(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

चुरडूमुरडू

तेजोमयीच्या काकांचा मुलगा अवनीश म्हणजे जरा वेगळच प्रकरण होतं. त्याला नवे नवे शब्द शोधून ते दररोजच्या व्यवहारात वापरायाचा छंद जुडला होता. एखाद्याने इंग्रजी शब्द उच्चारला की, हा त्याला ठाऊक असलेला पर्यायी मराठी शब्द सांगायाचा. केवळ सांगून पठ्ठ्याचं समाधान व्हायचं नाही, तर किमान चारदा तरी इंग्रजी शब्द वापरणाऱ्याकडून तो मराठी शब्द वदवून घ्यायचा. त्याच्या या छंदामुळे त्याची ख्याती ,या जगापेक्षा वेगळा असा तो सर्किट अशी पसरली होती. काहीजण त्याला शहाणा म्हणत. त्यांचं यामुळे समाधान होत नसेल तर ते त्याला अतिशहाणा म्हणत. काही जण तो दिसला की हॅ हॅ हॅ करुन त्याला टाळत. त्यांनी हॅ केली अवनीश हूं हूं करुन छाती फुगवायचा. मराठी शब्दांची ही अजब-गजब शक्ती आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतेय हे लक्षात आल्यानं अवनीश सुखावला होता. एकांतात असताना मध्येच स्वत:च्या शर्टाची कॉलर ओढून स्वत:लाच शाबासकी द्यायचा..

असा हा अविनाश परवा तेजोमयीच्या घरी आला असताना त्याने आल्या आल्या काकूस चुरडू- मुरडू करण्याची फर्माईश केली.

अरे, बाबा मराठीत सांगना ..काकू म्हणता म्हणता राहिली.

काय हवं म्हणालास दादा तू ..तेजोमयीनं विचारलं..

अगं चुरडू -मुरुडू म्हणालो.

ते काय असतं बॉ..तेजामयीच्या बाबांनी विचारलं.

अहो, काका चुरडूमुरडू म्हणजे रगडा पॅटीस हवी, मला काकूंच्या हातची. तिच्याशिवाय कुणीच चांगली बनवू शकत नाही. शिवाय पाणी पुरी, शेव पुरी  आणि वडापाव तर हवाच हवा..अविनाशने फर्माईश सांगून टाकली. हे ऐकून तेजोमयीच्या तोंडाला पाणी सुटलं.

खाण्यापिण्याची चर्चा होत असल्याचं लक्षात आल्यानं अलेक्झांडर कान टवकारुन ऐकत होता. पाणीपुरीचं नाव त्याच्या कानावरुन बरेच वेळा गेलं होतं. त्याचा आस्वादही त्याने घेतला होता. त्यामुळे पाणीपुरी आपल्याही मिळणार हे त्याच्या लक्षात आल्यानं जिभ लांब करुन तो आईभोवती फेऱ्या घालू लागला.

ठोंब्या, खायचं बरोबर कळतं तुला रे..असं आई लाडाने त्याला थोपटत म्हणाली.

अरे, पण हे हे सारं जंकफूड खायला दिलं तुझी आई रागवेल ना मला..आई म्हणाली.

जंकफूड नाही गं काकू..चुरडू-मुरुडू..

आँ..

हो गं चुरडू-मुरुडू ..हे जरा कठीण वाटत असेल तर अरबट-                   चरबट कसं वाटत..

वा वा एकदम बरोबर..बाबा उर्त्स्फुतपणे म्हणाले.

पण त्याऐवी सटरफटर कसं वाटतं..तेजोमयी म्हणाली.

त्यापेक्षा चटकमटक छान वाटेल… .पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस ,वडा पाव,पिज्जा हे नाहीतरी चटकमटकच असतं म्हणून जिभेला पाणी सुटतच..

वा व, काकू याता यापुढे आपण जंक फूड म्हणायचं नाही तर म्हणायचं चटकमटक…

पण दादा हे तर फास्ट फूड आहे ना..तेजोयमीनं विचारलं..

