जुने जातील, नवे येतील…
सध्या, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात, हा ठराविक प्रश्न विचारला जातो. तसे तर प्रत्येकच क्षेत्रासाठी प्रशिक्षित आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज भासते. मात्र सध्याचे काही प्रवाह लक्षात घेता, पुढील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करायला हरकत नाही. मात्र, तंत्रज्ञान वाढिचा वेग इतका विस्मयकारक आहे की, या वर्षी ज्या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्या तशाच पुढच्या वर्षीही राहतीलच, असे ठामपणे सांगता येत नाही. अनेक तज्जांच्या मते एआय, ऑटोमेशन, पर्यावरणीय बदलाशी संबंधित तंत्रज्ञ, अवकाश तंत्रज्ञ, जैवअभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये प्रारंभिच्या बऱ्याच संधी मिळू शकतात. एआय, मशिन लर्निंग आणि डाटा सायंस क्षेत्रांसाठी भारतातून सर्वाधिक मनुष्यबळ जगभरात पुरवले जाऊ शकते असाही काही तज्ज्ञांचा कयास आहे. एआय आणि मशिन लर्निंगच्या जोडिला २०३० पर्यंत क्वांटम कॉम्प्युटिंग (क्वांटम मेकॅनिक्सच्या नियमांवर आधारित संगणन पद्धती. ज्यात माहिती “क्यूबिट्स” मध्ये साठवली जाते. ती एकाच वेळी अनेक प्रकारांमध्ये असू शकते. त्यामुळे पारंपरिक संगणकांपेक्षा काही विशिष्ट गणना अतिशय वेगाने करता येतात. क्यूबिट्स (Qubits): पारंपरिक संगणकात बिट्स ० किंवा १ असतात, पण क्यूबिट्स प्रकारात बिट्स एकाच वेळी ० आणि १ दोन्ही अवस्थेत असू शकतात. याला सुपरपोझिशन म्हणतात. भारत सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले आहे. याव्दारे क्वांटम तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला जाईल. यामुळे भविष्यातील संगणन, सुरक्षा, औद्योगिक संशोधन आणि वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भारताला मोठा फायदा होऊ शकतो. पारंपरिक संगणकांना अशक्य वाटणारे औषधींचे शोध, एन्क्रिप्शन मोडणे, आणि जटिल सिम्युलेशन, क्वांटम संगणक काही सेकंदांत सोडवू शकतात.) हा विषयघटक जोडला जाईल. भविष्याचे त्याचे प्राबल्य राहील. तंत्रज्ञानाच्या या वेगामुळे सध्या अस्तित्वात नसलेल्या नव्या करिअर संधी निर्माण होतील. काही करिअर हे सध्या अस्तित्वात असलेल्या करिअरचे स्मार्ट रुप असेल. मात्र प्रत्येक नवे करिअर हे उच्च तंत्रकौशल्याचे असतील.
(१) तंत्रज्ञान – ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमनच्या मते सध्या काही संस्थांमध्ये ५० टक्के कोडिंग एआयमार्फत केले जाते. काही तज्ज्ञांच्या मते, पुन्हापुन्हा करावे लागणारे ९० टक्के कोडिंग एआय मार्फतच केले जातील. तंत्रकुशलता आणि कार्यान्वयन यामध्ये अमुलाग्र बदल एआयमुळे होईल. असे जरी असले तरी या क्षेत्रातील बहुतेक सर्वच तज्ज्ञांच्या मते, हा सर्वव्यापी ‘एआय’ नव्या वैशिष्ट्यपूर्ण रोजगार संधीही निर्माण करेल. त्यामुळे लवचिक आणि नवा बदल तत्काळ स्वीकारुन नवे कौशल्य लगेच आत्मसात करणाऱ्या मनुष्यबळास कोणताही धोका राहणार नाही. नव्या एआय तंत्रज्ञानामुळे चिफ एआय ऑफिसर, डाटा एथिक्स स्पेशॅलिस्ट, ॲलगॉरिथमिक अकाउंटबिलिटी मॅनेजर, एआय-पॉवर्ड सायबर सेक्युरिटी एक्स्पर्ट, डिजिटल मार्केटिंग एक्स्पर्ट, मशिन लर्निंग इंजिनीअर अशा नव्या रोजगार संधी आता निर्माण होऊ घातल्या आहेत. उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन, तंत्रकौशल्य प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना या संधी मिळणे सुलभ जाऊ शकते.
