अमेरिकन ड्रिम
सकाळ पासूनच पुसी कॅटची मुलगी सुशी नाराज होती. तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं. सकाळ झाल्याबरोबर दररोज उत्साहाने इकडे तिकडे धावणारी, धडपडणारी सुशी आज सूर्य उगवल्यानंतरही बराच काळ उठलीच नाही. जेव्हा पुसीने तिला उठवलं तेव्हा सुध्दा मोठ्या कष्टाने उठली. अंग मोडून एका कोपऱ्यात जाऊन बसली. कसला हट्ट नाही की नेहमीसारखी घरकामात लुडबूड नाही.
पुसीला आश्चर्यच वाटलं. अशी नाराज सुशी तिने कधीच बघितली नव्हती.
सुशीजवळ जावून तिला थोपटत पुसिने विचारलं, सुशे तुला बरं नाहीय का..सुशीने नकारार्थी मान हलवली. भूक लागलीय का? सुशीने विचारलं . तेव्हा तिने पुन्हा नकारार्थी मान हरवली. तुला त्या दांडगट रॉकी डॉगीने त्रास दिला का? पुसीने पुन्हा विचारलं. तेव्हा सुशीने पुन्हा नकारार्थी मान हलवलं. तुला चंद्रावर जायचय का? पुसीने थोडे चिडून विचारलं. थोडावेळ सुशी काहीच बोलली नाही. तेव्हा पुसीने तिच्या कानाला चावा घेतला. आईच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत सुशी म्हणाली..
मला नाही जायचय चंद्रा-फंद्रावर..
मग रहा अशीच दिवसभर अंगमोंडून. मी येते जरा फेर फटका मारुन..पुसी, सुशीला म्हणाली. आपण इतकं प्रेमानं तिला समजावतोय तर बाईला काही ऐकायचंच दिसत नाही..याचा पुसीला राग आलाच होता..त्यामुळे तिने दार बंद केले नि बाहेर पडणार तोच सुशी जोरात म्हणाली…
आई, मला चंद्रावर नाही पण अमेरिकेत जायचं आहे.
तिचा आवाज कानावर पडताच पुसी आत आली.
काय म्हणालीस तू..पुसीने, सुशिला विचारलं.
अमेरिकेला जायचच…
अगं, अमेरिका म्हणजे खाऊ नाही माझे बाय…
ते मला ठाऊक हाय माझे आय…सुशी आता किंचित लाडीगोडी करत पुसीला म्हणाली..
मग तुला ठाऊक आहे तर कशासाठी जायचं अमेरिकेत..पुसीने सुशिच्या डोळयाला डोळा भिडवत विचारलं. तेव्हा पुसीने हळूच एक पेपर पुसीला दाखवला. त्यात एका मांजरीचा फोटो होता. सुशीने त्यावर बोट ठेवलं.
ही बघ..
कोण ही..पुसीने विचारलं.
ही विलो..
बरं मग..
अगं बर काय म्हणतेस आई..ही विलो राष्ट्रपतींच्या घरची मांजर आहे..
बर मग..
म्हणजे तुला काहीच नाही वाटलं…
मला काय वाटणार..
आनंद..अभिमान..
तो कशासाठी बॉ..पुसीने नाक फेंदारत विचारलं.
अगं आई तुला समजत कसं नाही. ही विलो आपल्यातली आहे ना..
पण आपली नाही ना… मान दुसरीकडे वळवत पुसी म्हणाली.
अगं आई, हे काय चाललय तुझं, आपली तुपली..सुशीने नाराजी व्यक्त केली.
अगं माय माझे,आता ही विलो का फिलो राष्ट्रपतीची मांजर झालीय..त्यात तुझा माझा काय फायदा..
मला नाही माहीत…
मग कशासाठी जायच तुला अमेरिकेत…
अरे हो आई,अगं मी अमेरिकेत कां जायचा हट्ट करतेय हे सांगायचच राहिलय वाटतं..
सांग की आता..तेच तर मघापासून मी विचारतेय ना.
अगं आई ही विलो आपल्यासारखीच अशी रस्त्यावर राहणारी मांजर होती.एकदा तिला राष्ट्रपतींच्या बायकोनं बघितलं आणि विलो तिला खूप आवडली. तिने तिला आपल्या घरी आणलं.
बर मग..
अगं आई, मी अमेरिकेत गेले तर एखादे दिवशी माझ्याकडेही राष्ट्रपतींच्या बायकोंचं लक्ष जायचं आणि मीही त्यांना आवडली की त्या मला नाही का नेणार त्यांच्या घरी..सुशी उत्साहानं म्हणाली.
सुशीचं बोलणं एकूण पुसीने स्वत:भोवती फेर धरला.शेपूट उंच केली. सुशीसमोर ती बसली.तिलाही बसायला सांगितलं.
सुशीचा पंजा हातात घेऊन पुसी म्हणाली, अगं सुशे, मोठं होण्याची स्वप्न नक्कीच बघितलं पाहिजे. पण जे स्वप्न साकार होऊ शकत नाहीच ते बघणं म्हणज मुर्खपणा ठरतो.
यात काय मुर्खपणा आई..
अगं,तू अमेरिकेत गेल्यावर राष्ट्रपतींच्या बायकोने बघायला हवं ना. मांजरींना बघत फिरणं हे काही त्यांचं काम नाही. समजा एखादे वेळी त्यांनी तुला बघितलं पण तू त्यांना आवडली नाहीस तर..समजा त्यांना आवडली व त्यांनी त्यांच्या घरी नेलं,ख् पण विलो म्हणाली की नको आपल्या घरी ही खेडवळ मांजर तर..समजा विलोलाही तू आवडलीस पण राष्ट्रपतींच्या कुत्र्याला तू नाही आवडलीस. समजा राष्ट्रपतींच्या कुत्र्यालाही आवडलीस पण राष्ट्रपतीच म्हणाले की आपल्या घरी फक्त एकच कुत्रा आणि एकच मांजर राहू शकते.तिसऱ्याला जागा नाही तर.. तू काय करणार..पुसी सुशीला समजावून सांगत असताना, हे सगळं ऐकून सुशीचा ऑ वासला गेला..आई उगाचच भीती दाखवतेय असं तिला वाटू लागलं. पण असं समजा घडलचं तर मग आपण एकटे, तिकडे काय करणार…सुशीच्या मनात असे वेगवेगळे विचार येउु लागले..ते पुसीने बरोबर विचारलं.
अगं सुशे, कुणाला काय मिळालं,हे बघून नाराज व्हायचं नसतं. तसचं आपल्याला मिळायला हवं याचा हट्ट करायचा नसतो. आपल्या जे चांगलं जमतना ते आणखी उत्तम केलं की खूप आनंद मिळतो. राष्ट्रपतीच्या घरी राहायला मिळाल्याने नव्हे..पुसीने सुशीला समजावलं.
सुशीने मान डोलावली.
सुरेश वांदिले