कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षा
लष्काराच्या वेगवेगळया घटकांमध्ये सामील होण्यासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षा (संयुक्त संरक्षण सेवा) हा एक महत्वाचा मार्ग आहे.ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. या परीक्षेद्वारे देहरादूनस्थित इंडियन मिलिटरी अकॅडेमी, एजिमालास्थित इंडियन नॅव्हल अकॅडेमी ,हैद्राबादस्थित एअरफोर्स अकॅडेमी, चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमीमध्ये प्रवेश दिला जातो.
विशेषत: ज्या तरुणिंना लष्करात जावून साहस गाजवायचं आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तम संधी प्रदान करतं. या तरुणिंना चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी येथील अतांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
अर्हता
इंडियन मिलिटरी अकॅडेमीमधील काही जागा एनसीसी सी प्रमाणपत्र(आर्मी ) धारकांसाठी राखीव असतात. इंडियन नॅव्हल अकॅडेमीमधील काही जागा एनसीसी सी प्रमाणपत्र(नेव्ही) धारकांसाठी राखीव असतात. या अकॅडेमित कार्यकारी–सामान्य सेवेसाठीचा अभ्यासक्रम चालविला जातो.एअरफोर्स अकॅडेमीमध्ये प्री–फ्लाईंग अभ्यासक्रम चालविला जातो.
चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी शार्ट सव्हिर्स (लघु सेवा) कमिशन अभ्यासक्रम चालविला जातो.
इंडियन नॅवल अकॅडेमी– मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी. एअर फोर्स अकॅडेमी– मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. मात्र 12 वीमध्ये फिजिक्स आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा अभियांत्रिकी पदवी.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी–कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठात कोणत्याही विषयातील पदवी. इंडियन मिलिटरी अकॅडेमी– कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
परीक्षा प्रक्रिया
ही परीक्षा दरवर्षी दोनदा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते.२०२३ या वर्षातील पहिला परीक्षा १६ एप्रिल २०२३ मध्ये देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई,नवी मुंबई,ठाणे,पुणे आणि नागपूर या शहारांचा समावेश आहे.या परीक्षेव्दारे ३४१ पदे भरली जातील.अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२३ ही आहे.
इंडियन मिलिटरी अकॅडेमी,इंडियन नेव्हॅल अकॅडेमी आणि एअर फोर्स अकॅडेमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मूलमूत अंकगणित या तीन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी 100 गुणांचे तीन पेपर्स असतात.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर्स असतात. प्रश्न वस्तुनिष्ठ पध्दतीचे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतात व ते इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असतात. निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासाठी 0.33 गुण वजा केले जातात. एकापेक्षा जास्त उत्तरे नोंदवल्यास 0.33 गुण वजा केले जातात. प्रश्नाचे उत्तर लिहिले नाही तर कोणत्याही प्रकारे गुण वजा केले जात नाही.
या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांचे निर्धारण कमिशनच्या वतिनं केलं जातं.मुलभूत गणिताच्या पेपरचा दर्जा हा दहावी स्तराचा आणि इंग्रजी व सामान्य अध्ययन पेपरचा दर्जा पदवी स्तराचा असतो. इंग्रजीच्या पेपरमध्ये उमेदवाराचं या भाषेवरचं सर्वसाधारण प्रभूत्व आणि शब्दांचा अचुक वापर करण्याची क्षमता तपासली जाते. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये चालू घडामोडी, दैनंदिन जीवनाशी निगडित सामान्य विज्ञान, भारताचा इतिहास आणि भूगोल इत्यादी विषय घटकांवर प्रश्न विचारले जातात.
मुलाखतीचे गुण
इंडियन मिलिटरी अकॅडेमी, इंडियन नेव्हॅल अकॅडेमी आणि एअर फोर्स अकॅडेमीच्या मुलाखतीसाठी 300 गुण आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमीच्या प्रवेशासाठीच्या मुलाखतीसाठी 200गुण असतात.
बुध्दीमता आणि व्यक्तिमत्व चाचणी– ही चाचणी दोनस्तरीय असते. पहिल्या टप्प्यात ऑफिसर्स इंटेलिजन्स टेस्टचा समावेश आहे. यामध्ये पिक्चर पर्सेप्शन टेस्ट ,डिस्क्रिप्शन टेस्टचा समावेश होतो.या टेस्टच्या गुणांवर आधारीत दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाते. या टप्प्यात मुलाखत, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क, मानसशास्त्रीय चाचणी आणि चर्चा यांचा समावेश आहे. ही संपूर्ण प्रक्रिया चार दिवस चालते.उमेदवार मानसिक आणि बौध्दिकदृष्टया लष्करी सेवा करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची सखोल तपासणी या चाळण्यांद्वारे केली जाते.
