तंत्रकुशलतेकडून आर्थिक स्वावलंबनाकडे
सध्या कौशल्य विकासाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कौशल्य म्हणजे एखादी कला विशेषत: तांत्रिक कला हस्तगत करणे. अशी तांत्रिक कला प्राप्त केलेल्या विद्यार्थी -विद्यार्थींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी सुलभतेने मिळू शकतात. १० वी नंतर काय करायचे असा प्रश्न पडणाऱ्या पालकांसाठी महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इंस्टिट्यूट) अशा संधी वर्षानुवर्षे देत आहेत.
महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक तालुक्यात किमान एक (शासकीय अथवा खाजगी) आयटीआय आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी शासकीय आयटीआय आहे. या सर्व शासकीय आणि खाजगी आयटीआयमधून दरवर्षी किमान दीड लाख मुला – मुलिंना शिल्प कारागिर योजनेतंर्गत तंत्रकुशल बनवले जाते. केवळ तरुणींसाठी १५ ठिकाणी आयटीआय आहे. (या शिवाय प्रत्येक आयटीआयमध्ये ३० टक्के जागा विद्यार्थीनींसाठी राखीव असतात.) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी २ स्वतंत्र आयटीआय तर या सवंर्गातील उमेदवारांसाठी स्वतंत्र तुकड्या ४३ शासकीय आयटीआयमध्ये आहेत. आदिवासी उमेदवारांसाठी ६१ तर शासकीय आदिवासी आश्रमशाळा आयटीआय – २८ , अनुसूचित जाती आणि नवबौध्द संवर्गासाठी उच्च स्तर आयटीआय – ४ आहेत. याशिवाय वर्धा येथे केवळ दिव्यांगासाठी आयटीआय आहे. द चिल्ड्रेन एड सोसायटी खाजगी औद्योगिक संस्था, मानखुर्द, कुर्ला मुंबई येथे केवळ अनाथ संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. द लेप्रसी मिशन, खाजगी शिक्षण संस्था पंचवटी, नाशिक येथील खाजगी आयटीआय मध्ये केवळ कुष्टरोगग्रस्त उमेदवारांना प्रवेश दिला जातो. क्विन्स मेरी खाजगी आयटीआय पुणे येथे संरक्षण सेवेतील व्यक्तिंच्या मुलांना प्रवेश दिला जातो. आपल्या राज्यात आयटीआयचे जाळे कसे विस्तृत आणि व्यापक आहे, ही बाब उपरोक्त माहितीवरुन सिध्द व्हावी.
शिकावू उमेदवारी योजना
महाराष्ट्रातील आयटीआयचे आणखी महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिकावू उमेदवारी योजना. आयटीआय मधील शिक्षण संपल्यावर प्रत्यक्ष कारखाना किंवा उद्योगातील यंत्रसामग्री हाताळण्याची अथवा त्यावर काम करण्याची संधी या योजनेंतर्गत संबंधित उमेदवारांना दिली जाते. राज्यातील ११ हजाराच्या आसपास उद्योग/कारखाने यामध्ये एक लाखाच्या आसपास अशी संधी उपलब्ध करुन दिली जाते. या काळात त्यांना शासनाच्या नियमानुसार विद्यावेतन दिले जाते. या काळात संबंधित उमेदवार कुशल कारागीर बनतो.
आयटीआय मधील प्रशिक्षण काळात उमेदवारांना विविध कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष कामकाज बघण्यासाठी नेले जाते. उद्योग व्यवसायातील तज्ज्ञांची व्याख्याने नियमितपणे आजोजित केली जातात. कॅम्पसमध्ये मुलाखती आयोजित केल्या जातात. शिकावू उमेदवारी आणि नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्य केले जाते.
प्रशिक्षण
आयटीआयमधे एकूण ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये अभियांत्रिकी गटातील एक वर्षं कालावधीच्या २३ आणि दोन वर्षे कालावधीच्या ३२ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्षे कालावधीच्या २४ व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ११ अभ्यासक्रमांसाठी १० उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी अर्हता आहे. तर ६८ अभ्यासक्रमांना केवळ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेचे, राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दिले जाते). या अभ्यासक्रमांमध्ये ७० टक्के भर प्रात्यक्षिकांवर व ३० टक्के भर सैध्दांतिक (थिअरी) वर दिला जातो.
इतर लाभ
१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआय मधून २ वर्षे कालावधीचा व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यांनी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा उत्तीर्ण केल्यास त्यांना १२ वीच्या समकक्ष समजले जाते. १० वी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांनी २ वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा उत्तीर्ण केल्यास त्यांना १० वीच्या समकक्ष समजले जाते. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल त्यांना पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गाला थेट प्रवेश दिला जातो.
