झाली. आपली समस्या सहजासहजी सुटल्याने, आनंदून तिने स्वत:भोवती गिरकी घेतली. काहीतरी वेगळं घडलंय, हे लक्षात आल्याने स्वत:भोवती फेरी मारुन, ‘काय झालं बाई, एव्हढं आनंदायला?’, असे भाव चेहऱ्यावर आणत अलेक्झांडर तिच्याकडे बघू लागला.
“व्हेरी बॅड!”गोर्जी उद्गारली.
“काय, व्हेरी बॅड?” त्याचवेळी तेजोमयीच्या खोलित आलेल्या बाबांनी, गोर्जीचे बोल एकून विचारलं.
“गोर्जी, व्हेरी बॅड!” तेजोयमी रागाने म्हणाली.
“कशामुळे गोर्जी बॅड झालीय?” बाबांनी विचारलं.
“डॅड, तेजोला निबंध लिहून दिला नाही, म्हणून मी बॅड झालेय.” गोर्जीनेच सांगितलं.
“अगं, यात गोर्जीने काय चुकिचं केलं. तुझा निबंध, ती कां लिहून देईल? तिच्या योग्य वागण्याला ‘बॅड’ म्हणून, तूच ‘बॅड’ असल्याचं सिध्द करत आहेस.” तेजोमयीला समजावत बाबा म्हणाले. तेजोमयीने गाल फुगवले.
“पण डॅड, तेजोने मला ‘बॅड’ म्हंटलं म्हणून वाईट वाटलं नाही, पण…”
“पण काय?”
“अहो डॅड, तिने ‘को-पायलट’ला सांगून निबंध लिहून घेतला, म्हणून, मी व्हेरी बॅड म्हणाले.” गोर्जी म्हणाली. बाबांनी ‘को-पायलट’ने लिहिलेला लॅपटॉपवरचा निबंध वाचला.
“व्हेरी बॅड!” बाबांनी उत्सुर्फतपणे प्रतिक्रिया दिली.
“माझ बरोबरयना डॅड?”गोर्जीनं विचारलं. तेजोमयीला हा, गोर्जीचा चोंबडेपणा वाटला. तिने रागाने डोळे वटारुन गोर्जीकडे बघितलं. ते बाबांच्या लक्षात आलं.
“हे बघ तेजो, तू जे काही केलंस ते, व्हेरी बॅडच होतं. पण, ‘को-पायलेटने’ लिहिलेला निबंधही व्हेरी बॅडच आहे. किती चुका त्यात. स्पेलिंग सुध्दा चुकलेत. आकडेवारी आणि तथ्यही बरोबर नाहीत. हे असंच जर, सरांनी बघितलं असतं तर, मोठा ओरडा खावा लागला असता तुला.” ‘को-पायलट’ने लिहिलेल्या निबंधातील चुका दाखवत, बाबा तेजोमयीला म्हणाले.
तेजोमयीची मान खाली गेली.तिला जवळ घेत बाबा म्हणाले,
“हे बघ बाळ, या स्मार्ट गोष्टी आपल्या मदतीसाठी आहेत, याचा अर्थ सगळं काही त्यांच्याकडून करुन घेणं, शहाणपणाचं नाही. त्याने, अभ्यास पक्का व्हायचा नाही. स्वत:चा अभ्यास स्वत:च करायचा असतो. तरच तो पक्का होऊन ज्ञानात वाढ होते. दुसऱ्यावर विसंबून राहिल्यास, आपली बुध्दी खुरटीच राहते. ती काही वाढत नाही.”
बाबांचं सांगण तेजोमयीला पटलं. यापुढे असं काही करणार नाही, असं बाबा, गोर्जी आणि अलेक्झांडरकडे बघून तिने कबूल केलं.
सुरेश वांदिले