धूर आणि धोका!
दोन दिवसांपासून अलेक्झांडर ठराविक वेळी गॅलरीत जाऊन बाहेर बघायचा. त्यावेळी तो बराच अस्वस्थ असायचा. ही बाब अलेक्सा गोर्जीच्या लक्षात आली. तिने तसं तेजोमयीला सांगितलं. तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याच वेळेला अलेक्झांडर गॅलरीत गेला, तेव्हा दोघीही त्याच्या पाठीमागे गेल्या.
गॅलरीच्या बाजूला नाला वाहतो. तिथे पायवाट आहे. तिथे एक व्यक्ती आपल्या शेपूटवाल्या दोस्ताला घेऊन आली. अलेक्झांडर त्या दोघांकडेही बघू लागला. त्या व्यक्तीने सोबत चेंडू आणला होता. तो त्याने दूरवर फेकला. त्या चेंडूच्या पाठीमागे डॉगी पळाला. तो तिकडे जाताच त्या व्यक्तीने सिगारेट शिलगावली. तोंडात चेंडू घेऊन डॉगी आला, नि त्या व्यक्तीच्या अवतीभवती खेळू लागला. त्या व्यक्तीचं धूम्रपान सुरूच होतं. इकडे अलेक्झांडर चुळबूळ करू लागला. त्याची अस्वस्थता वाढली. हे गोर्जी आणि तेजोमयीच्या लक्षात आलं. तेजोमयीने त्याला जवळ घेऊन विचारलं,
“काय झालं अलेक्झू तुला?”
अलेक्झांडरने तिचं लक्ष गॅलरीच्या बाहेर वेधलं. पायवाटेवर एका ठिकाणी बसून धूम्रपान करणारी व्यक्ती आणि तिच्या अवतीभवती खेळणाऱ्या डॉगीशिवाय तिथे कुणी नव्हतं.
“गोर्जे, तुला काही वेगळं दिसतंय का?” तेजोमयीनं विचारलं. गोर्जीनं नकारार्थी मान हलवली. थोड्या वेळाने ती व्यक्ती डॉगीला घेऊन निघून गेली.
अलेक्झांडरची अस्वस्थता काही कमी झाली नाही. तो कान खाली टाकून आतल्या खोलीत जाऊन बसला. दोघीही त्याच्या पाठोपाठ खोलीत गेल्या.
“याला बरं वाटत नसेल ना?” तेजोमयीने गोर्जीला विचारलं. गोर्जीने डोळ्यातील स्कॅनरने अलेक्झांडरच्या मेंदूतील विचारांचं विश्लेषण केलं.
“बापरे!” मध्येच गोर्जी पुटपुटली.
“काय झालं?” तेजोमयीने घाबरून विचारलं.
“धूम्रपान करणारी व्यक्ती आणि डॉगी?”
“ते कधीचेच निघून गेले.”
“अलेक्झूला त्या डॉगीची काळजी वाटतेय.”
“तो, त्या व्यक्तीसोबत मजेत खेळत होता.” तेजोमयीनं गोर्जीच्या लक्षात आणून दिलं.
००००
बराच वेळ होऊन तिघेही दिवाणखान्यात आले नाहीत म्हणून आई-बाबा आतल्या खोलीत आले.
“आज तुम्हा तिघांनांही जेवायचं नाही का?” आईने विचारलं. तिचं लक्ष खाली मान घालून बसलेल्या अलेक्झांडरकडे गेलं.
“ठोंब्या, तुला काय झालं?” आईनं विचारलं. अलेक्झांडर आईच्या कुशीत शिरला.
“स्वारी, नेहमीसारखी उत्साही दिसत नाही.” म्हणाले. तेव्हा गोर्जीने त्यांना आतापर्यंतचा सगळा घटनाक्रम सांगितला.
“बापरे!” बाबा म्हणाले.
“काय झालं?” आईनं विचारलं. तेव्हा बाबांनी त्यांच्या लक्षात आलेली गोष्ट सगळ्यांना सांगितली. सर्वांच्या चेहऱ्यावर काळजी उमटली.
०००
दुसऱ्या दिवशी सकाळी ती व्यक्ती पुन्हा डॉगीला घेऊन आली. तिच्या अवतीभवती डॉगी खेळत असतानाच तिचं धूम्रपान सुरू झालं. अलेक्झांडरने आज बाबांना ओढतच गॅलरीकडे आणलं. बाबांनी बाहेर बघितलं. त्यांच्या लक्षात सारं काही आलं. ते लगेच अलेक्झांडरला घेऊन पायवाटेवर गेले.
त्या व्यक्तीचा डॉगी, अलेक्झांडरला बघून गुरगुरू लागला. अलेक्झांडर मात्र शांत होता. त्या व्यक्तीने तिच्या डॉगीला आवरलं. सिगारेट खाली टाकून विझवली. अवतीभवती मात्र सिगारेटचा धूर आणि वास काही काळ तसाच राहिला. त्यामुळे बाबांना ठसका बसला.
“हे बघा, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं बरोबर नाही.” बाबा त्या व्यक्तीला म्हणाले. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. बाबांच्या ते लगेच लक्षात आलं,
“माझं बोलणं तुम्हाला आवडणार नाही. पण धूम्रपान आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं, हे तुम्हाला ठाऊक असेलच. पण ते या मुक्या प्राण्यांसाठीसुद्धा घातक ठरतं. ते बिचारे बोलू शकत नाहीत, पण आपल्यासारख्या सुज्ञांना ते कळायला हवं ना.”
“हे बघा, उगाच शहाणपणा करू नका. ही पायवाट सार्वजनिक असली तरी इथे कुणीच येत नाही. म्हणून मोकळ्या हवेत, माझ्या डॉगीला फिरायला घेऊन येतो.”
“अहो, ते चांगलंच आहे. पण या मोकळ्या हवेत तुम्ही सिगारेटचा धूर सोडून हवा प्रदूषित करता. ही प्रदूषित हवा तुमच्या डॉगीच्या फुफ्फुसात जाते. त्याचा फटका त्या बिचाऱ्याला बसू शकतो. आमच्या अलेक्झांडरने हे दोन दिवसांपूर्वीच ओळखलं. तेव्हापासून तो अस्वस्थ आहे. तो आपल्याला बोलून सांगू शकत नाही, पण तो काळजी व्यक्त करतोय. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. बाकी तुमची मर्जी.” बाबा म्हणाले.
“खरंच की, याचा मी विचारच केला नव्हता.” ती व्यक्ती खेदानं म्हणाली. यापुढे आपल्या डॉगीसमोर धूम्रपान करणार नाही असं आश्वासन देऊन ती व्यक्ती निघून गेली. जाताना त्या व्यक्तीने अलेक्झांडरची पाठ थोपटून थँक्यू म्हटलं. बाबांनी गॅलरीकडे बघितलं. आई, तेजोमयी आणि गोर्जी तिघीही टाळ्या वाजवत होत्या.