(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

आनंदानुभव

आमच्या कॉलनीच्या परिसरात खूप झाडे आहेत. आंब्यांची, गुलमोहाराची, जांभळाची, वड-पिंपळ अशी बरीच. या झाडावर वर्षभर साम्राज्य असतं ते कावळ्यांचं. वसंत ऋतू आला की कोकीळ आणि कोकिळा कुठून तरी येतात आणि चारेक महिने तिथे राहतात.

ही झाडं जणू काही कावळ्यांची कॉलनीच झालीय. दिवसभर इकडून तिकडे उडून आले की या झाड्यांच्या फांद्यावर बसतात आणि कावकाव करतात. भूक लागली की पुन्हा इकडे-तिकडे उडतात. काही हुषार कावळे किचनच्या खिडकीजवळ येऊन आई-आजी-मावशीशी सलगी करतात. यापैकी पन्नास टक्के सलगी यशस्वी झाल्याचं सध्याचं चित्र आहे. आई-आजी-मावशी त्यांना जेवायला देतात. पाणी प्यायला देतात. सारं काही साग्रसंगीत दिवसभर चालत राहतं.

अशारितीने कॉलनीतल्या झाडांवर कावळ्यांचं उत्तम चाललं असताना काही दिवसांपूर्वी पाच सहा हिरव्या रंगाचे ,लाल चुटूक चोच असलेले आणि झुबकेदार शेपटी असलेल्या पोपटांचं आगमन झालं. ते कुठून आले, कशासाठी आले ते काही ठाऊक नाही. पण कावळ्यांच्या भाऊगर्दीत ते त्यांच्या वेगळया रंगामुळे आणि आकारामुळे चांगलेच उठून दिसू लागले. कुणाला तरी पहिल्यांदा दिसले आणि त्याने याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं. असं करत करत सगळया कॉलनीला, पोपट झाडावर आल्याचं कळलं. ते सर्वांच्याच आकर्षणाचे विषय झाले. लहान मुलांना ते फार आवडले. मोठयांनी कौतुकांनी त्यांचे फोटो काढले. काहिंनी सेल्फी सुध्दा काढली.

काहिंना शंका आली की  कावळ्यांनी या पोपटांना हाकलून लावलं किंवा मारुन टाकलं तर? कावळयांचं काही खरं नाही. पण तसं काही झालं नाही. कावळ्यांनी पोपटांकडे लक्ष दिलं किंवा नाही पोपटांनी कावळ्यांकडे लक्ष दिलं किंवा नाही हे आम्हास कळण काही शक्य नव्हतं.

दोन-चार दिवस कावळे त्यांचं कार्य करत होते तर पोपट त्यांच्या विश्वात मग्न होते. ते कॉलनीतल्या झाडांवर उडून बसायचे. एखाद्या फांदिवर बसून फळ खायचे किंवा ते पानं सुध्दा खात. खाण्यासाठी फांदिला घट्ट पकडून उलटं सुध्दा होत. हे बघण्याची मोठी गमंत असायची. त्यांचं असं सकाळची न्याहरी, दुपारचं भोजन चालायचं.

रात्री कावळे आणि पोपट भोजन करायचे की नाही हे माहीत नव्हतं. कदाचित अंधार पडायच्या आतच ते जेवून घेत असावेत. कावळ्यांनी पोपटांच्या न्याहरी किंवा भोजन कार्यक्रमावर अतिक्रमण केलं नाही. दादागिरी केली नाही. त्यांच्याकडे जाऊन कावकाव केली नाही.काही दिवसांनी पोपटांची संख्या चांगलीच वाढली. त्यामुळे झाडांची शोभाही वाढली.

०००

कॉलनीत एके दिवशी सोसायटीची सभा झाली. कॉलनीतल्या झाडांवर पोपटांच्या आगमनाबद्दल सदस्यांनी आनंद व्यक्त केला.

झालं ते खूपच छान झालयं. असेच अनेक रंगीबेंरंगी पक्षीसुध्दा आपल्या या झाडांवर येऊ शकतात. कदाचित ते काळुंद्र्या कावळ्यांच्या कलकलाटामुळे आणि गर्दिमुळे येत नसावेत. तेव्हा आपण कावळ्यांना हाकलून लावले किंवा त्यांना मारुनच टाकले तर… असं काही तरी भयंकर चर्चा त्या ज्येष्ठांच्या बैठकित झाली.

कावळ्यांना हाकलून तर बघाच तुम्ही, माझी आजी बाबांना म्हणाली.

