(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ते वर्षं होतं २०१५. बासष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये तिला तामीळ चित्रपट ‘सैवम’ मधील ‘अजहागे अजहागे (सौंदर्य)’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारी ती आतापर्यंतची सर्वात छोटी गायिका ठरली. त्यावेळी तिचं वय होतं अवघं १०! (गानकोकिळा लता मंगेशकरांना हा पुरस्कार ६२ व्या वर्षी तर आशा भोसले यांना ४८व्या वर्षी मिळाला होता.)

तिला संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. तिचे वडील ख्यातमान कर्नाटकी कंठगायक. आई भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम क्षेत्रातील नामवंत. संगीत आणि कलेच्या या वातावरणामुळे तिला संगीताची आवड बालपणीच निर्माण झाली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात, त्याप्रमाणे तिच्या गळयातले सूर बालपणातच दिसू लागले. तिच्या आईबाबांनी, तिला प्रोत्साहन दिलं. वयाच्या पाचव्या वर्षीच ती कर्नाटकी गायकीच्या प्रशिक्षणासाठी गुरुंकडे जाऊ लागली. पुढच्या काही वर्षात तिचा गळा चांगलाच तयार झाला. त्यातून मिळालेल्या आत्मविश्वासाने ती, संगीताचे इतर प्रकारही लिलया हाताळू लागली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, जाज, पॉप, रॉक, पार्श्वगायन यातला तिचा वावर भल्याभल्यांना स्तंभित करणारा ठरला. कर्नाटकी गायनाचं प्रशिक्षण सोडल्यास तिने इतर प्रकारातील गायकीचे प्रशिक्षण कोणत्याही गुरुंकडून घेतलं नाही. त्या त्या क्षेत्रातील थोर थोर गायकांचं गायन मन लावून ऐकायचं नि मग स्वत:चं स्वत:च शिकायचं. थोडक्यात काय तर, ती स्वत:चीच गुरु झाली. तिच्या गायकीचा चतुरस्त्रपणा किंवा अष्टपैलुपणाची कीर्ती हळूहळू सर्वदूर पसरु लागली. लहान वयातच तिला एकदा तामीळनाडूतील नवरात्र महोत्सवातील ‘गोलू’ या सणाच्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली. तिच्या गायकीने उपस्थित असलेल्या सगळ्यांना भारावून सोडलं. या कार्यक्रमात तामिळनाडूतील प्रसिध्द संगीत दिग्दर्शक जी.व्ही प्रकाश उपस्थित होते. ते या छोट्या गायिकेच्या प्रेमातच पडले. त्यांनी तिला ‘अजहागे’ हे गाणं गायला दिलं. या गाण्याच्या आधी २०१३ साली, ८ वर्षाची असताना, तिने तामीळ बालकलावंत साराअर्जूनसाठी पर्श्वगायन केलं होतं. राष्ट्रीय पुरस्कारानंतर नंतर गायनातील तिची घौडदौड नेत्रदीपक ठरली.

वयाच्या पाचव्या वर्षी जेव्हा ती कर्नाटकी गायन शिकायला गेली. तेव्हा सुरुवातीला तिला फारसा त्यात रस वाटला नाही. त्यामुळे ती सारखी उंडारक्या नि टंगळमंगळ करायची, मात्र नंतर तिने एके दिवशी दृढनिश्चय केला की बस्स झालं हे टवाळकी करणं. मग काय, ती मन लावून शिकू लागली. ‘शिकण्यातली तिची गती बघून मी आश्चर्यचकितच झालो,’ असे तिचे गुरु डॉ.सुधाराजा कौतुकाने सांगतात. ती चेन्नईच्या लेडी  अंदल वेंकटसुब्बाराव स्कूलमध्ये शिकायला जायची. तिला शिकण्यात फार रस नव्हता. ‘पण मला मित्र आणि शिक्षकांना भेटायला नि त्यांच्याशी बोलायला फार आवडायचं म्हणून, मी शाळेत जायचे,’ असं ती सांगते. तिला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा  तिच्या घरी तिची मुलाखत घेण्यासाठी पत्रकार, टीव्ही वाहिन्यांचे वार्ताहर आले तेव्हा या बाईसाहेब, टॉम ॲण्ड जेरीचं कार्टून मन लावून म्हणा किंवा टक लावून म्हणा बघत होत्या. ते बघून झाल्यावरच ती पत्रकारांना भेटली.

तर अशी ही, पी. उन्नीकृष्णन आणि प्रिया उन्नीकृष्णन यांची लाडकी लेक, उथरा उन्नीकृष्णन. वय वर्षे २१ . हल्ली मुक्काम चेन्नई.

सुरेश वांदिले