नाही नाही तेजो, फास्ट फूड नाही हे तर झटपट खाउु किंवा फटाफट खाऊ ..

नको ते फटफटीसारखं वाटतं..झटपट खाऊच छान कानाला गोड वाटत..आई म्हणाली.

वा वा काकू..कित्ती छान..,

हो बाबा.. सकाळचा नास्ता झाला दुपारच्या लंचला काय हवं तुला..

काकू, लंच नाही गं..भरपेट न्याहारी..

बरं बाबा ते तर ते..

ते तर ते नाही..लंच म्हणजे भरपेट न्याहारी..

ठीक आहे, भरपेट न्याहारीत काय घेणार तू..

अगं, इतकं सगळं चटकमटक खाल्यावर दुपारी …

स्नॅक्स… असच म्हणायचय ना दादा तुला..तेजोमयी मध्येच बोलली..

तेजो, स्नॅक्स नाही गं.. अल्पोपोहार म्हण..

स्नॅक्स म्हणजे अल्पोपोहार असं तेजोयमीकडून अविनाशने वदवून घेतलं.

रात्री मात्र असलेली रस्सेदार बटाट्याची भाजी करायची हं काकू..

म्हणजे ग्रेव्हीच ना रे..

अगं, काकू ग्रेव्ही काय म्हणतेस,रस्सा म्हण की..

बरं,बटाटे डीप फ्राय करुन करु की फक्त चिरुन टाकू रस्य्यात..

अगं,डीप फ्रॉय काय म्हणतेस बटाट्याला डुबुकना रस्यात.

डुबूक,डुबूक ..तेजोमयी म्हणाली..डुबूक डुबूक म्हणायाला तिला गंमत वाटली. तिने अलेक्झांडरकडे बघितलं. खाण्यापेक्षा  मंडळी फक्त बोलताहेत हे बघून त्याला कंटाळा आला होता. त्याने मध्येच जांभई सुध्दा दिली…बुडूक झालं बुवा अलेक्झांडरचं, तेजोमयी म्हणून गेली..हो ना रे अलेक्झू.

त्यानेही मान हलवली..

अग बुडूक म्हणजे सुध्दा डीप फ्रायच …त्याचं कुठे काय तसं झालं..

अरे, त्याला आता जाम कंटाळा आलाय..ऐकून ऐकून ..आधी पोटोबा मग शब्दोबा..

हो ना ग आई..

हो हो हो …..आई चटकन म्हणाली..अवनीशच्या शब्दांच्या तावडीतून कधी सुटका होते याची ती वाटच बघत होती.ती स्वयंपाकघरात जाता जाता अवनीशला म्हणाली..

चटकमट सोबत तुला सॅलड चालेना रे ..

काकू सॅलॅड नाही गं… कच्चाहार म्हण..

कुठून आपण सॅलडची आठवण केली असं आईला झालं.अवनीश आणखी काही सांगण्याऐवजी ती चटदिशी स्वयंपायक घरात निघून गेली.

शब्दांच्या खाऊपेक्षा खरा खाऊ आईकडेच असल्याचं पक्कं ठाऊक असल्यानं अलेक्झांडरही आईसोबत आत शिरला..

चुकलं का काही काकू माझं..अवनीशने काकूंची प्रतिक्रिया बघून विचारलं..

शब्द कधी चुकत नाही राजा..आपण कंटाळा करतो ते शब्द वापरण्याचा ..ते चुकतं…तुझ्या काकूला कोण सांगणार ते..बाबा म्हणाले.

तुम्ही सांगा की..अवनीश बोलून गेला..त्यावर तेजोमयी खुदकन हसली..

ती कां हसली हे बाबांना बरोबर कळलं होतं..आपलं खरच काही चुकलं का असं वाटून अवनीश मात्र गंभीर झाला होता…

 

 

 

म्हणजे काकू तुला पटलं म्हणायचं हं..

तू असेपर्यंत तरी पटवून घ्यावच लागेल ना रे..

सुरेश वांदिले