(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आपला वारसा,आपली जबाबदारी!

एका पर्यटन कंपनीसोबत तेजोमयी तिच्या आई बाबांसमवेत महाबलिपूरमला गेली होती. महाबलिपूरम हे पल्लव राजांच्या काळातले महत्वाचे नगर. या नगरात ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक वास्तू, मंदिरे, शिल्पकलेचे नमुने आहेत. पल्लव राजे सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी होऊन गेले. ते शक्तीशाली राजे होते. आपल्या पराक्रमाने त्यांनी दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार केला होता. अशा समृध्द आणि संपन्न राज्यामध्ये मंदिर आणि शिल्पकला चांगलीच विकसित झाली होती. त्याकाळातील बरीच सुस्थितीतील मंदिरे आणि शिल्पे महाबलिपूरममध्ये आहेत. त्यामुळे या संपूर्ण शिल्पसमूहाला युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिला आहे.

महाबलिपूरम हे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. या समुद्र किनाऱ्यावरही भव्य मंदिरे आहेत. या नगराच्या जुन्या आख्यायिकेनुसार पूर्वी इथे सात मंदिरे होती. त्यामुळे प्राचीन खलाशी या नगराला “सात पॅगोडांची भूमी” म्हणत.  या सात मंदिरापैकी सहा समुद्राने गिळंकृत केली. फक्त एकच किनाऱ्यावर उरले. २००४ साली डिसेंबर महिन्यातील सुनामीच्या आधी समुद्र अचानक कैक मीटर मागे हटला. तेव्हा  वाळूखाली दडलेली एक मंदिराची भिंत आणि काही शिल्पे दिसली. पुढे पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात पाण्याखाली आणखी काही मंदिरांचे अवशेष सापडले. ती जुनी आख्यायिका काही अंशी खरी असल्याचे हे पुरावेच होते.

अशा या प्राचीन नगरीतील ऐतिहासिक वारसा असलेल्या विविध वास्तूंची माहिती सोबतचे तज्ज्ञ काका देत होते. आपल्या देशाच्या प्राचीन काळातील या अफाट प्रगतीची माहिती ऐकून तेजोमयीचा अभिमान उचंबळून येत होता.

तज्ज्ञाची ही माहिती ऐकत असतानाच तेजोमयीला प्रश्न पडला. कोणताही प्रश्न पडला की त्याची तड लागलीच पाहिजे हा तिचा खाक्या, त्यामुळे लगेच तिने आपला मोर्चा तज्ज्ञांकडे वळवला.

” काका तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली?”

तज्ज्ञ जरा चमकले. इतरांना तेजोमयीचा आगावूपणा वाटला. आईने तिच्यावर डोळे वटारले. बाबांना कौतुक वाटले.

“अगं, ही माहिती बऱ्याच ऐतिहासिक पुस्तकांमध्ये आहे,” काका म्हणाले.

“पण काका, एखाद्या पुस्तकातील हजार-दीड हजार वर्षांपूर्वीच्या माहितीवर आपण डोळे झाकून कसा विश्वास ठेवायचा?” तेजोमयीने धीटपणे विचारले. ही मुलगी जरा जास्त शहाणी असल्याची कुजबूज सुरू झाली. पण तज्ज्ञ काकांनी ती थांबवली.

“अहो, ही मुलगी जास्त शहाणी नाही, तर ‘योग्य’ शहाणी आहे. तिने विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पुस्तकातील माहिती खरी की खोटी, हे तपासता कसं येईल?” काकांनी सर्वां       नाच प्रश्न केला.

“तुम्ही सांगताय म्हणजे ती खरीच असणारना!” पर्यटकांपैकी एक जण म्हणाला.

“कशावरून?” काकांनी पुन्हा विचारलं.

“काका, तुम्हीच तर ही माहिती सांगताय, तरीही विचारताय की कशावरून?” तेजोमयीने आश्चर्याने विचारले,

“अशा अतिप्राचीन वास्तू किंवा मंदिरांच्या संदर्भात त्या काळातील राजांनी आणि शिल्पकारांनी मंदिरांच्या भिंतींवर, पायऱ्यांवर त्यांच्या लिपीत, विशेषतः पल्लव ग्रंथ लिपीमध्ये सगळं कोरून ठेवलंय. आधुनिक काळातील लिपीतज्ज्ञ हे शिलालेख वाचतात. अभ्यास करतात. मग निष्कर्ष काढतात. त्यावर आधारित ऐतिहासिक पुस्तके लिहिली जातात,” काकांनी समजावलं.

“अच्छा! मग इथेही असं काही कोरलेलं आहे का?” तेजोमयीने उत्सुकतेनं विचारले.

“हो ना, ते मी दाखवणार आहे.” असे म्हणून तज्ज्ञ काकांनी त्या मंदिराच्या पायऱ्यांवर आणि भिंतीवर कोरलेल्या ओळी दाखवल्या. ते बघताच पर्यटक मंडळींची फोटो काढण्याची शर्यतच सुरु झाली. कुणी या अँगलने तर कुणी त्या अँगलने फोटो काढू लागले. फोटो काढण्याची घाई इतकी की, तज्ज्ञ काका त्या ओळींमध्ये काय लिहलंय हे सांगू लागले तरी कुणाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. या धांदलीत काही पर्यटक पायरीवर कोरलेल्या ओळीवरुन चालू लागले. हे बघून तेजोमयीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती सर्वांच्या समोर जाऊन ओरडली.

“अरे काय हा बाजार मांडलाय. जरा तरी गांभीर्य ठेवा. भान ठेवा. ज्या पायऱ्यांवर आपल्या गौरवशाली इतिहासाची माहिती नोंदवून ठेवलीय, त्यावरुन चप्पल-बुटांसह कसं काय तुम्ही चालू शकता?” तेजोमयीचे हे रुप बघून सर्वजण चपापलेच. पायरीवर चढलेल्या व्यक्ती ताडदिशी खाली आल्या. तज्ज्ञ काकांनी नाराजी व्यक्त केली.

“अशा बेछूट वागण्याने हा मोलाचा वारसा खराब नाही का व्हायचा? हे स्वत:हूनच तुम्हाला कळायला हवं. आपल्या वारशाचा केवळ अभिमान बाळगून उपयोग नाही. तो वारसा छोट्या छोट्या कृतीतून जपायला हवा ना.”

तज्ज्ञ काकांनी तेजोमयीचे कौतुक केले. आपल्याजवळील “पल्लवांचा इतिहास” हे पुस्तक त्यांनी तिला सप्रेम भेट दिले.