(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

डिजिटल करिअर संधी….(भाग एक) 

डिजिटल तंत्रज्ञानातील विस्मयकारक प्रगतिमुळे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये विविधांगी बदल घडताहेत. बहुतेक सर्व उद्योग आणि कंपन्या हे तंत्रज्ञान प्राधान्याने अंगिकारत असल्याने पारंपरिक पध्दतीच्या नोकऱ्यांना यापुढे फारसे स्थान मिळणार नाही. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या विविध पैलुंचे कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना यापुढे अधिकाधिक संधी मिळू शकते. डेल टेक्नॉलॉजी या संस्थेच्या अहवालानुसार २०३० पर्यंत या तंत्रज्ञानामुळे ८५ टक्के नव्या पध्दती आणि प्रकारच्या करिअर संधी निर्माण होतील. हे तांत्रिक बदल लक्षात घेऊन माहिती तंत्रज्ञान आणि संगणक शास्त्राशी संबंधित वेगवेगळया उच्चशिक्षण अभ्यासक्रमात प्रमुख वा सहाय्यक विषय घटक म्हणून प्रोग्रॅमिंग लँग्वेज, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सेक्युरिटी सारख्या विषय घटकांचा सध्या ठळकपणे समावेश करण्यात येत आहे.

या विषय घटकांना व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्येही  समावेश करण्यात येत आहे. ॲनॅलिटिक्स, डेटा सायंस, आयटी, फिनटेक अशासारखे स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम हे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या दोन्ही शाखांमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. अशी स्पेशलाईज्ड पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना नोकरी सुलभेतने मिळेलच शिवाय ते त्यांच्या क्षेत्रात नेतृत्व करुन प्रगतीचे टप्पे झपाट्याने गाठू शकतील. सध्या उदयास आलेले तंत्र आणि कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची कमतरता विविध देशांना भासत आहे. ही दरी वाढत चाललेली दिसते. त्यामुळे स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर मोठी मागणी राहू शकते.

() फिनटेक

भारतीय फिनटेक क्षेत्राची वार्षिक उलाढाल ३१ बिलियन डॉलर्स आहे. २०२५ पर्यंत ही उलाढाल ८४ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहचेल.

महसूलवृध्दी हा मुख्य उद्देश असूनही फिनटेक कंपन्या सध्या ग्राहकांच्या गरजेनुसार विविध उत्पादनांवर भर देतात. आपल्या देशाच्या अवाढव्य लोकसंख्येपैकी ३.७ टक्केच लोकसंख्या इक्विटी(कंपन्यांची समभाग गुंतवणूक) कडे वळली आहे . या संख्येत मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढू शकतात.

गुंतवणूक कशी करावी?कर्ज कसे घ्यावे? वित्तीय नियोजन, बचत, चांगल्या उत्पनवृध्दीसाठी गुंतवणूक अशासारख्या बाबींना फिनटेक कंपन्या प्राधान्य देत आहेत.

() ब्लॉकचेन

आपल्या देशात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा नुकताच वापर सुरु झाला असला तरी नजिकच्या काळात या क्षेत्राची झपाटयाने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२३ पर्यंत या तंत्रज्ञानाव्दाने आदानप्रदानाची संख्या १६ बिलियनपर्यंत पोहचू शकते. या तंत्रज्ञानाचा वापर बँकिंग, इंशुरन्स, हेल्थकेअर, लॉजिस्टिक्स आणि लोकप्रशासनात दिसू लागला आहे. इतरही कंपन्यांचा कल या क्षेत्रातील तंत्रकुशल मनुष्यबळाच्या भरतीकडे दिसून येतो. यामध्ये ब्लॉकचेन डेव्हलपर, ब्लॉकचेन सॉफ्टवेअर इंजिनीअर, ब्लॉकचेन सिस्टिम आर्किटेक्ट  अशा मनुष्यबळाचा समावेश असून आयबीएम, ओरॅकल, ॲमेझॉन, जेपी मॉर्गन, मायक्रोसॉफ्ट अमेरिकन एक्स्प्रेस, आदी कंपन्यांनी अशा तंत्रज्ञांना अधिकाधिक संधी देणे सुरु केले आहे. भारतातही अनेक कंपन्यांना अशा तंत्रज्ञांची गरज भासू लागली आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे क्रिप्टोग्रॅफीच्या माध्यमातून सतत विकसित होताना दिसते. त्याव्दारे डिजिटल माहिती सर्वत्र पाठवली जाऊ शकते मात्र त्याची कॉपी (नक्कल) करता येत नाही. वित्तीय देवाणघेवाण करण्यासोबतच, ज्या कोणत्याही बाबीस मूल्य (व्हॅल्यू/प्राइस) आहे, त्याची नोंद इथे केली जाते.

आता आपणास खिशातून पाकिट काढून व्यवहार करण्याची गरज भासत नाही. आपल्या हातातील स्मार्टफोन हा आपल्यासाठी ई-वॅलेट झाले आहे. मोबाईल तंत्रज्ञानात झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे आपल्या आर्थिक व्यवहारावर बरेच परिणाम झाले आहेत. डिजिटल वॅलेट- ई-कॉमर्स- कॅब ॲप्लिकेशन – थेट पैशाची देवाणघेवाण, यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाचे बदल आपण अनुभवत आहोत. हे सर्व बदल वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रकौशल्यामुळे शक्य झाले आहेत.

