(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कौशल्याची कला!

 महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात (RT-MSSU) पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्रे असे कौशल्य निर्मितीचे विविध अभ्यासक्रम करता येतात. पारंपरिक विद्यापीठातील अभ्यासक्रमांपेक्षा या अभ्यासक्रमांची संरचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आली असून प्रात्यक्षिकांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार टप्प्याटप्प्याने या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याची सुविधाही आहे. त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी प्रदान केली जाते. या टप्प्यांमध्ये निर्धारित करण्यात आलेले कौशल्य विद्यार्थी प्राप्त करतो. हे कौशल्य त्याला रोजगार-स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरते.

 कौशल्य विकास या संस्थेच्या स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्किल्सने मॅकडोनाल्ड या बहुराष्ट्रीय फूड चेन (अन्नसाखळी) कंपनीच्या सहकार्याने आतिथ्यसेवा क्षेत्रातील पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

 **(१) बॅचलर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) इन रेस्टॉरंट मॅनेजमेंट** – नेतृत्व कौशल्य, वेगळा विचार करण्याचे कौशल्य, रेस्टॉरंटच्या अनुषंगाने मनोरंजनाच्या बाबी, पाककलेचे विविध पैलू, कॅटरिंग (खाद्यपेय व्यवस्था), विपणन, ग्राहकाची वर्तणूक, विक्री, व्यवस्थापन आदी बाबींचे ज्ञान या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रदान केले जाते. कालावधी चार वर्षे. हा अभ्यासक्रम ठाणे आणि लोणावळा कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर एनएसक्यूएफ लेव्हल (नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क – राष्ट्रीय कौशल्य गुणवत्ता रचना – स्तर) चार प्राप्त होते. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांनंतर पदविका, तीन वर्षांनंतर बॅचलर ऑफ व्होकेशन आणि चार वर्षांनंतर बीबीए पदवी मिळू शकते.

 या अभ्यासक्रमात पुढील कौशल्ये प्रदान केली जातात – 

(१) अन्न आणि खाद्यपेय सेवा व्यवस्थापन, 

(२) रेस्टॉरंट कार्यान्वयन आणि व्यवस्थापन, 

(३) ग्राहकसेवा आणि अतिथी समाधान, 

(४) मालसाठा/सूची नियंत्रण आणि व्यवस्थापन, 

(५) खर्च व्यवस्थापन आणि अंदाजपत्रक, 

(६) रेस्टॉरंटचे विपणन व प्रचार आणि प्रसिद्धीसाठी व्यूहरचना, 

(७) कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण, देखरेख, 

(८) गुणवत्ता नियंत्रण आणि अन्नसुरक्षा नियमांकांचे पालन, 

(९) विक्री आणि महसूल व्यवस्थापन, 

(१०) पाककलेतील प्रवाह आणि नावीन्यता, 

(११) रेस्टॉरंट उभारताना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक, 

(१२) प्रभावी संवाद आणि आंतरसमूह संवाद कौशल्य.

 **अर्हता** – कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण; खुला संवर्ग ४० टक्के, राखीव संवर्ग ३५ टक्के. १२ वी मध्ये इंग्रजीचा अभ्यास केलेला असावा **किंवा** दहावीनंतर ३ वर्षे कालावधीची पदविका **किंवा** १ वर्ष कालावधीचा आयटीआय अभ्यासक्रम आणि औद्योगिक क्षेत्रात १ वर्षाची पूर्ण केलेली व प्रमाणित केलेली अप्रेंटिसशिप **किंवा** दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम आणि बारावी समकक्ष प्रमाणपत्र.

 **(२) रेस्टॉरंट ऑपरेशन** – हा तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम आहे. उपहारगृहाचे संचलन आणि संनियंत्रण करण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमात सैद्धांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अन्नपदार्थांची निर्मिती, ग्राहक सेवा, मालसाठा/सूचीवर नियंत्रण, नेतृत्व कौशल्य या बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राला संबंधित उद्योगामार्फत मान्यता दिली जाते. त्यामुळे संबंधित उमेदवाराला रोजगाराच्या संधी सुलभतेने मिळू शकतात. 

हे अभ्यासक्रम या विद्यापीठाचे विद्याविहार कॅम्पस (मुंबई), पुणे आणि नागपूर येथे करता येतात.

 **(३) बॅचलर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन** 

या विषयातील प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम झुडिओ संस्थेच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहेत. रिटेल, बीएफएसआय (बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स), विपणन, कार्यान्वयन, रिटेल आस्थापना, कॉर्पोरेट पर्यावरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन आदी विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते.

 हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील कौशल्ये प्रदान केली जातात – 

(१) एक्सेल, 

(२) नेटवर्किंग (संपर्क साखळी), 

(३) वेगळा विचार करण्याचे कौशल्य, 

(४) समस्यांचे निर्धारण, 

(५) टॅली, 

(६) वित्तीय साक्षरता, 

(७) इंग्रजी संवाद कौशल्य, 

(८) परदेशी भाषा, 

(९) ग्राहक सेवा, 

(१०) वेळेचे व्यवस्थापन, 

(११) तणाव व्यवस्थापन, 

(१२) वित्तीय विश्लेषण, 

(१३) विक्री आणि विपणन. 

 अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे. हा अभ्यासक्रम पुणे, नागपूर आणि ठाणे कॅम्पसमध्ये करता येतो.

 **(४) रिटेल स्टोअर ऑपरेशन प्रमाणपत्र** – अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने. रिटेल उद्योग/व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. रिटेल क्षेत्रातील रोजगारासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि ज्ञान या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रदान केले जाते. विशेषतः रिटेल विक्री कार्यान्वयन आणि ग्राहक सेवेवर अधिक भर दिला जातो. प्रत्यक्ष कामावरचे प्रशिक्षण हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या उद्योग/व्यवसायातील सर्व बारकावे विद्यार्थ्यांना अभ्यासणे शक्य होते. हा अभ्यासक्रम ठाणे, पुणे आणि नागपूर येथील कॅम्पसमध्ये करता येतो.

 **(५) बीबीए इन फॅसिलिटी मॅनेजमेंट** – या विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी मार्फत सेवासुविधा क्षेत्रासाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित केले जाते. स्वच्छ भारत मिशनमार्फत देशाला अधिक आरोग्यदायी केले जात आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन ही प्रबोधिनी कार्यरत आहे. महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या सहकार्याने सेवासुविधा क्षेत्रातील वेगवेगळे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी या अभ्यासक्रमातून मिळणारे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. या क्षेत्रातील उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कामाच्या प्रशिक्षणावर भर दिला जातो. हा अभ्यासक्रम बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. एक महिन्याच्या कालावधीचे फॅसिलिटी सुपरवायझर आणि सिक्युरिटी सुपरवायझर हे अभ्यासक्रमही करता येतात.

 **(६) पदव्युत्तर पदवी एमबीए अभ्यासक्रम** – केपीएमजी, प्रायमस पार्टनर्स, आदित्य बिर्ला ग्रुप, टाटा-ट्रेंट लिमिटेड, एमएसआयएनएस, आय-स्पार्क फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्याने सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत 

(१) बिझिनेस अॅनालिटिक्स, 

(२) फायनान्शियल मॅनेजमेंट, 

(३) न्यू एज मार्केटिंग, 

(४) इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट 

या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर व्यवस्थापकीय स्तरावरील करिअर सुरु व्हावे, या अनुषंगाने या अभ्यासक्रमातील विषयघटकांच्या माध्यमातून कौशल्य प्रदान केले जाते. या अभ्यासक्रमाच्या कालावधीत 

(१) डिझाइन थिंकिंग, 

(२) डिजिटल टूल्स अँड टेक्निक्स, 

(३) गुगल अॅड्स, 

(४) गुगल अॅनालिटिक्स, 

(५) हबस्पॉट, 

(६) पायथन, 

(७) आर-प्रोग्रामिंग 

ही प्रमाणपत्रे प्रदान केली जातात. इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग आणि कंटेंट मार्केटिंगचे ज्ञान प्रदान केले जाते. ९ महिन्यांचे प्रत्यक्ष कामावरचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. बिझिनेस अॅनालिटिक्स अभ्यासक्रमाचे बहुतांश विद्यार्थी कंसल्टिंग कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. एमबीए अभ्यासक्रम नवी मुंबई आणि नागपूर कॅम्पसमध्ये करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी एनएसक्यूएफ स्तर-६ प्राप्त करतात. ज्या विद्यार्थ्यांना एक वर्षानंतर अभ्यासक्रमातून बाहेर पडायचे असेल, त्यांना पदव्युत्तर पदविका प्रदान केली जाते.

 **अर्हता** – या अभ्यासक्रमाला कोणत्याही विषयातील पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील कौशल्ये प्राप्त होतात – 

(१) प्रगत संवाद कौशल्य आणि वाटाघाटी कौशल्य, 

(२) विश्लेषणात्मक कौशल्य, 

(३) डिजिटल मार्केटिंग, 

(४) डिझाइन थिंकिंग, 

(५) नवीन व्यवसाय उभारणी, 

(६) डेटा (माहिती साठा) खोदकाम साधने आणि तंत्र, 

(७) डिजिटल विपणन (मार्केटिंग) साधने आणि तंत्र, 

(८) व्यवसाय कुशाग्रता. 

 प्रवेशासाठी सीयूईटी पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षेतील गुणांचा प्रारंभिक चाळणीसाठी वापर केला जातो. मुलाखतीनंतर अंतिम निवड केली जाते. अर्ज ऑनलाइन करावा लागतो.

 **संपर्क** – 

(१) महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, एलफिन्स्टन टेक्निकल स्कूल, मेट्रो चौक, महापालिका मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४००००१, संकेतस्थळ – https://mssu.ac.in 

(२) संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, शासकीय आयटीआय – कोपरी स्टेशन रोड, साधू वासवानी नगर, कोपरी, ठाणे – ४००६०३ 

(३) आयटीआय, नांगरगाव, लोणावळा, कुसगाव बुद्रुक – ४१०४०१ 

(४) महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, पुणे विद्यापीठ परिसर, पिंपळे गौरव स्मार्ट सेंटर इमारत, राजमाता जिजाऊ उद्यानाच्या विरुद्ध दिशेला, पिंपळे गौरव रोड, काशिद नगर, पिंपरी चिंचवड – ४११०६१ 

(५) जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन, दुसरा मजला, नागपूर – ४४००२५