अरे, ते कॉलनीत आहेत म्हणून बरीच स्वच्छता असते. त्यांच्या कावकावीचा मोठा दिलासा मिळतो आम्हास. तुम्ही आणि तुमची मुलं आमच्याशी मोजकं आणि तोलून- मोजून बोलता. ते बिचारे खिडकीजवळ येऊन कावकाव करत बसतात. आम्ही काही बोललो तर ते ऐकत बसतात. वारंवार बोलून बोलून त्यांना आम्ही काय म्हणतो हे कळायला लागलं असावं.अरे ते आमचे खरे कॅम्पनिअन,खरे साथीदार आहेत. त्यांचा आधार वाटतो आम्हास. त्यांनी तुम्हास  काही त्रास दिलाय का? पोपटांना त्रास दिलाय का? इतर पक्षांना येऊ नको म्हणून सांगितलं का? पोपटांचा आकार मोठा म्हणून तुम्हाला ते दिसले. पण बरेच छोटे-छोटे रंगीबेंरगी पक्षी झाडावर येतात. काही क्षण बसतात. पानं खातात आणि जातात. त्यांना काही कावळयांनी हाकलून लावलं असं मला दिसलं नाही. कावळे आपल्या फांद्यावर राहतात. ते त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही. कोकीळ आणि कोकिळेला हाकलून लावले का त्यांनी ? ते तर दोन-तीनच आहेत. शंभर कावळयांनी एकत्र येऊन त्यांना हाकलून लावणं अजिबातच अशक्य नाही. असं झालं का? नाही ना.. पोपटांसोबत त्यांचं काही भांडण झालय का? ते त्यांच्या पध्दतीनं मजेत राहत आहेत. कावळे त्यांच्या पध्दतीनं. कावळयांचं बरं आहे बाबा त्यांना एकाच जागेचा कंटाळा येत नाही. ते इथेच राहतात. पोपटांना आज इथे राहावसं वाटतं उद्या तसं वाटेलच असं नाही. त्यांना एका ठिकाणी राहण्याचा कंटाळाच येत असावा. त्यामुळे याआधीही आलेले पोपट दोन तीन दिवसाच्यावर थांबले नाहीत. तुम्ही आता कावळ्यांना हाकलून लावलं तरे पोपटही पळून जातील आणि इतर पक्षीही येणार नाहीत. कावळयांच्या कावकावीशिवाय कॉलनी तर ओकीबोकी होईलच पण झाडंही दु:खी झाले तर…त्या दु:खातच या झाडांचं बरं वाईट झालं तर…

झाडांचं बरं-वाईट म्हणजे गं, बाबांनी आजीस विचारलं..

बरं वाईट म्हणजे, अरे, आपल्याला जसा एकमेकांना लळा लागलेला असतो तसा झाडांनाही या कावळ्यांच्या स्पर्शाचा लळा लागलेला असलेच की नाही. झाडांवरचे पक्षी हे त्यांचं टॉनिक असू शकतं. ते तुम्ही काढलं तर त्यांचं काय होईल ते तुम्हीच ठरवा. आजी म्हणाली.

आजीची ही मात्र अचुक लागू पडली. बाबांनी इतर ज्येष्ठांना आजीचं म्हणनं सांगितलं. म्हाताऱ्या-कोताऱ्यांना बरचं कळतं बुवा.आपल्याला कुठे वेळ आहे एवढ सगळं जाणून घेण्याचा. तेव्हा आजीच्या म्हणण्यानुसार आपण काही कावळ्यांना हाकलून लावायचं नाही. ते राहिले काय किंवा नाही काय. आपल्याला कुठे वेळ आहे त्यांच्याकडे बघायला. अशी बैठकीत चर्चा झाली.

कावळयांना हाकलून देण्याचा कार्यक्रम काही कॉलनीत कुणी घेतला नाही. चार दिवस नव्हाळीचे संपल्यावंर पोपटांची टोळी अचानक एके दिवशी गायब झाली. झाडांवर नंतर असेच कधी पोपट, घारी, नावही माहीत नसणारे रंगीबेरंगी पक्षी ,खारुताई येत राहिले आणि जात राहिले. कावळ्यांनी त्यांच्या हक्काच्या घरी कां आलात म्हणून काही आकांडतांडव केला नाही की ही झाडं काही तुमच्या बापाची नाहीत असही म्हटंल नाही.. कॉलनीतल्या आजी- आया-मावशा सर्वजण कावळ्यांच्या कावकावित आनंदानुभव घेत राहिले….घेत आहेत….

सुरेश वांदिले