दहा रुपयात इतिहास?
गेल्याच आठवड्यात तेजोमयी आणि तिचे आई-बाबा त्यांच्या मित्रांसमवेत, राजस्थानच्या सहलीला गेले होते. वेगवेगळ्या गड-किल्ल्यांना भेटी देत ते उदयपूर जवळील कुंभलगड या किल्ल्यावर पोहचले.
हा किल्ला सात पर्वतरांगांच्या आड दडलेला असल्याने तो शत्रूपासून बराच काळ सुरक्षित राहिला. महाराणा प्रताप यांचे वडील राणा उदयसिंग यांनी राणा प्रताप यांना बाळपणी शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या किल्ल्यात लपवून ठेवले होते. या किल्ल्याच्या भवती ३६ किलोमीटर लांबीची भिंत संरक्षणासाठी बांधलीय. ग्रेट वाल ऑफ चायना नंतरची दुसऱ्या क्रमांकाची ही भिंत. अद्यापही उत्तमरितीने शाबूत असलेली. सध्याच्या किल्ल्याचे बांधकाम हे राणा उदयसिंग यांनी केले असले तरी या किल्ल्यास प्राचीन असा इतिहास आहे. असा इतिहास जाणून घेतला तरच कोणत्याही किल्ल्याची सफर जिवंत होते.
हा इतिहास सांगून किल्ला दाखवणारे गाइड सोबतीला घेतलं की ते आपणास बरोबर महत्वाच्या बाबी दाखवतात. त्यांच्या ओघवत्या भाषेत इतिहास जिवंत करतात. तेजोमयीच्या बाबांनी किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी गाइडबद्दल विचारणा केली. पण सर्व गाइड पर्यटकांना घेऊन किल्ल्यात गेले होते.
आता काय करायचं, हा प्रश्न सर्वांना पडला. हॉटेलमधील रुमवर जाऊन राहण्याऐवजी आपणच किल्ला बघू या, असं सर्वानुमते ठरलं.
किल्ल्याच्या पायऱ्यांवरुन सर्वजण वर चढू लागले. पायऱ्यांच्या वळणावळणावर पडलेल्या इमारती, खोलगट परिसर, मध्येच मंदिर , एखाद दुसरी विहीर, भव्य चौक, त्यावर हत्तींची पेंटिग, अजुनही सुस्थितीत असणारी शिल्पं इत्यादी गोष्टी दिसत होत्या. ते बघायचं, त्यांची छायाचित्र काढायची. पुढे जायचं, असा क्रम किल्ल्याचा शेवट येईपर्यंत सुरु होता.
सगळाच प्रवास निरस होता. निर्जीव आणि तुटक्या-फुटक्या वास्तुंमध्ये प्राण ओतण्याचे काम गाइडचे शब्द करतात, ही बाब तेजोमयीच्या लक्षात आली. पण गाइडच उपलब्ध नसल्यावर, करणार तरी काय ? असं कुणीतरी म्हणालं. किल्याच्या शेवटच्या टोकावर सर्वांनी छायाचित्रं काढली. थोड्यावेळ बसून सर्वजण परतीच्या प्रवासाला लागले.
काही अंतरावर मागून एक आवाज आला, मी सांगू का इतिहास.. एक १० वर्षांची मुलगी म्हणत होती. मी सांगू का इतिहास..सर्वांनी मागे वळून बघितलं. ती मुलगी त्यांच्याजवळ आली.
मी इथेच राहते. मला या गडाचा इतिहास पूर्ण पाठ आहे. मी तुम्हाला चांगलं सांगू शकते. ती मुलगी म्हणाली.
सर्वांनी नेत्रपल्लवी केली. त्याचा भाव असा होता की, या मुलीकडून इतिहास समजून घ्यायला हरकत नसावी. गाइडपेक्षा ही मुलगी अधिक चांगली सांगू शकेल, असं कुणीतरी म्हणालं.
त्यांचं म्हणणं सर्वांना पटलं. त्यांनी तिला किल्ल्याचा इतिहास सांगण्यास सांगितलं. ती म्हणाली दोनशे रुपये फी लागेल.
दोनशे रुपये..एक काका आश्चर्यानं म्हणाले.
त्यात काय? गाइडची फी पाचशे रुपये आहे ना. मग द्यायला काय हरकत आहे, असं तेजोमयीस सांगावं वाटलं. तिने सांगण्याचा प्रयत्न केला तर आईने तिला चूप बसवलं..
चला तर एका झाडाखाली बसून मी तुम्हाला इतिहास सांगते, ती मुलगी पुन्हा म्हणाली. दोनशे रुपये फी सर्वांना खूप वाटली म्हणून त्यांनी इतिहास समजून घ्यायला नकार दिला आणि मंडळी पुढे निघाली..
त्या मुलीचा पाठीमागून आवाज आला..
१०० रुपये द्या साहेब..
सर्वांनी मागे वळून पाहिलं..ती मुलगी धावत आली. मग सांगूना साहेब…तिने विचारलं…ग्रुपमधील काहीजण तयार झाले. पण एक काका म्हणाले नको नको.. हिच्याकडून इतिहास समजून घेतला तर दुसरे गाइड आपणास अडचणित आणू शकतात..
तो कसा काका, न राहवून तेजोमयीनं विचारलं..
गाइड गाइड मध्ये स्पर्धा असते. काही जण अशा लहान मुलांकडून आपली काम करुन घेण्याची शक्यता असते. मात्र लहान मुलांकडून काम करायचं नाही, हा कायदा आहे. असं कुणी करताना दिसलं तर ते आपली तक्रार करु शकतात. काकांनी सांगितलं.
ग्रुपमधील सर्वांना काकांचं म्हणणं पटलं असावं. तेजोमयीस मात्र यातलं काहीही कळलं नव्हतं. ते तिला विचारायची हिम्मत झाली नाही. सर्वांनी १०० रुपयांमध्ये इतिहास समजून घेण्यास नकार दिला आणि पुढे चालू लागले.
साहेब दहा रुपये..पाठीमागून केविलवाणा आवाज आला. ग्रुपमधील मंडळीपैकी कुणीही तिच्याकडे बघितलं नाही.
मात्र तेजोमयीच्या कानावर तो केविलवाणा आवाज सारखा आदळत राहिला. तिने पाठिमागे वळून बघितलं. ती मुलगी हाताचे दोन्ही पंजे दाखवून दहा रुपये असा इशारा करत होती..
गडाचा इतिहास समजून घेण्यासाठी काका मंडळींना दहा रुपयेही देणे जड जातय याचं तेजोमयीस दु:ख झालं. तिने आपल्या स्कर्टच्या खिशात हात घातला. पण तिच्याकडे पैसे नव्हते. फक्त कॅडबरीचचं नुकतच घेतलेलं पाकिट होतं. तेजोमयीने एक क्षण विचार केला. ती मागे वळली. पळत जाऊन तिने ते कॅडबरीज त्या मुलीला दिले. मुलीच्या डोळयात पाणी तरळले..तेजोमयीने येणारा हुंदका कसाबसा थोपवला..
सुरेश वांदिले