ज्युनिअर जेम्सबाँड
टिल्लू जरा जास्तच संशयी होता. कशावरही तो संशय घ्यायचा. बरेचदा यातून काही प्रश्नांचं उत्तर मिळत तर काहीवेळा गैरसमजही होतं. काहीवेळा त्याला, बाबांची बत्तीही या संशयीवृत्तीमुळे मिळाली. पण टिल्लूत, सुधारणा होण्याची चिन्हे दिसेना. त्याला वाटे, आपण जेम्सबाँडचा ज्युनिअर अवतारच जणू. सिनिअर जेम्सबाँड, जसा, संशयाच्या अस्त्राने, शत्रुच्या रहस्यापर्यंत पोहचतो, तसं, आपणही संशयाच्या सुईने शत्रूचा फुग्याला टोचून, त्याला उघडं पाडू शकतो, असं तो एकदा आईला म्हणाला.
“अहो महाशय, पण तुमचा शत्रू तरी कोण, आधी ते सांगा की?” आईने विचारलं.
“मॉम, एक का, अनेक शत्रू आहेत.”
“बरं, मग एकाचं तरी नाव सांगाना.” आई हसून म्हणाली. टिल्लू विचार करु लागला.
“गणित, छे छे, टिचर, छे छे! आपल्या स्मार्टनेसवर सदैव, खार खाऊन असणारा पम्या, छे छे छे! आपल्याकडे ढुंकूनही न बघणारी,रश्मीटली. छे छे! बाबा, ओह नो! आई, ओह मॉय गॉड, काहीतरीच काय?”टिल्लू पुटपुटला.
“काय रे, एकही शत्रू नाही का सापडला का?”
“तसं नाही गं, पण”
“कारण, तुला शत्रूच नाहीतना, मग कसे सापडणार? तेव्हा ज्याच्यात्याच्यावर संशय घेणं, सोड बाबा आता.”
बाबाही असंच म्हणाले. पुढील काही दिवस, टिल्लूला खरोखरच कुणाचाही आणि कशाचाही संशय आला नाही. पण एके दिवशी शाळेत जात असताना, त्याला त्याच्या
घराजवळील एका रिकाम्या घराची चांगली सजावट सुरु असल्याचं दिसलं. त्या घरी मग खुर्च्या टेबल, सोफा येऊ लागले. आतमध्ये केबीन तयार होऊ लागल्या. एक काचेची मोठी केबिन तयार झाली. काही दिवसांनी, त्या घरावर अमुक तमुक बँक अशी पाटी लागली. तिथे सुट पँट आणि टाय घातलेले कर्मचारी काम करु लागले.
टिल्लू शाळेतून जातायेता याचं निरीक्षण करायचा. बँकेत गर्दीही वाढू लागली. एकदा, या बँकेतील एक स्मार्ट कर्मचारी, त्यांच्या घरी आला. त्याने बाबांना बँकेत गुंतवणूक केल्यास इतर बँकांपेक्षा चार टक्के अधिक व्याज देऊ असं सांगितलं नि खाते उघण्याची विनंती केली .त्यावेळी तिथेच असलेल्या टिल्लूने विचारलं, “समजा, तुम्ही नाही दिला हा व्याज दर तर?” या
अनपेक्षित प्रश्नान तो स्मार्ट कर्मचारी गडबडला. सावरासावर करु लागला. असं काही घडणार नाही, असं त्याने सांगितलं. आपण इथे आणखी थांबल्यास, या मुलाच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागेल, असं वाटून त्याने, बाबांना बँकेत येण्याचा निमंत्रण देऊन, निरोप घेतला.
“तू व्यक्ती केलेली शंका बरोबर होती टिल्लूराव.” असं बोलून बाबांनी त्याची पाठ थोपटली.
याचा अर्थ, संशय घेणं चांगलचं असतं असं म्हणायच. टिल्लू स्वत:वर, खुष होत पुटपुटला.
