(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

जेव्हाजेव्हा बाबांसमवेत तेजोमयी आणि अलेक्झांडर बाहेर बाजारात जात, त्यावेळी हमखास एका दुकानाजवळ अलेक्झांडर रेंगाळून कुतुहलाने त्या दुकानाकडे बघायचा. ते दुकान होत, डेली निड्सचं, म्हणजेच दूध, चहा, बिस्किट, ब्रेड, पाव, दही आणि अशाच छोट्या दैनंदिन गरजेच्या वस्तू, या दुकानात मिळत. कधीकधी तेजोमयीसुध्दा या दुकानातून सामान विकत घ्यायची.

तसं ते इतर दुकानांसारखंच दुकान होतं. तरीही  हे दुकान  आलं की, अलेक्झांडर काही क्षण तिथे थांबून दुकानावर नजर टाकायचाच. दुकानदार काका काही अलेक्झांडरचं कौतुक करायचे नाहीत की त्याला बिस्किटं द्यायचं नाहीत. मग हा का थांबत असावा इथं? असं एकदा तेजोमयीला वाटूनच गेलं. तिने बाबांना विचारलं. बाबांच्या काही तोपर्यंत ते लक्षात आलं नव्हतं. पुढील दोनतीन खेपेला बाबांनी अलेक्झांडरवर बारिक लक्षं ठेवलं. प्रत्येक वेळेस हे दुकान आलं की अलेक्झांडर थांबतो नि कुतुहल आणि उत्सुकतेनं दुकान न्याहळतो, हे बाबांच्याही लक्षात आलं. बाबांनी एकदा दुकानाकडे नि एकदा त्याच्याकडे बघितलं. 

“काय रे, काही वेगळं दिसतय का तुला?” बाबांनी हातवारे करत अलेक्झांडरला विचारलं. त्‍याने होकारार्थी मान हलवली.

“काय?” असं विचारण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं. पण तो कसा काय सांगेल? हे लक्षात येताच बाबांनी अलेक्झांडरची पाठ थोपटली. मग त्यांनी तेजोमयीला विचारलं,

“काय गं, तुला काही वेगळं दिसतं का दुकानात?”

तेजोमयीने आधी नकारार्थी मान हलवली नि मग तिने हे दुकान आणि आजुबाजूच्या दोन तीन दुकानांचं निरीक्षण केलं.

तसंतर काहीच नवं दिसतं नव्हतं. इतर दुकानांसारखे हेही दुकान होते. तिने पुन्हा एकदा चौफेर नजर फिरवली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की, हे दुकानसोडून इतर दुकानं इलेक्ट्रिक बल्बच्या प्रकाशाने न्हाऊन निघाले आहेत. त्यावेळी तसा भरपूर सूर्यप्रकाश होता. त्यामुळे कृत्रिम प्रकाशाची गरज नव्हती. पण इलेक्ट्रिक दिव्याच्या प्रकाशामुळे दुकानं चकचकित वाटत. तसा चकचकितपणा काही या दुकानात नव्हता. तेजोमयीने बाबांच्या लक्षात ही बाब आणली.

“खरंच की, जे अलेक्झूला दिसलं किंवा कळलं ते आपल्याला दिसलंच नाही.”

“पण बाबा, इतर दुकानदारांप्रमाणे या काकास इलेक्ट्रिक बल्ब कां  बरं लावावा वाटला नसेल? त्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर तर काही परिणाम झाला नसेल ना?” तेजोमयीने बाबांना प्रश्न केला.

प्रश्न तर योग्यच होता. पण त्याचं उत्तर दुकानदार काकांनाच देणं शक्य होतं. म्हणून बाबाही उत्सुकतेपोटी या दुकानात गेले. सोबत अलेक्झांडर होताच. तेजोमयीने काही वस्तू विकत घेतल्या. अलेक्झांडरचं दुकान न्याहळणं सुरुच होतं.

“अहो, हा काय बघतो सारखा इतक्या बारकाईनं?”दुकानदाराने बाबांना विचारलं.

“काका अहो, तुमचं दुकान आलं की नेहमी अलेक्झांडर थांबतो, दुकानावर नजर टाकतो नि मगच पुढे जातो. इतर दुकानासारखं दुकान असूनही इथेच कां थांबतो, याचं आम्हालाही फार आश्चर्य वाटलं.” तेजोमयी म्हणाली.

“खरं की काय?”

“त्यामुळे आज आम्ही जरा इतर दुकानं आणि तुमच्या दुकानाचं बारकाईनं निरीक्षण केलं, तेव्हा लक्षात आलं की इतर दुकानांमध्ये जसा इलेक्ट्रिक दिव्यांच्या प्रकाशाचा झगझगाट आहे, तसा काही तुमच्या दुकानात नाही. उलट तुमच्या दुकानात एकही बल्ब लागलेला नाही. आमच्या आधी, हे या अलेक्झांडरच्या लक्षात आलं असावं. म्हणूनच तो प्रत्येकवेळी इथे थांबत असावा.” बाबा म्हणाले.

“फारच हुषार आहे हो तुमचा डॉगी. बरोबर, त्याच्या लक्षात आलं.” दुकानदार काका अलेक्झांडरचं कौतुक करत म्हणाले.

“पण काका, इतर सगळी दुकानं प्रकाशानं न्हाऊन गेली असताना तुम्ही कां अशा अंधारात? त्यामुळे ग्राहक दुसरीकडे नाही का जाणार?” तेजामयीनं विचारलं. अलेक्झांडरनेही मान हलवली. दुकानदार हसून म्हणाले.

“अगं बाळं, इतका लख्ख सूर्यप्रकाश असताना कशाला लावायचे आता इलेक्ट्रिक दिवे. या प्रकाशातही सगळंच कसं स्पष्ट दिसतना. मला तर काही अंधार दिसत नाही. ग्राहकांना बहुतेक तसचं वाटत असावं. त्यामुळे माझे ग्राहक बरोबर इथेच येतात.”

“पण काका, इतर दुकानांसारख्या झगझगटामुळे आणखी ग्राहक येतील असं नाही का वाटत  तुम्हाला? ”

“अगं, ते काही खरं नाही. गरज नसताना उगाच बल्ब कशाला लावायचे. आपण सगळेजण विजेची बचत करा, बचत करा असं मारे म्हणत राहतो. पण तसं करत नाही. कुणी करो नि करो, मी, मात्र अशी बचत करण्याचं ठरवलय. सूर्य प्रकाशात कशाला हवा कृत्रिम प्रकाश? संध्याकाळ झाली की लावतोच की दिवे.” दुकानदाराने सांगितलं. बाबा आणि तेजोयमीला दुकानदाराचं कौतुक वाटलं. अशाच छोट्या छोट्या कृतीमधून विजेची बचत घडू शकते, हे तेजोमयीच्याही लक्षात आलं. मोठयामोठ्या बाता करण्यापेक्षा अशी एखादी लहानशी कृती महत्वाची.

“नाही का हो बाबा?”

“काय गं?”

“अहो, मला म्हणायचं होतं, आपणसुध्दा घरी गरज नसताना दिवे,पंखा लावायलाच नको ना.”

“अगदी बरोबर, अलेक्झांडरच्या सूक्ष्म निरीक्षणामुळे हा धडा आपल्याला मिळाला म्हणायचा.” बाबा कौतुकाने अलेक्झांडरची पाठ थोपटत म्हणाले.

सुरेश वांदिले

००