(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भारतातील वस्त्रोद्योग हा सर्व प्रांतात पसरलेला असून या क्षेत्राव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक वस्त्रनिर्मितीपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वस्त्रनिर्मितीचा प्रवास भारतात झपाट्याने झाला आहे. या क्षेत्राला तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज सातत्याने भासत असून ही गरज भागवण्यासाठी, भारत सरकारने, सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल स्कूल ऑफ टेक्सटाइल ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी वस्त्रोद्योग क्षेत्रातील  शिक्षण – प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणारी आपल्या देशातील महत्वाची स्वायत्त संस्था आहे.

             या संस्थेमार्फत वस्त्रोद्योग निर्मिती, व्यवस्थापन व्यवसायासंदर्भातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवले जातात.  या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, हे अभ्यासक्रम चांगल्या संधीच्या दारापर्यंत पोहचवू शकतात.

पदवी अभ्यासक्रम

() बीएस्सी- टेक्सटाइल्स ॲण्ड  ॲपेरल, अर्हता- भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र या विषयासह १२वी. खुला संवर्ग ४५ टक्के/ राखीव संवर्ग ४० टक्के.कालावधी- तीन वर्षे.

() बीएस्सी- टेक्निकल टेक्सटाइल्स, अर्हता- भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र या विषयासह १२ वी. खुला संवर्ग ४५ टक्के/ राखीव संवर्ग ४० टक्के. अभ्यासक्रमाचा कालावधी – तीन वर्षे.

() बीबीए- टेक्सटाइल्स बिझिनेस ॲनॅलिटिक्स. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. खुला संवर्ग ५० टक्के/ राखीव संवर्ग ४५ टक्के. अभ्यासक्रमाचा कालावधी – तीन वर्षे.

() बीएस्सी- टेक्सटाइल्स (बिझिनेस ॲनॅलिटिक्स), अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे. अर्हता- १२वी विज्ञान शाखा – रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा १२ वी वाणिज्य शाखा- अकाउंटिंग (लेखा) आणि (वित्त) आणि बिझिनेस मॅथेमॅटिक्स (व्यवसाय गणित). अर्हता- खुला संवर्ग ४५ टक्के/ राखीव संवर्ग ४० टक्के.

प्रवेश प्रकिया

             सर्व पदवी अभ्यासक्रमांना बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो. याचा अर्थ जे इच्छूक विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतील, त्यांची बारावित मिळालेल्या गुणांच्या आधारावर संवर्गनिहाय गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार केली जाईल. उपलब्ध जागांनुसार प्रवेश निश्चित केला जाईल.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

() एमबीए टेक्सटाइल्स मॅनेजमेंट, () एमबीए ॲपेरल मॅनेजमेंट, () एमबीए रिटेल मॅनेजमेंट, () एमबीए टेक्निकल टेक्सटाइल्स मॅनेजमेंट,

             अर्हता- कला/ वाणिज्य/ विज्ञान/ अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ औषधीनिर्माणशास्त्र/ वास्तुकला विषयातील पदवी अथवा ३ वर्षे कालावधीची पदविका आणि ३ वर्षांचा कार्यानुभव.

प्रवेश प्रकिया

             या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. यंदा पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात. मात्र त्यांचा निकाल ३० सप्टेबर २०२३ पर्यंत लागणे आवश्यक आहे. ज्यांना ही परीक्षा द्यायची नसेल त्यांना, कॉमन एंट्रन्स टेस्ट (कॅट), मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (मॅट), कॉमन मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (सी-मॅट) अशा सारख्या चाळणी परीक्षा द्याव्या लागतील. या परीक्षेत मिळालेले गुण प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात.

