(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बऱ्याच दिवसांनी रमाआजी तेजोमयीच्या घरी आल्या. रमाआजी म्हणजे तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला राहणाऱ्या देशपांडे काकांच्या आई. त्या तिकडे ब्रम्हपुरीत आपल्या मोठ्या मुलाकडे राहतात. दोनतीन वर्षांकडून देशपांडे काकांकडे येतात. गावावरुन आल्याकी भरपूर खाऊ आणतात. शिवाय त्यांच्याकडे गोष्टिंचा प्रचंड खजिना. इकडे असेपर्यंत त्यांच्याकडून गोष्टी ऐकण्याची मज्जाच मज्जा. त्यामुळे तेजोमयीला रमाआजी फार आवडत.

रमाआजीने घरात पाऊल टाकताच, तेजोमयीला आवाज दिला. अभ्यास सोडून तेजोमयी बाहेरच्या खोलीत आली. तिच्या सोबत अलेक्झांडर आणि अलेक्सा गोर्जीही आली.

अलेक्झांडरला रमा आजी ठाऊक असल्याने तो त्यांच्यावर गुरगुरला नाही. मात्र त्यांच्याजवळही गेला नाही. गोर्जीचे प्रोसेसर या सगळ्या गोष्टी  टिपून घेत होतं. रमाआजींनी कोडकौतुक केल्यावर, तेजोमयी आत निघून गेली, अलेक्झांडरही तिच्यासोबत आत गेला. मात्र, गोर्जी तिथेच घुटमळत राहिली.

आई आणि आजीच्या गप्पा सुरु झाल्या. काही वेळाने गोर्जीच्या लक्षात आलं की रमाआजीच फक्त बोलतेय आणि आई फक्त मान डोलावतेय. आजी इतक्या कशा काय बोलू शकतात? त्यांचं तोंड दुखत नसेल का? असे प्रश्न तिला पडले. तिच्या या प्रश्नांवर प्रोसेसरने लगेच कामही सुरु केलं.

आजी दोनेक तास गप्पा करत होती. आईने आजीसाठी पोहे केले. थोड्यावेळाने चहा दिला. या गप्पासुरु असताना दीड ऐक तासाने आईने हलकीशी जांभई दिली. थोड्यावेळाने आईला डुलकीही आली. पण आईने स्वत:ला लगेच सावरलं. आजी आता गेल्या तर बरं, असं आईला वाटत असल्याचं गोर्जीच्या प्रोसेसरने बरोबर टिपलं. तीनेक तासानंतर आजीला कंटाळा आला असावा. आजीने आईचा निरोप घेतला. ‘येते गं तेजो’, म्हणून आजी निघून गेली. आईला हायसं वाटलं.

आजी जाताच, तेजोमयी आणि अलेक्झांडर बाहेरच्या खोलीत आले. त्यांना उद्देशून गोर्जी म्हणाली,

“किती बोलतात या बाई.”

“बाई नाही गं, रमाआजी.” तेजोमयीने दुरुस्ती केली.

“ओह सॉरी! काहो आई, तुम्हाला कंटाळा नाही का आला त्यांचं बोलणं एैकूण?” गोर्जीने आईला विचारलं. आई हसली. तेव्हढ्यात गोर्जीच्या स्क्रीनवर संदेश उमटला, आता इथून गेलेल्या रमाआजींच्या बोलण्याच्या वेगाचं गणित समजून घ्यायचय का?

“याचं पण गणित असतं की काय?” आईने आश्चर्य व्यक्त केलं.

“मला समजून घ्यायला आवडेल.” तेजोमयी म्हणाली. अलेक्‍झांडरनेही मान डोलावली.

“अगं, माझ्या प्रोसेसरने रमा आजीच्या बोलण्याचं विश्लेषण केलय.”

“काय निष्कर्ष निघालाय त्यातून?” आईने उत्सुकतेनं विचारलं.

“रमा आजीच्या बोलण्याचा वेग पाहता त्या सरासरीने १३ हजार ३४९ शब्द दररोज बोलतात.”

“ओह माय गॉड!”

“तुम्हाला गंमत सांगू का?” गोर्जीने विचारलं.

“सांग सांग.” तेजोमयी उत्सुकतेनं म्हणाली. अलेक्झांडरने कान टवकारले.

 “तेजो तुझ्या आवडीच्या, ‘हॅरी पॉटर ॲण्ड द फिलॉसॉफर स्टोन’ या पुस्तकात ७६,९४४ शब्द होते.”

“त्याचा आणि रमाआजीच्या बोलण्याचा काय संबंध?”

“संबंध असा की, रमा आजीच्या बोलण्याचा वेग लक्षात घेता, त्या दर सहा दिवसाला हॅरी पॉटरच्या या पुस्तकाएव्हढं  बोलतात.”

“गंमतच म्हणायची.” आईने प्रतिक्रिया दिली.

“आई रागावणार नसाल तर एक विचारु का?”गोर्जीने विचारलं.

“विचार की.”

“तुम्हाला कंटाळा येत नाही का रमाआजींच्या बोलण्याचा? अलेक्झांडरला, गप्पा इतक्या आवडतात. पण तोसुध्दा एकक्षणही थांबला नाही. माझं लक्ष होतं त्याच्याकडे.”

“बरोबरय तुझं निरीक्षण. ठोंब्याला त्यांचं इतकं बोलणं आवडत नाहीच. पण मला त्याच्यासारखं वागता नाही यायचं.”

“कां हो?”

“अगं, अशा वृद्ध व्यक्तींचं खूप बोलणं म्हणजे त्यांच्यासाठी टॉनिक असतं. त्या एकाकी असतात, मग त्यांना कुणीतरी ऐकणारं मिळालं की त्यांना ऊर्जा मिळते. थोडी कळ सोसली तर बिघडलं कुठं?” आईने गोर्जीला समजावलं.

 

“आई, तू खरचं ग्रेट आहेस.” तेजोमयी बोलून गेली.

“शिवाय या आजी, तेजोसाठी किती प्रेमानं खाऊ आणतात, तिला गोष्टी सांगतात. आजीचं असं नितळ प्रेम वर्षादोन वर्षातून तेजोला मिळतं. मग त्यासाठी त्यांचं दोनतीन तास बोलणं एैकल्यानं माझं काहीच नुकसान नाहीना.” आई म्हणाली. तेजोमयीने आईला मिठी मारली. अलेक्झांडरनेही तसच केलं.

गोर्जीला आईचा अभिमान वाटला. ” गोर्जीच्या प्रोसेसरमध्ये आता ‘प्रेम’ आणि ‘सहनशीलता’ या शब्दांचे नव्या छटा अधोरेखित झाल्या. मानवी नात्यांमधील सहनशीलताही कोणत्याही अल्गोरिदमपेक्षा मोठी असते, हे आज गोर्जीला उमजले. गोर्जीच्या मेमरीमध्ये प्रेमया शब्दाचा अर्थ आता फक्त एक भावना नसून, दुसऱ्याच्या आनंदासाठी दिलेला वेळ असा नोंदवला गेला.”

सुरेश वांदिले

००००