छू जादू की खरी जादू
खूप दिवसांपासूनची बाप्पा आणि तेजोमयीची मैत्री आहे. बाप्पा म्हणजे आपले–तुपले गणपती बाप्पा बरं का? नित्यनेमानं दोघेही इकडे–तिकडे भेटतात. मस्त गप्पा करतात. इकडच्या–तिकडच्या गमतीजमती एकमेकांना सांगतात. दोघांकडेही त्याचा भरपूर साठा. वेळ कसा जातो हे काही दोघानांही कळत नाही. एकदा असच मारुतीरायांच्या मंदिराच्या पारावर दोघांच्या गप्पा रंगात आल्या असताना तेजोमयीनं अचानक बाप्पानं विचारलं,
बाप्पा तुम्हाला जादू येते का हो.
ही जादू काय आहे गं..बाप्पांनी आभाळाकडे पाहत, गालातल्या गालात हसत विचारलं..
अहो जादू म्हणजे छू करुन हॅ आणायचं.
तुम्ही मान्स कुत्र्यांना छू छू करता ,ते का? बाप्पा हसत म्हणाले.
नाही हो बाप्पा. तुम्ही विषयांतर करु नका. छू म्हणजे डोळे बंद करायचे. मंत्र पुटपुटायचं आणि छू म्हंटलं की समोर महाल तयार. किंवा सोन्याचा रथ अबलख घोड्यांसह आकाशात जाण्यासाठी तयार. ते छू आणि ती जादू.
अशी पण जादू असते?
असते म्हणजे काय ? आहेच की. तो आपला हॅरी पॉटर नाही का करत अशी जादू..
आपला हॅरी पॉटर? कुठून आला हा आपला हॅरी पॉटर? बाप्पांनी प्रश्नार्थक विचारणा केली.
आपला म्हणजे बाप्पा, मला म्हणायचं होतं,त्या इंग्लंडदेशी राहणाऱ्या रोवलिंग काकूंचा लेक हो.
अच्छा तो कुणाचा तरी लेक आहे.
ते महत्वाचं नाही बाप्पा, महत्वाचं म्हणजे हॅरीला मस्त जादू येते. त्याने छू केलं की त्याच्या हाती एक झाडू येतो.
झाडू..म्हणजे हा हॅरी सध्या तुमच्याकडे जोरात चाललेल्या स्वच्छता अभियानाचा ब्रँड ऍ़म्बेसेडर तर नाही ना..तुमच्या सचिन तेंडुलकरसारखा…बाप्पांनी विचारलं
स्वच्छता अभियानात वापरण्यासाठीचाच झाडू असला तरी बाप्पा, तो आहे जादूचा.
म्हणजे हा झाडू काय करु शकतो.
अहो बाप्पा, हा झाडू एकदम विमानासारखा उडू शकतो. त्यावर मांड ठोकायची.एवढंच पुरे. तुम्ही थेट आकाशात नि पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकता.
अरे वा.. असा झाडू मला मिळेल का गं तेजोमयी..बरं ते जाऊ दे आणखी कोणती जादू येतं या आपल्या हॅरीला
बाप्पा तुम्ही श्वास रोखून धरा. अहो तो हातातील छडी फिरवून त्यातून घुबड काढू शकतो. मंत्रासारखं काहीतरी पुटपुटून गुप्त होता येतं त्याला.तेजोमयी उत्तरली.
ही अशी जादू मला नाही येत बॉ..बाप्पा म्हणाले.
तुम्ही खोटं बोलताहात बाप्पा. तेजोमयी म्हणाली.
अग मी खोटं का सांगू?
पण तुम्ही तर मुषकस्वामीवर बसून चंद्राकडे गेले होतात. मुषकस्वामींना पंख नसतानाही तो जादूशिवाय कसा काय उडू शकतो?
अगं तुला हे कुणी सांगितलं.ही दंतकथा आहे.बाप्पा म्हणाले.
अहो बाप्पा,आईने सांगितलंय ना. ते खोटं थोडच असणार.आता तुम्ही दंतकथा,जीभकथा,कंठकथा असे काही चमत्कारिक बोलत जाऊ नका बाँ.
बरं बाई,असं काही चमत्कारिक बोलणार नाही.पण मला जादू येत नाही हे मात्र खर हं.
बाप्पा असं कसं हो.
अगं खरचं.परवा हॅरी पॉटर माझ्या स्वप्नात आला होता.
काय सांगता काय.कशासाठी हो बाप्पा.
अगं त्याला हे ठाऊक आहे ना की मला जादू येत नाही.म्हणून तो म्हणाला मी तुम्हाला जादू शिकवतो.
वाव बाप्पा, ग्रेट मग तुम्ही कधीपासून सुरु करणार पॉटरची शिकवणी.
छे छे मी कसली लावतोय त्याची शिकवणी.मला काही जादूबिदू शिकायची नाही.मी सांगितलय स्पष्टच त्याला.
काय हो हे बाप्पा,तुम्ही पण तस्सेच आहात..तुम्हाला हॅरी पॉटर द ग्रेट ,जगतला सर्वांत मोठा जादूगार स्वत:हून जादू शिकवायला आला पण तुम्ही शिकत नाही.काय म्हणायचं यास..