दुसऱ्या दिवशी शाळेत जात असताना, टिल्लूचे लक्ष बँकेच्या नावाकडे गेले. त्याला हे नाव ओळखीचं वाटलं. त्याने मेंदुला जरा ताणल, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, अरे याच नावाची बँक बाजूच्या गल्लीतसुध्दा आहे की. एकाच बँकेच्या दोन शाखा इतक्या कशा काय, जवळजवळ राहू शकतात. असा संशय त्याच्या डोक्यात आला. शाळेकडे वळणारी टिल्लूची पावल्या जुन्या बँकेकडे वळली. बँकेच्या आत गेल्यावर तेथील गर्दी बघून तो भांबावला. इकडेतिकडे त्याने दोनदा चक्कर मारली. त्याचं भिरभिरणं काचेच्या केबिनमध्ये बसलेल्या मॅडमच्या लक्ष्ज्ञात आलं. त्यांनी सुरक्षारक्षकाच्या मार्फत आतमध्ये बोलावून घेतलं. त्याला बिसलेरीची बॉटल देतत्यांनी विचारल.
“तुझे बाबा दिसत नाहीत का तुला?”
“नाही मॅडम”
“मग तू इथे, असा भिरभिरत का आहेस.”
टिल्लूने आत श्वास घेतला नि त्याला जे सांगायचं होतं, ते सारं काही धाडधाड सांगितलं.
त्याचं बोलणं संपल्यावर त्यांनी लगेच मुख्य शाखेला फोन वरुन अशी काही नवी शाखा उघडल्याची चौकशी केली. तेव्हा असं काही नसल्याचं, त्यांना सांगण्यात आलं. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी लगेच पोलीसांना फोन केला. टिल्लू आणि सुरक्षा रक्षकाला घेऊन, त्या नव्या शाखेत आल्या. काचेच्या मोठ्या काचेच्या केबीनबाहेर बँक व्यवस्थापक अशी पाटी होती. त्या टिल्लूला घेऊन आत गेल्या. स्वत:च ओळखपत्र व्यवस्थापकांच्या समोर ठेवलं. ते बघून व्यवस्थापकांना घाम फुटला. तो ताडदिशी बाहेर पडला नि पळूच लागला. हे बघून टिल्लून त्याच्या पायात पाय टाकून त्याला पाडले. तोपर्यंत पोलीस तिथे आले होते. मॅडमनी पोलीस अधिकाऱ्यास टिल्लूस कशी, या बँकेबाबत संशय आला हे सांगितलं.पोलीस अधिकाऱ्यांनी टिल्लूचे कौतुक केले. मॅडमकडे वळून म्हणाले, अहो या टिल्लूला आलेल्या संशय तुम्हा मंडळींना नको का यायला, तुम्ही सुध्दा इथूनच जात असाल ना.
“होय साहेब,पण असं काही घडू शकतं हे कळलच नाही”
“पण तुम्ही तर वरिष्ठ अधिकारी आहात ना. तुमच्या बँकेची एक नवी शाखा तुमच्या इतक्या जवळ उघडलीय, याची शंका यायला हवी होती ना. आपण असं झापडबंद राहतो वागतो, त्यामुळे या भामट्यांचं फावतं. म्हणून अशी राजरोज खोटी बँक उघडू शकतात. हे भामटे जसे दोषी तसेच आपणसुध्दा..या पोराच्याही हे लक्षात आलं नसतं या भामट्यांनी लोकांना लुटून पोबारा केला असता..”
पोलीस अधिकारी म्हणाले. त्यांनी टिल्लूचे मनसोक्त कौतुक केलं. घराजवळ इतके पोलीस कां बरं आले असावेत हे बघण्यासाठी सोसायटीतील इतर लोकांसमवेत टिल्लूचे आईबाबाही तिथे आले होते. त्यांना बघताच टिल्लू त्यांच्याकडे धावला.
मॅडम आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा टिल्लूचे कौतुक केले. मॅडमने त्याला त्याला हजार रुपये बक्षीस दिलं. शाळेला दांडी मारल्याची शिक्षा करायची की गुन्हेगारांना पकडून देण्यासाठी जेम्सबाँडगिरी केल्याबद्दल पाठ थोपाटायची, बाबांना प्रश्न पडला. याप्रश्नाचं त्याना हसू आलं.
काय हो झालं
आईने विचारलं.
यापुढे या ज्युनियर जेम्सबाँडसारखचं आपणही डोळे उघडे ठेऊन नीट बघत राहायचं असं ठरवलय मी…
पण बाबा त्यासाठी संशयाच्या कल्लोळात जावं लागतं.टिल्ले डोळे मिचकावत म्हणाला.