(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी तेजोमयीची आई जरा गंभीर असल्याचं अलेक्सा गोर्जीच्या लक्षात आलं.‍ तिने अलेक्झांडरकडे बघून आपल्याला वाटत ते बरोबर ना रे, असं नजरेनं खाणाखुणा करत विचारलं. अलेक्झांडरला आईच्या सर्वच भावना कळत असल्याने त्याने मान आणि शेपूट हलवून, गोर्जीच्या मनातल्या भावनेला होकार दिला. या दोघांच्या नजरेच्या खाणाखुणा बाबांच्या नजरेतून काही सुटल्या नाहीत.

“काय चाललय तुम्हा दोघांचं, गोर्जे? आम्हालाही कळू द्या की.” बाबांनी गोर्जीला विचारलं.

“नाही म्हणजे, आई आज जरा फार गंभीर वाटतात.” गोर्जी म्हणाली.

“आई तू, कोणती गंभीर? गौतम की सिध्दार्थ!” तेजोमयीनं मिश्किलपणे विचारलं. आईने तिच्याकडे रागानं बघितलं. अलेक्झांडरलाही हा विनोद आवडला नसावा, कारण त्याने हळूवार गुर्रावून आपली नाराजी व्यक्त केली. तेजोमयीला ते बरोबर कळलं. तिने आईचा हात हातात घेतला. आईची क्षमा मागून तिचा चेहरा काळजीपूर्वक न्याहाळला.

“आई, तुझं काही दुखतय का?” तेजोमयीनं विचारलं.

“काही अघटीत घडलय का?” बाबांनी विचारलं.

“काही अघटीत-बिघटीत घडलेलं नाही.” आई उत्तरली.

“मग, तुम्ही अशा गंभीर का? कसली तरी काळजी वाटतेय तुम्हाला?” गोर्जीने आपली शंका पुन्हा बोलून दाखवली.

“अगं गोर्जे, काय करावं ते कळत नाहीय?”

“काय कळत नाही?”तेजोमयीने प्रतिप्रश्न केला.

“उन्हाळा आलाय ना.”

“तो दरवर्षी येतोय. त्यात काय नवल नि त्याची काय काळजी करायची?” बाबा म्हणाले.

“तसं नाही हो.”

“मग काय झालं?”

“अहो पाणी…”

“पाण्याचं काय?”

“आपण दरवर्षी पक्षांसाठी गॅलरित पाण्याचं भांड ठेवतोना.”

“मग यंदाही ठेऊया की.”

“तुमच्या मनात दुसरं काही आहे का?” गोर्जीने विचारलं.

“आहे आणि नाहीही. यंदा पक्षांसाठी गॅलरीत पाणी ठेवायचं की नाही याचा विचार करत होते.”

“अगं, हा अविचार झाला.” तेजोमयी म्हणाली.

“पण, तुम्हाला असं कसं काय वाटू शकतं? दरवर्षी पक्षांसाठी पाणी ठेऊन तुम्ही पुण्य मिळवता. त्याचा लाभ आम्हालाही मिळतो. यंदा हे पुण्य नको आहे का?” बाबांनी हसून विचारलं.

“अहो, मी पुण्याबिण्यासाठी काही  पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करत नव्हते. त्‍यांची तहान आपण नाही भागवणार तर कोण?”

“मग यंदा कां प्रश्न पडला तुम्हाला?” गोर्जीने विचारलं.

“अगं ते कबुतर…”

“त्यांचं काय?”

“ते सुध्दा पाणी प्यायला येतात ना.”

“कबुतरंसुध्दा पक्षीच आहेतना आई.”

“हे आहे का तुमच्या काळजीचं नि गंभीर होण्याचं कारण?” बाबांनी विचारलं.

“अहो आई, कबुतरांचा आपल्याला त्रास होत असला तरी पक्षापक्षांमध्ये भेदभाव कसा करायचा आपण?” गोर्जीनं विचारलं.

“तसं नाही पण, कबुतरांच्या विष्टेमुळे आपल्या  आरोग्यास अपाय होत असल्याचं सगळेजण सांगतात. त्यामुळे पाणी पिऊन ते आपल्या गॅलरीत शिटतील. मग त्यामुळे आपणा सर्वांना अपाय नाही का होणार?” आई म्हणाली.

“आई, आपल्या खिडकीत येऊन येऊन किती कबुतरं येणार ? दोन किंवा तीन. मग त्यांच्यासाठी इतर पक्षांवर कां अन्याय करायचा?                                                त्यांनी कुठे जायचं?” तेजोमयी म्हणाली.

“आई, पक्ष्यांच्या मेंदूत ‘स्पेशल मेमरी’ असते. जिथे त्यांना पाणी किंवा अन्न मिळतं ते ठिकाण ते बरोबर लक्षात ठेवतात. आता या रखरखत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची आपल्या गॅलरीत सोय होते, असे पोपट, कोकीळ, खारुताई, चिमणी, खंड्या, निळकंठ, टिटवी, कावळा अशा अनेक पक्षांना खात्री  वाटून दरवर्षी ते इथे न चुकता येतात. त्यांच्या मेंदूत आपल्या घराचं लोकेशन पक्क झालं असत. यंदा आपण पाण्याचं भांड ठेवलं नाही तर ते कुठे नवं ठिकाण शोधणार?                         .” गोर्जीने शंका उप‍िस्थत केली.

“एका कबुतरासाठी इतर पक्षांवर कां अन्याय करायचा आपण?” तेजोमयीनं विचारलं.

“अशी अर्धवट भूतदया काय कामाची?” गोर्जी म्हणाली. आतापर्यंत सगळी चर्चा काळजीपूर्वक ऐकणाऱ्या अलेक्झांडरने शेपूट हलवून गोर्जीच्या बोलण्याला संमती दिली.

“कबुतरांना हाकलून लावण्याचं अलेक्झांडरला शिकवलं तर तो त्यांना पाण्याच्या भांड्याकडे फिरकूही देणार नाही. पण मग कबुतरांनी जायचं कुठं? ” बाबांनी विचारलं.

“ते म्हणतात ना दाने दानेपे लिखा है खानेवाले का नाम, तसंच पाण्याच्या थेंबाथेंबावर सुध्दा लिहलं असतं पिणाऱ्याचं नावं. आपण कशाला ते ठरवायचं?” गोर्जी म्हणाली.

आईच्या डोळ्यात पाणी आलं. आपण भलताच चुकीचा विचार करत होतो, याची कबुली तिने दिली. तिच्या चेहऱ्यावरची काळजी मिटली. हे अलेक्झांडरला बरोबर कळल्याने त्याने उड्या मारुन आपला आनंद व्यक्त केला.

सुरेश वांदिले