या परीक्षेला अर्ज करु इच्छिणारा उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. उंची,वजन, डोळे याविषयीचे मानके (स्टँडर्ड्स) निर्धारित करण्यात आले आहेत.अशाच पात्र उमेदवारांची निवड होऊ शकते.
इंडियन नेव्हल ॲकेडमी येथे ४४ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर कॅडेट्सना सब लेफ्टनंद या पदावर नियुक्ती(कमिशन)दिली जाते.
विद्यावेतन आणि पदोन्नती
आर्मी आणि नेव्हीसेवांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात 21 हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं. प्रशिक्षणाचा कालावधी–१८ महिने. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर पर्मनंट कमिशनद्वारे सेवेत सामावून घेतले जाते. या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना 2 वर्षांत लेफ्टनंट ,6 वर्षानंतर मेजर आणि13 वर्षानंतर लेफ्टनंट कर्नल, 26 वर्षानंतर कर्नल या पदावर पदोन्नतीची संधी मिळू शकते .निवड पध्दतीने उमेदवारांना 15 वर्षांत कर्नल,23 वर्षात ब्रिगेडियर आणि 25 वर्षात मेजर जनरल,28 वर्षात लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्तीची संधी मिळू शकते.
एअर फोर्स ट्रेनिंग अकॅडेमीमध्ये ७४ आठवड्यांचे प्रशिक्षण दिलं जातं. यशस्वी प्रशिक्षणानंतर उमेदवारांना फ्लाईंग ऑफिसर म्हणून सामावून घेतले जातं. त्यानंतर कालबध्दरीत्या फ्लाइट लेफ्टनंट, स्क्वार्डन लिडर, विंग कंमाडर,ग्रुप कॅप्टन अशी पदान्नती अनुक्रम 2,6,13 आणि 26 वर्षानंतर दिली जाते.निवड पध्दतीने एअर कमोडोर, एअर व्हाइस मार्शल,एअर मार्शल या पदांवर नियुक्ती होण्याचीही संधी मिळू शकत
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी मध्ये निवड झालेल्या जंटलमेन कॅडे्स/लेडी कॅडेट्सना उमेदवारांना10 हजार महिना विद्यावेतन दिलं जातं. हे प्रशिक्षण 49 आठवडयांचं असतं.हे प्रशिक्षण संपलं की लघु सेवा कमिशनद्वारे लेफ्टनंटच्या रँकमध्ये सामावून घेतलं जातं.हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मद्रास विद्यापीठाची पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट ऍ़ण्ड स्ट्रेटेजिक स्टडीज ही पदव्युत्तर पदविका प्रदान केली जाते.प्रशिक्षणानंतर प्रारंभी 10 वर्षासाठी सामावून घेतलं जातं.त्यानंतर उमेदवारांची कार्यक्षमता बघून 4 वर्षासाठी ही सेवा वाढवली जाऊ शकते.या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना 2 वर्षांत कॅप्टन ,6 वर्षानंतर मेजर आणि13 वर्षानंतर लेफ्टनंट या पदावर पदोन्नतीची संधी मिळू शकते.
शुल्क आणि संपर्क
महिला आणि अनूसुचित जाती व जमाती संवर्गातील उमेदवारांना या परीक्षेचे शुल्क फी भरावी लागत नाही. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क आहे. हे शुल्क नेटबँकिंगद्वारे भरता येते.
उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी एकदाच अर्ज करणं आवश्यक आहे. अन्यथा अर्ज रद्द केला जातो. शासकीय सेवेत वा खाजगी सेवेत असणारे उमेदवार थेट अर्ज करु शकतात. मात्र त्यांनी असा अर्ज केल्याची माहिती आपल्या सध्याच्या कंपनीला वा आस्थापनेला देणे गरजेचं आहे. मुलाखतीच्यावेळी संबंधितांचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं लागतं.
परीक्षेच्या तीन आठवडे आधी ई–ऍ़डमिट कार्ड पाठवलं जातं. हे प्रवेशपत्र यूपीएस्सीच्या www.upsc,gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतं.
.संपर्क– (1)फॅसिलेशन कांऊटर, दूरध्वनी-011-23381125/23385271 , (2) इंडियन मिलिटरी अकॅडेमीसाठी– joinidianarmy.nic.in (3) रिक्य्रुटमेंट डायरेक्टोरेट– 011-26173215, फॅक्स-26196205,(4) एअर फोर्ससाठी– पीओ3 –ए/एअर हेडक्वार्टर्स, जे ब्लॉक ,रुम नंबर-17,अपोजिट वायू भवन,मोतिलाल नेहरु मार्ग ,नवी दिल्ली-110011, (5) नेव्हीसाठी– रुम नंबर-204,सी विंग,सेना भवन नवी दिल्ली– 110011,नेव्हीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्याचे नियुक्तीपत्र www.nausena-bhati.nic.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करावे.
सुरेश वांदिले