मार्ग यशाचा- ७८- डिजिटल अभ्यास सुविधा
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (राष्ट्रीय परीक्षा संस्था – एनटीए) या संस्थेची स्थापना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केली आहे. या संस्थेमार्फत आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), एनआयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), आयआयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), एनआयएफटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी), एआयएम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स), केंद्रीय विद्यापीठे आणि इतर शासकीय संस्थांमधील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमधील गुण बऱ्याच खाजगी संस्थाही प्रवेशासाठी ग्राह्य धरतात. या परीक्षांना देशभरातील लाखो विद्यार्थी बसतात. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना या परीक्षा देणे अधिक सोईचे आणि सुलभ जावे यासाठी संस्थेने “अभ्यास ॲप” विकसित केले आहे. हे ॲप गुगल स्टोअरवरून डाउनलोड करता येते. सध्या या ॲपवर वैद्यकीय (नीट – नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) आणि अभियांत्रिकी/तंत्रज्ञान (जेईई – जॉइंट एंट्रन्स परीक्षा) या परीक्षांच्या अभिरूप (मॉक टेस्ट) चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच २०२६ मधील नवीन अपडेटनुसार, या ॲपमध्ये आता जेईई आणि नीटच्या सोबतीने ‘युजीसी नेट’ (UGC NET) परीक्षेचा देखील समावेश करण्यात आला आहे.
कृत्रिम प्रज्ञेचा (AI) वापर
या ॲपमध्ये कृत्रिम प्रज्ञेचा (एआय – आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करण्यात आला आहे. या ॲपद्वारे विद्यार्थी चाळणी परीक्षांच्या मॉक टेस्ट देऊ शकतात. या चाचणीचा निकाल त्वरीत दिला जातो. या ॲपमधील कृत्रिम प्रज्ञेद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील कमकुवत बाजू तत्काळ निदर्शनास आणल्या जातात. त्यामुळे पुढील चाळणी परीक्षेमध्ये सुधारणा करता येणे शक्य होऊ शकते. स्वयंअध्ययन आणि स्वयंसुधारणेसाठी हे ॲप उपयुक्त ठरू शकते.
नीट आणि जेईई या परीक्षांच्या तयारीसाठी हे ॲप उपयुक्त ठरू शकते. या ॲपमध्ये या दोन्ही परीक्षांच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर (सिलॅबसवर) आधारित प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिका तज्ज्ञांनी तयार केलेल्या असतात. या प्रश्नपत्रिका एआयच्या मदतीने तपासल्या जात असल्याने संबंधित विद्यार्थी कोणत्या टॉपिकवरील प्रश्नांमध्ये अडखळतात किंवा अडचणी येतात, ही बाब लक्षात येते. त्यानुसार तज्ज्ञांमार्फत सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच नवीन आवृत्तीमध्ये प्रत्येक धड्याचा सखोल आढावा घेण्यासाठी ‘चॅप्टर मॅस्ट्री’ (Chapter-by-chapter view of strong, shaky or untouched topics) हे नवीन वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थी कोणता विषय मजबूत आहे किंवा कशात कच्चा आहे हे पाहू शकतात.
ॲपचे फायदे
या ॲपचा काळजीपूर्वक वापर केल्यास पुढील चार प्रकारे फायदा होऊ शकतो:
(१) निष्काळजीपणामुळे होणाऱ्या चुकांमध्ये लक्षणीय घट होते.
(२) वेळेचे व्यवस्थापन सुधारते किंवा वेळेचा अधिक अचूकपणे वापर करता येतो.
(३) प्रश्न सोडवण्याची गती आणि अचूकतेत वाढ होते.
(४) परीक्षा देण्याच्या व्यूहरचनेमध्ये प्रभावीपणे बदल करण्याची क्षमता प्राप्त होते.
“अभ्यास ॲप” कसा डाउनलोड करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा, याविषयीचा व्हिडिओ https://nta.ac.in/Abhyas या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो स्वयंस्पष्ट असून त्याचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यास या ॲपचा प्रभावीपणे वापर करता येणे शक्य आहे. हे ॲप कोणत्याही अँड्रॉइड मोबाईल किंवा उपकरणांमध्ये डाउनलोड करता येते. https://nta.ac.in/abhyas/help आणि https://nta.ac.in/Abhyas/started या संकेतस्थळांवर या ॲपविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
सराव केंद्रे
एनटीएच्या परीक्षा कॉम्प्युटर-बेस्ड (संगणकाधारित) असल्याने त्या सर्वच विद्यार्थ्यांना सुलभतेने देणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एनटीएला देशात सर्वत्र आणि विशेषतः ग्रामीण भागात टेस्ट केंद्रे उभारणे बंधनकारक केले आहे. या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाधारित परीक्षांच्या सरावाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाते. या सरावात लॉग इन करणे, संगणकावरील विस्तृत माहिती नजरेखालून घालणे, प्रत्यक्ष पेपर स्क्रीनवर हाताळणे, माऊसचा वापर करून एका प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नावर जाणे, उत्तरे दुरुस्त करणे आणि पुनर्तपासणी करणे या बाबींचा समावेश आहे. या सरावामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पेपर सोडवण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतो.
