तेजोमयीने आज पुन्हा कंटाळ्याचं रडगाणं अलेक्सा गोर्जीसमोर गायलं. गोर्जीने तेजोमयीचा मेंदू स्कॅन केला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आता, तेजोमयीला काहीतरी भन्नाट खेळायला हवं. ते तिला मिळत नसल्यानं ती कंटाळीय.
हिचा कंटाळा कसा घालवायचा? याचा विचार गोर्जी करु लागली. विचार करता करता तिच्या डोळ्यासमोर कावकाव कावळे आले.
‘बयोचा कंटाळा, घालवणार कावळा’, ती पुटपुटली. तेजोमयीच्या कानावर फक्त कावळा शब्द पडला.
“गोर्जी मॅडम, आता या क्षणी तुम्हाला कावळा कां बरे आठवला?”
“म्हंटलं, तुझ्या कंटाळा घालवायला कावळ्यास बोलावलं तर कसं राहील?”
“काळुंद्रा कावळा माझा कंटाळा घालवणार म्हणजे गाढवानं गाण म्हणण्यासारखचं. हा हा हा!”
“वा वा वा! तुला कोण हवा गाढवराव की कावळोबा?”
“गोर्जे, तुला कावळा फोबिया तर नाही ना झालाय, की तुला कावळ्याने सुपारी दिलीय ”
“बरोब्बर!”
“आँ!”
“हाँ! त्याचा निरोप आहे, तेजोमयी बाईसाहेबांना सांगा की, आम्ही कावळे फक्त काळेच नसतो?”
“नसतो म्हणजे? हा रंगिबेरंगी असतो का? थापा नको मारु नकोस.”
“थापा कशाला? जर कावळोबा म्हणतोय तर मग त्यांचं म्हणणं खरं की खोटं, याचा शोध घेतला तर… किंवा असं समज याच शोधाचा खेळ खेळला तर..”
‘कावळ्याचा खेळ’ ही आयडिया तेजोमयीस भारी वाटली. गोर्जी कधीकधी मॅड सारखी वागत असली तरी तिला सुचतं भन्नाट, त्यातून निघते स्मार्ट खेळाची वाट, हे तेजोमयीस ठाऊक होतं. त्यामुळे ती ‘कावळ्याचा खेळ’ खेळण्यासाठी क्षणात तयार झाली. चार मैत्रिणींना लॅपटॉप घेऊन बोलावशील तरच आपण हा खेळ तुला सांगू, अशी अट गोर्जीने टाकली. ही अट मान्य करत तेजोमयीने सोसायटीतल्या सुनिती, प्रनिती, मनाली आणि प्रणाली या मैत्रिणींना लॅपटॉपसह बोलावून घेतलं. त्यानांही ‘कावळ्याच्या खेळाची आयडीया आवडली.
मग, गोर्जीने खेळ समजावून सांगितला. प्रत्येकीने एका खंडातील कावळ्याची चित्रं गुगल सरांच्या मदतीने शोधायची. त्या चित्रांचं फोल्डर करायचं. प्रत्येक फोल्डरला त्या खंडाचं नाव द्यायचं. चौघींचे चार खंड आणि उरलेल्या दोन खंडांची जबाबदारी गोर्जीने स्वत: स्वीकारली.
खेळ सुरु झाला. तेजोमयी आणि मैत्रीणीसाठी पिज्जा नि आईसक्रीम मागवण्याची परवानगी गोर्जीने आईला व्हॉटसॲप संदेश पाठवून घेतली. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या साहाय्याने गोर्जी आईच्या मोबाइलशी संपर्क साधू शकत असे. आईची परवानगी येताच गोर्जीने ‘स्वीगी’ला सांगून दोन तासात आईसक्रीम आणि पिज्जा येईल अशी व्यवस्था केली.
तेजोमयी आणि तिच्या मैत्रिणींनी ‘कावळ्यांचा खेळ’ सुरु केला. प्रत्येक खंडात कोणते कावळे सापडतात, याची चित्रं आणि त्यांची थोडक्यात माहिती त्यांनी आपआपल्या फोल्डरमध्ये गोळा केली. गोर्जीनेही ही माहिती गोळा केली.
दोन तासांनंतर जेव्हा प्रत्येकीने हे फोल्डर बघितले तेव्हा, अरे बापरे, ओह माय गॉड, फंटास्टिक, क्या बात है, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. त्याचं कारण होतं, आपल्याकडील कावळा काळा असला तरी जगात अनेक ठिकाणचा कावळा वेगवेगळ्या रंगांचा, आकाराचा असल्याचं या खेळातून दिसून आलं. गडद निळं शरीर नि लाल चोच असणारा ब्ल्यू मॅगपाय कावळा प्रणालीला श्रीलंकेत दिसला. हिरव्या रंगाचा ग्रीन मॅगपाय कावळा मनालीला व्हिएतनाममध्ये आढळला. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात काळ्या-पांढऱ्या रंगाचा नि पिवळी चोच असलेल्या येलो बिल्ड मॅगपाय बघताच तेजोमयी हरखून गेली. इंडोनेशियात तपकिरी गुलाबी छटा असणारा नि काळेपंख असणारा बोरिनियन ट्रेपाय कावळा सुनितीच्या नजरेस पडला.
“हे खरं की भूताटकी!” प्रणितीने शंका व्यक्त केली.
“तुम्ही खऱ्या कावळ्यांची चित्रं आणि माहिती मिळवलीय. मग यात कुठून आली भुताटकी.”
“परग्रहावरुन आले असतील का हे कावळे?” सुनितीने शंका व्यक्त केली.
“ते आपल्याच ग्रहावरचे. आपल्या माहीत नव्हते इतकचं.”
“म्हणजे कावळा म्हणाला ते खरं की काय?”
“काय म्हणाला नि कधी?” प्रणालीने विचारलं.
“तो म्हणाला, मी काही केवळ काळाच नाही म्हणून.”
“वा व!”
“टा व!”
“पण तरी माझा विश्वास बसत नाही.”
“तुमचा विश्वास बसत नसल्यास तुम्ही या सुटिच्या दिवशी बाबांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात जा. तिथे प्राणी विभागात असे असंख्य प्रकाराचे कावळे तुम्हाला बघायला मिळतील.” गोर्जीने सांगितलं.
‘कावळ्याचा खेळ’ असा वस्तुसंग्रहालयापर्यंत पोहचेल याची कल्पना तेजोमयी आणि तिच्या मैत्रिणींनी केली नव्हती. तेजोमयीचा कंटाळा कुठल्या कुठे पळाला. मैत्रिणी घरी जायला निघाल्या, तोच दारात पिज्जा आणि आईसक्रीमचं पार्सल आलं. सगळ्यांनी त्यावर ताव मारत कावळ्याचा जयजयकार केला.
सुरेश वांदिले