(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

धोरणकर्त्यांसाठी दिशादिग्दर्शन   

विविध प्रयोग आणि अभ्यासाव्दारे मिळालेल्या माहितीवर आधारित निष्कर्ष काढण्यासाठी सांख्यिकी तंत्राचा वापर केला जातो. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध प्रश्न आणि समस्या यांची माहिती गोळा करण्यासाठी या कौशल्याचा वापर केला जातो. बेरोजगारी, दरडोई उत्पन्न, लोकसंख्येची वाढ, गृहनिर्माण, वैद्यकीय सोईसुविधा याविषयीचे ठोकताळे बांधणे आणि उपाययोजना सुचवणे यासाठी या माहितीचा वापर केला जातो.

धोरणकर्त्यांना  निर्णय घेणे सुलभ जाईल असे विश्लेषण करण्याचे तंत्र या तज्ज्ञांना अवगत करावे लागते. वेतन, मूल्य, वेळ निर्धारण, पुरवठा व मागणी, या घटकांच्या विश्लेषणात हे तज्ज्ञ महत्वाची भूमिका बजावतात आणि उत्पादन वृध्दीत हातभार लावतात.

लेखा आणि लेखापरीक्षण- लेखांकन आणि लेखापरीक्षणासाठी सॅम्पल साइज म्हणजे विशिष्ट कालावधीची माहिती निर्धारित केली जाते. सांख्यिकी तंत्राच्या मदतीने निष्कर्ष काढले जातात. ते अचुकतेच्या आसपास पोहचणारे असतात. शासनाचे विविध निर्णय आणि धोरणांचा आधार सांख्यिकी माहिती असते. त्याद्वारे प्रशासकीय निर्णय घेतले जातात. विविध शासकीय संस्था, सांख्यिकी तज्ज्ञांना लोकसंख्या, आर्थिक उपाययोजना, बेरोजगारी, साक्षरतेचा दर, कुपोषण, अपघात, आत्महत्या अशा विविध कारणांनी होणारे मृत्यू, इतर सामाजिक समस्यांचे याबाबतीतल्या उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्यासाठी बोलावत असतात.

सध्या वेगवेगळया कंपन्या, संस्था, कार्पोरेट हाऊसेस आणि उद्योगांकडे विविध प्रकारच्या माहितीचा प्रचंड साठा गोळा होत आहे. समाजमाध्यमांचा वापर करुन फेसबुक, गुगल, व्हॉटस ॲप या कंपन्या आपली व्यक्तिगत माहिती गोळा करताहेत. यासर्व माहितीच्या साठयाचा उपयोग त्याच्या विश्लेषणानंतरच होऊ शकतो. असे विश्लेषण करण्याचे कौशल्य सांख्यिकी तज्ज्ञांनी प्राप्त केले असते.

नैसर्गिक आणि समाजशास्त्र – नैसर्गिक आणि समाजशास्त्राच्या सर्व शाखांमध्ये सांख्यिकी माहिती महत्वाची भूमिका बजावते. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, हवामानशास्त्र या शास्त्रांमधील विविध प्रयोगांचे निष्कर्ष हे सांख्यिकीय माहितीद्वारे तपासले जाऊन त्याचे विश्लेषण केले जाते.

 खगोल शास्त्राचा अभ्यास-खगोलशास्त्राच्या अभ्यासात अतिप्राचिन काळापासून सांख्यिकीय माहितीचा वापर केला जात आहे. ग्रहताऱ्यांचे अंतर, आकार, घनता यांचा अभ्यास निरीक्षणाने केला जातो. त्यात येणाऱ्या त्रुटी या सांख्यिकीय साधनांचा वापर करुन दूर केल्या जातात.