(२) फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स- दैनंदिन खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि दर्जा वाढण्यासाठी आता जगातील अनेक मोठ्या खाद्यउत्पादन कंपन्या, एआयचा वापर प्राधान्याने करताहेत. अमेरिकेतील, क्रॅफ्ट हेंज बहुराष्ट्रीय खाद्यपदार्थ कंपनी एआयचा वापर करून उत्पादन नवकल्पना, मार्केटिंग आणि पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम बनवत आहे. या कंपनीने ‘टेस्ट मेकर’ नावाचे एआय-प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. यामुळे, ‘उत्पादन कल्पना ते वैयक्तिक मार्केटिंग सामग्री तयार करण्यापर्यंतचा’ वेळ ८ आठवड्यांवरून फक्त ८ तासांवर आला आहे. यामुळे वेळेची ८० टक्के बचत झाली आहे. एआयच्या साहाय्याने, लोणच्यासाठी वापरण्यात येणारी काकडी, ही सुयोग्य लांबी, जाडी आणि घनता असणारी तयार केली. यामुळे या कंपनीचे उत्पादन १२ टक्क्यांनी वाढले. अन्नपदार्थ निर्मितीत असणाऱ्या जागतिक स्तरावरील बहुतेक मोठ्या कंपन्यांमध्ये आता ई कॉमर्स प्रणाली सोबतच ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि रोबिटिक्स या तंत्रांवर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. सामान्य किंवा नियमित स्वरुपातील व्यापारापेक्षा अन्न पदार्थ व्यापारातील ई-कॉमर्सचा वापर तीन ते चार पटिने वाढण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या क्षेत्रामध्ये चॅनेल असॉर्टमेंट मॅनेजमेंट, की अकाउंट मॅनेजमेंट अशा नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या क्षेत्रात येण्यासाठी डाटा सायंस, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सस्टनेबल ॲण्ड ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चुरिंग, की अकाउंट मॅनेजमेंट या कौशल्याची गरज भासेल.
(३) स्पेसटेक- या क्षेत्रात, ॲलॉन मस्क सारख्या खाजगी उद्योजकांनी आता हिरिरीने सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. भारताचे पृथ्वी निरीक्षण (अर्थ ऑर्ब्झव्हेशन- इओ) क्षेत्र ढवळून निघाले आहे. ‘इओ’ माहिती प्रचंड प्रमाणावर मिळू लागली आहे. त्यामुळे हवामान बदल, कृषी, पायाभूत सुविधा , आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रासाठी, सरकार, खाजगी उद्योजक, इतर संस्था ही माहिती प्राप्त करुन रिअल टाइम (त्याक्षणीची परिस्थिती) स्थिती जाणून घेऊ लागली आहेत.
करिअर संधी- रिमोट सेन्सिंग डाटा ॲनॅलिस्ट, एआय/मशिन लर्निंग, इओ स्पेशॅलिस्ट इंजिनीअर, जिओस्पॅशिअल डाटा सायंटिस्ट, इओ प्लॅटफॉर्म क्लाउड इंजिनीअर, मिशन ऑपरेशन असोशिएटस, ॲप्लाइड रिसर्च, सिंथेटिक डाटा इंजिनीअर, एज एआय डेव्हलपर्स, ऑटनॉमस डाटा पाइपलाइन इंजिनीअर्स, जिओस्पॅशिअल मॅनेजर्स, क्लायमेंट एआय ॲनॅलिस्ट अशासारख्या करिअर संधी निर्माण झाल्या आहेत.
