(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 करोनोत्तर करिअर संधी  

सध्या तरी जवळपास गेलेल्या (आणि भविष्यात कधीही येऊ शकणाऱ्या) करोना संकटामुळे आपले काय होणार याची काळजी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी पारंपरिक पध्दतीने विचार करण्याला फाटा दिला पाहिजे. कौशल्य वाढीसाठी मानसिकता तयार करायला पाहिजे. विविध कौशल्यप्राप्तीसाठी प्रचंड बुध्दिमत्ताच पाहिजे अशातला भाग नाही. सतत सराव आणि अभ्यासाने सुध्दा कौशल्ये हस्तगत करता येतात.
काही कौशल्ये ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे घरी बसल्या बसल्या प्राप्त करता येतात. त्यासाठी अतिशय अल्प किंवा परवडणाऱ्या शुल्क आकारले जाते. सध्या तर काही कंपन्यांनी असे प्रशिक्षण मोफत देणे सुरु केले आहे. भविष्यात शुल्क लावले तरी फार असणार नाही.
त्यामुळे, जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा उपयोग केवळ नवे चित्रपट, संगीत अल्बम, आयपीएल, डिजिटल गेम्स, किंवा वेब सिरिज/ मालिका पाहण्यापुरता मर्यादित न ठेवता, किमान पन्नास टक्के वा त्याहून अधिक वेळ हा ऑनलाइन प्रशिक्षणासाठी द्यायला हवा.
करोनोत्तर काळात पुढील आणखी काही क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होणार आहेत.
(१) रोबोटिक्स – स्वयंचलन किंवा ऑटोमेशनकडे अधिकाधिक लक्ष पुरवले जाईल. ज्या क्षेत्रात आतापावेतो राबोंचा किंवा या तंत्राचा वापर केला जात नव्हता, त्या क्षेत्रातही याचा वापर केला जाईल. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी रोबाचे साहाय्य घेण्यात आले. मोठी संयंत्रे, सुरक्षा, ड्रोनचा वापर अशा विविध क्षेत्रात हे तंत्र वापरले जाईल. त्यामुळे या क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि मनुष्यबळास रोजगाराच्या संधी मिळू शकतील.
(२) मानसोपचार तज्ज्ञ- कोरोना परिस्थितीमुळे विविध प्रकारच्या मानसिक समस्या, प्रश्न आणि आजार उद्भवू लागले आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे तज्ज्ञ मोठ्या संख्येने लागतील. सध्या आपल्या देशात व इतर देशातही या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची फार वानवा आहे. ही बाब लक्षात ठेवायला हवी.
(३) योग प्रशिक्षक – कोरोना विषाणू आणि इतरही विषाणूंचा सामना करण्यासाठी उत्तम आरोग्य असण्याची गरज कोरोना काळात अधिक अधोरेखित झाली. भारतीय योगसाधना यासाठी उपयुक्त ठरु शकते, अशी सकारात्मक भावना देशात आणि जगातही निर्माण झाली. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक नागरिकांचा ओढा योगाभ्यासाकडे वाढेल. व्यक्तिगत प्रशिक्षक, सोसायटीचे प्रशिक्षक, समूह प्रशिक्षक अशा अनेक संधी निर्माण होतील.
(४) वृध्दांसाठी केअर टेकर किंवा केअर गिव्हर- कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा वृध्दांना बसत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना पूर्वी आणि नंतर वृध्दांची देखभाल करणाऱ्या नव्या मनुष्यबळाची गरज यापुढील काळात भासेल.
(५) सॅनिटेशन मॅनेजर- सध्या सॅनिटायझेशन हा परवलीचा शब्द बनला आहे. कोरोना विषाणूवर हमखास औषध किंवा लस मिळाल्यानंतरही सॅनिटायझेशनला पर्याय राहणार नाही. घरगुती सॅनिटायझेशन ते मोठया आस्थापना, कार्यालये, कॉर्पोरेट हाऊसेस आणि जिथे जिथे गर्दी होईल किंवा लोक गोळा होतील त्यासर्व ठिकाणी सॅनिटायझेशन केले जाईल. त्यासाठी संनियंत्रण करणारे मनुष्यबळ लागेल.
इतर क्षेत्रे
(१) ई – वर्कफोर्स मॅनेजमेंट. (२) कस्टमर सर्व्हिस, (३) वेगवेगळया स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि काऊन्सेलिंग (४) या सारख्या सेवा ऑनलाइन देण्यात ज्या व्यक्ती तज्ज्ञता प्राप्त करतील वा कौशल्य प्राप्त करतील त्यांना रोजगारासोबतच स्वंयरोजगाराच्या संधीही मिळू शकतात.
शिकाल तर टिकाल
करोनोत्तर काळात करिअरच्या संधीमध्ये निश्चितच मोठा फरक पडणार आहे. तथापि ज्या उमेदवारांकडे विविध प्रकारच्या व्यामिश्र (कॉम्प्लेक्स) समस्या सोडवण्याची क्षमता, नेतृत्वगुण, सादरीकरण कौशल्य आणि उत्तम संवाद कौशल्य असेल त्यांना संधी मिळणे कठीण जाणार नाही.
आपल्याकडे असलेल्या कौशल्याचे सतत उन्नतीकरण म्हणजे अपग्रेडेशन करता आले पाहिजे. हे करत असताना नवी कौशल्ये हस्तगत करता आली पाहिजेत. आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा उपयोग हा जितका प्रभावीरित्या करता येईल, तितक्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. करोना काळात ज्यांच्याकडे कोणते ना कोणते कौशल्य होते, ते टिकून राहिले. ही बाब कायम लक्षात ठेवावी. कौशल्य प्राप्त उमेदवारांवर अधिकाधिक महत्वाच्या जबाबदाऱ्या सुध्दा टाकल्या जातील आणि त्यांना प्रगतीच्या संधीही झपाट्याने उपलब्ध होतील, याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
सुरेश वांदिले