(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बाप्पांच्या आगमनानंतर तेजोमयीच्या घरी फुलांनी सुंदर सजावट केली गेली. बाप्पांना मखरात साग्रसंगीत बसवलं गेलं. बाबांनी पूजा केली. पुजेची तयारी आईने करुन दिली होती. तेजोमयीनेही बरीच मदत केली.

पूजा सुरु असतानाच एका फुलातून अळी बाहेर आल्याचं, तेजोमयीनं बघितलं. तिची चुळबूळ सुरु झाली. आता या अळीचं काय करावं, हे तिला काही कळेना. त्यावेळी अथर्वशीर्ष म्हणणं सुरु होतं. तिघांचाही एक सुर लागला होता. अलेक्झांडर डोळे मिटून श्रवणभक्ती करत होता.

अळी दिसताच, तेजोमयीचं लक्ष तिकडे गेल्यानं, तिचं अथर्वशीर्षातील लक्षं उडालं आणि आणि ती चुकू लागली. त्यामुळे अथर्वशीर्षाची लय चुकली. बाबांच्या हातात पूजेचं ताट असल्याने ते काहीच बोलले नाही. मात्र आईने, तेजोमयीस नजरेनं चूक लक्षात आणून दिली..पण तिचं लक्षं अळीवरुन जाईना. अखेर न राहवून तिने पूजेसाठी आणलेलं आंब्याचं पान अळीजवळ टेकवलं. इकडे-तिकडे पळण्यासाठी कुठे जागा दिसत नसल्याने ती अळी कशीबशी त्या पानावर चढली. तेजोमयीने ते पान गॅलरीत नेऊन ठेवलं. ती अळी पानावरुन उतरुन खिडकीच्या एका किनाऱ्यास लागून निघून गेली. तेजोमयीनं हुश्श केलं.

ती पुन्हा पूजेत सामील झाली. अथर्वशीर्ष संपलं होतं. पूजाही संपत आली होती. पूजा संपताच आई तेजोमयीवर बरसलीच. आईचा तो अवतार बघून अलेक्झांडरही थरथर कापू लागला. तो बाबांच्या बाजूला अंग चोरुन बसला.

गधडे, असं पूजा सोडून जायला कुणी सांगितलं तुला..आँ..

अगं, आई ती अळी..

काय ती अळी…फुलापानांमध्ये अळ्या असतातच..मारुन टाकायचं असतं,त्यांना…

काही तरीच काय आई..

काहीतरी नाही..असं पूजा सुरु असताना उठून गेल्यानं बाप्पांचा अपमान होतो. ते रागावू शकतात..आई जरा शांत होत म्हणाली..

अहो पण, असं बाप्पांच्या समोरच त्या सुईपेक्षाही लहान जीवाला मारणं, त्यांना तरी आवडलं असतं का? बाबा तेजोमयीची बाजू घेत म्हणाले.

अहो, तुम्ही लेकीची बाजू घेऊ नका. अशानेच ती आगावूपणा करायला लागलीय..त्या सूईपेक्षाही लहान जीवाला इथे कडमडायला मी सांगितलं होतं का?

अगं आई, तिला कुठे माहीत ना की आपण पूजा करतोय ते किंवा ज्या फुलात ती होती, ते बाप्पांच्या पूजेसाठी वापरणार ते..

गप्प गं..पुन्हा तुझा शहाणपणा सुरु..

नाही हो, तिचा शहाणपणा नाही हा..बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी, त्यांच्यासमोरच एका इटुकल्या जीवाला मारलं असतं तर त्यानांच आवडलं नसतं. उलट आपल्याला रागावले असते ते..तेजूने जे केलय ना ते बरोबरच केलं. प्राणीमात्रावर प्रेम करण्याची अशी संधी बाप्पांनीच दिल्यावर ती नाकारण्याचा करंटेपणा तेजूने केला नाही. त्याचं कौतुक नको का करायला तू..हो ना हो बाप्पा..बाप्पांच्या मूर्तीकडे बघत बाबा म्हणाले..

बाप्पा काही बोलायच्या आतच अलेक्झांडरने आईकडे बघून, बाबा म्हणताहेत ते बरोबर असल्याचे भाव दर्शवत मान हलवली आणि हळूच आईजवळ सरकला..

बस बस, खूप झाली लाडीगोडी, आई लटक्या रागानं म्हणाली..

अगं लाडीगोडी नाही त्याची. तो म्हणतोय, बाप्पांनी त्याच्या कानात गुपचूप सांगितलं तसं..म्हणूनच त्यांचे कान लांब आणि याचेही लांब..बाबा म्हणाले.

आईच्या चेहऱ्यावर हसू आलं.आई हसली की तणाव संपला हे, समिकरण पक्क माहीत झाल्यानं अलेक्झांडरने आईच्या गालाला जिभ लावून आपला आनंद व्यक्त केला..

सॉरी बाप्पा..आईनं आपल्या चुकीबद्दल बाप्पांची क्षमा मागितली.

सुरेश वांदिले