(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

आईसक्रीमचा ताप…

सार्थक आणि अवनीश या दोघांनांही आईसक्रीम खूप आवडतं. इतर कोणताही हट्ट पुरवता येत नसेल तर सार्थक आणि अवनीशचे बाबा त्या दोघांनांही आईसक्रीम पार्लरमध्ये घेऊन जाणार, त्यांच्या आवडीचे आईसक्रीम घेऊन देणार..दोघांचे समाधान झालेच म्हणून समजा.

सार्थक आणि अनिकेत हे दोघे चुलत भाऊ. सार्थक वरच्या मजल्यावर राहतो तर अनिकेत खालच्या मजल्यावर. त्यांच्या घरी पाहुणे आले की सकाळची न्याहरी सार्थककडे तर दुपारचे भोजन अवनीशकडे, अशी विभागणी व्हायची. त्यावेळी वरचे आणि खालचे एकत्रच पाहुण्यांसोबत जेवायला बसत असत.

पाहुणे आले की सार्थक आणि अवनीशची चंगळ असायची. पाहुण्यांसाठी गोडधोड, आईसक्रीम असं सारं काही होत असे. त्यामुळे घरी पाहुणे येतात कधी याची ते दोघेही कायम वाट बघायचे.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे त्यांच्याकडे कुणी आल नव्हतं. हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसल्यावर डिसेंबरमध्ये सार्थक आणि अवनीशकडे मुंबईचे पाहुणे आले. पाहुणे म्हणजे सार्थक आणि अवनीशची आत्या.

आत्या येताना दोघांसाठी वेगवेगळी खेळणी आणि खूप सारा खाऊ घेऊन यायची, त्यामुळे सार्थक आणि अवनीश आत्यावर खुष असत.

आत्या आल्यावर सार्थक आणि अवनीशचे बाबा तिच्यासाठी ठरलेला व आवडीचा पाहुणचार करत . आत्याला सुध्दा आईसक्रीम खूप आवडायचं. त्यामुळे जेवण झालं की अवनीशचे बाबा आईसक्रीम घेऊन येत.

आजही तसचं घडलं. रात्रीचं छान जेवण झालं. आत्याची आवडती फणसाची भाजी अवनीशच्या आईने खूप चवदार केली होती. त्यामुळे सर्वांनी दोन घास अधिकच खाल्लं. जेवणानंतर प्रथेप्रमाणे अवनीशच्या बाबांनी आईसक्रीम आणलं.

सार्थक आणि अवनीशच्या तोंडाला पाणी सुटलं. कधी एकदा आपण ते गट्टम करतो असं त्यांना झालं. पण सार्थक आणि अवनीशच्या आईंनी, दोघांनीही आईसक्रीम खायचं नाही असं फर्मावलं. कारण काहीच दिवसांपूर्वी त्या दोघांनाही खोकला आणि प्रचंड सर्दी झाली होती. त्याआधी एका नातलगाच्या लग्नात दोघांनीही आईसक्रीमवर चांगलाच ताव मारला होता. दोघांच्याही आई नको-नको म्हणत असताना त्यांनी त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्याच दिवशी दोघांचा घसा बसला. तापही आला.खोकला झाला. दोघांना डॉक्टरांकडे नेले तेव्हा, आईसक्रीम कशाला खाऊ दिलत म्हणून डॉक्टर दोघांच्याही आईबाबांना रागावले. आता काही दिवस आईसक्रीमचं नावही काढायचं नाही असं त्यांनी सार्थक आणि अवनीशला समजावून सांगितलं.आईबाबांनांही निक्ष्क्षुण सांगितलं.

त्याची आठवण दोघांच्या आईंनी त्यांना आता करुन दिली.

पण आता तर खोकला नाही ना..सार्थक म्हणाला.

तापही नाही.अवनीश म्हणाला..

मग ,आता खायला काय काय हरकत आहे. दोघेही एकत्र म्हणाले.

नाही म्हणजे नाही..दोघांच्याही आई गरजल्या.

आत्याचं म्हणण पडलं,काय हरकत आहे.

यावर दोघांच्याही आया काही बोलल्या नाहीत.मात्र त्यांच्या नजरेतील नाराजी आत्याने बरोबर टिपली.आता या विषयावर बोलायचं नाही असं तिने मनोमन ठरवलं.

सार्थक आणि अवनीशने आपला मोर्चा बाबांकडे वळवला.

आधी तर त्यांनी ठाम नकार दिला. तेव्हा दोघांचेही चेहरे हिरमुसले झाले. बाबांनी पान आणलं असतं तर आपण आईसक्रीम नसतं मागितलं…. असं सार्थक अवनीशला म्हणाला….

जाऊ दे..कदाचित देवालाच नको असेल आपलं आईसक्रीम खाणं..

मग बाबांना पान आणण्याचं कां बरं सुचलं नाही रे..अशी बडबड ते आपसात करत राहिले.