देव देतो,सॉरी हॅरी देतो नि कर्म नेतो, नाही नाही,बाप्पा घालवतो.असं तर म्हणायच नाही ना तुला..
नाही हो बाप्पा, तुम्हाला असं म्हणण्याची माझी काय टॉप आहे.मला उगीचच असं वाटलं की ज्याला शिकायचं नाही त्याकडे हॅरी जातो नि मला जादू शिकायची आहे तर साधं विचारत सुध्दा नाही..
अगं तू निराश होऊ नकोस..काळजी करु नकोस.मी पाठविन नं हॅरीला
तुझ्याकडे..
म्हणजे बाप्पा,तो परत तुमच्याकडे येणारय का?तुम्ही जादू शिकणार नाही असं सांगितल्यावर त्याला राग नाही का आला. ?
छे गं. उलट त्याला आश्चर्याचा धक्का बसला. हॅरी पॉटरला कुणी नकार देऊ शकतं हे काही त्यास सहन झाले नाही. पण तो चांगला मुलगा आहे. त्याला त्याचा राग मात्र आला नाही. मी कां जादू शिकत नाही हे त्याने प्रेमळपणे विचारलं.
तुमच्या उत्तराने त्याचं समाधान झालं का बाप्पा..
ते मला माहीत नाही..पण तो हॉगवार्टवरवरुन इतक्या दूर मला खास भेटायला आला म्हणून मी त्याचा आदरसत्कार केला. मोदक दिले.त्याला काही भेट द्यावी म्हणून मी विचार करु लागलो तर मला जगदीशचंद्र बोसांचं नाव सुचलं..
अय्या..तुम्ही जगदीशचंद्र बोस भेट दिलात हॅरीला..
नाही गं वेडे..
मग..
मी हॅरीला जगदीशचंद्रांकडे घेऊन गेलो, ते त्यांच्याकडे असलेली अद्भूत आणि वेगळी जादू दाखवायला आणि जमलं तर ती जादू जगदीशचंद्रांकडून शिकून घ्यायला..
वेगळी जादू म्हणजे काय?तेजोमयीने आश्चर्यानं विचारलं.
अगं, हॅरीने जेव्हा मला जादू शिकविण्याची तयारी दर्शवली.तेव्हा मी त्याला म्हणालो की, तुझी जादू मला शिकायची इच्छा नाही. तुझ्या जादूचा उपयोग गमती जमती,आणि काही तरी उटपटांग गोष्टी किंवा कुणाविरुध्दचे कट कारस्थान करणे आणि ते उलथून लावणे किंवा मग गुप्त खजिना वगैरे शोधणे अशासाठी होतो.पण मी तुला अशा वेगळ्या जादूगाराकडे घेऊन जातो की त्यांची जादू बघून तू थक्क होशील.तुला वाटेल आपणही ही खरी जादू शिकायला हवी.
पण बाप्पा, जगदीशचंद्र बोस तर महान वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत.ते जादूगार कधी पासून झालेत.आम्हाला तर त्यांची ही कला ठाऊकच नाही.
अग बाळे, ते वनस्पतीशास्त्रज्ञ आहेतच पण त्यांच्यामधे एक मोठ्ठा थोर जादूगारही दडलेला आहे.
बाप्पा तुम्ही असं कोड्यात नका हो बोलू.
हे बघ तेजू.जगदीशचंद्रांनी वनस्पतींना, वृक्षवल्लिंना माणसांसारख्या भावभावना असतात,ते संवाद करतात असं शोधून काढलं,की नाही ?
होय बाप्पा,पण हे संशोधन झालं.जादू नव्हे.
माझ्या मते हीच खरी जादू. जे तुम्हाआम्हाला ठाऊक नसतं ते शोधून काढणं म्हणजेच जादू. जादूगार रंगीबेरंगी छडी फिरवतो नि बघता बघता त्याच्या छडीतून कधी पोपट बाहेर पडतो तर कधी उंदिर..तर कधी कागदाचे फुलं होतात.तर कधी रुमालाचे पत्ते होतात आणि पत्त्याचे होतात पेरु. शास्त्रज्ञ असले कधी बिनकामाचं काही करत नाही. त्यांच्या हाती छडीबिडी काही नसते.ते दिवसरात्र प्रयोगशाळेत प्रयोग करतात. खूप ग्रंथ वाचतात. अभ्यास करतात. थोडक्यात काय तर ते छडीऐवजी डोक चालवतात. पण त्यांना आपलं डोकं वारंवार चालवावं लागतं. न थकता. न कंटाळता. जादूगाराच्या छडीसारखं एकदा वापरुन चालत नाही त्यांना. प्रचंड डोकेफोड केल्यावर मग कुठे ते एखादं यंत्र त्यांच्याकडून तयार होतं.ते यंत्र मात्र मग जादूसारखं काम करु लागतं. जगदीशचंद्रांनी क्रिसोग्रॉफ शोधून काढला. ग्राहम बेलने टेलिफोन शोधून काढला, बेअर्ड साहेबांनी टीव्ही शोधून काढला,मार्कोनी साहेबांनी रेडियो काढला,राइट बंधूनी विमानाचा शोध लावला.असे शोध म्हणजे खरी जादू.जादूच्या छडीने निर्माण होणाऱ्या वस्तू आभासी असतात.
