दही खाऊ की मही
तेजोमयी आपल्या काकांची फार लाडकी. त्यामुळे ते जेव्हा-जेव्हा भोपाळ वरुन तिच्या भेटिला येत, तेव्हा-तेव्हा तिच्यासाठी खूप खाऊ आणि गोष्टीची पुस्तकं, खेळणी घेऊन येत.
घरी आल्यावर थोडं स्थिरस्थावर झाले की ते तेजोमयीसाठी आणलेल्या सर्व वस्तू, खेळणी आणि पुस्तकं तिला देत. त्यांच्याकडे बघून तेजोमयी हरखून जायची. तिची अवस्था मग हे बघू की ते बघू, हे चॉकलेट खाऊ की ते बिस्किट खाऊ, कॉमिक्स पुस्तक हातात घेऊ की नवीन बाल कादंबरी बघू असं व्हायचं. म्हणजे सगळा गोंधळ. कधी याच्यावर नजर टाक, तर कधी त्याच्यावर नजर टाक.
तिच्या या गोंधळलेपणाची अलेक्झांडर (द डॉगी) ला मोठी गंमत वाटत असे. काकांनी आणलेला खाऊचा पसारा तेजोमयीने मांडला की हा सुध्दा तिच्या बाजूला बसून निरीक्षण करत असे. वस्तूंच्या निरीक्षणापेक्षा तेजोमयीच्या हालचालीकडे त्याचं जास्त लक्ष असायचं. त्यामुळे सतत या वस्तूवरुन त्या वस्तूवर जाणाऱ्या तेजोमयीच्या हाताप्रमाणे त्याच्या मानेची आणि डोळयाची हालचाल व्हायची. थोड्यावेळाने कंटाळा आला किंवा मान दुखली की अलेक्झांडर मग स्वत:च एखादी वस्तू तोंडात पकडून तेजोमयीपुढे टाकायचा. तेव्हा तेजोमयीससुध्दा सुटका झाल्यासारखी वाटायची. हीच ती वस्तू सर्वात आधी आपणास उघडून बघायची किंवा खायची होती, असं ती मग काकांना म्हणायची. तेव्हा काका, आई-बाबा सर्वजण मनमुराद हसत असत.
अलेक्झांडरची पाट थोपटून आई त्याला शाबासकी देत असे.
आँ,मला कशाला बुवा शाबासकी, असे भाव अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर त्यावेळी उमटत असे. अशावेळी आईकडे बघण्याची त्याची सवय होती. त्याने तसं बघितलं की, ठोंब्या तुला नाही कळणार ते. असं काहीसं आई त्याला सांगायची. तो सुध्दा आपल्याला काहीच कळत नाही, आई सांगतेय ते खरच असलं पाहिजे असं समजून मान खाली करायचा आणि शेपटी हलवत आईच्या अवतीभवती फेर मारायचा.
एकदा असेच काका भोपाळवरुन आले असताना तेजोमयी सोबतच त्यांनी यावेळी अलेक्झांडरसाठीही बरीच खेळणी आणि त्याच्या आवडीची वेगवेळया कंपनीची बिस्किटं आणली. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या वस्तू दाखवल्यावर एका क्षणात अलेक्झांडरने एका खेळणीवर झडप घातली आणि तो खेळूही लागला. मात्र तेजोमयीस आता सर्वप्रथम काय घ्यावं या प्रश्नानं गोंधळवून टाकलं.. पुन्हा तिची यावरुन त्यावर नजर आणि हात जाऊ लागला. हे की ते ,ते की हे..यातच पंधरा मिनिटं गेली.
बाबा ही सारी गंमत बघत होते. तेजोमयीस जवळ घेऊन म्हणाले,
तुझं दरवेळेला असं, दही खाऊ की मही खाऊ होतं…मजेशीर असतो हा तुझा गोंधळ..
बाबा तुम्ही काय म्हणालात, आता दही खाऊ की मही खाऊ असच ना..
हो असचं नाही, हेच म्हणालो….बाबा उत्तरले
माझ्या गोंधळाशी आणि या दहीमहीचा काय संबंध..तिने विचारलं..
अगं, मी सांगतो …काका तिला जवळ घेत म्हणाले,
तुझ्यापुढे खूप साऱ्या वस्तू टाकल्या किंवा दिल्या की तुला आधी ही वस्तू घेऊ की ती वस्तू घेऊ असं नेहमी होतं. म्हणजे तुला निर्णय घेणं अवघड जातं. या स्थितीला दही खाऊ की मही खाऊ असं म्हणतात.
यातलं दही मला कळलं..पण मही म्हणजे काय हो काका?
अग मही म्हणजे मंथन करणं किंवा घुसळणं. ते केलं की येतं लोणी किंवा ताक. तेव्हा प्रश्न पडतो किंवा कळत नाही की आता दही खायचं की ताक प्यायचं किंवा लोण्यावर ताव मारायचा,तेव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो.
अलेक्झूचं मात्र तसं झालं नाही.त्याच्या पुढयात पडलेल्या वस्तूतून त्याने चटदिशी वस्तू निवडली. त्याच्या मनात काही गोंधळच नाही. त्यामुळे त्याला त्या वस्तूशी झटपट खेळणं सुरु करुन आनंद घेता आला. बाबा म्हणाले.
दही खाऊ की मही खाऊ असं करत बसलो ना की मग काहीच धड होत नाही. त्यामुळे कधीही फार दोलायमान स्थितीत राहायचं नाही. ते टाळलं की वेळ वाया जात नाही…आपण चटदिशी निर्णय घेऊ शकतो याचा आत्मविश्वास सुध्दा येतो. बरोबर ना रे अलेक्झू…..काका अलेक्झांडरकडे बघत म्हणाले. पण पठ्ठयाचे लक्ष कुठे होते, तो आपल्या खेळण्यात पुरता रंगून गेला होता..
सुरेश वांदिले