करिअर संधी

             पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी साहाय्य केलं जातं. या संस्थेत पुढील कंपन्या प्लेसमेंसाठी येतात- जे जे मिल्स, रोडमाइन/इस्टमॅन एक्सपोर्ट, लाइफस्टाइल इंटरनॅशनल-मॅक्स फॅशन, रिलायंस ट्रेंडस्, लॉयल टेक्सटाइल, बाटा, गोकलदास एक्स्पोर्टस, ककून ॲपेरल्स, रेमंड्स, पँटलून्स, पार्क अव्हेन्यू, वर्धमान, टॉमी ॲण्ड हिलफिगर इत्यादी.

लघु मुदतीचे अभ्यासक्रम

             याच संस्थेने पुढील अत्यल्प कालावधीचे कौशल्यनिर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतील असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले आहेत-

() मेडिकल टेक्सटाइल मॅनेजमेंट

             फॅशनेबल वस्त्रप्रावरणांकडे आपणा सर्वांचं कायम लक्ष असतं. नवनवीन छटा आणि रंगसंगती असलेल्या ऋतूनिहाय पोषाखांची विविध माध्यमांमधून बरीच चर्चा होत असते. मात्र असं एक क्षेत्र आहे की, ज्यास विशिष्ट प्रकारची वस्त्रप्रावरणं अतिशय मोठ्या प्रमाणावर लागत असूनही त्याविषयी आपल्याकडे अल्प किवा अजिबातच चर्चा होत नाही. त्याबद्दल बहुतेक सर्वजणच अनभिज्ञ असतात. हे क्षेत्र म्हणजे वैद्यकीय.

             आरोग्यविषयक समस्या किंवा प्रश्नांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चाललीय. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तार एखाद्या मोठ्या उद्योगासारखा झालाय. या क्षेत्रासाठी फॅशनेबल वस्त्रप्रावरणांची गरज भासत नसली तरी, दवाखाने ते भव्य अशी कार्पोरेट रुग्णालये यांना चादरी, अर्भे, पडदे, उशा, रुग्णांना घालावयची वस्त्रे, डॉक्टर-नर्सेसची वस्त्रे, मुखपट्टी, मलमपट्टी, रुमाल आणि आणखीही इतर वस्त्रे यांची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते. हे क्षेत्र नव्या आणि जुन्या दोन्ही उद्योजकांसाठी उत्पन्नाचं चांगलं स्त्रोत ठरु शकतं.

             याविषयाचं महत्व आणि व्याप्ती इच्छुकांच्या लक्षात यावी म्हणून, या संस्थेने ३० तास इतक्या अल्पमुदतीचा प्रशिक्षण कम अभ्यासक्रम सुरु केला आहे.

             हा अभ्यासक्रम/प्रशिक्षण ऑनलाइन पध्दतीने करता येतो. कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करु शकतात.

काय शिकाल?

() वैदयकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या वस्त्रप्रावरणाची निर्मिती आणि तंत्र, () या वस्त्रप्रावरणाचं विपणन (मार्केटिंग), नियामके, नाविण्यपूर्ण बाबी, दर्जा आणि गुणवत्ता परीक्षण, () या क्षेत्रात उद्योग सुरु करण्यासाठीचे कौशल्य.

             संपर्क भ्रमणध्वनी- ८८७०४७९६९५

००००

() ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन इन द टेक्सटाइल इंडस्ट्री-

             या प्रशिक्षण/अभ्यासक्रमाचा कालावधी केवळ १५ तास आहे.

काय शिकाल?

() वस्त्रोद्योग आणि फॅशन तंत्रज्ञान उद्योगात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रभावी व सुलभतेनं  वापर करुन व्यवसायवृध्दी.

() वस्त्रोद्योग आणि फॅशन तंत्रज्ञान उद्योगासाठी आवश्यक निर्मिती प्रक्रिया, तंत्र, कार्यान्वयन आणि पुरवठा साखळी.

