(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

अफजलखान हसला..

अफजलखान जोरजोरात हसत होता. हसू न आवरल्याने गडबडा लोळत होता.छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या दिशेने येताना बघून तो आणखीनच चेकाळला. मात्र महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ते पुढे निघून गेले. महाराज तिथून गेल्यावर अफजलखानाच्या हास्याचा गडगडाट थांबला नाही. तो तसाच गडबड लोळत होता. पोट धरुन इकडे-तिकडे बोट दाखवून हसत होता.

थोड्या दूर गेल्यावर महाराज एका झाडाखाली थांबले. तानाजीने त्यांना पाणी दिलं. महाराजांना बरं वाटलं..महाराज अफजलखानाच्या दिशेनं बघू लागले.

महाराज, कशाला आपला वेळ दवडायचा, वेडा झालाय तो अफजल्या…तानाजी सुध्दा अफलजखानाच्या दिशेने बघत म्हणाला.

तानाजी, तो वेडा झाल्याचं समजलं तरी त्याचं हसणं आम्हास वेगळच वाटलं..महाराज म्हणाले.

म्हणजे महाराज, आम्हाला जी गोष्ट सरळ सरळ वाटते, त्यात तुम्हाला वाटा आणि वळणं दिसतात …वा ..म्हणूनच तुम्ही महाराज आणि आम्ही तुमचे सरदार..

तसं नाही तानाजी…आपण सदैव जागरुक असलं पाहिजे. एखादा वेडासुध्दा तसं का वागतो हे समजून घेतलं पाहिजे. अफजलाखानाचं तर नक्कीच समजून घेतलं पाहिजे..महाराज म्हणाले.

पण महाराज ते कसं समजून घेणार? तो तर काही आपल्याला सांगणार नाही. तानाजी म्हणाले.

बरोबर आहे, म्हणून तुम्ही बर्हिजींना मोहिमेवर पाठवा. गेल्या तीन-चार दिवसात अफजलखान कुठे कुठे गेला होता, याची इत्थंभूत माहिती आम्हास हवी आहे, म्हणून त्याला सांगा…महाराज म्हणाले.

तानाजी लगेच कामाला लागले. त्यांनी बहिर्जींना बोलावून घेतले. महाराजांचा आदेश सांगितला.

महाराजांच्या आदेशाप्रमाणे बर्हिजी कामाला लागला. अफजलखान गेल्या दोन तीन दिवसात कुठे कुठे गेला, याचा त्याने कसून शोध घेतला..पण फार काही त्याच्या हाती गवसलं नाही..तो निराश होऊन महाराजांकडे परतला.

बहिर्जी काय काय कळलं तुम्हाला अफजलखानाबद्दल… महाराजांनी उत्सुकतेनं विचारलं.

महाराज, क्षमा असावी..पण फार काही गवसलं नाही हो..बहिर्जी मान खाली घालून म्हणाला.

म्हणजे..अफजलखान गेल्या दोन-तीन दिवसात कुठे गेला नाही म्हणता..

तसं नाही महाराज…

मग..

तो गेला होता..पण त्यात सांगण्यासारखं काही नाही..

तरी सुध्दा सांग बघू, कुठे कुठे गेला होता ते…महाराजांनी बहिर्जिंना बजावलं.

महाराज,अफजल्या दोन दिवस आपल्या महाराष्ट्र देशी गेला होता. इकडे तिकडे फिरला नि परत आला. त्याने तिकडे काही केलं नाही..बहिर्जींनी माहिती दिली..

महाराष्ट्र देशी, अफजलखान कशासाठी गेला असेल? तिथे जाण्याचा आणि त्याच्या या वेड्यासारख्या हसण्याचा काही संबंध तर नाही ना? महाराज मनात म्हणाले..त्यांनी बहिर्जींना जाण्यास सांगितलं. बाजीप्रभू आणि तानाजीस बोलावून घेतलं..लगेच महाराष्ट्र देशी निघण्याची तयारी करण्याचा आदेश दिला.

तयारी झाल्यावर महाराज, तानाजी आणि बाजीप्रभू यांनी महाराष्ट्र देशाकडे कुच केले. प्रवास करताना त्यांना दिसलं की सगळं तर कसं छान चाललय..लोक आनंदी आहेत. इकडे तिकडे फिरताहेत..खेळताहेत..उपहारागृहात जाऊन खात पित आहेत..याचा अर्थ बरचं बरं असताना अफजलखान वेड्यासारखा हसतो तरी कशासाठी? महाराज विचारात मग्न झाले.

महाराज काय झालं..इकडे तर सर्व आलबेल दिसतं…बाजीप्रभू म्हणाले..

महाराज मी म्हणालो होता ना की अफजल्या ठार वेडा झाला म्हणून…

हं.. महाराज एवढच म्हणाले..चला परत निघू या, असं म्हणून तिघेही माघारी फिरले..वाटेत उद्यान गणेशाचं मंदिर लागलं. तिघांनीही दर्शन घेतलं आणि बाजूला काही क्षणासाठी बसले.

