सध्याच्या घडीला एकच शब्द सर्वाधिक ऐकू येतोय, तो म्हणजे ‘एआय’ (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स). चहाच्या टपरीपासून ते मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत जो तो ‘एआय’, ‘एआय’ करतोय. हेच खरे भविष्य असल्याचे चित्र रंगवले जात असल्याने अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये याविषयी कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. त्यात वावगे काही नाही. बदलत्या काळाची पावले ओळखणे कधीही चांगलेच. परंतु, आपल्याकडे एखादी नवी गोष्ट आली की जी ‘कळपीय मानसिकता’ सुरू होते, त्यापासून सावध राहिलेले बरे.
यंदा १०वी आणि १२वीच्या परीक्षा संपल्यानंतर मुले-मुली ‘एआय’च्या नावाखाली सुरू असलेल्या ‘छोट्या छोट्या’ अभ्यासक्रमांकडे वळू लागली. अशा संस्थांचे पेव फुटले आहे. या संस्थांचे संचालक, मार्केटिंग प्रतिनिधी “आमचा कोर्स करा आणि लगेच रोजगार मिळवा” अशी आश्वासने देत आहेत. एका दैनिकात तर अशा अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे वृत्तही नुकतेच प्रसिद्ध झाले. ‘एआय’ लयभारी वगैरे असेल किंवा असले तरी छोट्या छोट्या अभ्यासक्रमांनी आपले कसे काय भले होऊ शकेल? याचा विचार विद्यार्थी आणि पालकांनी करायला हवा. हे छोटे अभ्यासक्रम खरोखरच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार की पालकांच्या खिशाला कात्री लावणार, याचाही साधकबाधक विचार करायला हवा.
‘गाजर‘ दाखवणारी साखळी
एआय हे तंत्रज्ञान नक्कीच प्रभावी आहे, पण ते काही ‘जादूची कांडी’ नाही. या छोटेखानी अभ्यासक्रमांचे शुल्क पाचशे-हजार रुपयांत नसते, तर ते थेट हजारोच्या घरात असते. यातली मार्केटिंगची पद्धतही चक्रव्युहासारखी असते. “पहिले मॉड्युल पूर्ण करा, मग दुसरे केले की आणखी चांगली संधी मिळेल,” असे सांगत एकामागून एक (मॉड्युल्सची) गाजरे दाखवली जातात. ‘एआय’ शिकले की बेरोजगारीची समस्या कायमची मिटेल, असे वाटणे स्वाभाविक असले तरी प्रत्यक्षात, झटपट आणि पटपट शिकून कुणीही ‘एआय तज्ज्ञ’ होऊ शकत नाही.
संस्थेची गुणवत्ता तपासा
अशा संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी पालकांनी, संबधितांना काही रोखठोक प्रश्न विचारणे गरजेचे आहे. हे अभ्यासक्रम शिकवणारी ही सर मंडळी नेमकी कोण आहेत? त्यांचे स्वतःचे शिक्षण काय? त्यांना या क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव किती? केवळ चॅटजीपीटी किंवा अशाच काही टूल्सकडून माहिती काढून कोणी शिक्षक बनत असल्यास तो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच ठरू शकतो. या संस्थांकडे रोजगाराची कोणती खात्री आहे? त्यांनी आजवर किती विद्यार्थ्यांना कुठे नोकऱ्या मिळवून दिल्या? तिथे त्यांना किती वेतन मिळते? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही संस्था अधिकृत म्हणजेच केंद्र किंवा राज्य शासनाची मान्यताप्राप्त संस्था आहे का, की केवळ एक भाड्याची खोली घेऊन सुरू केलेले दुकान आहे? किती वर्षांपासून या संस्था हे काम करत आहेत, या बाबींची खातरजमा करायला हवी.
टूल्स म्हणजे एआय नव्हे!
अनेक अभ्यासक्रमात प्रत्यक्षात, एआय टूल्स (उदा. चॅटजीपीटी, मिडजर्नी, कॅनव्हा एआय) कसे वापरायचे आणि त्यांच्याकडून स्मार्टली काम कसे करून घ्यायचे, हे शिकवले जाते. या टूल्सचा वापर करण्याचे तंत्र शिकणे, हे काही रॉकेट सायन्स नाही. आजची पिढी तंत्रस्नेही आहे, ती स्वतःहूनही हे तंत्र अवगत करु शकते. ज्या गोष्टी युट्युबवर किंवा गुगलवर विनामूल्य शिकता येतात, त्यासाठी हजारो रुपये मोजण्याचे कारण नाही. समजा ‘एआय’ ही जादूची कांडी असेलही, तरी ही कांडी चालवण्यासाठी गणित, कोडिंग आणि लॉजिक या तीन बाबींचे कौशल्य अंगी असायला हवे.
एआयचा आवाका आणि वास्तव
‘एआय’ हा अत्यंत व्यापक विषय आहे. अनेक महत्वाच्या शैक्षणिक संस्था पूर्णकालीन अभ्यासक्रमाची रुपरेषा व्यवस्थितपणे आखण्याची प्रक्रिया करत आहेत. सध्या इंजिनीअरिंगमध्ये कॉम्प्युटर सायन्ससोबत ‘एआय-मशिन लर्निंग’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ किंवा ‘सायबर सिक्युरिटी’ असे जोड-अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. या पदवी शिक्षणाला चार वर्षे लागतात, तिथे १५ दिवस किंवा महिन्याभराच्या अभ्यासक्रमांनी काय साध्य होणार? ‘एआय’ हे कॉम्प्युटर सायन्स या मोठ्या वृक्षाची फांदी आहे, तिला स्वतंत्र झाड समजण्याची घाई करू नये.