ब्लॉकचेनच्या शोधामुळे वित्तीय तंत्रज्ञानाने पुढचा टप्पा गाठला असून जागतिक पातळीवर ब्लॉकचेन तंत्राचा वापर झपाट्याने वाढताना दिसतो.

पारंपरिक पध्दतीच्या चलन व्यवहारापेक्षा ब्लॉकचेन या  आधुनिक पध्दतीने जागतिक पातळीवरील चलनव्यवहाराला नवा आयाम दिला आहे. या तंत्राशी निगडित पेमेंट सिस्टिम, स्टेबल कॉईन, सेंट्रल बँक डिजिटल करंसी, क्रिप्टोकरंसी, सप्लाय चेन, असे डिजिटल प्लॅटफॉर्म अधिकाधिक वापरले जात आहेत.

२००८ साली सतोशी नाकामोटो या इसमाने ब्लॉकचेन तंत्राला विकसित केले असे समजले जाते. त्यानंतर या तंत्राच्या बहुवीध स्वरुपात उत्क्रांती होत गेली. नाकामोटोने ब्लॉकचेन तंत्राचा वापर करुन बिटकॉईन या आभासी नाणेपध्दतीचा विकास केला. डिजिटल विश्वासाला वृध्दी करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असा विश्वास नाकामोटोने व्यक्त केला होता. २०१४ साली ब्लॉकचेन-टू, हे या तंत्राचे दुसरे रुप विकसित झाले. पैशाच्या/चलनच्या व्यवहारापलिकडे या तंत्राचा वापर या दुसऱ्या स्वरुपामुळे शक्य झाले. त्यानंतर इथेरिअयम ब्लॉकचेन प्रकियेव्दारे डिजिटल देवाणघेवाणीतील अधिक प्रगत टप्पा गाठला गेला.

आता व्हेनेज्युएला, होंडुरस आणि अनेक आफ्रिकन राष्ट्रे स्थानिक चलनापेक्षा आभासी चलनावर अधिक विश्वास ठेऊ लागले आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे, अधिकाधिक राष्ट्रे ही अमेरिकन डॉलर्स या चलनास अधिक विश्वासहार्य मानतात.

१९४० सालापासून डॉलर्स हे चलन तेलाच्या अर्थकारणाशी निगडित आहे. अनेक देश आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी डॉलर्स साठवतात किंवा विकत घेतात. तेल समृध्द देशांचा खर्च हा त्यांच्या उत्पनापेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या चलनाच्या मूल्यदरात कधीही घट होऊ शकते हे या देशातील नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या राष्ट्रातील नागरिक आपली संपत्ती ही सोने आणि बिटकॉईन्स सारख्या आभासी चलनात परिवर्तित करत आहेत. हे चलन साठवण्यासाठी सोपे, आणि व्यवहारासाठी सोईचे आहे. जगातील कोट्यावधी लोकांनी या पध्दतीचा स्वीकार केला आहे.

भारतात डिजिटल व्यापार, खरेदी आणि विक्री प्रचलित असली तरी रिझर्व्ह बँकेने यावर काही निर्बंध आणल्याने काहिंना हे व्यवहार बेकायदेशीर वाटतात. हे निर्बंध क्रिप्टोकरंसीची विक्री व खरेदी सेवा देण्यासंदर्भातील आहेत. काही कंपन्या, उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात कार्य करत आहेत. क्रिप्टोकरंसीची खरेदी-विक्री करुन नफा कसा मिळवता येईल, यासाठीही या कंपन्या प्रयत्नशील आहेत. अनेक देशांमध्ये सेंट्रल बँकेने डिजिटल करंसीच्या वापराबाबत विचारविनिमय सुरु केला आहे.

या सर्व बाबिंचा सखोल अभ्यास रिझर्व्ह बँकेकडून होत आहे. सध्या भारतात क्रिप्टोउद्योग हा कोणत्याही नियामकाशिवाय सुरु आहे. त्यास नियमांच्या चौकटित कसे बसवता येईल यावर विचार मंथन सुरु झाले आहे. शासकीय पातळीवर ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरंसीबाबत सकारात्मकता दिसून येते. या अनुषंगाने काही केंद्रीय मंत्र्याचा अभ्यासगटही स्थापन करण्यात आला. या अभ्यासगटाच्या अहवालानुसार या क्षेत्रासाठी नियमांची चौकट तयार केली जाऊ शकते. विकसनशील देशांसाठी वित्तीय कारभारासाठी क्रिप्टोकरंसी ही महत्वाची भूमिका पार पाडू शकते.

क्रिप्टो बँकिंगसाठी स्मार्टफोन आणि गतिमान इंटरनेट जोडणीची गरज भासते. स्मार्टफोनच्या आणि इंटरनेट डेटाच्या कमी होणाऱ्या किमती  यामुळे क्रिप्टोचलनाचा वापर नजिकच्या काळात मोठ्याप्रमाणावर वाढू शकतो, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारतात मोबाईल फोन आणि इंटरनेट सुविधेबाबत झालेली प्रगती प्रचंड आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारामुळे देशांतर्गत अर्थकारणात सर्वसमावेशकता येऊ शकण्याची शक्यता बऱ्याच तज्ज्ञांनी वर्तवली आहे.