उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये एके दिवशी तेजोमयीच्या घरी तिच्या मैत्रिणी कल्याणी, वैष्णवी, गौरी, माधुरी गोळा झाल्या. गप्पाटप्पांमध्ये त्या रंगून गेल्या. या गप्पा ऐकताना अलेक्सा गोर्जीलाही मजा येऊ लागली. अलेक्झांडर स्वारींना तर काय, अशा गप्पा म्हणजे मेजवाणीच. स्वारी मस्त पसरुन नि कान टवकारुन आळीपाळीने एकीकडे बघून वा, मस्त, छान, झक्कास अशा प्रतिक्रिया त्याच्या पध्दतीने देऊ लागला. दोनतीन तासानंतर तेजोमयीच्या मैत्रिणी जायला निघाल्या, तेव्हा गोर्जी तेजोमयीच्या कानात काहीतरी पुटपुटली. गोर्जीने तिला एक आयडिया दिली होती. गोर्जीने काय सांगितलय हे सगळयाजणिनीं उत्सुकतेनं विचारलं तेव्हा तेजामयीने कल्याणीच्या कानात ते टाकलं. कल्याणीने वैष्णवीस नि तिने माधुरीस सांगितलं. ही अशी कानोकानी बघून अलेक्झांडरने आपला कान गोर्जीपुढे केला. गोर्जीला हसू आलं. याचा अलेक्झांडर स्वारीला राग येऊ शकतो हे लक्षात येताच ती लगेच त्याच्या कानात पुटपुटली. स्वारी खुष होऊन शेपूट हलवू लागली.
“मग मॅडम, कशी काय वाटली आयडिया?” गोर्जीने तेजोमयीला विचारलं.
“झक्कास, तुला कशी काय सुचली ही आयडिया?”
“तुमच्यासाठी विचार करत होते, तेव्हा हा खेळ सुचला.”गोर्जी म्हणाली.
०००
गोर्जीने तेजोमयीच्या कानात जे सांगितलं, त्यात एक शोध दडलेला होता. हा शोध प्रत्येकाने आपल्या घरीच घ्यायचा होता. दुसऱ्या दिवशी तेजोमयी आणि तिच्या मैत्रिणींनी स्वत:च्या घरी शोधमोहीम सुरु केली. प्रत्येकीच्या आईबाबांना आश्चर्य वाटलं. काय शोधता? असं विचारलं असता, आधी मुलींनी सांगण्यास टाळाटाळ केली. पण जास्तच आग्रह धरला गेला, डोळे वटारले गेले, लाड केले गेले, तेव्हा मुलींनी आईबाबांच्या कानात हळूच सांगितलं. सर्वच पालकांनी आँ फासला. हे काय भलतच, अशी प्रतिक्रिया उमटली.
सगळ्या पालकांनी एकमेकांशी संपर्क साधून कानोकानीचं रहस्य समजून घेतलं. सगळ्यांच्या घरी एकसारखी शोधमोहीम सुरु असल्याचं त्यांना कळलं. हे जरी भलतंसलतं असलं तरी, मुलीचं वागणं मजेदार नि स्मार्ट असल्याचं, पालकांनी एकमेकांना सांगून मुलींचं कौतुक केलं.
या शोधमोहिमेला मूर्त स्वरुप देण्यासाठी मुलींच्या कानोकानीच्या खेळात सामील होण्याचं त्यांनी ठरवलं. या खेळाच्या पुढच्या टप्प्यासाठी सुटिच्या दिवशी एक ट्रिप काढण्याचं पालकांनी ठरवलं तसं त्यांनी मुलींना सांगताच, प्रत्येकिनं आपआपल्या घरी दंगाच केला. मुलींचा आनंद बघून पालकांनांही मस्त वाटलं.
सुटिच्या दिवशी तेजोमयीच्या बाबांनी १० जण बसू शकतील अशी गाडी बूक केली. दुपारी सगळया मुली, त्यांचे बाबा आणि अर्थातच अलेक्झांडर स्वारी या गाडीत बसून ट्रिपला निघाले.
“जायचं कुठं?” हे जेव्हा तेजोमयीनं बाबांना विचारलं. तेव्हा ते तिच्या कानात पुटपुटले. तिचे डोळे विस्फारले. सगळया मुलींच्या बाबांनी हेच केलं. सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या कानात कुणीच सांगत नाही हे बघून अलेक्झांडर स्वारीने नाराजी व्यक्त केली. तेव्हा बाबा त्याच्या कानात पुटपुटले. अलेक्झांडरने आनंदाने त्यांना मिठी मारली.
थोड्या वेळाने गाडी एका पुस्तकाच्या दुकानाजवळ थांबली. सगळी मंडळी दुकानात शिरुन मुलांच्या विभागात गेली.
“तुमच्या कानोकानीचा शोध इथे संपतोय बर का?”तेजोमयीचे बाबा मुलींना म्हणाले. त्यांना आवडणाऱ्या दहा गोष्टीची पुस्तकं घेण्याची परवानगी त्यांच्या त्यांच्या बाबांनी मुलींना दिली. चांगले दोन तास घालवून मुलींना गोष्टिची पुस्तकं निवडली. बघता बघता चाळीस पुस्तक झाली. त्या पुस्तकांचा गंध घेऊन अलेक्झांडरने, ‘मस्त’ असा शेरा, उडी मारुन दिला. रस्त्यात पाणीपुरीवर ताव मारुन मंडळी घरी पोहचली. सगळेजण आधी तेजोमयीच्या सदनिकेत आले.
दारात पाऊल टाकताच, “शोध मोहीम सक्सेसफुल!”असं तेजोमयी गोर्जीच्या कानात पुटपुटली.
“मग बाबा, कसा वाटला हा कानोकानी खेळ?”
“म्हणजे तुला हे ठाऊक होतं म्हणायच?”बाबांनी विचारलं.
“अहो काका,गोर्जीच आहे या कानोकानी खेळाची जनक!”
“अगं बाई, तुझ अशा आगावूपणामुळे आमची भंबेरी उडतेना.”वैष्णवीचे बाबा हसून म्हणाले.
“अहो काका, मी फक्त त्यांना शोध मोहिमेची आयडिया दिली. ुतूनच हा खेळ रंगला की नाही?”
“मस्तच रंगला!”माधुरीने प्रतिक्रिया दिली.
“बघा सगळ्या मुलींना किती आनंद झालाय. शोध मोहिमेत एकदोनच मुलांची पुस्तक घरी असल्याचं दिसलं नि आता प्रत्येकाच्या घरी नवी कोरी दहा पुस्तकं आली.”गोर्जीने लक्षात आणून दिलं.
“यालाच तर शोधा म्हणजे सापडेल, असं तर म्हणत नसावं ना?” तेजोमयी डोळे मिचकावत म्हणाली.
सगळ्यांनाच हा कानोकानी खेळ जाम आवडला. गोर्जीने आगावूपणा केला नसून तिने आपले डोळेच उघडले असं तेजोमयीच्या बाबांनी वैष्णवीच्या बाबांच्या लक्षात आणून दिलं.
सुरेश वांदिले