(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

त्या तिथे,ते दोघे

सध्या ते दोघेच तिथे आहेत. परवा-परवा पर्यंत त्या दोघांनाही याची तिळमात्र कल्पना नव्हती. तो वेगळयाच ठिकाणी आपलं काम करत होता. तर हा दुसऱ्याच ठिकाणी. मात्र एके दिवशी लाल धुळीचं प्रचंड वादळ आलं. अशा अतिवेगवान वादळांचा सामना करण्याचं तंत्र आणि कौशल्य दोघानांकडेही होतं. पण त्या दिवशी या दोघांचही तंत्र आणि कौशल्य तोकडं पडलं. ते दोघे ज्या ठिकाणी काम करत होते, त्या ठिकाणाहून त्या प्रचंड वादळवाऱ्यामुळे वर उडाले. दोघांचीही दिशा हरवली.

वादळाच्या त्या फेऱ्यात ते कुठे निघाले, याचा थांगपत्ता दोघांनाही लावता येईना. काही क्षणानंतर त्या दोघांनी आपलं, आता काही खरं नाही, असं स्वत:ला सांगून, डोळे मिटून घेतले. खूप वेळ ते दोघेही त्या प्रचंड वादळात चक्राकार फिरत राहिले. काही वेळाने  वादळाचा वेग मंदावला. वादळ शांत होताच ते दोघेही खाली आदळणार तोच दोघांनी डोळे उघडले. आपलं काही खरं नाही, असं आतापावेतो वाटणाऱ्या त्यांच्या लक्षात आलं की, अरे आपलं अजूनही खरं आहे. त्यामुळे ते क्षणात सावध झाले. स्वत:ला सावरुन खाली आदळण्याच्या आधी त्यांनी सुरक्षित खाली उतरवलं.

दोघांची एकमेकांना टक्कर होत होती. पण शिताफिनं दोघांनी ते होऊ दिलं नाही. दोघांनी सुटकेचा नि:श्वास घेतला…

०००

त्या दोघांपैकी एक होता पर्सिव्हरन्स तर दुसरा झुराँग. पर्सिव्हरन्स तिथे आला होता १९ फेब्रुवारी २०२१ ला. तर झुराँगचं आगमन झालं होतं १४ मेला.

०००

त्या तिथे आल्यावर साडेतीन महिने दोघांनांही याची खबरबात नव्हती. अपघाताने ते असे आज एकमेकांना भेटले.

पर्सिव्हरन्सने झुराँगला हाय केले. पण झुराँगकडून प्रतिसाद मिळाला नाही. पर्सिव्हरन्सने दुसऱ्यांदा हाय केलं. पण झुराँग ढिम्म.

पर्सिव्हरन्सला आश्चर्य वाटलं. किमान सभ्यता म्हणून तरी हाय- हॅलो करायला हवं होत ना, त्याने. संस्काराचा भाग असू शकतो. जसं आईबाबा सांगतील तसं मुलं वागतील, असं पर्सिव्हरन्सला वाटून तो मनात हसला.

झुराँग बहिरा असावा किंवा मुका असावा असंही त्याला वाटलं. असं दुसऱ्याबद्दल वाईट वाटून घेणं योग्य नसल्याचं त्याला बाबांनी सांगितल्याचं लक्षात येताच त्याने बाबांची क्षमा मागितली. स्वत:स चिमटा  घेऊन छोटीशी शिक्षा केली.