इच्छुक विद्यार्थी nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन अशा केंद्रासाठी नोंदणी करू शकतो किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एनटीए स्टुडंट ॲप डाउनलोड करू शकतो. या ॲपवर सराव केंद्रासाठी नोंदणी करण्याच्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. सरावाची सुविधा मोफत असल्याने कोणत्याही सराव केंद्राला विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारता येणार नाही. या सराव केंद्रावर जाऊन कितीही वेळा सराव परीक्षा देता येते. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार वेळ निर्धारित करू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा शक्यतो प्रयत्न केला जातो. प्रत्येक सराव केंद्र एनटीए संकेतस्थळाच्या nta.ac.in/Central/Login शी लॉग इन करून सराव परीक्षेचे साहित्य मिळवू शकतात.
या केंद्रातून सराव परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे त्यांचा टाईम स्लॉट (पेपरची वेळ) २४ किंवा ४८ तास आधी कळवला जातो. या अनुषंगाने काही अडचणी आल्यास पुढील ईमेल आणि भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येतो:
- ईमेल: tpcntaexams@gmail.in
- भ्रमणध्वनी: tpc@nta.ac.in
- दूरध्वनी: ०११-४०७५९०००
- संकेतस्थळ: https://nta.ac.in/TPC
पेपर सराव सुविधा
nta.ac.in/Quiz या संकेतस्थळावर एनटीएने घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षांचे प्रत्यक्ष पेपर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये जेईई (मेन), नीट, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स परीक्षा – अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट (क्युईटी युजी आणि पीजी), कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट, जॉइंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (जिपमॅट), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ॲडमिशन टेस्ट (एनआयएफटी), ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्चिट्यूड टेस्ट (जिपॅट), नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट टेस्ट (एनसीएचएम) अशा सारख्या परीक्षांचा समावेश आहे.
हे पेपर डाउनलोड करून विद्यार्थी याचा उपयोग सरावासाठी करू शकतात. यामुळे पेपरपद्धती, प्रश्नांचे प्रकार आणि प्रश्नांची काठिण्यता यांचा परिचय होतो. दिलेल्या वेळेत किती प्रश्न अचूकतेने सोडवता येतात, हे कळते. हे पेपर महाविद्यालयातील किंवा कोचिंग क्लासच्या अध्यापकांकडून तपासून घेतल्यास विषयघटकातील नेमक्या चुका कळतात. त्या घटकांवर अधिक भर देता येणे शक्य होते आणि संकल्पना अधिक स्पष्ट करून घेता येतात.
या प्रश्नपत्रिका केवळ सरावासाठी असून यातील कोणतेही प्रश्न पुन्हा जसेच्या तसे विचारले जात नाहीत, ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा असल्याचे हे पेपर सोडवल्यावर लक्षात येऊ शकते. त्यामुळे एखाद्या वर्षी एखाद्या टॉपिकवर प्रश्न विचारले नसतील, तर त्याच टॉपिकवर दुसऱ्या वर्षी प्रश्न विचारले जातीलच, असे ठामपणे सांगता येत नाही. त्याचबरोबर याच टॉपिकवरचे प्रश्न येऊ शकतात, ही बाबसुद्धा ध्यानात घेणे गरजेचे आहे. या पेपरची उत्तरतालिका मिळाली तरी, सरावाचा मूळ उद्देश साध्य व्हावा यासाठी आधीच ती पाहू नये.
हा सराव पेपर घरीच सोडवायचा असल्याने, तो दिलेल्या वेळेत अगदी प्रत्यक्ष परीक्षेसारखाच द्यायला हवा. घरी असलेले कोणतेही अभ्यास साहित्य, मोबाईल आणि शिक्षकांची मदत अजिबात घेतली जाऊ नये.
याच संकेतस्थळावर मॉक टेस्टही देण्यात आली आहे. याचा उद्देश प्रत्यक्ष परीक्षेची तोंडओळख करून घेणे हा आहे. यातील एकही प्रश्न मूळ परीक्षेत विचारला जाईलच असे नाही. त्यामुळे पाठांतराच्या भानगडीत न पडलेले बरे. ही मॉक टेस्टसुद्धा प्रत्यक्ष परीक्षेच्या गांभीर्यानेच देणे आवश्यक आहे. तरच सरावाचा मूळ उद्देश साध्य होईल.
व्हिडिओ लेक्चर्स
एनटीएने जॉइंट एंट्रन्स परीक्षा (मेन) आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणे सुलभ जावे म्हणून, आयआयटी-पाल (IIT-PAL – प्रोफेसर असिस्टेड लर्निंग) व्हिडिओ लेक्चर्सची (अध्यापनाची) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांतील विविध घटकांवर हे व्हिडिओ लेक्चर्स आधारित आहेत. हे व्हिडिओ आयआयटीचे अध्यापक आणि विषयतज्ज्ञांकडून तयार करण्यात आले आहेत.
अकरावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना वेगवेगळे घटक उत्तम रीतीने समजून घेण्यासाठी आणि स्वयंअध्ययनासाठी हे लेक्चर्स उपयोगी ठरू शकतात. हे लेक्चर्स केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘स्वयंप्रभा’ या वाहिनीवर आणि दूरदर्शनच्या डीटीएच वाहिनी २२ वरही बघता येतात. या लेक्चर्ससाठी नोंदणी केलेले विद्यार्थी त्यांचे प्रश्न किंवा न आकलन झालेल्या घटकांविषयी शंका विचारू शकतात. आयआयटी-पालच्या चमूमधील तज्ज्ञ या शंकांचे निरसन करतात. निवडक प्रश्नांची उत्तरे संकेतस्थळावर ठेवली जातात. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही उत्तरे बघता येतात.
— सुरेश वांदिले