इतर वैशिष्ट्ये
शासकीय आयटीआय कडे शासनाने अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिले असल्याने, या सर्वच आयटीआयमध्ये उत्कृष्ट अशा प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध आहेत. सर्वच शासकीय आयटीआयच्या स्वतंत्र आणि उत्तम अशा इमारती आहे. स्थानिक औद्योगिक गरजा लक्षात घेऊन या आयटीआयमध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
विविध विषयांमध्ये तंत्रकुशलता प्राप्त व्हावी म्हणून आयटीआय मध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमात काळानुरुप आणि गरजेनुसार बदल केले जातात. यातील काही अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षे, तर काहींचा एक वर्षं आणि काहींचा सहा महिने असा आहे. या सर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्हता ही १० उत्तीर्ण आहे. दहावीची परीक्षा ज्या जिल्ह्यातून दिली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या जिल्ह्यातील आयटीआयमध्ये ९० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
शासकीय आणि खाजगी आयटीआय मधील प्रवेश हे केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येतात. अशी पध्दत राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. या पध्दतीने सर्व प्रवेश प्रक्रिया या पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच होतात. त्यावर सर्वांनाच लक्ष ठेवणे शक्य होते.
प्रमाणपत्रांचे महत्व
व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती म्हणजे शिक्षण शुल्क परत मिळण्यासाठी विशिष्ट नमुन्यात अर्ज दाखल करावा लागतो. त्यासाठी सर्व गटातील उमदेवारांना पुढील कागदपत्रे जोडावी लागतात- आधार कार्ड, विद्यार्थी/विद्यार्थीनीचे नाव असलेली शिधा पत्रिका, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट), पालकांचा उत्पनाचा दाखला, जातिचा दाखला, अनुसूचित जमाती संवर्गातील उमदेवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र, खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी वैद्यकीय मंडळाने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, यामध्ये अपंगत्व कायमस्वरुपी असून त्याचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे आहे. पुढील वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत वैध असणारे इतर मागास वर्ग/विमुक्त जाती आणि भटक्या जमाती व विशेष मागास प्रवगासाठी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, (हे प्रमाणपत्र उपविभागीय दंडाधिकारी/ उपजिल्हाधिकारी/ जिल्हाधिकारी/ महानगर न्याय दंडाधिकारी यांच्याकडून प्राप्त करता येते.), भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र (यासाठी पुढील प्रमाणपत्र मान्य केली जातात – शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर उमेदवाराचे राष्ट्रीयत्व भारतीय म्हणून नोंद/ योग्य प्राधिकाऱ्याने दिलेले भारतीय पारपत्र/ उमेदवाराचे जन्म ठिकाण भारतात असल्याचा जन्म दाखला.),माध्यमिक शालांत परीक्षेची गुणपत्रिका, अलिकडील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
ही प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत. आयटीआय प्रवेशासाठी आणखी दीड- दोन महिनाच्या काळ आहे. त्यामुळे या कालावधित ही प्रमाणपत्रे आपल्या ताब्यात असलेली बरी. दहावीतील गुणांसोबत प्रमाणपत्रेही महत्वाची ठरतात. एखादे प्रमाणपत्र नसल्यास नुकसान सुध्दा होऊ शकते.
२०१९ सालापासून खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आयटीआयमध्ये जागा आरक्षित ठेवण्यात येतात. अशा उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
वाढीव गुण
आयटीआय प्रवेशासाठी पुढील बाबींसाठी वाढीव गुण दिले जातात. (१) इंटरिजिएट चित्रकला परीक्षा (ही परीक्षा उत्तर्णी झाल्याचे प्रमाणपत्र.), (२) क्रीडा (सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.), (३) तांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी (माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) प्रमाणपत्रावर तांत्रिक विषयाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.), (४) माजी सैनिक (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आई वडील संरक्षण सेवेत होते आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी (डोमिसाईल) असल्याचे प्रमाणपत्र), (४) संरक्षण सेवेतील कार्यरत व्यक्ती (संरक्षण सेवा प्रमाणपत्र आणि उमदेवाराचे आई वडील संरक्षण सेवेत होते आणि ते महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचे प्रमाणपत्र)
आपल्या मुलाचा कल, बौध्दिक क्षमता, आर्थिक परिस्थिती आदी बाबींचा विचार करुन पालकांनी आयटीआयचा पर्याय स्वीकारायला हवा. आयटआयटीमधील प्रशिक्षण या विद्यार्थ्याने मनापासून घेतले तर त्याचा भविष्याचा पाया पक्का करण्यासाठी मदतच होते. आयटीआयटमधून प्राप्त होणारी तंत्रकुशलता ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम करु शकते, ही बाब लक्षात ठेवायला हवी.
संपर्क-संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुख्य कार्यालय, ३, महापालिका मार्ग, टपालपेटी क्रमांक- १००३६, मुंबई, दूरध्वनी- ०२२ – २२६२०६०३, फॅक्स-२२६५९२३५, संकेतस्थळ- www.admission.dvet.gov.in, ईमेल –itiadmission@ dvet.gov.in
सुरेश वांदिले