म्हणजे त्या कुठेतरी असतात. नि जादूगार आपल्या हुषारीने त्या आपल्या समोर काढून दाखवतात. असली जादू फक्त मनोरंजनासाठी..पण तशी बिनकामाची.तुला जर जादूच शिकायची असेल तर डोक चालवून चालवून एखाद्या यंत्राची निर्मिती करणारी जादू शिक..हॅरी पॉटरला मी हेच सांगितलय..
मग अशी जगदीशचंद्रांची जादू शिकायला तयार झालाय का तो..
डंबलडोर सरांची परवानगी घ्यावी लागेल..असं सांगून तो हॅगवार्टला गेलाय..तो आला की तुझी नक्कीच भेट करुन देइन हो,बाप्पांनी तेजोमयीला आश्वासन दिलं.
0000
2
बाप्पांनी हॅरी पॉटरला जगदीशचंद्र बोस जशी जादू करतात ती जादू त्यांच्यकडूनच शिकवण्याची तयारी दाखवली. त्यावर हॅरीने डंबलोडरसरांची परवानगी घ्यावी लागेल असं सांगितलं. डंबलडोरसर म्हणजे हॉगवर्ट येथील जादूच्या शाळेचे हेडमास्तर किंवा प्राचार्य. बाप्पांना भेटून गेल्यावर हॅरी पुन्हा काही त्यांच्याकडे परतला नाही. आता तो येईल असं वाटत नाही. असं बाप्पांनी एक दिवस जाहीर करुन टाकलं. त्यामुळे तेजोमयी खट्टू झाली.
हॅरी पॅाटर खरोखरच डंबलडोरसरांची परवानगी घेईल काय,असा प्रश्न तेजोमयीला पडला. या प्रश्नाचं उत्तर हॅरीच देऊ शकला असता. त्यामुळे त्याच्याकडे जाणं श्रेयस्कर होतं. हॅरी तिला दोनदा त्याच्या पुस्तकात 333व्या पृष्टात भेटला होता. हॅरी पॉटरचे पाचवे पुस्तक तेजोमयीने काढले नि 333वे पृष्ठ उघडून ती हॅरीचा जप करु लागली.
त्या पृष्ठातून धूर येऊ लागला नि नंतर धुराची आकृती तयार झाली.ही हॅरीची प्रगट होण्याची स्टाइल होती.
हाय तेजो, हॅरी म्हणाला. त्याने तिच्यासाठी हॅगवार्ट मधील चोको–चिकी–पॉपकॉर्न आणले होते.ते तोंडात ठेवले की त्याचे चॉकलेट व्हायचे.
वॉव..तेजोमयी म्हणाली.
टॉव..मला का बोलावलस तेजो. हॅरीने विचारलं.मग तेजोमयीने त्याला विस्तारानं सारं काही सांगितलं.
मग तू डंबलडोर सरांची परवानगी घेतली का रे..
होय ..
मग काय म्हणाले ते.
त्यांनी जगदीशचद्रांची जादू शिकण्याची परवानगी दिली.
मग कधी जाणार तू बाप्पंाकडे..
मी जायचं नाही असं ठरवलंय..
अरे, तू वेडा आहेस की काय,अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते..तेजोमयी किंचाळत म्हणाली
अगं, अशी ओरडू नकोस तुझे आई बाबा येतील नि मला हाकलून लावतील.हॅरी हसत म्हणाला.
पण तू कां जाणार नाही..बाप्पांची ऑफर अव्हेरतोस..
अगं जगदीशचंद्र बोसांची जादू शिकायला खूप अभ्यास करावा लागतो.
मग कर की..
तेच तर जमत नाही ना यार..म्हणून हॉगवार्टच्या शाळेत कायम मागे राहिलो ..शास्त्रज्ञांची जादू शिकायची म्हंटली की इतर भानगडी करायला अजिबात वेळ मिळत नाही..खूप पुस्तकं वाचावी लागतात.अभ्यास एके अभ्यासच करावा लागतो.खूप प्रयोग करावे लागतात. डोकं चालवावं लागतं.
ते तसं चालव ना.
तीच तर समस्या आहे ना तेजू. माझं डोकं चालत नाही..माझी छडी चालते..किंवा फार तर उडते म्हण..सोप्प काम आहे हे.कठीण काम बोस अंकल करतात,आइनस्टाइन ग्रँडपा करतात.बेअर्ड मामा करतात..
बकवास काम हॅरी करतो.. अशी काहीशी प्रतिक्रिया द्यावी, असं तेजोमयीला वाटलं.
पण ही प्रतिक्रिया ऐकायला हॅरी होता कुठे तिथे. तो केव्हाच अलगद 333 व्या पृष्ठात गुप्त झाला होता..
सुरेश वांदिले,
9324973947