(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

खोडकर बाप्पा!

तेजोमयीच्या घरी तिच्या मैत्रिणी बाप्पांच्या दर्शनाला आले असताना गप्पाटप्पा चांगल्याच रंगल्या. अलेक्झांडर स्वारीही या गप्पांमध्ये दंगला. अलेक्सा गोर्जी या सर्वांचं सूक्ष्म निरीक्षण करत होती.मध्येच ती म्हणाली,

“बाप्पांसोबत बोलायचं का?” सगळ्यांनी गोर्जीकडे आश्चर्यचकित होत बघितलं.

“हे तुझं आम्हाला उल्लू बनवणं तर नाहीना?” मानसीने डोळे वटारले.

“उल्लू कशाला बनवीन. वाटलंच उंदीर बनवीन. हाहाहा!” हसत गोर्जीने अलेक्झांडरकडे बघितलं. पठ्ठेरावांनी उडी मारून तिला पाठिंबा दर्शवला.

“हे बघा, गोर्जी म्हणतेय याचा अर्थ तिच्या डोक्यात काहीतरी असणारच. अलेक्झूने जसा पटकन विश्वास ठेवला तसा आपणही ठेवूया?” तेजोमयीसगने समजावलं.

“बरं बाबा, तुलाही अलेक्झूसारखंच वाटतंय तर काय आम्ही तयार आहोत की, बोलणारे बाप्पा बघायला.” सगळ्यांनी हाच सूर आवळला.

गोर्जीने लगेच बाप्पांची मूर्ती स्कॅन केली. तिचं त्रिमितीय डिजिटल मॉडेल तयार केलं. एआयच्या साहाय्याने आवाज आणि हालचाली निर्माण केल्या. बाप्पांच्या मूर्तीच्या डिजिटल प्रतिकृतीला होलोग्राफिक रूप देऊन सगळ्यांसमोर उभं केलं. मूर्तीच्या बाजूला हलतेडुलते बाप्पा बघून अलेक्झांडर आधी दचकलाच, पण लगेच समोरच्या पायांवर खाली वाकून त्याने बाप्पांना दंडवत घातला. मग सगळ्यांनी लगबगीने हाच कित्ता गिरवला.

“हाय तेजो, कसं काय चाललंय तुमचं? चंगळ आहे बुवा तुमची.” डिजिटल बाप्पा म्हणाले. हे बोलणारे बाप्पा बघून गोर्जीबद्दलचा सर्वांचा आदर वाढला. अलेक्झांडरसह सगळ्यांनी तिलाही दंडवत घातला.

“अरे, असं काही करू नका. दंडवताचा मान बाप्पांचा, माझा नाही. आता ते बोलताहेत म्हंटल्यावर करा की गप्पा त्यांच्यासोबत.” गोर्जी म्हणाली.

“बाप्पा, तुम्हाला मोदक का आवडतात हो इतके?” तेजोमयीने विचारलं.

“तुम्हाला पिझ्झा का आवडतो इतका? असंच विचारण्यासारखं झालंय की हे. पण खरं सांगू का, मला पालकाचं सूप यापेक्षा अधिक आवडतं.”

“काहीतरीच काय बाप्पा. हे तर आमच्या कानावरून कधीच गेलं नव्हतं.”

“मस्त विनोद आहे हा हं बाप्पा.”

“विनोद नाही काही. पालकात लोह, व्हिटॅमिन के, फोलेट, ल्युटेन ही खनिजं असतात. ही खनिजं आपल्या शरीराला स्ट्राँग करतात.” बाप्पांनी डोळे मिचकावले.

बाप्पा आपल्याला आता पालकपुराणात पुरते गुंतवतील असे वाटून तेजोमयीने गप्पांचा रोख तिसरीकडे वळण्यासाठी त्यांना विचारलं,

“बाप्पा तुम्ही बालपणी कसे होतात हो?”

“बघायचंय का माझं बालपण?” डिजिटल बाप्पांनी विचारलं. सर्वांनी एका सुरात हो म्हटलं. अलेक्झांडरने शेपूट हलवून मलासुद्धा बघायचं हे सांगितलं. मग डिजिटल बाप्पांनी होलोग्रॅामच्या रूपात आपलं बालपण दाखवायला सुरुवात केली.

हिमालयातील त्यांच्या घरी ते एकदा महादेवांच्या आजूबाजूला दुडूदुडू धावत होते. महादेव आणि पार्वतीमाता त्यांची बाललीला कौतुकाने बघत होते. असं खेळत असताना बाप्पांचं लक्ष महादेवांच्या मस्तकावर असलेल्या अर्धचंद्राकडे गेलं. त्यांना ते कमळाचं देठ वाटून ते महादेवांच्या मांडीवर उभे राहिले नि चंद्र पकडण्यासाठी हात उंचावू लागले. पण महादेवांच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नीमुळे त्यांचा डावा हात जरासा भाजला. त्यामुळे जटांमधील गंगेच्या पाण्यात हात टाकला तर महादेवांच्या गळ्यातील सापाने जोरात फुत्कार केला. त्यामुळे बाळ बाप्पा रडकुंडीस आले नि ते जोरजोरात रडू लागले. महादेव आणि पार्वती माता बाप्पांच्या फजितीवर हसू लागले. याचा बाप्पांना राग आला आणि ते पाय दणदण आपटत बाहेर निघून गेले नि समोर नंदी बघताच ते पुन्हा खेळण्यात रममाण झाले.

डिजिटल बाप्पांनी ही कथा इथे थांबवली.

“म्हणजे बाप्पा तुम्ही बालपणी बरेच खोडकर होतात म्हणायचं?” तेजोमयीने विचारलं.

“अगं, बालपणी तसंच राहायला हवंना. बालपणीच्या खोड्या नव्यानव्या उत्सुकतेपोटी असतात. तेव्हा आपलं मन निर्मळ असतं. भीती हा शब्दच ठाऊक नसतो आपल्याला. या खोड्यांमधून नकळतपणे काय चांगलं, काय वाईट हे कळतं. त्यातून आपला स्मार्टनेस हळूहळू वाढत जातो.”

“हं, पण आमच्या आईबाबांना कुठे हे माहीत?” कल्याणी उसासा टाकत म्हणाली.

“खोड्या करायच्या वर्षात ते आम्हाला मोबाईलमध्ये गुंगवतात नि उड्या मारायच्या वर्षात केजीत टाकतात.” वैष्णवीने कैफियत मांडली.

“आणि मग पुढे या क्लासमधून त्या क्लासमध्ये पळवत राहतात.” तेजोमयी म्हणाली.

“तूच आता यांना जरा समजव की रे बाप्पा.” मानसीने बाप्पांसमोर हात जोडले. तेवढ्यात या मुलींच्या शास्त्रीय संगीताच्या क्लासची वेळ झाल्याची सूचना गोर्जीच्या अल्गॉरिदमने दिली. तिने झटदिशी डिजिटल बाप्पाचा होलोग्राम अवतार संपुष्टात आणला. सगळ्यांना क्लासची आठवण करून दिली.

मूर्तीतले बाप्पा गालातल्या गालात हसत असल्याचा भास सगळ्यांना झाला.