भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम शास्त्रीय संगीत आणि मुकाभिनय या कलांमधील प्रगत प्रशिक्षणासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत, यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप ही योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ४०० कलावंतांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.
शिष्यवृत्तीचे विषय
पुढील कलाप्रकारांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो- (अ) सुगम शास्त्रीय संगीत– (१) ठुमरी, (२) दादरा, (३) टप्पा, (४) कव्वाली, (५) गझल, (६) कर्नाटकी शैलीवर आधारित सुगम संगीत, (८) रविंद्र संगीत, (९) नझरुल गिती, (१०) अतुलप्रसाद
(ब) लोककला- (१) लोकनृत्य, (२) लोकसंगीत, (३) लोकगीत, (४) लोकरंगमंच, (५) पारंपरिक आणि देशी कला, (६) कठपुतळी
(क) दृष्यकला- (१) शिल्पकला, (२) चित्रकला, (३) सर्जनशील छायाचित्रणकला, (५) मातीकला, (६) ग्रॅफिक्स. (ड) रंगमंच- (१) दिग्दर्शन, (२) अभिनय. (इ) भारतीय शास्त्रीय नृत्य- (१) भरतनाट्यम, (२) कथ्थक, (३) कुचिपुडी, (४) कथकली, (५) मोहिनीअट्टम, (६) ओडिसी/नृत्य आणि संगीत, (७) मनिपुरी/नृत्य आणि संगीत, (८) थांगता, (९) छाऊ /नृत्य आणि संगीत, (१०) सत्रीया नृत्य, (११) गौदिया नृत्य. (ई) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत- कंठ आणि वाद्य. (फ) कर्नाटकी शास्त्रीय संगीत-कंठ आणि वाद्य
अटी आणि शर्ती
या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षाचा आहे. या कालावधीत संबंधित कलावंताने आधी घेतलेले प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याची निवड केली जाते. मान्यताप्राप्त संस्थेतील गुरुंकडे अधिक प्रगत प्रशिक्षणाची सुविधा असते. शिष्यवृत्तीच्या कालावधीत कलावंतास खडतर प्रशिक्षण घ्यावे लागेल. सैध्दांतिक ज्ञान प्राप्तीसाठी वेळ दिल्यानंतर या कलाकारास दररोज किमान तीन तास सराव करणे बंधनकारक आहे.
या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या प्रत्येक कलावंतास दोन वर्षासाठी दरमहा ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. याव्दारे त्याने आपल्या दैनंदिन गरजा, पुस्तक खरेदी, प्रवास खर्च, इतर साहित्य, प्रशिक्षण शुल्क आदी भागवावेत अशी अपेक्षा आहे.
अर्हता-
संबंधित कलावंताने आपल्या कला क्षेत्रातील गुरुंकडे किंवा संस्थेकडे किमान पाच वर्षाचे प्रशिक्षण घेतलेले असावे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना संबंधित गुरु किंवा संस्थेचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल. ही शिष्यवृत्ती प्रगत प्रशिक्षणासाठी असल्याने संबंधित कलावंताने आपल्या कलेत किमान प्रभुत्व मिळवलेले असावे. ही शिष्यवृत्ती नवशिक्या कलाकारांसाठी नाही. खडतर प्रगत प्रशिक्षणासाठी आपण तयार असल्याचा पुरावा संबंधित कलाकारास द्यावा लागेल. संबंधित कलाकाराचे वय एक एप्रिल रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
निवड प्रकिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना तज्जांपुढे आपली कला सादर करावी लागेल किंवा मुलाखत द्यावी लागेल. मुलाखत किंवा कला सादरीकरणाची वेळ तारीख आणि ठिकाण उमेदवारांना ईमेलव्दारे कळवले जाते. उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर केली जाते. निवड यादी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कळवलेही जाते.
संपर्क– सेंटर फॉर कल्चरल रिर्सोसेस ॲण्ड ट्रेनिंग, १५ ए, सेक्टर ७, व्दारका, नवी दिल्ली-११००७५, दूरध्वनी- ०११-२५०७४२५६, संकेतस्थळ- https://indiaculture.gov.in/award-scholarships-young-artists-different-cultural-fields
०००
म्युझिक प्रॉडक्शन ॲण्ड डायरेक्शन
व्हिसलिंग वूडस इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फिल्म कम्युनिकेशन ॲण्ड क्रिएटिव्ह आर्ट, या संस्थेतील, स्कूल ऑफ म्युझिकने, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी प्रदान केली जाते. कालावधी तीन वर्षे.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर (१) म्युझिक प्रोड्युसर, (२) म्युझिक डायरेक्टर, (३) म्युझिक एडिटर, (४) साऊंड इंजिनीअर, (५) प्रोफेशनल म्युझिशिअन, (६) कम्पोझर, (७) डीजे आणि आर जे, या करिअर संधी मिळू शकतात.
प्रवेश प्रक्रिया– या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करु शकतात. त्यांची संगीत कलचाचणी आणि मुलाखत घेतली जाते.
या संस्थेत, सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक फाउंडेशन – लेव्हल वन. हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी– दहा आठवडे.
संपर्क संकेतस्थळ- https://www.whistlingwoods.net/admissions/school-music/ ईमेल- admissions@ www.whistlingwoods.net
०००
वेस्टर्न कंटेमपररी म्युझिक
नर्सी मोन्जी युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.हा अभ्यासक्रम केल्यावर, बॅचलर आफ आर्ट ही पदवी प्रदान केली जाते. कालावधी – तीन वर्षे. यामध्ये गिटार, ड्रम, पियानो आणि कंठ संगीताचा समावेश आहे.
