१० वी १२ वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. जेइइ मेन संपली आहे. महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या बऱ्याच सीइटी संपलेल्या आहेत. काही राष्ट्रीय स्तरावरील चाळणी परीक्षा संपल्या आहेत. काही पुढील महिन्या – दीड महिन्यात संपतील. एकूण पुढील काही महिने १०/१२ वी, विशेषत: १२ वीची परीक्षा दिलेल्या मुलामुलींच्या घरची चर्चा, ‘करिअरच्या अनुषंगाने पुढे काय?’ या प्रश्नाभोवती फिरत राहील. अर्थातच बहुतांश मुलांना एकतर वैद्यकीय क्षेत्रात जायचे असते किंवा मग अभियांत्रिकी क्षेत्रात जायचे असते. या क्षेत्रात प्रवेश मिळाला नाही तर मग पुढच्या क्षेत्रांचा विचार होतो.
करिअरच्या रोडमॅपमध्ये या दोन क्षेत्रांवर अधिकाधिक भर महाराष्ट्रीय कुटुंबात देत असल्याने इतर ज्ञानशाखांकडे दुर्लक्षच केले जाते. त्यामुळे मराठी मुले दर्जेदार अशा राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये अल्प प्रमाणात निवडल्या जातात. या संख्येत दरवर्षी फार वाढ होताना दिसत नाही.
अनास्था कायम
नुकतेच एका करिअर मार्गदर्शन शिबिरात उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. काही राष्ट्रीय परीक्षांबद्दल कितपत माहिती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, याबाबत फार अनास्था दिसून आली. पूर्णपणे जेइइ किंवा सीइटीवर लक्ष केंद्रित केल्याने, पालकांचे लक्ष राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रकियेकडे गेलेले दिसले नाही. एखाददुसऱ्या पालक आणि विद्यार्थ्याचा अपवाद वगळता, याबाबत अनभिज्ञताच दिसून आली.
आपल्याकडे राष्ट्रीय महत्वाच्या शैक्षणिक संस्थाच्या प्रवेश प्रक्रिया या ऑक्टोबर महिन्यात सुरु होतात. या संस्थांच्या ॲडमिशन नोटिसेस (प्रवेश सूचना) जाहीर होण्याचा कालावधी ठरलेला असतो. त्यात गेल्या दहा वर्षात तरी बदल झालेला नाही. याबद्दल प्रस्तुत लेखकाने वेळोवेळी सांगितलेही आहे. पण, एकूणच पुढे करायचे, याचे चिंतन-मनन, हे बोर्डाची १२ वीची परीक्षा मार्च/एप्रिलमध्ये संपल्यावर होते. त्यामुळे साधारणत: पाच महिने आधीच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय ज्ञानशाखेशिवाय इतर ज्ञानशाखांचा विचार काही (अपवाद वगळता) पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनाला शिवत नाही. ही परीस्थिती पुणे,मुंबई-नागपूर सारख्या डायनॅमिक, स्मार्ट वगैरे समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये दिसून येते. ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्थिती निश्चितच चिंताजनक असेल, यात संशय नाही.
यंदाच्या म्हणजे २०२६-२७ च्या शैक्षणिक वर्षात तर हा बाण सुटून गेला आहे. मात्र २०२७-२८ च्या शैक्षणिक वर्षात पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थामधील ज्ञानशाखांचा आपल्या रोडमॅपमध्ये अवश्य समावेश करावा. त्याविषयी यंदाच्या मार्ग यशाच्या मालिकेत प्रसंगपरत्वे सांगितले जाईल.
दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण
भारत सरकारने विविध ज्ञानशाखांचे शिक्षण – प्रशिक्षण देणाऱ्या आणि संशोधनाला चालना देणाऱ्या अनेक संस्था सुरु केल्या आहेत. यातील बहुतेक संस्थांना सेंटर ऑफ एक्सलंसचा दर्जा (गुणवत्तेचे केंद्र) आणि इंस्टिट्शून ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा (राष्ट्रीय महत्वाच्या संस्था) हा दर्जा दिला आहे. या सगळ्या संस्थांना शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी पुरेसा निधी केंद्र सरकार देत असते. या सर्व संस्थांमध्ये नव्या शैक्षणिक धोरणाच्या विविध मुद्द्यांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या संस्थांमध्ये इंटर्नशीप (आंतरवासिता) ची सुविधा असते. नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आला आहे. खाजगी संस्थांनीही तसे करणे अपेक्षित असले तरी, या संस्थांच्या एकूणच कारभारातील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेबाबत सातत्याने शंका उपस्थित होत असतात. त्यात बऱ्याच अंशी तथ्यही असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शासकीय संस्थांमध्ये प्रवेश कसा मिळेल याविषयी जागरुक राहायला हवे.