             हे अल्पमुदतीचं प्रशिक्षण असलं तरी, त्याचा उपयोग ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित उद्योगात रोजगार आणि स्वंयरोजगार मिळवण्यासाठी होऊ शकतो.   पुरवठा साखळीला डिजिटल माध्यमात रुपांतर करण्यासाठी सुयोग्य अशी विदा (डेटा) गोळा करणं आणि आपल्या उद्योगाच्या गरजेनुसार ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचं कौशल्य प्राप्त करता येतं.

             या प्रशिक्षणाला कोणत्याही विषयातील पदवीधराला प्रवेश मिळू शकतो. हे प्रशिक्षण ऑनलाइन पध्दतीने दिलं जातं.

             संपर्क भ्रमणध्वनी-  ९८९४२९०७४०

०००

() नॉनवोव्हन फॅब्रिक्स

             जी वस्त्रप्रावरणं साधारणत:  विणली जात नाहीत आणि ज्यांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहने, गृहपयोगी वस्तू, बांधकाम आदींमध्ये केला जातो, त्यांचा समावेश या वर्गवारीत होतो.

             या प्रकारातील कापड किंवा वस्त्र हे तंतू किंवा प्लॅस्टिकला रासायनिक पध्दतीने आणि यंत्राने किंवा औष्णिक पध्दतीने एकत्र आणून तयार केलं जातं. असं वस्त्रं/कापड एखाद्या सछिद्र सपाट पत्र्यासारखं असतं. या पक्रियेत शिवणे किंवा विणने या तंत्राचा वापर केला जात नाही. तंतूना धाग्यामध्ये रुपांतर करण्याची गरज नसते.

(काही उदाहरणे-बस/ रेल्वे/ विमानातील एअर प्युरिफायर, चहा – कॉफीच्या छोट्या बॅग/सॅचेट, फरशी पुसण्याचं किंवा कोरडे करण्याचं कापड, खूर्ची किंवा सोफ्याखालील डस्ट कव्हर, गालीच्याच्या खाली वापरलं जाणारं कापड, सलूनमध्ये वापरण्यात येणारं विशिष्ट प्रकारचं कापड, बॅटरीमधील कॅथोड आणि ॲनोडला विलग करण्यासाठी वापरण्यात येणारं सूक्ष्म थर असलेलं कापड, वाहनांच्या पृष्ठ भागावरील चटई, इत्यादी.)

             अशा प्रकारच्या नॉनवोव्हन कपड्यांच्या क्षेत्रातही रोजगार/स्वंयरोजगाराच्या विपुल संधी दडलेल्या  आहेत. सध्या या क्षेत्राची झपाट्यानं वाढ होताना दिसते आहे. या संधींची माहिती नव उद्योजकांना व्हावी म्हणून नॉनवेव्हन टेक्सटाइल मॅनेजमेंट हा प्रशिक्षण/ अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. कालावधी- ३० तास. कोणत्याही विषयातील पदवीधरास हे प्रशिक्षण करता येतं. प्रशिक्षण शुल्क १० हजार रुपये.

काय शिकाल?

() नॉनवोहन कपड्यांचं सध्याच्या काळातील महत्व.

() नॉनवोहन कपड्यांची निर्मिती, तंत्रज्ञान, नियामके, वाणिज्यिक बाबी, प्रकिया, यंत्र सामग्री आदी.

             हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर या प्रकारातील कापडाच्या विविध उपयोगाबद्दलचं ज्ञान प्राप्त होते. तांत्रिक वस्त्रोद्योग (टेक्निकल टेक्सटाइल्स) या क्षेत्रात स्वत:चा उद्योग किंवा रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या बाबी लक्षात येतात.

(लघुमुदतीच्या अभ्यासक्रमांसाठी माहिती विचारण्यासाठी ईमेल-skill@svpitm.ac.in)

             संपर्क- १४३८ अविनाशी रोड पीलामेदू कोईम्बतूर-६४१००४, संकेतस्थळ- www.svpitm.ac.in, ईमेल-admission@ svpitm.ac.in, भ्रमणध्वनी-८८७०४७९६७५

सुरेश वांदिले