झपाझप चालणारे बापू
पहाटेचे पाच वाजले होते. अजून अंधारच होता. पक्षांचा किलबिलाट आता कुठे सुरु झाला होता. सर्वत्र प्रसन्न वातावरण होतं. या प्रसन्न वातावरणात नेताजी सकाळची सर्व कर्मे आटोपून व्यायाम करत होते.
सूर्यनमस्कार घालत असताना त्यांच्या दिशेने झपाझप पावलं टाकत कुणीतरी येताना दिसलं. इतक्या पहाटे कोण बरं असेल, असा प्रश्न नेताजींच्या मनात आला. ते येणाऱ्या व्यक्तिच्या दिशेने बघू लागले. काही क्षणात ती व्यक्ती नेताजींच्या जवळ येऊन पोहचली.
बापू तुम्ही…नेताजी आश्चर्यचकित होत म्हणाले..
अरे, सुभाष आपण कधीच भेटलो नाहीत असं समजून तू कां बरं आश्चर्यचकित झालास..
तसं नाही बापू..पण तुम्ही इतक्या पहाटे, या वयात झपाझप चालत आलात ना..म्हणून जरा मी गोंधळलो.. नेताजी म्हणाले. त्यावर बापू हसले. त्यांनी नेताजीच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांना म्हणाले चलतोस का माझ्यासोबत फिरायला. नेताजी हो म्हणाले.
मात्र झपाझप चाललं पाहिजेस हं तू.. बापूंनी अट घातली. नेताजींनी ती मान्य केली.
दोघेही झपाझप चालत खूप दूरवर आले. सूर्याचं आकाशात आगमन होत होतं. पक्षांचा किलबिलाट वाढला होता…समोर एक नदी वाहत होती. नदीच्या काठावरील एका झाडाखाली चांगलीशी जागा बघून बापू आणि नेताजी बसले. नेताजींना थोडा दम लागला होता. बापू मात्र नेहमीसारखं श्वाच्छोश्वास करत होते.
नेताजींनी कौतुकानं आणि आदरानं बापूंकडे बघितलं.
अरे सुभाष, असा काय बघतोस माझ्याकडे..जणू काही पहिल्यांदा बघितल्यासारखं..
बापू, तुम्ही आणि मी दोघेही झपाझप चाललो पण तुम्हाला दम लागला नाही, मला मात्र दम लागला.. तुमच्या माझ्या वयात तीस वर्षांचं अंतर असून सुध्दा तुम्हीच माझ्यापेक्षा खूप तंदुरुस्त आहात…याचं रहस्य काय बापू…यावर बापू हसले. त्यांच्या गालावर खळी पडली. नेताजींचा हातात हात घेऊन ते म्हणाले..
अरे सुभाष, यात कसलं आलय रहस्य..
रहस्यच आहे हो बापू…तुम्हाला सांगायचं नसेल तर माझी काही हरकत नाही..
अरे नाही नाही..तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार मी…बापू नेताजींना म्हणाले. नेताजींच्या चेहऱ्यावर स्मित आले. बापूंनी त्यांचा हात नेताजींच्या हातून काढला.
ते सांगू लागले…
अरे, मी माझ्या चालण्यात नियमितपणा ठेवला. खूप बरं नसेल तेव्हा सोडून पहाटे झपाझप चालण्याचा नित्यक्रम कधीही मोडला नाही.
बसं इतकच..नेताजींनी विचारलं..
अरे इतकचं..पण याचा आदर्श फार लोकांनी घेतला नाही ना..कुणी म्हणतात बापूंनी शिकवलेला अहिंसेचा आदर्श ठेवा..कुणी म्हणतात बापूंच्या सत्यआचरण्याच्या शिकवणुकीचा आदर्श ठेवा..कुणी म्हणतात साध्या वागणुकीचा आदर्श ठेवा….
पण त्यात काही चूक नाही ना बापू…
मी कुठे म्हणतोय चूक आहे सुभाष.. अरे, त्यांचा आदर्श ठेवाच पण पहाटे उठून झपाझप चालायला जातो,याचाही आदर्श ठेवा ना..हा आदर्श ठेवा असं फारसं कुणी म्हंटल्याचं किंवा सांगितल्याचं माझ्या कानावर नाही..तू तरी ऐकलस का..
नाही हो बापू..नेताजी म्हणाले.
बघ..आता काय म्हणावं याला..अरे पहाटे पहाटे उठून झपाझप चालण्याने तब्येत तर चांगली राहतेच.पण दिवसभर उत्साह राहतो. कोणताही आजार शरीरावर आक्रमण करण्याआधी दहादा विचार करतो.म्हणजे तब्येतीच्या कुरुबुरी नाही…उर्जा आणि उत्साह सतत मिळणार.. त्यामुळे कंटाळा नाही..कंटाळा नाही याचा अर्थ ,खूप काम करणं…कळलं का तुला, मी काय म्हणतोय ते..नेताजींकडे बघत बापू म्हणाले..
नेताजी काहीच बोलले नाही. ते मंत्रमुग्ध होऊन बापूंकडे बघत राहिले. बापूंनी त्यांच्या आयुष्यात इतकं मोठं काम केलं. त्याची उर्जा त्यांच्या या झपाझप चालण्याच्या नियमिततेत होती. पण लोक मात्र हा आदर्श काही ठेवत नाही..मोठी माणसं चालत नाहीत आणि आपल्या मुलांना चालण्याची सवय लावण्याऐवजी गाड्या घेऊन देतात.पालकही आळशी आणि मुलही तशीच…नेताजी या विचारांमध्ये गढून गेले.
नेताजी काहीच बोलत नसल्याचे बघून बापूंनी त्यांच्या खांद्याला धरुन हलवलं.
अरे सुभाष, कुठे हरवलास बाबा..
हरवलो नाही बापू..झपाझप चालणाऱ्या गांधींचा आदर्श आपल्या बांधवांनी घेतला तर त्यांचं किती भलं होईल, याचा विचार मनात येत होता माझ्या..नेताजी म्हणाले..
बापू निर्मळ हसले. त्यांच्या गालावरच्या खळीने या निर्मळतेवर आणखी भर घातली.
सुरेश वांदिले