(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला एक वाहता नाला आहे. या नाल्याच्या अवतीभोवती असलेल्या झाडंझुडपांवर विविध रंगी पक्षी येऊन बसतात. या नाल्याच्या पाण्यातून कचरा, गवत, वेगवळ्या छोट्या लाकडी फळ्या, थर्माकोलचे तुकडे, अशा वस्तू वाहत असतात. बरेचदा यावर बसून, बंगी बगळेरावाचा प्रवास सुरु असतो. पाण्याच्या प्रवाहासोबत बंगीचं वाहन पुढेपुढे जातं. बंगी कितीतरी वेळ एकाच स्थितीत त्यावर बसून असतो.  ‍बंगीची, ही गमंत बघायला अलेक्झांडरला फार आवडतं.

एकदा, बंगी पाण्यातील थर्माकोलवरुन पुढेपुढे जात असताना मध्येच उडून नाल्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली येऊन बसला. त्यांचं सगळं लक्षं पाण्याकडे होते. एकाच स्थितीत तो कितीतरी वेळ उभा होता. हे सगळं अलेक्झांडर बराच वेळ बघत होता. बगळा काहीच हालचाल करत नाही, याचं त्याला आश्चर्य वाटलं असावं. त्याने तेजोमयीला गॅलरीकडे ओढत नेलं. तेजोमयीपाठोपाठ अलेक्सा गोर्जीही तिथे आली. अलेक्झांडरने, दोघींचं लक्षं एकाच जागी स्थिर असलेल्या बगळयाकडे वेधलं.

“अलेक्झू, तो बगळा आहे.” तेजोमयी  अलेक्झांडरच्या पाठीवरुन हात फिरवित म्हणाली.

“तेजो, हे काही त्याला नक्कीच विचारायच नाहीय. अलेक्झूला काहीतरी वेगळाच प्रश्न पडलाय.” गोर्जी म्हणाली.

“काय असेल बरं?”

“आपण, दहा मिनिटं इथेच थांबून बघूया. काहीतरी लक्षात येईल.” गोर्जी म्हणाली. दहा मिनिटं गोर्जी आणि तेजोमयी बंगीकडे बघत राहिल्या. या वेळेत त्याने जराशीही हालचाल केली नाही. तो  एकटक पाण्याकडे बघत होता.

“गोर्जे,                                       बंगी तर जागचा हलायला तयार नाही.” तेजोमयी म्हणाली.

“हाच प्रश्न कदाचित अलेक्झांडरलाही पडला असेल. बंगी, इतका वेळ एकाच जागी कसा स्थिर राहू शकतो?”

“कशासाठी बरं?”तेजोमयीनं विचारलं.

०००

गॅलरिमध्ये गोर्जी, तेजोमयी आणि अलेक्झांडर बराच वेळ काय करताहेत, या उत्सुकतेने बाबा तिथे आले. काय चाललय तिघांचं, म्हणून त्यांनी विचारलं. बराच वेळ होऊनही बंगी, काहीच हालचाल करत नसल्याचं, गोर्जीने, त्याच्याकडे लक्ष वेधत, बाबांना सांगितलं.

बाबांनी गॅलरितून बघितलं. बंगी अजूनही त्याच स्थितीत होता.

“हा बंगी एकाच  स्थितीत इतका वेळ कशासाठी आणि कसा काय राहू शकतो? हा अलेक्झांडरला प्रश्न पडला असावा म्हणून त्याने आम्हाला इकडे आणलं. आता जवळपास अर्धातास झालाय. पण, बंगीची समाधी काही भंग पावतच नाही. तुम्हाला काय वाटतं बाबा?” तेजोमयीने बाबांना विचारलं.

बाबा एकटक बगळ्याकडे बघू लागले. काही क्षणांनी खळखळ असा आवाज आला. बगळ्याची मान झरदिशी पाण्यात गेली. लगेच त्याने मान वरही केली. त्याच्या चोचित दोन छोटे मासे होते. तो हलेकच उडाला नि पाण्यातील एका गवताच्या गंजीवर जाऊन बसला. पाण्यासोबत गंजी हळूहळू पुढे जाऊ लागली. बगळ्याने हळूच दोन्ही मासे पोटात ढकलेले नि डोळे मिटून जलप्रवाहाचा आनंद घेऊ लागला. हे दृष्य बघून बाबा लगबगीने म्हणाले, “अलेक्झांडरच्या प्रश्नाचं उत्तर मिळालय.”

“मग, सांगा की बाबा” गोर्जी आणि तेजोमयी उत्सुकतने म्हणाल्या. अलेक्झांडरही जिभ लांब करुन त्यांच्याकडे बघू लागला.

सगळेजण, दिवाणखान्यात येऊन सोफ्यावर बसले. अलेक्झांडर बाबांच्या पायाशी बघून उत्सुकतेने बघू लागला.

बाबा त्याला कुरळवात सांगू लागले,

“बंगी इतका वेळ, एकाच स्थितीत न कंटाळता बसला होता कारण, त्याला त्याचं उदि्दष्ट्य साध्य करायचं होतं.”

“कोणतं बरं?” गोर्जिनं आश्चर्याने विचारलं.

“त्याचं उद्दिष्ट्य होतं, भक्ष्य मिळवण्याचं. त्‍यासाठीच इतका वेळ, एकाच स्थितीत, न कंटाळता तो उभा होता. एकाच स्थितीत खूप वेळ उभं राहायचं म्हणजे सयंमाची परीक्षाच. या परीक्षेत तो पास होऊन त्याचं उद्दिष्टही साध्य झालं.”

“कित्ती छान!” तेजो                                       मयी म्हणाली.

“त्याच्यापासून आपण हेच शिकलं पाहिजे.”

“म्हणजे?”गोर्जीने विचारलं.

“हेच की, आपणास काही साध्य करायचं असल्यास, असाच संयम हवा, चिकाटी हवी. उद्दिष्ट स्पष्ट  हवं. चलबिचल किंवा कंटाळा केल्यास, यश गवसत ना                                                    ही. आपल्या उद्दिष्ट्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास, हमखास यश मिळतं. मग, बंगीसारखा पुढचा प्रवासही आनंदानं करता येतो, बरोबरना रे अलेक्झू?” बाबा, हलकेच त्याचा कान उपटत म्हणाले.

“मला काय सांगता, तेजोला सांगा की,” असे भाव चेहऱ्यावर आणत तो तेजोमयीकडे बघू लागला.

सुरेश वांदिले