डिजिटल करिअर संधी….(भाग दोन)
(१) डेटा ॲनॅलिटिक्स- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डेटा (विदा/विविध स्त्रोतांकडून गोळा होणारी माहिती) मुळे त्याचे विश्लेषण/उपयुक्तता आणि सुरक्षितता याविषयी अचुक आणि तातडिने निर्णय घेण्यासाठी या तंत्रज्ञाची गरज भासते. महत्वाच्या निर्णयासाठी कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या डेटा विश्लेषणाच्या निष्कर्षावर अधिकाधिक भर देऊ लागल्या आहेत. एका अहवालानुसार डिसेंबर २०२१ पर्यंत ९० लाखाच्यावर या मनुष्यबळाच्या जागा विविध कंपन्यांमध्ये रिक्त होत्या. ई- कॉमर्स, एडटेक
(एज्युकेशन टेक्नॉलॉजी), बीएफएसआय (बँकिंग, फायनांशिअल सर्व्हिसेस आणि इंश्युरंस), लॉजिस्टिक्स या क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अशा तज्ज्ञांची गरज भासते आहे. या कंपन्यामंध्ये डेटा सायंटिस्ट, अनॅलिस्ट स्पेशॅलिस्ट, डिसिजन सायन्स मॅनेजर, बिझिनेस ॲनॅलिस्ट, ॲनॅलिस्ट मॅनेजर, ऑपरेशन ॲनॅलिटिक्स मॅनेजर अशा संधी उपलब्ध झाल्या आहेत.
(२) क्लॉऊड कॉम्प्युटिंग – करोनामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कामकाजासाठी पारंपरिक पध्दतींपेक्षा क्लॉउुड तंत्रज्ञानासारख्या आधुनिक तंत्रज्ञान वापरास प्राधान्य दिले. या वर्षिच्या अखेरपर्यंत या क्षेत्रात १ मिलियन नोक-या उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये क्लाऊड डेव्हलपर इंजिनीअर, क्लॉऊउ नेटवर्क इंजिनीअर, क्लॉऊउ ऑटोमेशन इंजिनीअर, क्लॉऊउ सेक्युरिटी मॅनेजर अशा सारखी पदे भरली जात आहेत.
(३) आर्टिफिशियल इंजिनीअर- बहुतेक सर्वच कंपन्यांमधील विविध कामांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित तंत्रज्ञान मोठया प्रमाणावर वापरले जात आहे. यामुळे कंपन्यांमधील कार्यशैली आणि कामकाज पध्दतींमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येते. डेटा सायंटिस्ट/ सॉफ्टवेअर इंजिनीअर/ प्रॉडक्ट मॅनेजर अशा सारख्या मनुष्यबळाला या क्षेत्रात विविध संधी मिळू शकतात. असे कौशल्यप्राप्त केलेले उमेदवार झपाट्याने आपली प्रगती करु शकतात.
संधीचा फायदा घ्या
जगातील एकूण कार्यकारी मनुष्यबळामध्ये तरुणांचा सहभाग हा २५ टक्क्यांच्या आसपास असूनही ४० टक्के तरुणांना संधी मिळत नसल्याचे युनोस्कोच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. नोकरीच्या संधींपेक्षा नव्या तंत्रकौशल्याचा या तरुणांकडे असलेला अभाव, हे याचे मुख्य कारण असल्याचे, हा अहवाल सांगतो. युनेस्को, जागतिक कामगार संघटना आणि जागतिक बँकेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार तरुणांनी ऑनलाईन अध्ययन प्लॅटफॉर्मचा उपयोग करुन नवे तंत्र आणि कौशल्य हस्तगत केल्यास त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायंस, सायबर सेक्युरिटी, डेटा ॲनॅलिटिक्स या क्षेत्रात सुलभतेने रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
सुरेश वांदिले