काका,जरा शहाणे व्हा!
तेजोमयी, बाबा आणि अलेक्झांडर त्यांच्या घराजवळील बागेत फिरायला जात. अलेक्झांडर स्वारीला बागेत फिरायला फारच आवडायचं. बागेत आल्यावर त्याचं सूक्ष्म निरीक्षण सुरू असायचं. गेल्या काही दिवसांपासून तेजोमयीच्या असं लक्षात आलं की, चक्कर मारताना एका कोपऱ्यातील बाकड्यावर बसलेले काका आले की, अलेक्झांडर हमखास तिथे थांबणार. त्यांना न्याहाळूनच पुढे जाणार. ही बाब तिने बाबांच्याही लक्षात आणून दिली. त्यांनाही आश्चर्य वाटलं.
अलेक्झांडर आपल्यासमोर आला की थांबतो नि आपल्याला न्याहाळतो, हे काही काकांना आवडलं नसावं. तसं त्यांनी बाबांना बोलून दाखवलं. बाबा अलेक्झांडरला रागावले. बिचाऱ्याने तोंड लहान केलं. घरी आल्यावर अलेक्झांडरचा पडलेला चेहरा बघून बागेत काहीतरी घडल्याचं आईने ताडलं.
“काय रे ठोंब्या, काय झालं?” अलेक्झांडरला जवळ घेत आई म्हणाली. त्याने कान खाली पाडून तोंड आणखी बारीक केलं.
“काय गं, काय झालं याला?” आईने तेजोमयीस विचारलं.
“काही झालं नाही. तुझा लाडका उगाच आगावूपणा करत होता.”
“म्हणजे काय करत होता?” अलेक्झा गोर्जीने विचारलं. तेव्हा तेजोमयीला सविस्तर सगळं सांगावं लागलं.
“बागेतले काका दिसल्यावर हा तिथे थांबून त्यांना न्याहाळतो, यात त्याला रागावण्यासारखं काय हो?” गोर्जीनं विचारलं.
“अगदी बरोबर.” आई म्हणाली.
“तो त्यांच्यावर भुंकला का?” गोर्जीनं विचारलं.
“नाही, तो फक्त त्यांना न्याहळत होता.” तेजोमयी म्हणाली.
“याचा अर्थ त्याला काहीतरी खटकत असलं पाहिजे.”
“काय खटकत असलं पाहिजे? आगावूपणा नुसता.” बाबांनी आवाज चढवला. अलेक्झांडरने आईच्या कुशीत आक्रसून घेतलं.
“ते काका काय करतात, एका ठिकाणी बसून?” गोर्जीने विचारलं. ते काही बाबा आणि तेजोमयीला सांगता आलं नाही. इतक्या बारकाईने काही त्यांनी बघितलं नव्हतं.
“ओके. तर मी उद्या येते तुमच्यासोबत. बघू बरं अलेक्झांडर काय न्याहळतो ते.” गोर्जी म्हणाली.
दुसऱ्या दिवशी गोर्जीही तेजोमयी, बाबा आणि अलेक्झांडरसोबत बागेत फिरायला आली. नेहमीच्या बाकड्यावर बसलेले काका दिसताच अलेक्झांडर पुन्हा थांबला नि त्यांना न्याहाळू लागला. गोर्जीचं लक्ष काकांच्या हातातील मोबाईलकडे गेलं. गाणं सुरू होते नि काका तेच गाणं म्हणत होते. बाबांनी ओढतच अलेक्झांडरला पुढे नेलं. दुसऱ्या फेरीच्या वेळेला काकांचा बाकडा येताच अलेक्झांडर थांबला नि त्यांना न्याहाळू लागला. काका गाणं म्हणण्यात तल्लीन झाले होते. गोर्जीने पुन्हा याची नोंद केली. तल्लीन झालेल्या काकांचं लक्ष अचानक अलेक्झांडरकडे गेलं. ते गाता गाता थांबले नि अलेक्झांडरवर ओरडले. बाबांनाही काहीबाही बोलले. तेवढ्यात गोर्जीने डोळ्यातील स्कॅनरने अलेक्झांडरचा मेंदू स्कॅन केला. तेव्हा तिच्या सारं काही लक्षात आलं.
बाबांना अद्वातद्वा बोलणाऱ्या काकांना थांबवत तिने त्यांना थेट प्रश्न केला,
“ही बाग कशासाठी आहे काका?”
“कशासाठी म्हणजे?” काका रागावून म्हणाले.
“म्हणजे असं की, फिरण्यासाठी? खेळण्यासाठी? व्यायाम करण्यासाठी? की गाणं म्हणण्यासाठी?”
“तुला काय करायचं?” काका ओरडले.
“अहो ओरडू नका. हाच प्रश्न या मुक्या अलेक्झांडरलाही पडला.”
“आँ!” बाबांनी आश्चर्य व्यक्त केलं.
“होय बाबा. हे काका या बागेत फिरायचं सोडून गाणं कां ऐकताहेत? नि म्हणताहेत? हा प्रश्न त्याला प्रत्येक वेळी, काकांच्या समोर आला की पडायचा. म्हणून थांबून न्याहाळायचा.”
“तुमच्या कुत्र्याला हा आगावूपणा करायला सांगितला कुणी?” काका गुस्स्यात म्हणाले.
“कुत्रा नाही, तो अलेक्झांडर आहे. माझा भाऊ.” तेजोमयी म्हणाली.
“माझा लेक!” बाबांनी आता आवाज चढवला.
“मला तसं म्हणायचं नव्हतं. मला जे काही करायचं ते करू द्या, तुमचं तुम्ही बघा ना.” काकांनी नरमाईचा सूर लावला.
“अहो काका, आमचं आम्ही बघू हो. पण अलेक्झांडरच्या मनात आलंय ते चुकीचं कसं? अहो, तुम्ही तुमच्या घरी गाणं ऐकू शकता नि गाऊ शकता. बागेत यायचं ते चार-पाच फेऱ्या मारण्यासाठी ना. त्यामुळे तुमची तब्येत चांगली राहील. बागेत तुम्ही तेच करत असाल असं तुमच्या घरच्यांनाही वाटत असणार ना.” गोर्जी काकांच्या डोळ्यात बघत म्हणाली.
“नाही म्हणजे हो. मी फिरायला जातो म्हणूनच इथे येतो.” काका चाचरत म्हणाले.
“याचा अर्थ तुम्ही घरच्यांना फसवता?” तेजोमयी बोलून गेली. हा खडा बरोबर लागला. काकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी अलेक्झांडरला जवळ घेतलं.
“उद्यापासून बागेत फक्त फिरणार राजा, गाणं नाही म्हणणार. आता यापुढे घरच्यांशी नाही खोटं बोलणार.” ते जड स्वराने म्हणाले. बाबांनी त्यांची पाठ थोपटली. अलेक्झांडरला सॉरी म्हटलं.
—