या संस्थांमध्ये प्रवेश प्रकिया ही पारदर्शक स्वरुपाची असते. आरक्षणाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात. केंद्र आणि राज्यशासनाच्या शिष्यवृत्तींचा लाभ मिळतो. बऱ्याच संस्थांमध्ये प्लेसमेंट सेलही उघडलेले असते. त्यामुळे पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतर रोजगाराच्या संधीही विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मिळू शकतात. अनेक संस्थांनी मुलामुलींना राहण्यासाठी वसतीगृहाची व्यवस्था केली असते. शैक्षणिक शुल्क परवडणारे असते. (अपवाद वगळता) खाजगी संस्थांमध्ये तासिकेच्या बेसिवर शिक्षक/प्राध्यापकांना शिकवायला बोलावले जाते. बरेचदा नुकतेच पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांवर ही जबाबदारी सोपवली जाते, तसे, या शासकीय संस्थांमध्ये होत नाही. शिकवणारे प्राध्यापक हे अनुभवी आणि उच्च प्रशिक्षित असतात. चांगल्या प्रयोगशाळा, उत्त्कृष्ट ग्रंथालये, क्रीडांगणे अशा सुविधाही असतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम या संस्थांमध्ये राबवले जाते. अशा संस्थांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची एक वेगळी इकोसिस्टिम तयार केली आहे. त्यात मराठी मुलांचा टक्का वाढणे गरजेचे आहे.
या संस्थांच्या चाळणी परीक्षा या साधारणत: १२ वीचा अभ्यासक्रम आणि मुलांचे सर्वसाधारण सामान्य ज्ञान, भवतालाचे आकलन यावर आधारित असतात. बहुतेक सगळया परीक्षा संगणकाधारित असतात. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ (मल्टिपल चॉइस- ऑब्जेक्टिव्ह) प्रश्न विचारले जातात. तार्किक क्षमता, विश्लेषण, संख्यात्मक क्षमता विश्लेषण, इंग्रजी भाषेचे ज्ञान अशा घटकांवर सर्वसामान्य स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात.
या संस्थांच्या चाळणी परीक्षांची केंद्रे महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये असतात. यंदा, एका महत्वाच्या शैक्षणिक संस्थेने महाराष्ट्रातील जवळपाळ सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्राची सोय उपलब्ध करुन दिली आहे. याचा फायदा मराठी मुलांनी घेतला पाहिजे. चाळणी परीक्षा देण्यासाठी स्वत:च्या गावापासून खूप दूरवर जाण्याची गरज नसते.
शिक्षकांची जबाबदारी
१० वी १२ वीमधील विद्यार्थी शिक्षकांच्या नजरेखालून सातत्याने जातात. त्यामुळे त्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांचा, कल-आवड-गती-रस हे कळू शकतात. त्यात सक्षम बाजू आणि दुर्बळ बाजूही लक्षात येऊ शकतात. (खरे तर तेच होणे अपेक्षित आहे.) वर्गातील सरसकट सगळ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या रोलरकोस्टरमध्ये बसवण्यात सुज्ञपणा नाही, हे शिक्षकांनी जाणले पाहिजे. त्यानुसार मुलांना वेगवेगळ्या ज्ञानशाखांची माहिती देणे, हे त्यांचे कर्तव्य बनते. काही शिक्षक हे काम अत्यंत आवडीने आणि प्रामाणिकपणे करतातही. मात्र ही संख्या वाढायला हवी. शिक्षकांनीच शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासून मुलांच्या आवडीनुसार नि कलानुसार राष्ट्रीय शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियांची माहिती द्यायला हवी. त्यामुळे मुलांची मनोभूमिका तशी होऊ शकते. प्रत्येक पालकाला व्यक्तिगतरित्या समजावून सांगता येत नसल्यास शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला त्यांची एकत्रित सभा घेऊन या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थाचे अभ्यासक्रम, त्याचे महत्व, त्यातून मिळाणाऱ्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी सांगितले पाहिजे. त्यामुळे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय ज्ञानशाखेशिवाय इतरही अनेक रोजगारक्षम ज्ञानशाखा असल्याचे पालकांच्या लक्षात येऊ शकते.
यंदाच्या ‘मार्ग यशाचा’ मालिकेत, वेगवेगळ्या महत्वाच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच नवे प्रवाह, कौशल्य विकास, काही यशकथा, शिष्यवृत्ती याविषयी माहिती दिली जाईल. या लेखांचा फोकस हा १२ वीनंतरच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांवर राहील. त्याशिवाय काही महत्वाच्या शैक्षणिक संस्थांमधील संशोधन संधी याबद्दल सांगितले जाईल. राज्य आणि केंद्रशासनाने रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन मुला-मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येते. या योजनांसाठी पात्रता, अटी, मिळणारे लाभ, अर्थसाहाय्य, अर्ज प्रकिया या विषयी सांगितले जाईल.
आनंददायी प्रवास
करिअरचा प्रवास हा एक आनंदायी अनुभव असतो. सध्याच्या काळात हा आनंद मिळत नसल्याचे काहीजणांना वाटते. पण त्यात तितकेसे तथ्य नाही. हा प्रवास आनंददायी होण्यासासाठी आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांना एकदा मिळवलेल्या ज्ञानाला सतत परजवत ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे कौशल्य मिळवणे, त्यात सतत वाढ करणे आणि नवे कौशल्य प्राप्त करणे ही त्रिसूत्री जे विद्यार्थी अवलंबतील तेच यशस्वी होतील. गेल्या एक-दोन वर्षापासून तर ‘एआय’ हा नवा स्पर्धक विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आड येतो की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. पारंपरिक रोजगारांवर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच नवे रोजगारही निर्माण होतील, यावर तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. या ‘एआय’ला चेहरा नसला तरी त्याच्याकडे बरंच काही करण्याची क्षमता आहे. त्याच्या या क्षमतेवर, ‘स्किलिंग, अपस्किलिंग आणि रिस्किलिंगने” मात करता येऊ शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे.
सुरेश वांदिले