अरे, पण तुम्ही आईसक्रीम खाल्लात तर पुन्हा खोकला होईल नि डॉक्टरकडे नाही का जावे लागेल. अवनीशच्या बाबाने
त्यांना समजावलं.

छोटे बच्चो का दिल डॉक्टर क्या जाने..असं सार्थक बोलून गेला…

ते ऐकून आत्या अवाकच झाली. आपल्याजवळच आईसक्रीम द्यावं असही तिला वाटलं पण तिने स्वत:वर नियंत्रण ठेवलं.

बाकी सगळी मंडळी आईसक्रीमचा आनंद घेत असताना, सार्थक आणि अवनीश दोघेही त्यांच्याकडे आशाळभूतपणे बघत होते. त्यांच्या डोळयातील केविलवाणे भाव बघवत नव्हते. शेवटी अवनीशच्या बाबाला दया आली. त्याने दोघांना हळूच सांगितले की, आयांना पटवा..त्यांनी हो म्हंटले तर आमची ना नाही..

पण आईला पटवायच कसं?दोघांच्याही आयांनी दुर्गेचाच अवतार धारण केला होता.

जाऊ दे रे,माँका भी दिल बडा नही है… अवनीश सार्थकला म्हणाला.

एक थोबाडीत हाणीन…अवनीशची आई त्याला रागावत म्हणाली.

म्हणे दिल बडा नाही..तुझा खोकला काय माझ्या बड्या दिलाने बरा होणार आहे का?.. सार्थकची आई त्याला रागावली.

दोघींच्या या रागावण्याने सार्थक आणि अवनीशचा चेहरा आणखी पडला. सर्वांचे आईसक्रीम आतापावेतो खाउुन झाले होते. दोन आईसक्रीम फ्रिजमध्ये ठेवले होते.

देवाला सांग आणि घ्या.. सार्थकचा बाबा दोघांना म्हणाला.

काय सांगू देवाला…सार्थकने विचारले.

आईला लवकर झोप येउु दे म्हणून..

आँ…देव ऐकेल असं..

नाही ऐकलं तर नको खाउुस ..अवनीशचा बाबा म्हणाला..

नाही तर नाही..जान थोडीच जानेवाली है अपनी सार्थक उत्तरला..

आता खरोखरच थोबाडीत हाणीन हं..सार्थकची आई त्याला म्हणाली. काहीही बडबड करतो. नाही म्हंटल तर नाही..ऐकत  जा ना..

सार्थक रडकुंडीलाचा आला या रागावण्यामुळे, ऐकायचं का रे मग आपण आपल्या आईंच.. त्याने अवनीशला विचारलं.

बाबांना विचार ना तू, तो म्हणाला..

त्या दोघांचंही हे केविलवाणं बोलणं ऐकूण अवनीशचा बाबा त्याला म्हणाला, आईसक्रीम फ्रिजच्या बाहेर काढून ठेवतो.त्याचे पाणी होईल..आई जेवायला बसली की ते पाणी गटागटा पिउुन टाका….

पण ते पाणी पिताना जर आईनं पकडलं तर..

तर तुमचं तुम्ही बघा..अवनीशचा बाबा म्हणाला. सार्थकच्या बाबानेही हाच सूर आवळला..

तुम्ही आमच्या मदतीला नाही येणार का बाबा. अवनीशने साळसूदपणे विचारलं.

कसं येणार?आम्हाला पण भीती वाटते ना..

आईची भीती का बाबा?

ते आमचं गुपित आहे.

मग सांगा ना ते गुपित..

त्यासाठी तुम्ही आईसक्रीमचा आग्रह सोडला पाहिजे..अवनीशचा बाबा म्हणाला..

यावर सगळेजण मनमुराद हसले.

ते कां हसले हे सार्थक आणि अवनीशच्या लक्षात आलं नाही….

आपल्याला आईसक्रीम खायला मिळत नाही हे मात्र आता त्यांच्या पक्क लक्षात आलं होतं..आता हट्ट धरुन काही उपयोग नाही हेही लक्षात आलं.तेव्हा त्यांनी सार्थकची एक वर्षाची लहान बहीण आदीरथीस जवळ घेतलं आणि तिला ते सांगू लागले..आदी तू आइसक्लिम खावू नको हं..खोकला होतो..ताप येतो..डॉक्टलपेक्षा आईलाच जास्त येतो….हे ऐकून दोघांच्याही आयांना खरं तर खूप राग आलाच होता. पण त्या दोघांची केविलवाणी स्थिती दोघीनांही बघवत नव्हती. रागावून काही उपयोगही नव्हता. सार्थकची आई अदिरथीला म्हणाली..अदी बेटा आईसक्लिमसाठी हट्ट नाही करायचा हं..दादांचं ऐकायचं ….तो माझं ऐकत नसला तरी….

सार्थकच्या आईच बोलणं ऐकून दोघेही काय समजायचे ते समजून गेले…

सुरेश वांदिले