(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

काही दिवसांपूर्वी इचलकरंजीचा मुलगा भेटला. त्याने यंदा १२ वीची परीक्षा दिलीय. गप्पा सुरु असताना, सध्या काय करतोस? असं विचारल्यावर आयपीएमएटी किंवा आयपीमॅट परीक्षेच्या तयारीसाठी इंदौरला चालल्याचं त्यानं सांगितलं. “अरे, याची तयारी तर इचलकरंजीतूनही होऊ शकते”, असं विचारल्यावर तो हसला आणि म्हणाला,” अहो, आयपीमॅट परीक्षेचे खास कोचिंग क्लास इंदौरला आहेत. “या, क्लास लावा नि हमखास प्रवेश मिळवा,” अशी या क्लाससेची महती आहे. हे ऐकून थोडं बरं वाटलं कारण, आपल्याकडे ज्याला त्याला कोट्यालाच जावं वाटतं. त्याला हा मुलगा अपवाद निघाला.

कोट्याऐवजी इंदौरची गाडी पकडण्याच्या मुलाच्या निर्णयास पाठिंबा दिल्याने त्याच्या पालकांचही कौतुक वाटलं. इचलकरंजीसारख्या मुंबई पुण्यापेक्षा तुलनेने फारच छोट्या गावातील किंवा शहरातील मुलाला, ‘आयपीमॅट’ बद्दल माहिती मिळून त्याने ही परीक्षा देण्याचा निर्णय घ्यावा, हे सुध्दा कौतुकास्पदच. कारण मोठ्या शहरात अजुनही म्हणजे २०२४ साली आयपीमॅट बद्दल फार काही माहिती नाही, उत्सुकता नाही. त्यामुळे ही परीक्षा देण्याचा विचारही नाही. बरे, त्याचं कुणाला फारसं काही वाटत नाही. माझ्या कॉलनीतील १० – १२ मुलांनी यंदा १२ वीची परीक्षा दिली. सहज म्हणून विचारणा केली तर सर्वच पालकांनी, “यह, आयपीमॅट काय आहे राव?” अशी विचारणा केली. याचा अर्थ सगळ्यांना सगळयाच गोष्टी माहिती असायलाच हव्यात असं नाही. पण “आयपीमॅट” परीक्षा सुरु होऊन आता जवळपास १३ वर्षे झाली आहेत. १२ वीनंतर उत्तम करिअर घडवण्याचा हा एक उत्कृष्ठ पर्याय आहे.

खूपखूप हुषार मुलांचा प्रश्नच नाही. ते त्यांनी आणि त्यांचे पालक “जेईई” किंवा “नीट” परीक्षेपलिकडे बघत नाहीत. तशी त्यांना गरज वाटत नाही. पण मध्यम बुध्दीमत्तेच्या मुलांचा सुध्दा पहिला ते दहावा पर्याय हेच असतात. विज्ञान शाखेतील मुले हवेतच असतात किंवा त्यांच्या पालकांनी त्यांना हवा दिलेली असल्याने ते सुध्दा दुसऱ्या पर्यायांचा विचार, सारं काही निसटून जाण्याच्या टप्प्यात करतात. त्यामुळे इचलकरंजीच्या त्या मुलाचं विशेष कौतुक.

तर ही “आयपीमॅट” म्हणजे इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनजेमेट ॲडमिशन टेस्ट! ही चाळणी परीक्षा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- इंदौर, या संस्थेमार्फत घेतली जाते. कला- वाणिज्य किंवा विज्ञान शाखेपैकी कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो. अशा विद्यार्थ्यांनी १० वी आणि १२ वी मध्ये उत्तीर्ण श्रेणी मिळवली तरी पुरे!

या चाळणी परीक्षेव्दारे या संस्थेतील पाच वर्षे कालावधीच्या एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. दरवर्षी १५० मुलांची निवड केली जाते. आतापर्यंतच्या सर्व बॅचेसमधील मुलांना १०० टक्के उत्तम प्लेसमेंट मिळालं आहे. तीन वर्षानंतर अभ्यासक्रम सोडता येतो. अशा विद्यार्थ्यांना बीबीए पदवी दिली जाते. शेवटच्या दोन वर्षात, या संस्थेच्या नियमित स्वरुपाच्या एमबीएचेच विषय या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात.

संपर्क – संकेतस्थळ – www.iimidr.ac.in, ईमेल-ipmadmissions @iimid.ac.in

इतर आयआयएम

आयआयएम इंदौर नंतर गेल्या काही वर्षात रोहतक, रांची, बोधगया, जम्मू या आयआयएमनी हा असा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे.

(१) आयआयएम रांची

या अभ्यासक्रमाला  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.

या अभ्यासक्रमाला, आयआयएम – इंदौर मार्फत घेतल्या जाणाऱ्‍या, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (आयपीमॅट) मधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.

संपर्क- संकेतस्थळ- https://iimranchi.ac.in/ipm/ ईमेल-chair.ipm@ iimranchi.ac.in

(२) आयआयएम रोहतक

२०१९ च्या शैक्षणिक वर्षापासून रोहतक स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे. प्रवेशासाठी आयआयएम-रोहतकव्दारेच घेतली जाणारी आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते. या अभ्यासक्रमाला  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणं आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.

