(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“हॅलो हॅलो, मी एक गंमत सांगते. यात दडलय एक जबरतस्त रहस्य! परवा, मी माझ्या मेंदूत डोकावले, तेव्हा, जे दिसलं, ते बघून धक्काच बसला. माझ्या मेंदूत, मला दिसलं की, श्रीयुत डायनोसार महोदयांना याची डोळा याची देही मी बघितलं.”

तुम्ही म्हणाल, “आम्हीसुध्दा, ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटात डॉयनोसॉरला बघितलेत.”

“हा हा हा हा! ते डायनोसॉर चित्रपटातले. म्हणजे आभासी.”

“तुझ्या जगातले डायनोसॉर खरे होते की काय? बंडला मारु नकोस.”

“नाही मी बंडलबाज, खरंच ऐकलाय डायनोसॉरांचा आवाज, त्याचा आव, त्याचा भाव. त्याचं चालणं, त्यांचं उडणं!”

“हा हा हा हा! म्हणे तू डॉयनोसॉरला बघितलस. याचा काय पुरावा? आम्ही का विश्वास ठेवायचा?”

“कारण हा पुरावा, तुम्हा मनुष्यप्राण्यालाच सापडलाय.

“तो कसा नि कुठे?”

“अमेरिका नामे देशातील ओक्लोहोमा विद्यापीठ आणि युटा विद्यापीठातील काही संशोधक, जगातील अनेक देशात जावून प्राणीसंग्रहालय आणि जीवाश्म म्हणजेच फॉसिल्स संग्रहालयाला भेट देऊ लागले.”

“कशासाठी?”

“त्यांना, पृथ्वीवरुन नष्ट झालेल्या क्रोकोडिलयन प्राण्यांच्या ९९ प्रजाती आणि सध्या जिवंत असलेल्या २० प्रजातींचा अभ्यास करायचा होता. या अभ्यासामुळे या संशोधकांकडे २३ कोटी वर्षांपर्यंतचा क्रोकोडिलयनचा इतिहास झाला गोळा! आलाना तुमच्या पोटात गोळा! या इतिहासातून क्रोकोडिलयनची उत्क्रांती कशी होत गेली, हे कळलं. त्याचा डाटाबेस म्हणजेच माहितीचा प्रचंड साठा, संशोधकांजवळ जमला. या अभ्यासातून लक्षात आलं की, डायनोसॉरांनी पृथ्वीवरुन कधीचाच निरोप घेतला. पण त्याच्या काळातच त्याच्यासोबत राहिलेली, बागडलेली, दंगामस्ती केलेली, ‘मी’ एक क्रोकोडिलयन आजही कशी काय बुवा टिकून आहे? आहेना जबरदस्त रहस्य!”

“होय, मग पुढे?”

“संशोधकांना असही दिसलं की आजची ‘मी’ आणि भूतकाळातील क्रोकोडिलोमार्फ्स गटात मोडणारे माझे पूर्वज, यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत बरचसं साम्य होतं. मांसाहारी क्रोकोडिलोमार्फ्सचं वास्तव्य जमिनीवर होतं. त्यांचं खाद्य होतं छोटे प्राणी.”

“या संशोधकांना हे कसं कळलं.”

“क्रोकोडिलोमार्फ्सच्या जीवश्मांमधील दात आणि कवटिच्या अभ्यासावरुन, आहारासाठी आवश्यक असलेल्या त्यांच्या शिकार करण्याच्या पध्दतीचा शोध, या संशोधकांना लागला. हे क्रोकोडिलोमार्फ्स नष्ट झाले तेव्हा, त्यांची आहारपध्दती काय होती, हेसुध्दा कळलं.”

“पण, तू कशी काय तेव्हापासून जिवंत राहिलीस?”

“मी, जिवंत राहिले कारण मी आणि माझे सख्खे नातेवाईक हे उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर राहू शकण्याची कला प्राप्त केलेले प्राणी आहोतना.”

“त्याने काय झालं?”

“संशोधकांनी अभ्यास केलेले जिवाश्म आणि आताच्या ‘मी’च्या केलेल्या अभ्यासातून त्यांना दिसलं की मी माझ्या नातेवाईकांना, पृथ्वीवर सतत बदलणाऱ्या पर्यावरणाशी जुळवून घेता येतं. आम्ही जमेल तेव्हा पाण्यात, गरज असेल तेव्हा जमिनीवर, वेगवेगळया प्रकाराच्या अधिवासात म्हणजे ठिकाणी, राहण्याच्या आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत लवचिक आहोत. ही लवचिकता आम्ही विकसित केली म्हणा किंवा निसर्गानेच आम्हाला तशी क्षमता दिली म्हणा, या क्षमतेचा पुरेपुर फायदा घेतो.

“म्हणजे नेमकं काय करता?”

“अहो, जेव्हा जमिनीवर काही बदल घडले, तेव्हा आम्ही पाण्यात राहायला गेल्याने आमच्यावर जमिनीवरच्या बदलांचा काही परिणाम झाला नाही. आम्ही पाण्यात असताना तेथील छोट्या प्राण्यांमध्ये आहार शोधला नि त्यांच्यावर ताव मारत, पाण्यात विहार केला. यातला विनोद सोडला तरी, आम्ही पर्यावरणाशी जुळवून घेतलं. लवचिक आहाराचा स्वीकार केला. चपळ तर आम्ही होतोच की. हा असा स्मार्टनेस डायनोसॉरांना दाखवता आला नाही. काळाबरोबर जे चालत नाहीत, धावत नाहीत, बदलत नाहीत, त्यांचं हे असंच होतं. हा धडा शिकायचा बरं का या डायनोसॉरकडून.”

“हो हो. पण, तू अशी स्वत:ला अतिहुषार समजणारी आहेस तरी कोण?

“मी, म.. म.. मगर! डॉयानोसॉरला बघितलेली नि तुम्हालाही बघणारी. जिवंत फॉसिल! माझी कथा खरतर इथेच संपवायची होती. पण एक सांगते, सध्या पृथ्वीच्या पर्यावरणाचा जो खेळखंडोबा, तुम्ही मानवांनी चालवालयना, त्याची मला फार काळजी वाटते. पर्यावरणाच्या हेळसांडीचा पृथ्वीमातेला एखादे दिवशी खूपच राग आला तर ती नष्टच व्हायची. तेव्हा तुम्ही तर नष्टच व्हालच, पण २३ कोटी वर्षांपासून, जिवंत असलेली मीसुध्दा लुप्त व्हायची. किमान माझ्यासाठी तरी पर्यावरण रक्षणाकडे थोडं लक्ष द्याकी. जमेल ना ही साधी गोष्ट?

सुरेश वांदिले