उद्यान गणेशाच्या दर्शनाला बरीच गर्दी होती. शिवाजी मैदानावर खेळण्यासाठी  मुलांची आणि चालणं- धावण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होती.

आपल्याच विचारत गढून गेलेल्या महाराजांच्या कानावर हळूहळू त्या गर्दितले संवाद कानी पडू लागले. ते संवाद ऐकल्यावर महाराज चकित झाले..ही कोणती भाषा बरं..त्यांनी बाजीप्रभू आणि तानाजीसही त्यांच्या कानावर पडणारी भाषा काळजीपूर्वक ऐकण्यास सांगितलं..

महाराज ही आपली मराठीच वाटते..पण मध्येच काहीतरी वेगळेच शब्द येतात बाँ..ते नाही कळलं आपल्याला…तानाजी म्हणाला. बाजीप्रभुंना सुध्दा तसचं जाणवलं.

हे असं कां बोलतात याची चौकशी करु का महाराज,,बाजीप्रभूंनी विचारलं..महाराज हो म्हणाले. त्यांच्या जवळून जाणाऱ्या एका व्यक्तिला बाजीप्रभुंनी थांबवण्याचा प्रयत्न केला..कानात इअरफोन घालून गाणे ऐकत मैदानाला फेरी मारण्यासाठी आलेली ती व्यक्ती नाराजीने बाजीप्रभुंकडे बघत म्हणाली…हे मॅन हू आर यू..मला कां थांबवतोस..

नाही म्हणजे रावसाहेब, तुम्ही मराठीच आहात ना…

ऑफकोर्स मराठी…ती व्यक्ती नाक वर करत म्हणाली..

मग हे तुम्ही काय बोलता..

व्हाड डू यू मिन..समजलं नाही मला..

रावसाहेब, तुम्ही मराठी म्हणजे तुमची भाषा मराठी असताना तुम्ही मध्येच ही दुसरी भाषा कां बर बोलता..

व्हाट, दुसरी भाषा? ती व्यक्ती चिडून म्हणाली.. ॲण्ड हू आर यू मला विचारणारे तुम्ही….त्याच्या रागाचा पारा वाढला होता. बाजीप्रभुंनी त्याची क्षमा मागितली. कुठून कुठून येतात ही गावठी पिपल असं काहीस बडबडत ती व्यक्ती निघून गेली. बाजीप्रभू महाराजांकडे आले.

हा संवाद ऐकून महाराज थक्क आणि सुन्नही झाले. ते दोघांना म्हणाले, चला निघण्यापूर्वी आपण मैदानास प्रदक्षिणा मारु. त्याप्रमाणे एक टोक पकडून ते चालू लागले. मैदानातील बहुतेक सर्वचजण, त्या व्यक्ती सारखेच बोलत होते…अर्धी मराठी आणि अर्धी दुसरीच कोणती तरी भाषा..त्याचं कुणालाही काही वाटत नव्हतं..

फेरी पूर्ण झाल्यावर महाराज, बाजीप्रभू आणि तानाजी परतीला निघाले..

महाराज मी म्हणालो होतो ना अफजल्या वेडा आहे म्हणून..

नाही तानाजी…त्याचा हसण्याचा अर्थ आता मला कळला..

म्हणजे महाराज….बाजीप्रभू आणि तानाजीने आश्चर्यानं विचारलं..

अफजलखान, हसून हसून गडबडा लोळून सांगत होता, बघा बघा तुमची मराठी प्रजा…जिला धड तिची भाषाही बोलता येत नाही..अमृतासारखी गोड भाषा म्हणताना, बघा बघा तिची चव कशी कडू करुन टाकलीय तुमच्या प्रजेनं..परकीयांचं आक्रमण तुम्ही पराक्रम गाजवून परतवून लावलं..मराठीवरचं आक्रमण कसं बरं आनंदानं सहन करते तुमची प्रजा.. मुळात आक्रमण झालं हेच त्यांना कळत नाही…

अफजल्याच्या हसण्यात इतका अर्थ दडलाय महाराज…बाजीप्रभुने चिंता व्यक्त केली..

होय बाजी…महाराज म्हणाले..

महाराज आता काय ..तानाजीने विचारलं

तानाजी आपण प्रार्थनेशिवाय काहीच करु शकत नाही.. महाराज खिन्नपणे म्हणाले.

त्यानी उद्यान गणेशाचं, भवानी मातेचं आणि एकवीरा देवीचं स्मरण केलं. मराठी मानसाला त्याच्या आईच्या भाषेवर परकी भाषेनं केलेल्या आक्रमणाची जाणीव करुन देण्याची प्रार्थना केली….

सुरेश वांदिले