(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तेजोमयीच्या सदनिकेला तीन गॅलऱ्या होत्या. वेगवेगळ्या झाडांच्या रंगीबेरंगी कुंड्या ठेवून त्या गॅलऱ्यांमध्ये आईने बाग फुलवली. या बागेत पक्षांनी येऊन नासधूस करू नये म्हणून गॅलऱ्यांना जाळ्या बसवून घेतल्या. झाडांची छाटणी करणे, कुंड्यांतील तण काढणे, माती वर-खाली करणे याची काळजी आई घ्यायची, तर दररोज सकाळी बाबा झाडांना पाणी घालत. कुंड्यांतील पाणी बरेचदा गॅलरीच्या खाली लावलेल्या पत्र्यावर पडायचं. त्या पत्र्यावर कबुतर, पोपट, टिटवी, खारुताई, कावळा, चिमणी असे पक्षी येऊन बसत. पत्र्यावर पडलेल्या पाण्याला चोच लावत; पण ते पाणी एकतर लगेच खाली घरंगळून जाई किंवा विरुन जाई. बिचारे पक्षी आशाळभूत नजरेने कुंड्यांतील पाण्याकडे बघत.

“या पक्षांची तहान भागवण्यासाठी आपल्याला काही करता येणार नाही का?” एकदा तेजोमयीने बाबांना विचारलं.

“काही करायचं म्हणजे जाळी काढून पाण्याचं भांडे ठेवता येईल,” बाबा म्हणाले. आईने याला ठाम विरोध दर्शवला.

तेजोमयीने बाबांकडे बघितले. त्यांनी आपली असहायता व्यक्त केली. अलेक्झांडरनेही, ‘तुझं तूच बघ बाई’, अशा आशयाचे भाव आणत दुसरीकडे मान वळवली.

पाण्यासाठी आसुसलेल्या पक्षांसाठी आपण इतकही करू शकत नाही, याचं तिला खूप दुःख झालं. तिने आपली व्यथा आजीकडे बोलून दाखवली. आजी विचारात पडली. सूनबाईच्या विरोधात जाण्याची त्यांची तयारी नव्हती. ‘काय करावं बरं?’ आजी स्वतःशीच पुटपुटली. विचारात मग्न झाली. थोड्या वेळाने तिला काहीतरी सुचलं. तिने ते तेजोमयीच्या कानात सांगितले. ते ऐकून तेजोमयी दचकलीच. आजीला सुचलेली कल्पना चांगली असली तरी ती आगीशी खेळण्यासारखी होती.

“या आगीशी मीच खेळेन, तुला त्याची झळ पोहचू देणार नाही,”  असं तिने तेजोमयीला समजावलं. अखेर हो-नाही करत आजीच्या कल्पनेला साकार करण्यासाठी तेजोमयी तयार झाली.

रात्री सर्वांची निजानीज झाल्यावर आणि अलेक्झांडर ढाराढूर झोपल्यावर आजी आणि तेजोमयी एका गॅलरीत आल्या. आजीने गॅलरीच्या जाळीतून पक्षी आत येऊ शकतील अशा आकाराचा एक भाग कात्रीने कापला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत आईच्या काहीच लक्षात आलं नाही. आई-बाबा बाहेर जाताच आजीने गॅलरीत पाण्याचं भांडं आणून ठेवलं. तेजोमयी आनंदली.

नेहमीचे पक्षी गॅलरीत येऊन बसू लागले. काहींना जाळीचा फाटलेला भाग दिसला. आजी आणि तेजोमयीने पक्षांचं तिकडे लक्ष वेधलं. काही पक्षी उडाले, काहींनी उत्सुकतेनं त्या भागाकडे बघितलं. एक चिमणी हळूच आत आली. पाण्याच्या भांड्यावर बसली. चोचीने पाणी पिऊ लागली. हे बघून एक खारुताईही दबकत आली. तिनेही पाणी पिलं. खारुताईने जाताना एका झाडाचं पान खुडलं. आजीने तिच्यावर हात उगारला, तशी ती घाबरून पळाली.

काही वेळाने एक टिटवी आत आली. मग हळूहळू इतर पक्षी येत-जात राहिले. तेजोमयी आनंदली. आजीलाही समाधान वाटलं.

पण, आता संध्याकाळी आपलं पितळ उघडं पडणार हे लक्षात येताच दोघीही चपापल्या. शिवाय अलेक्झांडर दिवसभर सारं काही बघतच होता. तो आईला नक्कीच जाळीच्या फाटलेल्या भागाकडे घेऊन जाणार, याची तेजोमयीला खात्री होती. त्याला विनंती करूनही उपयोग नव्हता. ‘आता जे काही व्हायचे ते होऊन जाऊ दे,’ आजीने तेजोमयीला समजावलं. ‘काळजी करू नकोस’, असा दिलासाही दिला.

संध्याकाळी आई-बाबा घरी परतले. अलेक्झांडर आईला फाटलेल्या जाळीकडे नेणार आणि आपले भांडे फुटणार, याची भीती तेजोमयीला वाटू लागली. मनातून ती फार भ्याली. आजी दाखवत नसली तरी धास्तावली होतीच.

पण एक तास झाला, दोन तास झाले, आई झोपायला गेली तरी अलेक्झांडरने काहीच केलं नाही. आजी आणि तेजोमयीसाठी हा धक्काच होता. आजीने अलेक्झांडरकडे कौतुकानं बघितलं. त्याला जवळ घेऊन मायेनं थोपटलं. तेजोमयीने त्याचे लाड केले.

बाबा झाडांना पाणी घालत असल्यामुळे त्यांच्या लक्षात जाळीला भगदाड पडल्याचं आलं होतं. एकदा आई घरी नसताना आजीने त्यांना खरं काय ते सांगून टाकलं. बाबांना अलेक्झांडरची खरी भीती वाटत होती. पण त्याला सारं ठाऊक असूनही त्याने आईला सांगितले नसल्याचं, तेजोमयीने त्यांच्या लक्षात आणून दिलं. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

‘मुक्या प्राण्यांसारखी संवेदनशीलता आमच्यामध्ये आली तर किती चांगलं होईल ना रे,’ ते अलेक्झांडरला जवळ घेत म्हणाले.

‘जे यांना कळतं ते आपल्यालाही कळलं असतं तर अशी गुपचूप जाळी कापावी लागली नसतीना,’ आजीही पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली.

सुरेश वांदिले