या क्षेत्रात येण्यासाठी पायथॉन या संगणकीय भाषेवर प्रभुत्व मिळवावे लागेल. रॅस्टेरिओ आणि जीडीएएल (जिऑस्पॅशिअल डाटा ॲबस्ट्रॅक्शन लायब्ररी) या तांत्रिक लायब्ररीचे म्हणजे ज्ञान हस्तगत करावे लागेल. जीडीएएल ही या क्षेत्रातील सर्वात पायाभूत आणि शक्तिशाली ‘ओपन सोर्स‘ लायब्ररी आहे. रॅस्टेरिओ ही जीडीएएल वर आधारित, पायथन वापरकर्त्यांसाठी बनवलेली लायब्ररी आहे. गुगल अर्थ इंजिन, क्यूजीआयएस अशा सारखी साधने वापरता येणे गरजेचे आहे.
(४) ॲग्रिटेक – अमेरिकेतील केवळ १ टक्के लोकसंख्या कृषीक्षेत्राशी निगडीत आहे. मात्र हे मनुष्यबळ १२० कोटी एकरावर ड्रोन, मशिन लर्निंग, एआयच्या सहाय्याने शेतीविषयक असंख्य कामे सुलभतेने व गतिने करतात. ‘श्रमावर आधारित शेती‘ सोडून ‘बुद्धी आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती‘ला प्राधान्य दिले जाते. यामुळे कमी मनुष्यबळात विक्रमी उत्पादन घेतले जाते. केवळ १% लोकसंख्या असूनही अमेरिका जगातील एक मोठा अन्न निर्यातदार देश बनलाय. तेथील शेती आता ‘उच्च-तंत्रज्ञान उद्योग‘ बनला आहे. भारतातसुध्दा आता शेतीमध्ये एआयचा वापर सुरु झाला आहे. एआय आणि इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे शेतमाल व्यवहार (बाजार), वित्त, संसाधाने यांच्यात अमुलाग्र बदल घडून येत आहे.
भविष्यातील संधी – शेतीतील माहितीचे विश्लेषण, शेतमालाच्या उत्पादनात वाढ, पुरवठा साखळी प्रभावी व्यवस्थापन यासाठी ॲग्री डाटा ॲनॅलिस्ट, शेतीतील इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणे, सेन्सर, इतर उपकरणांची हाताळणी व देखभालीसाठी फिल्ड टेक्निशिअन, शेतमालाचे किमान नुकसान होईल अशारितीने ‘शेती ते व्यापारपेठे’त माल वाहतुक प्रभावी व गतिने करण्यासाठीचे सप्लाय चेन कुऑर्डिनेटर (पुरवठा साखळी समन्वयक), पीक व्यवस्थापन, किटक नियंत्रण आणि उत्पन्न वाढीसाठी एआय आणि मशिन लर्निंगचा वापर करुन भविष्यवेधी (प्रेडिक्टिव्ह) प्रारुप तयार करु शकणारे स्पेशॅलिस्ट, पर्यावरणपुरक शेती प्रक्रिया आणि पर्यावरणाचा प्रभाव कमी करण्याचा सल्ला देणारे ॲग्री फिनटेक सल्लागार.
आवश्यक तंत्रकौशल्य- डाटा सायंस, एआय, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन ऑपरेशन, वित्त, विपणन, पुरवठा साखळीचे कौशल्य, शेतीतील आव्हाने, प्रक्रिया आणि पुरवठा साखळीचे व्यवस्थापन या विषयीची परिपूर्ण माहिती.
(५) ईकॉमर्स- ई कॉमर्समुळे ग्राहकांना व्यक्तिगत स्वरुपाचा अनुभव ऑनलाइन पध्दतीने मिळणे शक्य झाले आहे. ग्राहकांना आता ई-कॉमर्स संबंधित प्लॅटफॉर्म्स त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन विक्रीसाठी सूचना करायला लागल्या आहेत. वस्तूंचे वितरण अधिक गतिने व्हायला लागले आहे. ऑनलाइन व्यवहाराची सुरक्षितता वाढली आहे. एआय साधनांचा अधिकाधिक वापर सुरु झाला आहे. त्यामुळे या संदर्भातील कौशल्य आणि तंत्र अवगत केलेल्या मनुष्यबळास उत्तमोत्तम संधी मिळू लागल्या आहेत.
सुरेश वांदिले
००००००