संपर्क संकेतस्थळ- https://www.iimrohtak.ac.in/ipm-admission.php,ईमेल-admin@ www.iimrohtak.ac.in

() आयआयएम बोधगया

    या संस्थेने २०२१ सालापासून इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.

संपर्क संकेतस्थळ- https://iimbg.ac.in/programs/ipm/, ईमेल -director_office@iimbg.ac.in

  (२) आयआयएम जम्मू

या संस्थेने इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम दोन वर्षांपूर्वी सुरु केला आहे. अर्हता – १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.

संपर्क- संकेतस्थळ- https://www.iimj.ac.in/programs/ipm/IPM_at_a_glance, ईमेल- : info@iimj.ac.in

निवड प्रकिया

बोधगया आाणि जम्मू येथील इंडियन इंस्टिट्यूट मॅनेजमेंट मधील पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, “जिपमॅट- जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट”, ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजंसीव्दारे घेतली जाते. परीक्षेचा कालावधी अडीच तास. ही संगणकाधारित (कॉम्पुटर बेस्ड) परीक्षा आहे.

चाळणी परीक्षेतील गुण हे उमेदवारांच्या प्रारंभिक निवडीसाठी (शॉर्टलिस्टिंग) उपयोग आणले जातात. त्यानंतर प्रत्येक आयआयएम  अंतिम निवडीसाठी वेगवेगळया बाबींचा अंगिकार करतात. यामध्ये मुलाखती, व्यक्तीमत्व चाचणी, लेखन कौशल्य क्षमता, यांचा समावेश असतो. १० वी १२ वीमधील शैक्षणिक कामगिरीसाठी काही वेटेज ठेवलं जातं.

(१) रांची आयआयएम- अंतिम निवड करताना शैक्षणिक कामगिरीला २० टक्के वेटेज देतं. १० वी आणि १२वीत जितके अधिक गुण, त्याप्रमाणात वेटज मिळतं. महिला उमदेवारांना ५ टक्के विशेष वेटेज दिलं जातं. ५० टक्के वेटेज  चाळणी परीक्षेतील गुणांना दिलं जातं.

(२) इंदौर आयपीएम- चाळणी परीक्षेतील गुणांवर आधारित निवडक मुलांना, रिटन ॲबिलिटी टेस्टसाठी बोलावलं जातं. ही चाळणी मुलांच्या लेखन कौशल्य तपासणीसाठी घेतली जाते. त्यानंतर मुलाखत घेतली जाते. अंतिम निवड या दोन्ही घटकांमध्ये मिेळालेल्या गुणांवर आधारित केली जाते.

(३) बोधगया आयआयएम- चाळणी परीक्षेतील गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते.

(४) रोहतक आयआयएम- प्रवेशाची गुणवत्ता यादी चाळणी परीक्षेतील गुण, मुलाखतीचे गुण आणि शैक्षणिक कामगिरी यावर आधारित केली जाते.

(५)  जम्मू आयआयएम- प्रवेशासाठी ९५ टक्के वेटेजे चाळणी परीक्षेतील गुणांना दिले जाते. महिला उमेदवारांना ५ टक्के वेटेज दिलं जातं

  या सर्व संस्थामध्ये भारत सरकारच्या राखीव जागांच्या नियमानुसार सर्व संवर्गासाठी राखीव जागा असतात.

सर्व पाचही आयआएएम मिळून सातशेच्या                                                     आसपास जागा आहेत.

परीक्षा पध्दती

प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा पॅटर्न साधारपणे सारखाच असतो. परीक्षा बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीची असते. या परीक्षेत, संख्यात्मक कौशल्य चाचणी, तार्किक विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य चाचणी, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व तपासलं जातं. त्यामुळे दहावीपर्यंत शिकलेल्या इंग्रजी आणि गणिताचा पाया पक्का असेल आणि संकल्पना स्पष्‍ट असतील तर पेपर सोडवणं कठीण जात नाही. या विषयांचा अभ्यास घरीही करणं शक्य आहे.

या सर्व संस्थांच्या संकेतस्थळावर  या परीक्षेतील सर्व विषय घटकांचा अभ्यासक्रम ठेवलेला आहे. त्याशिवाय मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकाही ठेवलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक नजरेखालून घातल्यास  परीक्षेचा आवाका लक्षात  येऊ शकतो.

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या चाळणी परीक्षा या दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होतात. त्याच्या किमान दोन महिने आधी या परिक्षांविषयी सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या जातात. अर्ज भरण्याची तारीख एप्रिल अखेरपर्यंत संपून जाते. इचलकरंजीसारख्या मुलाने किंवा त्याच्या पालकाने यंदा या परीक्षेचा अर्ज वेळेवर भरला असेल तरच त्यांना या परीक्षा देता येतील. तथापि पुढील म्हणजे २०२५ च्या करिअररोड मॅपमध्ये याची नोंद करुन ठेवल्यास अनेक मुलांना या परीक्षेचे अर्ज वेळेवर भरता येतील आणि परीक्षा देऊन १०० टक्के प्लेसमेंट देणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थामध्ये प्रवेश मिळवता येईल.

सुरेश वांदिले