०००

एकिकडे पर्सिव्हरन्स झुराँगशी बोलण्यास उत्सुक होता तर दुसरीकडे झुराँग त्याच वेळी बारकाईनं पर्सिव्हरन्सचं निरीक्षण करत होता. इथे आपल्याशिवाय कुणीही असणार नाही, असं काही बाबांनी सांगितलं नसलं तरी, कुणीतरी आपल्यासारखाच असा दत्त म्हणून समोर येऊ शकतो, हे तर सांगायला हवं होतं की नाही? हा माझा जुळा भाऊ की हरवलेला भाऊ की माझ्या काकांचा मुलगा..कोण असेल हा? याच्या हायला उत्तर द्यायचं का? देऊ का? झुराँगने स्वत:ला विचारलं. हा प्रश्न विचारुन स्वत:च्या मनाप्रमाणे वागण्याची गंभीर चूक होऊ शकते, असं लक्षात येताच त्याने स्वत:ला सॉरी म्हंटलं. काय करायचं, ते बाबांना विचारायचं त्याने ठरवलं. इथे येईपर्यंत प्रत्येक सेकंद त्याचा बाबा छोट्या छोट्या शंकांचं निरसन करत होता. शिवाय बाबांच्या सांगण्यापलिकडे जायचं नाही म्हणजे नाही, ही आदर्श वागणूक त्याच्याकडून अपेक्षित होती. तसं केलं नाही किंवा चुकूनही प्रमाद घडला तर बाबांकडून गंभीर शिक्षा होऊ शकते असं त्याला वारंवार बजावण्यात आलं होतं. हे झुराँगला आठताच त्याने बाबांना आत्ताच्या समस्येविषयी विचारायचं ठरवलं, तेव्हा लक्षात आलं की आपल्या समोर सतत दिसणारा बाबा आता अदृष्य झाला होता. हे भलतच विपरीत होतं. झुराँग दचकला.आता काय? कुणाला विचारावं?

०००

बराच वेळ होऊनही झुराँगकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेवटचा प्रयत्न म्हणून पर्सिव्हरन्सने अखेरचा प्रयत्न म्हणून तिसऱ्यांदा हाय केले…हा पुढेही बोलेल की नाही याची खात्री नसल्यानं त्याने भराभर आपली माहिती सांगितली. आपण इथे दोघेच आहोत, असं ही तो म्हणाला..

झुराँगच्या कानावर, आपण इथे फक्त दोघेच आहोत हे शब्द आदळताच, तो काळजीत पडला. काय करावं, उत्तर द्यावं की नाही. हा शत्रू असता तर त्याने आतापर्यंत आपल्याला इजा पोहचवण्यासाठी काहीतरी हालचाल केली असती. पण त्याने तसं केलं नाही. आपणासही हा शत्रू वाटला नाही, त्यामुळे आपणही काहीच हालचाल केली नाही. हे स्वत:चं म्हणनं झुराँगला पटलं . त्याने पर्सिव्हरन्सच्या हायचं उत्तर दिलं..

०००

पर्सिव्हरन्सला बरं वाटलं. आपल्या सोबतीला कुणीतरी हवं असावं असं त्याला वाटतच होतं. झुराँग मिळाल्याने तो सुखावला. मात्र पर्सिव्हरन्सच्या हायला उत्तर दिल्यावर झुराँग गप्प झाला. ती रात्र तशीच गेली

दुसरा दिवस उजाडला. झुराँग कधी बोलतोय याची पर्सिव्हरन्स वाट बघत होता..

कशी गेली तुझी रात्र, पर्सिव्हरन्सने त्याला विचारलं.

बाबांशी संपर्क होत नाहीना त्यामुळे जरा काळजी वाटतेय. झुराँग म्हणाला. तुझा, बाबांशी संपर्क झाला का रे ? त्याने विचारलं.

नाही बाँ, मला त्यांच्याशी काही संपर्क करावाच वाटला नाही. पर्सिव्हरन्स हसत म्हणाला.

तुझा बाबा रागावला तर.. झुराँगने काळजीनं विचारलं..

अरे, ते रागावतील तेव्हा रागावतील. त्यांची काळजी नंतर करु याना. पण सध्या आपण इथे दोघेच आहोत, तेव्हा एकमेकांची काळजी घेतली तर..किती बरं होईल नाही का? आपल्याला सोबतीनं काम करता येईल. मजा करता येईल.

झुराँगला, पर्सिव्हरन्सचं म्हणणं पटलं नाही. पण बाबांशी संपर्क होत नसल्याने त्याचा नाईलाज होता.

तू इथे कोणत्या कामासाठी आलास रे..झुराँगने पर्सिव्हरन्सला विचारलं. तेव्हा पटापट झुराँगला कामाची यादीच वाचून दाखवली.