वैद्यकीय क्षेत्र – उपलब्ध माहितीच्या साठ्याच्या आधारे विविध आजारांचा प्रभाव, देखभाल यांचे विश्लेषण केले जाते. (करोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात याचा फार मोठा उपयोग वैद्यकशास्त्रज्ञांना झाला. सांख्यिकीशास्त्राचा वापर करुन कानपूर आयआयटी येथील तज्ज्ञांनी भारतात चौथ्या करोना लाटेची भीती नसल्याचे स्पष्ट केले आहे.) विविध प्रकारच्या वैद्यकीय संनियंत्रणासाठी ही माहिती उपयुक्त ठरते. औषधी, नवी उपकरणे आणि साधने, एखाद्या आजारावर मात करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरु शकतात, याचे सांख्यिकीय विश्लेषण औषध निर्माण कंपन्या, वैदयकीय संशोधन केंद्रे, अन्न व औषध प्रशासन यांना देण्याचे काम असे तज्ज्ञ करतात.

कृषी आणि पर्यावरण- कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी शेती आणि शेतीआधारित व्यवसाय / उद्योगातील माहितीचा वापर वेगवेगळे निष्कर्ष काढणे, भाकित वर्तवणे यासाठी करतात. हवा, पाणी, मृदा प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांच्या सांख्यिकीय अहवालाचे संशोधन आणि विश्लेषण यासाठी या तज्ज्ञांची गरज भासते.

   प्लेसमेंट आणि संधी

इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांची संरचना अशा पध्दतीने करण्यात आली आहे की तो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यास गणित, सांख्यिकी, संगणकशास्त्र, गणितीय भौतिकशास्त्र याविषयांमध्ये उच्च शिक्षण घेता येणे सुलभ जाते.  गणित  आणि सांख्यिकी विषयाचा ज्या ठिकाणी थेट उपयोग केला जातो, तिथे या विद्यार्थ्यांना करिअरची संधी तत्काळ मिळते. 

  विद्यार्थ्यांना पुढील ठिकाणी प्लेसमेंट्स मिळाल्या आहेत – एआयजी, अमेरिकन एक्स्प्रेस, एएनझेड, एबीइनव्हेब, ॲक्सिस बँक, एक्सए लाइफ इंश्युरन्स, बीएआरसी इंडिया, बीसीएस टेक्नॉलॉजी, ब्लॅक रॉक, बार्कलेज शेअर्ड सर्व्हिस, कॅपिटल वन, सिटी बँक, क्रेडिट सुईस्से, क्रिसिल, सिबिल, सिटी कॉर्पोरेशन, क्युमिन्स इंडिया, डेलॅाइट, डॉ.रेड्डीज लॅब, दुनिया फायनांस, एलएलसी, आयबीएम, आयसीआयसीआय, अर्न्स्ट ॲण्ड यंग, इव्हेस्टनेट- योडली, फिको, गोल्डमन सॅच, एचसीबीसी टेक्नॉलॉजी ॲण्ड सर्व्हिस, जे.पी.मॉर्गन, केपीएमजी, महिंदा कॉमव्हिवा, मॅकिन्सी, मीडिया डॉट नेट, मेट्रो, मायक्रोसॉफ्ट, नारायणा ह्रदयालया, नॉव्हॅरटीस, निलसेन, पेट्रॅबाइट्स, कॉर्पोरेशन, रेडबस, रिलायन्स, सॅमसंग, स्टँडर्ड चार्टर्ड, टीसीएस ॲनॅलिटिक्स, टीसीएस इनोव्हेशन लॅब, युनायटेड हेल्थ ग्रुप, वालमार्ट लॅब, वेल्स फार्गो, झेड एस, झेनड्राइव्ह

