(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

घरातला शाहिस्तेखान

विनय, प्रदीप श्रीकांत, स्मीता, सीमा, तोमश्वर, जयदेव, मिलिंद, तेजोयमी, कल्याणी, सार्थक ही  टोळी बरेच दिवसांनी मारुतीरायाच्या मंदिरात जमली. मारुतीरायाचं दर्शन झाल्यावर काहीवेळ मंदिरातील सिमेंटच्या बाकांवर बसून गप्पाटप्पा करण्याचा त्यांचा नेहमीचा शिरस्ता.

आजही दर्शनानंतर या बाकांवर बसून एकमेकांची खेचत, एकमेकांना टपल्या मारत, चिडवाचिडवी करत त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

त्या सुरु असताना मिलिंद म्हणाला,

अरे, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस.

 महाराज किती पराक्रमी होते रे..त्यांना अजिबात कुणाची भीती वाटायची नाही. श्रीकांत म्हणाला.

त्या शाहिस्तेखानाला तर काय शिताफिने त्यांनी हाकलून लावलं. केवळ चित्तथराथरक.. तेजोमयी म्हणाली..

पण काय रे हा शाहिस्तेखान खरोखरच होता का?..डोळे मिचकावित सार्थक म्हणाला..

कां बरं तुला शंका वाटते अशी..एक भारदस्त आवाज त्याठिकाणी घुमला. सर्वांनी तिकडे वळून बघितलं. बघतात तर काय साक्षात महाराज उभे..

त्यांना बघताच सर्वांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. महाराजांनीही सर्वांना शुभार्शीवाद दिले. त्यांनी मारुतीरायाला मनोभावे नमस्कार केला.

महाराज तुम्ही अचानक इथे कसे काय..स्मिताने चाचरत विचारलं..

अगं, त्या सार्थकला शाहिस्तेखान होता की नाही याची शंका आलीय ना..

जाऊ द्या हो महाराज, त्याला फक्त शंका आणि शिंकाच येत राहतात..तोमेशवर हसत म्हणाला..

महाराज, अंधारलेल्या लाल महालात तुम्ही शाहिस्तेखानवर आक्रमण केलं. तलावरही चालवली. त्यात त्याची बोटं छाटल्या गेलीत..तो तिथून पळाला..कुठे गेला तो..तुम्ही त्याला शोधला नाही का..सीमाने विचारलं.

शोधला की, शाहिस्तेखान पळतपळत इथे तुमच्या कॉलनित आला..

काहीतरीच काय महाराज..अहो,कुणी साडेतिनशे चारशे वर्षे कसं पळू शकतं..

बघायचाच का त्याला..महाराज म्हणाले.

आँ..

हाँ.. मी दाखवतो ना तुम्हाला..

काय सांगता..सर्वांनी एकादमात आश्चर्य व्यक्त केलं. सीमाचं लक्ष मारुतीरायांकडे गेलं. ते होकारार्थी मान हलवत असल्याचा तिला भास झाला.

अरे मारुतीरायांनी हो म्हंटलय..सीमा म्हणाली..

मग महाराज, आम्हाला दाखवा की हा शाहिस्तेखान..टोळी म्हणाली.

चला तर मग माझ्यासोबत, महाराज सर्वांना म्हणाले. त्यांच्या सोबत कॉलनित आले. जयदेवच्या घराकडे सर्वांचे लक्ष वेधून म्हणाले, इथे राहतो हा शाहिस्तेखान..

आँ..जयदेवने घाबरुन आँ केलं..

अहो महाराज, तिथे तर जयदेव राहतो..मिलिंद म्हणाला..

अगदी बरोबर, पण त्याच्यासोबत शाहिस्तेखानही राहतो..

नाही  नाही महाराज, तुमची काहीतरी गफलत झालेली दिसते..जयदेव घाबरुन म्हणाला. त्याला घाम आला होता. शरीरास कंप सुटला होता. घशाला कोरड पडू लागली होती. महाराजांनी त्याला आपल्याजवळचे पाणी दिले. त्याला जवळ घेतले. त्याची पाठ थोपटत त्याला धीर देत म्हणाले..

मी जे प्रश्न विचारीन,त्या प्रश्नांची खरी खरी उत्तर देशील ना..

हो हो महाराज, पण त्याचा आणि शाहिस्तेखानाचा काय संबंध ..

ते कळेल ना नंतर..तू खरं खरं सांगशील ना..महाराज जयदेवच्या डोळयात डोळे घालून म्हणाले.

हो महाराज विचारा..

काल तुमच्याकडे मोठा स्मार्ट टीव्ही आला की नाही..

हो महाराज..

तुमच्याकडे दोन गाड्या असताना परवा आणखी एक महागडी गाडी आली की नाही..

हो महाराज..

मागच्या महिन्यात बाबांनी आईसाठी हिऱ्याचे चार हार आणलेत की नाही..

हो महाराज..

दोन महिन्यापूर्वी तुझ्या बाबांनी गावाकडे २० एकर शेती घेतल्याची चर्चा तुझ्या कानावर पडली की नाही..

हो हो महाराज..

