खरा आनंद
दिवाळी अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने तेजोमयीच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. घराची स्वच्छता जोरात सुरू होती. घर आणखी सुंदर दिसण्यासाठी काय काय करता येईल, याच्या नव्या नव्या कल्पना अलेक्सा-गोर्जी तेजोमयीला देत होती. आई दिवाळीचा खमंग फराळ करण्यात मग्न होती. बाबांनी यंदा दिवाळीचा कंदील घरीच बनवण्याचं ठरवून त्याची तयारी सुरू केली होती. अलेक्झांडर स्वारी इकडेतिकडे लुडबूड नि खुडबूड करून त्याचा सहभाग दर्शवत होती.
दुपारी सगळेजण जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसले असताना, तेजोमयी एकाएकी गंभीर झाली. आईने ते बरोबर हेरलं.
“काय झालं?”
“कुठे काय झालं? काहीच नाही.” तेजोमयी खाली मान घालून म्हणाली.
“तुझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय. त्यामुळे तू अस्वस्थ झालीस.” गोर्जीने तेजोमयीच्या डोक्यावरून हात फिरवत अलेक्झांडरकडे बघितलं. त्याने होकारार्थी मान हलवली नि तो तेजोमयीच्या पायाभोवती घुटमळू लागला.
“तेजो, असं एकाएकी अस्वस्थ व्हायला काय झालं?” बाबांनी विचारलं.
“बाबा, काल मी बागेत फिरायला गेले असताना माझं लक्ष चौकीदार काकांकडे गेलं.”
“बरं मग?”
“नेहमीसारखे ते प्रसन्न दिसले नाहीत. त्यांचे डोळे खोल गेल्यासारखे वाटले. त्यांना खोकलाही येत होता. नेहमी सगळ्या बागेत इकडून तिकडे उत्साहाने फिरणारे ते काल एकाच ठिकाणी बसून होते. ‘बरं नाही का?’ असं विचारलं तर त्यांना हुंदकाच आला.”
“अरे बापरे, काय झालं?”
“मी विचारलं त्यांना. त्यांची मुलगी कोमलला संगीत शिकायचंय. पण फी देण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत. त्यामुळे कोमलला संगीताच्या वर्गात जाता येत नाही. ती खूप निराश झालीय. त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवरही झाला. याची फार खंत चौकीदार काकांना वाटतेय. त्यांचं कशातच लक्ष लागत नाहीये.”
“अगं, पण आपण काय करू शकतो?”
“हं,” तिने दीर्घ श्वास घेतला. तिचा स्वर दु:खी होता.
आतापर्यंत सगळं संभाषण काळजीपूर्वक ऐकणारी गोर्जी तत्काळ म्हणाली,
“तुम्ही चौकीदार काकांना दिवाळीची भेट देऊ शकता.”
“म्हणजे?” आईने चमकून विचारलं. बाबा आणि तेजोमयीच्या चेहऱ्यावर तसाच भाव उमटला.
“अहो आई, तुम्ही सगळेजण दिवाळीचे कपडे घेणार आहात की नाही?”
“अगं, ते आम्ही दरवर्षीच घेतो.”
“दिवाळीत घेता, एखादा सेल आला की घेता, वाढदिवसाला घेता! असे कपडे घेऊन घेऊन तुमच्या तिघांचेही खूप कपडे जमा झाले आहेत. त्यातील कित्येक तर नवीनच आहेत.”
“तुला म्हणायचं तरी काय?”
“अहो बाबा, यंदा नवीन कपड्यांवर आणि फटाक्यांवर थोडा कमी खर्च केला तर? त्यातून वाचलेले पैसे आणि आपण थोडी अधिक रक्कम एकत्र केली, तर कोमलच्या संगीताच्या वर्गाची फी भरता येईल. मग तिची आणि काकांची दिवाळीही आनंदात जाईल! त्यांना ही दिवाळीची भेट द्या. दुसऱ्याला मनापासून दिलेला आनंदच खरा आनंद असल्याचे आपले तुकाराम महाराज सांगून गेलेत ना?”
हे ऐकताच तेजोमयीची कळी खुलली. हात धुवून तिने आपली पिगी बँक आणली. त्यातली जमा रक्कम फीसाठी वापरता येईल, असं तिने सांगून टाकलं. ही रक्कम तिने नवीन खेळणं घेण्यासाठी साठवली होती.
“अगं, मग तुझं खेळणं?” आईने विचारलं.
“ते खेळणं नंतरही घेता येईल. आधी आपण कोमलला गाणं शिकायला मदत करू या!”
आई आणि बाबांना तेजोमयीचं कौतुक वाटलं. त्यांचा उर अभिमानाने भरून आला. बाबांनी काकांच्या मुलीला मदत करण्याची तयारी दर्शवली.
गोर्जीला आनंद झाला. तिने लगेच आपला एक हात पुढे केला. तेजोमयी आणि बाबांनी तिच्या हातावर हात ठेवला. अलेक्झांडर स्वारीनेही उभे राहून आपला पंजा सर्वांच्या हातावर टेकवला.
दुसऱ्या दिवशी तेजोमयी आणि बाबा चौकीदार काकांच्या घरी गेले. त्यांनी काकांच्या हातात कोमलच्या संगीत शाळेची फी सोपवली. काकांच्या चेहऱ्यावर हसू आले. कोमलचे डोळे पाणावले. तिने बाबांच्या पायावर डोके ठेवले.
गोर्जीने शोधून काढलेल्या परिसरातील सर्वात चांगल्या संगीत शाळेचा पत्ता तेजोमयीने कोमलला दिला.
“ही आमच्याकडून तुला दिवाळी भेट. पुढेही जमेल तेवढी मदत आम्ही करू. खूप मन लावून संगीत शिक, सराव कर आणि आपल्या संगीताच्या सुरांनी सर्वांना खूप आनंद दे!” बाबांनी कोमलला आशीर्वाद दिला.