‘एआय’ क्षेत्रात करिअर करायचे असल्यास विद्यार्थ्यास पुढील काही बाबींचे कौशल्य आवश्यक असते, हे लक्षात ठेवायला हवे-
१. गणिताची गोडी: लिनिअर अल्जेब्रा, प्रॉबेबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स हे घटक ‘एआय’चा पाया आहेत. हे घटक कच्चे असल्यास, ‘एआय’मध्ये प्रगती साध्य करणे कठीण जाऊ शकते.
२. प्रोग्रामिंग लँग्वेज: पायथन ही संगणकीय भाषा ‘एआय’चे इंजिन असल्याने, ती भाषा शिकण्यावर भर द्यायला हवा.
३. प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग: ‘एआय’ला नेमका प्रश्न कसा विचारावा, हे एक कौशल्य नक्कीच आहे, पण त्यासाठी कोडिंग आणि विषय ज्ञान महत्वाचे ठरते.
४. स्वयं-अध्ययन: कोर्सेरा, युडेमी किंवा गुगलच्या अधिकृत संकेतस्थळावर अनेक विनामूल्य अभ्यासक्रम आहेत. त्याचाही विचार करायला हवा.
‘अधिकृत‘ निवडा!
‘एआय’चे तंत्र हस्तगत करण्याची इच्छा असल्यास खाजगी संस्थांच्या भूलथापांना बळी न पडता शासनमान्य आणि अधिकृत संस्थांचे पर्याय निवडावेत. प्रवेश घेताना सबंधित अभ्यासक्रम एनएसक्यूएफ (नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क) मान्यताप्राप्त आहे का, हे आवर्जून पाहावे. अधिकृत संस्थांचे अभ्यासक्रम माफक दरात आणि शास्त्रोक्त पद्धतीने शिकवले जातात. या संस्थांची प्रमाणपत्रे जागतिक स्तरावर मान्य केली जातात.
काही महत्वाच्या संस्था
१. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड –
ही महाराष्ट्रातील महत्वाची संस्था आहे. या संस्थेचे अभ्यासक्रम नजिकच्या एमकेसीएल केंद्रावर करता येतात. अभ्यासक्रम– (१) KLiC AI (क्लिक एआय) – कालावधी: ३० तास, यात १००+ एआय टूल्सचा वापर करून कंटेंट क्रिएशन, इमेज आणि व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते. (२) क्लिक एआय-एमएल बेसिक्स – कालावधी: ६० तास, यात डेटा सायन्स आणि मशिन लर्निंगच्या मूलभूत संकल्पनांची माहिती दिली जाते.
संकेतस्थळ: www.mkcl.org/klic किंवा klic.mkcl.org
२. स्वयम / एनपीटीइएल (नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग) (भारत सरकारचे पोर्टल)
या पोर्टलवर आयआयटीतील प्राध्यापक विनामूल्य शिकवतात. अभ्यासक्रम: (१) एआय फॉर एव्हरीवन, कालावधी: ४ आठवडे, एआय म्हणजे काय आणि त्याचा व्यवसायात वापर कसा होतो, याची प्राथमिक माहिती दिली जाते. (२) इन्ट्रोडक्शन टू मशिन लर्निंग, कालावधी: ८ ते १२ आठवडे, तांत्रिक सखोल ज्ञान (गणित आणि कोडिंगसह) दिले जाते.
संकेतस्थळ: swayam.gov.in
३. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT)- ही केंद्र सरकारची अधिकृत संस्था असून याचे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे मोठे केंद्र आहे. अभ्यासक्रम: (१) फाउंडेशन कोर्स इन मशिन लर्निंग / फाउंडेशन ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कालावधी: ८०-९० तास (सुमारे १-२ महिने), (२) सर्टिफिकेट कोर्स इन डाटा सायन्स ॲण्ड एआय, कालावधी: ६ महिने.
संकेतस्थळ: nielit.gov.in
४.स्किल इंडिया डिजिटल– पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत हे अभ्यासक्रम चालवले जातात.
(१) बेसिक्स ऑफ एआय ॲण्ड डाटा सायंस, कालावधी: १० ते १५ तास (व्हिडिओ आधारित), (२) एआय ९००: मायक्रोसॉफ्ट अझ्युरे एआय फंडामेंटल्स, कालावधी: स्व-अध्ययन.
संकेतस्थळ: skillindiadigital.gov.in
५. गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमचे अभ्यासक्रम
या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी स्वतःचे अधिकृत कोर्सेस विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत.
(१) गुगल एआय इसेंसिएल्स (कोर्सेरा किंवा गुगल क्लाउडवर उपलब्ध), कालावधी: साधारण ९-१० तास,
(२) एलिमेंट्स ऑफ एआय: (फिनलंडच्या University of Helsinki आणि MinnaLearn यांचा कोर्स), कालावधी: सुमारे ३०-५० तास.
संकेतस्थळ: grow.google/ai किंवा elementsofai.com
६. इंटेल आणि सीबीएसइ – (एआय फॉर युथ)–
शालेय विद्यार्थ्यांसाठी (विशेषतः ८वी ते १२वी) हे पोर्टल अत्यंत उत्तम आहे.
अभ्यासक्रम: एआय फॉर युथ प्रोग्रॅम, कालावधी: मॉड्यूलनुसार बदलतो.
संकेतस्थळ: ai4youth.intel.com
इंडिया एआय मिशन अंतर्गत, युवा एआय सारखे विनामूल्य अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.हे अभ्यासक्रम केल्यावर वेगवेगळे प्रकल्प(प्रात्यक्षिक) करणे सुध्दा गरेजेच आहे.
सुरेश वांदिले
—