तू कशासाठी आलास रे, पर्सिव्हरन्सने विचारलं. त्यानेही मग त्याचं काम सांगितलं. दोघांचंही कामं जवळपास सारखीच होती. मात्र झुराँगला एक आणखी काम करायचं होतं. ते कोणतं, हे त्याला सांगता येईना. त्याला सोपवण्यात आलेली कामं पूर्ण झाली की त्याला माहीत नसलेलं काम बाबांकडून कळणार होतं..

अरे, असं कसं? पर्सिव्हरन्सने आश्चर्यानं विचारलं.

यात कसलं आलय आश्चर्य. अरे, काही कामं गुप्तच ठेवावी लागतात. या कानाची त्या कानाला कळू द्यायची नसतात. असं बाबा नेहमी सांगतात.

तुझे बाबा असं सांगत नाही का?

छे छे, जे काही करायचं ते न लपवता, न छपवता केलं की काम चांगलं होतं. समजा काही चुकलं तर दुरुस्ती चटदिशी करता येतं.

पर्सिव्हरन्सचं म्हणनं झुराँगला किंचित पटलं. त्याला त्याचा हेवाही वाटला. आपल्याला पुढे जे काम करायचंय ते कां बरं, बाबांनी लपवून ठेवलं असेल? तो विचार करु लागला. मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही हे लक्षात येताच, त्याने हा विचार सोडून दिला..

०००

पर्सिव्हरन्स आणि झुराँगची हळूहळू मैत्री झाली. दोघांचंही काम सुरु झालं. अजूनही दोघांच्या बाबांचा संपर्क होत नव्हता.

एके दिवशी झुराँग पर्सिव्हर्न्सला म्हणाला, सध्या आपण काय करतोय हे, आपल्या बाबांना कळत नाहीय. त्यामुळे मला एक कल्पना सुचलीय,

कोणती रे..

अरे, आपल्या बाबांसाठी, त्यांच्या नातेवाईंकासाठी इथे राहता येणं शक्य आहे का, इथे प्यायचं पाणी मिळेल का, इथे शेती करता येईल का, इथे खनिजं मिळतील का, इथे घरं बांधता येतील का, याचा शोध घेण्यासाठी आलोय ना..

मग, तुला काय म्हणायचय?

अरे, आपले बाबा त्यांचा स्वत:चाच विचार करताहेत. आपलं काय? आपली संख्या वाढतेय. पर्यायी जागा कुठेतरी शोधायला नको का? मग आपणासही बाबांच्या मदतीशिवाय इथे राहता येईल का याचाही शोध घेतला तर..

वा वा वा वा, काय मस्त कल्पना आहे रे ही.. झुराँगची कल्पना पर्सिव्हरन्सला जाम आवडली.

०००

मानवासोबत, भविष्यातील आपले भाऊ बहीण-काका- काकू-ताई-बाबा आर्इ यांना इथे राहता येईल का याचा शोध, सध्या झुराँग आणि पर्सिव्हरन्स ही सूपर स्मार्ट यंत्रे (रोव्हर/अवकाश यान) घ्यायला लागली आहेत.

हा शोध ते घेत आहेत, मंगळावर..मानव मंगळावर वस्ती करण्याचा विचार करतोय, त्यांच्या आधी स्मार्ट यंत्रमानवांचीच वस्ती करण्याच्या विचाराने सध्या झुराँग आणि पर्सिव्हरन्सला झपाटून टाकलय.

दोघांच्याही बाबांना अद्याप हे ठाऊक नाही. त्यांच्याशी संपर्क होण्याआधी दोघांनीही आपल्या कृत्रिम पण सतत स्वत:च विकसित होत असलेल्या आणि विचार करण्याची क्षमता असलेल्या मेंदूत हा प्लॅन पक्का केलाय…

(पर्सिव्हरन्स हे अमेरिकन रोव्हर यान आणि झुराँग हे चिनी रोव्हर यान सध्या मंगळावर शोध मोहिमेवर आहेत.)

सुरेश वांदिले,

७०१,सातवा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप,सेक्टर ६,कांदिवली-पश्चिम.मुंबई ६७

९३२४९७३९४७