करिअर संधी-) इकॉनॉमेट्रिशिअन, २)स्टॅटिशिअन, ३) रिसर्च ॲनालिस्ट, ३)बायोस्टॅटिस्टिअन, ४) बायोमेट्रिशिअन, ५) इपिडेमिनॉलॉजिस्ट, ६) डाटा सायंटिस्ट,  ) स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशिअन ,८) मेडिकल स्टॅटिस्टिशिअन, ९) अनेक खाजगी संस्था आणि शासकीय संस्थांना लोकसंख्या व इतर अशाच प्रकारच्या माहितीचे विश्लेषण करणे , निष्कर्ष काढणे यासाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज भासते. १०) राष्ट्रीय सुरक्षा संस्था, शस्त्रास्त्रांचे सांख्यिकीय विश्लेषण आणि त्याअनुंषगाने व्यूहनीतीच्या निर्धारणासाठी अशा तज्ज्ञांची मदत घेतात. ११) इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस या परीक्षेद्वारे, संघ लोकसेवा आयोगामार्फत वरिष्ठ पदांसाठी नियुक्ती केली जाते. १२) स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर अशा कनिष्ठ पदावर नियुक्ती केली जाते. १३) खाजगी क्षेत्रात विमा, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, गुणवत्ता नियंत्रण, या विषयांसाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज भासते. १४) वित्तीय कंपन्या आणि समभाग विक्री कंपन्यांमध्ये संधी मिळते. १५) अॅक्चुरिअल सायन्स या विषयात शिक्षण घेऊन विमा क्षेत्रात चांगले करिअर करता येते.

    प्रवेश प्रकिया

    या संस्थेच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रकिया दरवर्षी मार्च महिन्यात सुरु होते. मे महिन्यात आयएसआय (इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट) ॲडमिशन टेस्ट आयोजित केली जाते. याव्दारे    बी.मॅथ/बी.स्टॅट आणि एम.मॅथ/एम.स्टॅट – या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. या परीक्षेसाठी दोन पेपर असतात. पहिला पेपर हा बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचा असतो. दुसरा पेपर हा वर्णनात्मक असतो. बी.मॅथ/बी.स्टॅट प्रवेशासाठीच्या पेपरमधील प्रश्न १२ वीच्या गणितावर आधारित असतात. एम.मॅथ प्रवेशासाठीच्या पेपर मधील प्रश्न बी.एस्सी मॅथ (ऑनर्स) च्या स्तरावरील असतात.

या संस्थेची बी.स्टॅटिस्टिक्स आणि बी.मॅथ ही  पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना एम.मॅथ/एम.स्टॅट अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो.

    संपर्क- २०३, बॅराकपोर ट्रंक रोड, कोलकता- ७०००१८, दूरध्वनी- ०३३-२५७५२००१, संकेतस्थळ- www.isical.ac.in

०००

ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स हा एक वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम या संस्थेने सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम कोर्सेरा या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करता येतो.

०००

बिझिनेस ॲनिलिटिक्स-

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स हा अभ्यासक्रम इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिटयूट, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकता आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर या तीन अत्यंत महत्वाच्या आणि शैक्षणिक दृष्ट्या आघाडीच्या संस्थांनी एकत्र येऊन सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्रपणे चाळणी परीक्षा घेतली जाते. बिझिनेस ॲनॅलिटिक्स या तज्ज्ञांची सध्या फार मोठ्‌या प्रमाणावर गरज असून प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना मोठमोठ्या उद्योगसमूह, कॉपोरेट हाऊसेस, स्टार्टअप यामध्ये तत्काळ चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. अभ्यासक्रमाच्या कालावधीत तिनही संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. आयआयएम कोलकताव्दारे व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील ॲनॅलिटिक्स तंत्राच्या प्रत्यक्ष वापराचे ज्ञान प्रदान केले जाते. इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिटयूट मार्फत सांख्यिकीशास्त्र आणि मशिन लर्निंगचे ज्ञान प्रदान केले जाते. आयआयटी खरगपूर मार्फत ॲनॅलिटिक्स तंत्रज्ञान कौशल्यावर भर दिला जातो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लेखी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत गुणवत्ता यादित आलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. अंतिम निवडीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे गुण, शैक्षणिक कारकीर्द आणि कार्यानुभव या घटकांचा एकत्रित विचार केला जातो. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर अर्ज करु शकतो. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – नवी मुंबई, पुणे आणि नागपूर. संपर्क- पीजीडीबीए ऑफिस, विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर- ७२१३०२, दूरध्वनी-०३२२२-२८२३१२, संकेतस्थळ- http://www.pgdba.iitkgp.ac.in/ ईमेल- pgdba@vgsom.iitkgp.ac.in

सुरेश वांदिले