(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲल्पाइड न्युट्रिशन, मुंबई ही आतिथ्यशीलता आणि हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची संस्था. भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या, या संस्थेने कौशल्य विकासाला प्राधान्य देणारे काही पदविका अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी सहज आणि सुलभतेने मिळावी या अनुषंगाने या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर देणारे आहेत. या संस्थेकडे उत्तम अशी प्रयोगशाळा किंवा किचन आहे. आधुनिक उपकरणे आहेत. ही सर्व उपकरणे विद्यार्थ्यांना हाताळायला मिळतात.

पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश सूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थी विद्यार्थींनींना १२ वी नंतर, या क्षेत्रात यायचे असेल, त्यांनी या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या उमेदवारांनी १२ वीमध्ये इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते. या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. पदविका अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून आहे.

सर्व पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी दीड वर्षे आहे. यापैकी एक वर्षे संस्थेत, सैध्दांतिक अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यानंतर वेगळया कंपन्या/ औद्योगिक घटक यामध्ये प्रात्यक्षिक करावे लागते.

पदविका अभ्यासक्रम

() डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन- हा अभ्याक्रम केलेल्या उमेदवारांना हॉटेल रेस्टॉरेंट, फास्ट फूड आऊटलेट, रिसॉर्ट, रेल्वे खानपान सेवा, एअरलाइन्स खानपान सेवा, जलवाहतूक खानपान सेवा आणि तत्सम क्षेत्रे  या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते. या अभ्यासक्रमामध्ये पोषण मूल्ये, खाद्य पदार्थांचे मूल्य/किमती, स्वयंपाकशास्त्र, अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, आरोग्यदायक काळजी, वस्तू आणि पदार्थ, या विषय घटकांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमात वाणिज्यिक (कमर्शिअल) स्वरुपाच्या अन्न पदार्थांच्या पाककृती निर्मितीचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये सर्वप्रकारच्या भारतीय, चायनीज आणि कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थ्यांच्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय वेगवेगळया प्रकारच्या भाज्या, आणि मांस कापणे, फळे आणि भाज्या सजवून त्या ग्राहकांना देण्याचे प्रशिक्षण देऊन त्याचा सराव केला जातो. कोठार व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते.

(२) डिप्लोमा इन बेकरी ॲण्ड कन्फेक्शनरी- बेकरी उत्पादनाशी संबंधित विषयाचे सखोल ज्ञान या अभ्यासक्रमात दिले जाते. यामध्ये ब्रेडची निर्मिती, पॅस्ट्रीची निर्मिती, केक डेकोरेशन, चॉकलेट डेकोरेशन या विषय घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. शिवाय व्यवसाय/ स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, संगणकीय ज्ञान प्रदान केले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना बेकर्स, पॅस्ट्री शेफ, चॉकलेटिअर्स, डेझर्ट स्पेशॅलिस्ट अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

(३) डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हेरेजेस सर्व्हिस – या अभ्यासक्रमात अन्नपदार्थ आणि खाद्य-पेये सेवा क्षेत्रासाठी लागणारे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये अन्नपदार्थ सेवा, विविध पेय सेवा, अन्न आणि पेये नियंत्रण, स्वच्छता आणि आरोग्य, व्यवसाय संवाद संप्रेषण, रेस्टॉरेंट व्यवस्थापन, बार व्यवस्थापन आणि कार्यान्वयन या विषय घटकांचा समावेश आहे.

(४) डिप्लोमा इन हाऊसकीपिंग- या अभ्यासक्रमात आतिथ्यसेवा केंद्र (हॉटेल/ गेस्ट रुम/ निवासस्थाने इत्यादी) यांच्या दैनंदिन देखभालीची कार्यपध्दती, अंतर्गत सजावट, देखभाल- दुरुस्ती सेवा, स्वच्छता आणि आरोग्य, व्यवसाय संवाद संप्रेषण या बाबींचा समावेश आहे.

संपर्क संकेतस्थळ – ihmctan.edu

सुरेश वांदिले