तुम्ही तिघेही जण दर दोन महिन्यांनी मॉलमध्ये जाऊन महागडे कपडे घेता आणि जुने वापरणं सोडून देता की नाही..

हो हो हो महाराज.

दर दोन तीन दिवसांनी तुम्ही महागड्या हॉटेलमधे जेवायला जाता किंवा घरी ते जेवण बोलवता की नाही..

हो हो महाराज हे सगळं खरंय, पण तुम्हाला हे कसं कळलं..तुम्ही आमच्यावर पाळत ठेवली की काय..लटलट कापत जयदेव म्हणाला..

अरे जयदेवा, महाराजांना पाळत ठेवायची गरज काय, ते महाराज आहेत..त्यांना सगळं कळत नि दिसतं..कल्याणी म्हणाली.

पण यात शाहिस्तेखान तर आम्हास कुठेच दिसत नाही ना..सीमाने महाराजांकडे विचारणा केली..

खरच की..इतरेही जण म्हणाले..

तीच तर गम्मत आहे, बाळांनो. महाराज दु:खी स्वरात म्हणाले..

शाहिस्तेखान दिसत नाही म्हणून त्याचे सतत फावते.. महाराज जयदेवच्या घराकडे  बघत उद्गारले..

पण महाराज, शाहिस्तेखान दिसण्यासाठी काय करावं लागेल..विनयने विचारलं.

प्रश्न पडले पाहिजेत बाळांनो, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत..

कोणते प्रश्न महाराज..

आता जयदेवच उदाहरण घ्या ना..त्याला किंवा त्याच्या आईला प्रश्न पडायला पाहिजे की…स्मार्ट टीव्ही, महागडी गाडी, महागडे कपडे, शेती, महागड्या हॉटेलातील जेवणासाठी लागणारे पैसे बाबांकडे येतात तरी कुठून..

पण महाराज, जयदेवचे बाबा अधिकारी आहेत. त्यांना मोठा पगार मिळतो….श्रीकांत म्हणाला..

ते जरी खरं असलं ना तरी त्यांना इतकाही मोठा पगार नाही की दर पंधरावीस दिवसांनी खूप खर्च करणं शक्य व्हावं..

म्हणजे काय…. जयदेवसह सर्वांनी एकाच वेळी विचारलं.. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की जयदेवच्या बाबांकडे त्यांच्या पगारापेक्षा अधिक पैसा येतो….त्यामुळे त्यांना अशी महागडी खरेदी करणं शक्य होतं..

हे वाईट असतं का महाराज..

होय बाळांनो, पगारापेक्षा किंवा उत्पन्नापेक्षा अधिकची रक्कम घरी येणं म्हणजे कुणाची तरी लुट करणं, कुणाला तरी फसवणं. जसं शाहिस्तेखान करायचा..मघा मी म्हणालो ना, तो लाल महालातून पळालेला शाहिस्तेखान असा संधी मिळाली की जयदेव किंवा इतर कुणाच्याही बाबांमध्ये शिरतो नि त्यांना अशी लुट करायला भाग पाडतो…

बापरे बाप..भयंकरच आहे हे..तेजोमयी म्हणाली.

भयंकर असलं तरी या शाहिस्तेखानाचा पडाव करता येणं शक्य आहे बाळांनो,महाराज म्हणाले.

ते कसं..

त्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकाला शिवाजी व्हावं लागेल..

म्हणजे तुम्ही का?प्रदीपने विचारलं.

हो हो मीच..

पण महाराज, तुमच्याकडे शाहिस्तेखानाला शिकस्त देण्यासाठी तलवार होती..आमच्याकडेतर काहीच नाही..तोमेश्वरनं विचारलं.

तुमच्याकडे तलावरीपेक्षा धारदार अस्त्र आहे बाळांनो..

काय सांगता,असं म्हणून सर्वांनी आपले खिसे चाचपडले..पण कुणाकडेही काहीही नव्हतं..

महाराज आमच्याकडे तर काहीच नाही..स्मिता म्हणाली..

बाळांनो तुमच्याकडे प्रश्न आहेत..तुमच्या घरी जेव्हा असं काही वेगळं दिसू लागतं तेव्हा समजायचं की शाहिस्तेखान डोके वर काढू लागलाय. तेव्हा बाबांना प्रश्नरुपी अस्त्राने भांडावून सोडायचं. घाबरायचं नाही..या प्रश्नांमुळे बाबाच उलट घाबरु शकतील. त्यांना खंत वाटू शकेल..ते चुकताहेत असही वाटू लागेल. त्यामुळे ते  स्वत:च त्यांच्या मनात शिरलेल्या शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करतील..काय जयदेव पटतेय का माझं म्हणणं..महाराजांनी जयदेवला विचारलं..

हो महाराज पटतय पटतय..प्रश्नरुपी तलावर उपसून यापुढे मी घरात शिरलेल्या शाहिस्तेखानास हाकलून लावीन…

 आम्ही सुध्दा..इतर सर्वजण म्हणाले.

महाराजांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं..यशस्वी भव असा आशीर्वाद देऊन महाराज, मारुतीरायाच्या मंदिराकडे निघून गेले.

सुरेश वांदिले