(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गणितरावांशी मैत्री!

तेजोमयी आज चांगलीच अस्वस्थ असल्याचं अलेक्सा गोर्जीच्या लगेच लक्षात आलं. तिच्यासमोर अभ्यासाचं पुस्तक होतं. पण तिचं लक्षं दुसरीकडेच होतं. सारखी तिची चुळबुळ सुरु होती. एकदोनदा तर तिने पुस्तक बंद केलं. पुन्हा उघडलं नि पुन्हा बंद केलं. तिसऱ्यांदा उघडलं तेव्हा ते तिने काहीवेळ उलटच पकडलं. ‍तिच्या अवतीभवती असणाऱ्या गोर्जीने तिला हलवलं तेव्हा कुठे ती भानावर आली.

“बाईसाहेब लक्ष कुठाय तुमचं? पुस्तक उलटं पकडलय तुम्ही. हे तर उलट्या गंगेसारखं झालय.” गोर्जी हसत म्हणाली. तेजोमयीने लगबगीनं पुस्तक सरळ केलं.

“बाईसाहेब, एव्हढ्या कसल्या विचारात आहात तुम्ही?”

“गोर्जे, अगं भीती वाटायला लागलीय.”

“कशाची गं? अवतीभवतीतर नागोबा नाहीय, राक्षस नाहीय, चेटकीण नाहीय आणि माझ्यात भीती वाटण्यासारखं काही नाहीय.” गोर्जी मिस्किलपणे म्हणाली.

“गोर्जे, यापैकी कुणाचीही मला भीती वाटत नाहीय, हे तुला चांगलच ठाऊकाय.”

“मग नेत्यानाहू काकांची भीती वाटते का?”

“अगं, त्यांना काय भ्यायचय?”

“हे नाही, ते नाही मग भीतीतरी कुणाची वाटते? परीक्षेची का?”

“परीक्षेतील गणिताच्या पेपरची.”

“अगं तेजो, वर्षभर गणिताचा अभ्यास केल्यावर आता असं शेवटच्या क्षणी त्याला भिऊन कसं चालेल? त्यामुळे त्याचच फावेल ना.”

“हे बघ गोर्जे, उगाच शहाणपणा शिकवू नकोस. पेपर मला सोडवायचाय तुला नाही.”

“तुलाच सोडवायचाय ना, मग  गणिताला तुझ्या डोक्यावर बसू द्यायचं की तू त्याच्यावर स्वार व्हायचं?”

“गोर्जे, तो आधीच डोक्यावर बसलाय. डोक्यातून खाली मेंदूत थोडा झिरपला असता तर काय बिघडलं असतं त्याचं?”

“तेजो, पण तुला असं का वाटतं?”

“गणित दुष्ट आहेना. त्याला काही दयामाया नाही.”

“वारेवा, हे तर फारच झालं. गणिताने तुझ्यावर कां दयामाया करायची? तू काय त्याची बहीण आहेस की भाची की डोनाल्ड काकांच्या दोस्ताची मुलगी?”

“मी गणिताची कुणीही नसली तरी तू मात्र त्याची खास एजंट असल्यासारखीच माझ्याशी आता वागत आहेस. म्हणूनच मला धीर  द्यायचा सोडून गणिताच्या कौतुकात बुडालीस तू.”

“मी तुला कां धीर द्यायचा?”

“बघ बघ, मी म्हणाले ना तू त्या गणितरुपी शत्रूराष्ट्रासोबत संगनमत करणारी सूर्याजी पिसाळ आहेस म्हणून. आता तूच स्वत: कबूल केलंस.”

“बरं, तुला तसं वाटतं तर तसं. मी शत्रुराष्ट्राला मिळाल्याने कोणतं आभाळ कोसळणार तुझ्यावर?”

“हा गणित, परीक्षेतील माझी वाट बिकट करणार नाही का?”

“म्हणूनच तर तुला मी सल्ला दिलाय, परीक्षेतील तुझी वाट बिकट करण्याची क्षमता असणाऱ्या गणितावरच स्वार होना.”

“गोर्जे काय चाललय मघापासून तुझं सारखं स्वार हो, स्वार हो. गणित काय घोडा आहे की काय?”

“अगं, घोडाच समज नि हो स्वार त्यावर, म्हणजे तुला तुझ्या मनासारखं त्याला दौडवता येईल. त्याला फुरफुर नि कुरकुर करायला संधीच नाही मिळणार.”

“गोर्जे तू काय बोलतेस हे तुला तरी कळतय का?”

“मला कळलय पण तुला वळत नाहीयना. अगं तू वर्षभर गणिताचा मन लावून अभ्यास केला. सगळ्या संकल्पना समजून घेतल्या. बऱ्याच प्रश्नांचा सराव केला. कठीण भाग सरांकडून समजून घेतला. हे बरोबर की खोटं? ”

“बरोबरच आहे.”

“तुला जर गणिताची इतकी भीती वाटली असती तर तू मन लावून अभ्यास करु शकलीच नसतीना.”

“म्हणजे?”

“म्हणजे असं की तू वर्षभर चांगला अभ्यास केला असताना आता असं परीक्षेच्या दिवसात हातपाय गाळून कसं चालेल? ही बयो आपल्याला चांगलीच घाबरतेय असं हा गणितराव बरोब्बर ओळखेल आणि तुला खड्यात टाकेल. नेमक्या वेळी जे घाबरतात त्यांच्याकडून चुकाच चुका होतात. जे घाबरत नाहीत ते आत्मविश्वासाने गणितच काय कोणत्याही विषयाचा मस्तपैकी सामना करतात. मग चुकाही कमी होतात. समजलं.”

“खरंच की गोर्जे, घाबरुन आपणच आपली पंचाईत करुन घेत असल्याचं लक्षात आलं नाही बाई माझ्या.”

“हो ना. तेव्हा आजचा धडा काय?”

“गणिताला डोक्यावर बसू द्यायचं नाही तर त्यावर स्वार व्हायचं.” तेजोमयी म्हणाली.

“अगदी बरोबर आणि गणिताला जे घाबरत नाहीत त्यांच्याशी गणित झटदिशी मैत्री करतं, असा निरोप द्यायला सांगितलाय त्याने तुला..

गोर्जीने तिच्या रोबोटिक हातातून एक छोटासा लेझर प्रकाश सोडला, जो भिंतीवर एखाद्या धावणाऱ्या घोड्यासारखा दिसू लागला. गोर्जीने हसत हसत टाळीसाठी आपला उजवा हात तेजोमयीच्या समोर केला. तेजोमयीने आनंदाने त्यावर टाळी दिली!