या संस्थेत, बीए इन इंडियन म्युझिक, हा अभ्यासक्रमही करता येतो. यामध्ये प्रामुख्याने सतार आणि कंठ संगीतावर भर दिला जातो.
प्रवेश प्रक्रिया- १२ वीतील कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी संगीत कलचाचणी आणि मुलाखत घेतली जाते.
संकेतस्थळ-https://performingarts.nmims.edu/BA-Music-Indian-Music/
०००
एम.ए इन म्युझिक
एस.एन.डी.टी वुमेन्स युनिव्हर्सिटीच्या पुणे कॅम्पस येथील डिपार्टमेंट ऑफ म्युझिकमध्ये, एम.ए इन म्युझिक, हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात २० रागांचा सखोल अभ्यासाचा समावेश आहे. ठुमरी, टप्पा, गझल, नाट्यसंगीत, देशभक्तीपर गाणे आदींचं प्रशिक्षण दिलं जातं.
अर्हता- कोणत्याही विद्यापीठातील बॅचलर इन म्युझिक ही पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि संगीत विशारद किंवा तत्सम अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी किंवा कोणत्याही विषयातील पदवी असलेल्या मात्र संगीत विषयातील पदवी नसलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी किमान पाच वर्षे नामांकित गुरुंकडे प्रशिक्षण घेतले असेल, असे विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. त्यांना संबधित गुरुंचे शिफारसपत्र सादर करावे लागेल. विद्यार्थ्यांची निवड ऑडिशनव्दारे केली जाते. संपर्क- संकेतस्थळ- https://sndt.ac.in/programmes/master-degree-courses/ma-in-music किंवा sndt.ac.in/musicpune/courses
ईमेल-
admissionspgmusic@gmail.com
०००
गुरुकुल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ललित कला केंद्र कार्यरत आहे. या केंद्राचे स्वरुप गुरुकुलाचे आहे. या ठिकाणी पुढील अभ्यासक्रम करता येतात- (१) इंटिग्रेटेड बीए-एमए इन म्युझिक- या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षाचा आहे. कोणत्याही विषयातील १२ वी झालेल्या विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. चार वर्षाचा अभ्यासक्रम झाल्यावर, बीए इन म्युझिक ही पदवी मिळेल. चार वर्षानंतर अभ्यासक्रम सोडण्याची सुविधा आहे. पाच वर्षे पूर्ण केल्यावर, एम.ए इन म्युझिक ही पदवी मिळेल. (२) एम.ए इन म्युझिक- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. यातील पहिले वर्ष हे ब्रीज अभ्यासक्रमाचे आहे. (मुख्य अभ्यासक्रम कठीण जाऊ नये आणि शिकण्याची गती कायम राहावी यासाठी ब्रिज अभ्यासक्रमात पूर्व तयारी केली जाते.) उर्वरित दोन वर्षात प्रत्यक्ष अभ्यासक्रम शिकवला जातो. अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी.
प्रवेशासाठी ऑनलाइन चाळणी परीक्षा आणि अभियोग्यता कलचाचणी (ऑडिशन ॲप्टिट्यूड टेस्ट) घेतली जाते. या अभ्यासक्रमासाठी किमान पूर्वानुभव आणि पूर्व प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे त्यासंबंधीची कागदपत्रे प्रवेशाच्यावेळी सादर करावी लागतात.
संपर्क- ईमेल-campus.unipune.ac.in, संकेतस्थळ- http://www.unipune.ac.in/dept/fine_arts/centre_for_performing_arts
०००
परफॉर्मिंग आर्ट
एचएसएनएसी (हैदराबाद-सिंध नॅशनल कॉलिजिएट बोर्ड) युनिव्हर्सिटीमध्ये, बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट, हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात तबला, हिंदुस्थानी कंठ संगीत आणि तालवाद्याचा समावेश आहे. कालावधी तीन वर्षे. अर्हता-कोणत्याही विषयातील १२ वी झालेल्या विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी ऑडिशन घेतली जाते.
संपर्क– एचएसएनसी युनिव्हर्सिटी, मुंबई डी.एम.हरीश बिल्डिंग, ४७, डॉ.आर जी थाडानी मार्ग, वरळी मुंबई ४०००१८, संकेतस्थळ- https://www.hsncu.edu.in/school-of-performing-art/files/Prospectus_SoPA.pdf, ईमेल-
sopa@ hsncu.edu.in
०००
सांस्कृतिक संशोधन
देशातील वेगवेगळ्या सांस्कृतिक संस्थांसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रात संशोधन कार्य करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत सांस्कृतिक विषयाच्या संशोधनासाठी राष्ट्रीय टागोर फेलोशीप, ही शिष्यवृत्ती दोन गटात दिली जाते. (१) टागोर राष्ट्रीय फेलोशीप – या योजनेंतर्गत १५ व्यक्तींना दरमहा ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. कालावधी दोन वर्षे. (२) टागोर संशोधन स्कॉलरशीप– २५ व्यक्तींना दरमहा ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. कालावधी दोन वर्षे.
संपर्क – https://indiaculture.gov.in आणि www.pmml.nic.in
सुरेश वांदिले